कृष्णमूर्ती ज्योतिष


गुणवत्ता मोलाची

व्यक्तीचे नाव ‘अ’शिक्षण – जेमतेम 10 वी पर्यंत कौशल्य – कुठलचं कौशल्य नाही, उलट कामचुकारपणा व बेफिकीरवृत्ती, आळशी स्वभाव- भयानक स्वार्थी, थापाडया, फुशारकी करणे नोकरी- चांगल्या बडया कंपनीत भरपूर पगाराची नोकरी नशीबाची साथ- भरपूर, प्रचंड, खूपच एकंदर आयुष्यातील यश – भरपूर आर्थिक यश, योग्यतेपेक्षा खूपच अधिक.

व्यक्तीचे नाव – ‘ब’शिक्षण – बी.एससी. हुशार विद्यार्थी कौशल्य – अनेक विषयांच सखोल ज्ञान, ज्ञानपिपासू वृत्ती, अनेक गोष्टीत निपुणता स्वभाव- मदतीचा हात कायम पुढे, कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय, अति प्रामाणिक. नोकरी – लहानश्या कंपनीत जेमतेम पगाराची नोकरीनशीबाची साथ – जवळ जवळ नाहीच, अत्यल्प एकंदर आयुष्यातील यश- आर्थिक अपयश, योग्यतेपेक्षा खूपच कमी

तुमच्या आजुबाजुची माणसं एकदा आठवून बघा, तुमच्या कार्यालयातली, तुमची मित्रमंडळी, तुमचे शेजारी, तुम्हाला रोज भेटणारी माणसं, तुमच्या ओळखीचे लोक, तुमचे नातेवाईक, ह्या सगळयांच्याकडे एकदा नीट नजर टाका. ह्यामधल्या काही लोकांच्या बाबतीत तुम्हाला असं वाटेल की अरे, ह्या माणसाची योग्यता #क्षमता ही खरचं खुप आहे, ह्याने आत्तापर्यंत खर तर खूप प्रगती करायला हवी होती, पण, प्रत्यक्षात मात्र त्याची म्हणावी तेवढी प्रगती किंवा म्हणावं तेवढया उंचीवर तो माणूस पोचलेला नसतो. तर काही माणसांच्या बाबतीत तुम्हाला असं आढळेल की, अरे, ह्याला तर ह्याच्या योग्यतेपेक्षा खूपच यश मिळालय, खरं तर ह्याची तेवढी योग्यताही नाही पण, पठ्ठयाला बरच यश मिळालयं. एखाद्या माणसाची पत्रिका बघतांना असं लक्षात येतं की या माणसाची हुशारी, ज्ञान तसं काही फार नाही पण याला आयुष्यात खूपच छान यशं मिळणार आहे. तर काही पत्रिकांच्या बाबतीत असं लक्षात येत की, या माणसाची हुशारी, व्यवहार चातुर्य, विषयाचं ज्ञान आणि एकंदरच योग्यता ही खरचं खूप आहे, पण त्या मानाने याला आयुष्यात यश मिळणार नाही. तर काही वेळेला असंही लक्षात येत की, या माणसाची जेवढी योग्यता # क्षमता आहे त्याचप्रमाणात त्याला यश देखिल मिळणार आहे. ह्यावरुन असं लक्षात येतं की, पत्रिकेची गुणवत्ता ही दोन प्रकारची असते. पहिली म्हणजे त्या माणसाची योग्यता # म्हणजेच, त्या माणसाची बौध्दिक क्षमता, विषयाचं ज्ञान, कौशल्य, व्यवहार चातुर्य, नितिमत्ता, प्रामाणिकपणा, मेहनती वृत्ती, जिद्द, महत्वाकांक्षा वगैरे वगैरे आणि दुसरी म्हणजे त्याच्या पत्रिकेतील यशाची गुणवत्ता म्हणजेच त्याला नशिबानी दिलेली साथ. ह्यापैकी पहिल्या प्रकारची गुणवत्ता खूप असेल पण दुसऱ्या प्रकारची गुणवत्ता जर फारशी नसेल, तर ते बरोबर ठरणार नाही. तसचं जर दुसऱ्या प्रकारची गुणवत्ता असेल पण पहिल्या प्रकारची गुणवत्ता नसेल तर काही प्रमाणात का होईना पण जनंमानसात थोडीतरी निंदा नालस्ती होईलचं खरं बघितलं, तर एखाद्या व्यक्तीची जेवढी क्षमता, योग्यता असेल त्याच्या समप्रमाणातच त्याला यश मिळण हे सगळयानांच अपेक्षित असतं पण तसं घडतच असं मात्र नाही. यावरुन आपल्या असं लक्षात येईल की आयुष्यातील यशाचं समिकरण हे खालीलप्रमाणे आहे.

माणसाची योग्यता + नशिबाची साथ = आयुष्यातील यश

काही माणसं मात्र खरच खूप भाग्यवान असतात. त्यांची पहिल्या प्रकारची गुणवत्ता म्हणजेच बुध्दिमत्ता, कौशल्य, व्यवहार चातुर्य, ही तर अफाट असतेच पण त्याचबरोबर दुस-या प्रकारची गुणवत्ता म्हणजेच ‘नशिबाची साथ’ ही देखील प्रचंड प्रमाणात असते, अशा व्यक्तींना आयुष्यात भरघोस यश मिळतं. पण त्या वेळेला त्यांनी ‘विद्या विनयेन शोभते’ या उक्तीप्रमाणे जमिनीवर राहाणंच शोभून दिसतं. भारतातल्या एका प्रसिध्द गायिकेने एका मुलाखतीत म्हटलं होत की, ‘आमच्या सारखे चांगल्या आवाजाचे लोक कितीतरी असतील किंवा कदाचित आमच्यापेक्षा चांगले गाणारेही असतील पण आमच्यावर ईश्वराची कृपा आहे म्हणूनच आम्ही या पदाला पोहोचलो’ थोडसं विषयांतर होत असलं तरी अल्बर्ट आईनस्टाईनची एक गोष्ट इथे मला सांगाविशी वाटते प्रसिध्द शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन एकदा एके ठिकाणी कसलीतरी वाट पहात उभे होते. थोडयावेळाने, त्यांच्या बाजूला एक तरुण मुलगा येऊन उभा राहिला. त्याच्या हातात भौतिकशास्त्राची जाडजुड पुस्तकं होती, ती पाहून आईनस्टाईननी त्याला सहज विचारलं की, तू भौतिकशास्त्राचा अभ्यास करतोयस का ? त्यावर तो माणूस अत्यंत गर्वाने म्हणाला, ‘मी भौतिकशास्त्राचा डॉक्टरेट आहे’ आणि एक तुच्छ कटाक्ष टाकून त्याने आईनस्टाईनला विचारलं की, ‘तुम्ही कोण आहात ? ‘ त्यावर प्रसिध्द शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन म्हणाले ‘मी भौतिकशास्त्राचा एक विद्यार्थी आहे’

काही वेळेला पत्रिका दाखवून झाल्यानंतर काही व्यक्ती विचारतात की, ‘आमच्या पत्रिकेचं मुल्यमापन तुम्ही कसं कराल? १० पैकी द्यायचे झाल्यास, किती गुण तुम्ही आमच्या पत्रिकेला द्याल?’ ह्या प्रश्नाचं उत्तर हे आपण कुठल्या आधारावर मुल्यमापन करणार ह्यावर अवलंबून आहे. साधारणत: व्यक्तीच्या आयुष्यामधे स्वभाव, शिक्षण, नोकरी /धंदा, पैसा, आरोग्य, विवाह सौख्य आणि संतती या सात गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. यापैकी एका जरी गोष्टीत दारुण अपयश आलं तरी आयुष्याचा समतोल ढळू शकतो. बाकी सगळं चांगलं आहे पण संतती नाही, संतती असेल तर विवाहसौख्यात कमतरता, विवाहसुख उत्तम असेल तर प्रकृतीची अडचण, अशा अनेक गोष्टी असू शकतात. वरील सातही गोष्टी उत्तम असणा-या व्यक्ती ह्या थोडयाच असतात, ही सातही प्रकारची सुखं खूप उत्तम प्रमाणात मिळाली आहेत, अशा व्यक्ती थोडयाच असतात. पत्रिकेच्या अनुषंगाने मुल्यमापन करतांना ह्या सातही गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं सातपैकी कुठल्यातरी एकाच गोष्टीचा एकांगी विचार करुन मुल्यमापन करता येणार नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचं करियर अतिशय उत्तम आहे, त्या व्यक्तीने भरपूर पैसा, मानमरताब मिळवला आहे पण लग्नचं केलेलं नाही, किंवा त्या व्यक्तीला संसारसुख किंवा विवाहसौख्य शुन्य आहे, तर, अशा पत्रिकेच मुल्यमापन करतांना फक्त करियर उत्तम म्हणून अधिक मुल्यमापन करता येणार नाही कारण त्याच बरोबर संसारसुख शुन्य आहे. तुम्हाला काही अशा व्यक्ती देखील माहीती असतील की ज्यांनी आयुष्यात काहीही प्रचंड करुन दाखवलेलं नाही किंवा त्या प्रचंड कर्तृत्ववान नाहीत पण वरील सात महत्वाच्या गोष्टीचा विचार केला तर ती सातही सुख त्यांना ब-याच अंशी चांगल्या प्रमाणात मिळाली आहेत, म्हणजे आयुष्यात त्यांना जेव्हा ज्या गोष्टीची गरज असते तेव्हा ती गोष्ट त्यांना मिळालेली आहे, उदाहरणार्थ लहानपणी आई- वडिलाचं छत्र, नंतर शिक्षण, नंतर नोकरी / धंदा, पैसा, पुढे लग्न, बायको, मुलं-बाळं, पुढे निवृत्त जीवन असं सगळं ब-याच अंशी मिळालेलं आहे, त्यांच्या आयुष्यात तसे फारसे चढ-उतार आलेले नाहीत, त्यांच आयुष्य हे खूपसं ‘सरळ’ गेलेलं आहे. अर्थातच, अशा व्यक्तींच्या पत्रिकेला १० पैकी बरेच जास्त गुणं मिळतील. थोडक्यात सांगायच, तर इथे ‘गुण’ हा विषय असल्यामुळे, हे परिक्षेत पास होण्यासारखं आहे. एकाच विषयात 100 पैकी 99 गुणं आणि इतर विषयात ‘नापास’ असं होऊन चालत नाही, सगळयाच विषयात पास व्हावं लागतं तरचं सपूर्ण परिक्षा उत्तीर्ण होता येतं.

मघाशी मी म्हटल्याप्रमाणे, काही व्यक्तींची दोन्हीही प्रकारची गुणवत्ता, म्हणजेच ‘योग्यता’ आणि ‘नशीबाची साथ’, ह्या दोन्ही प्रकारची गुणवंत्ता ही उत्तम असते, त्यामुळे अशा व्यक्ती अर्थातच आयुष्यात खूप यश मिळवतात, अशा व्यक्तींच्या पत्रिका ‘अतिउत्कृष्ट पत्रिका’ या विभागात येतात. अशा व्यक्तींना फार काळ अपयश येत नाही. ह्या व्यक्ती जे जे करतात त्यात त्यांना यश येत जातं तर, ह्याच्या अगदी उलट, काही पत्रिका ह्या ‘निकृष्ट दर्जाची कुंडली’ ह्या विभागात येतात. ह्या व्यक्तींची दोन्हीही प्रकारची गुणवत्ता चांगली नसते. त्यांची योग्यता देखील नसते आणि ‘नशीबाची साथ’ देखील नसते.

स्वभाव, शिक्षण, नोकरी / धंदा, पैसा, आरोग्य, विवाहसौख्य आणि संतती या सात गोष्टीपैकी बहुतांश गोष्टीमधे अशा व्यक्तींना अपयश येतं. ‘अतिउत्कृष्ट पत्रिका’ आणि निकृष्ट पत्रिका’ अशी दोन्हीही प्रकारची माणसं आपल्याला आपल्या आजुबाजुला बघायला मिळतात.

साधारणत: ‘गुणवत्ता’ म्हटलं की आपल्याला फक्त त्या ‘माणसाची’ गुणवत्ताच दिसते पण त्याचबरोबर आयुष्यात यश मिळवण्यासाठी ‘पत्रिकेची गुणवत्ता’ ही देखील तितकीच महत्त्वाची बाब ठरते, हे हि लक्षात हवं शेवटी, ‘गुणवत्तेला पर्याय नाही’ हेच खरं, म्हणूनच, ‘गुणवत्ता मोलाची’

Astrologer अभय गोडसे,
http://www.abhaygodse.com