कृष्णमूर्ती ज्योतिष


पराधीन आहे जगती……

एका काळोख्यारात्री मुसळधार पावसात एक चिमणीचं पिल्लू थंडीने कुडकुडत एका झाडावर कसंबसं बसलेलं असतं, अगदी मरणासन्न अवस्थेत असतं. त्याचवेळेस तेथून विष्णूचं वाहन असलेले गरूडराज उडत जात असतात, त्यांना हया पिल्लाची खूप दया येते. त्यांच्या असंही मनात येतं की जर यमराजाची दृष्टी या पिल्लावर पडली तर ते नक्कीच याला नेतील म्हणून ते त्या पिल्लाला कुठेतरी दूरवर अशा ठिकाणी न्यायचं ठरवतात की, जेथे यमराजाची दृष्टी त्याच्यावर पडणार नाही. गरूडराज त्याला एका ऊचं अशा कडेकपारीत घेऊन जातात. तेथे त्याला एक सुरक्षित जागा बघतात आणि त्या जागी त्याला ठेवतात. तोच अचानक तिथे यमराज अवतरतात. गरूडराज चकित होतात आणि यमराजांना विचारतात की, तुम्हाला कसं कळलं की मी या पिल्लाला एवढया दूरवरच्या ऊंच आणि दुर्गम भागात घेऊन आलोय, तुम्ही बरोबर इथे कसे काय अवतरलात? यावर यमराज मोठयाने हसतात आणि म्हणतात की, अहो गरूडराज, या चिमणीच्या पिल्लाच मरण हे हयाच ठिकाणी लिहिलेलं होत, मला फक्त ही काळजी होती की त्या दूरवर असलेल्या झाडावरून हया पिल्लाला एवढया अवघड, ऊंच, दुर्गम अशा या भागात कोण आणणार, आणि ही माझी अडचण तुम्ही दूर केलीत. ही झाली पुराणातील एक कथा पण तात्पर्य हे की ‘नशिबाचे भोग’ हे कोणालाच चुकले नाहीत मग ते चिमणीचं पिल्लू असू दे किंवा मनुष्यप्राणी असू दे. नशिबाचे भोग भोगण्यासाठी आजुबाजुच्या गोष्टी, घटना, माणसं ही पुरक असतात. कित्येक वेळेला ज्योतिषाकडे पत्रिका दाखविण्यासाठी आलेली माणसं विचारतात की, ‘हे सगळं आमच्या नशिबी का?’ ‘आम्ही कोणाचं काय वाईट केलयं म्हणून आमच्या नशिबी हे भोग आहेत’. कित्येक वेळेला अगदी सुस्वभावी, पापभिरू माणसांच्या आयुष्यात ब-याच खस्ता असतात आणि अगदी वाईट स्वभावाची, अनेक पापं केलेल्या व्यक्ती मजेत असतात. हे असं का होतं? तर अर्थातच ‘पूर्वकर्मामुळे’. ‘पुर्वकर्म’ म्हणजे पूर्वजन्मास केलेलं कर्म, मग ते वाईट असो वा चांगले आपल्या हिंदू धर्मानूसार आपण असं मानतो की पूर्वकर्मानूसार हया जन्मात आपलं ‘नशीब’ ठरत असतं पेरालं तसं उगवेल ह्या उक्तीप्रमाणे पूर्वजन्मात ज्या कर्माच बिज पेरलं गेलं असेल त्याप्रमाणे ह्या जन्मात त्याची फळ मिळतात. चांगल्या कर्माचं बिजं असेल तर चांगलं फळ आणि वाईट कर्माच वाईट फळ मिळतं. मग तुम्ही म्हणालं, ते कसं काय? तर ते असं की, ह्या जन्मात ते जी फळ भोगत आहेत त्यातील बरीचशी ही त्यांच्या पूर्वकर्माची आहेत आणि त्यांच्या ह्या जन्मातील वाईट कर्माची काही फळ ही याचं जन्मात आणि काही फळं ही पुढील जन्मात भोगणार आहेत. जेव्हा एखादं मुलं जन्माला येतं तेव्हा त्याला त्याच्या आयुष्यात जे चांगले वाईट भोग भोगायचे असतात त्यानुसार पुरक ग्रहमान असतानांच जन्माला येतं. तुमच्यापैकी काही जणांच्या असं ही मनात येईल की, समजा, अगदी चांगलं ग्रहमान, चांगली वेळ वगैरे असं सगळं आधी बघून ठरवून ‘सिझेरीयन’ केलं तर मग काय होईल? वरवर अगदी हे सगळं ‘ठरवून’ केल्यासारखं वाटलं तरी सुध्दा ज्या मुलाच्या नशिबात चांगलं ग्रहमान असतं त्याच मुलाच्या बाबतीत हे घडतं, इतरांच्या बाबतीत नाही. दुसरं म्हणजे, एका ठराविक वेळेच्या किंवा दिवसांच्या आतचं ‘सिझेरीयन’ करावं लागतं, त्यामुळे त्याला देखील मर्यादा आहेतचं. आपल्याला अपेक्षित असलेलं ‘चांगलं ग्रहमान’ हे त्या वेळेच्या किंवा दिवसांच्या मर्यादेपर्यंत असायला हवं अन्यथा ते शक्य नाही.

जन्माला येणा-या मुलाच्या नशिबात जे भोग भोगायचे असतात ते भोगण्यासाठी पुरक वातावरण किंवा परिस्थिती असलेल्या घराण्यातचं ते मुलं जन्माला येतं. एखाद्या कलेचा वारसा असतो, तेव्हा ज्या मुलाच्या नशिबात त्या कलेत पारंगत होण्याचे योग असतात ते मुलं अशाच एखाद्या घराण्यात जन्माला येतं जिथे त्याला हा वारसा लहानपणापासूनच मिळतो. पत्रिकेच्या अनुषंगने सांगायचं झाल्यास कित्येक वेळेला आई – वडिलांच्या आणि त्यांच्या मुलांच्या पत्रिकेत साम्य आढळतं. एवढचं नाही तर संपूर्ण घराण्यामध्येच एकाचं प्रकारचे ग्रहयोग पत्रिकेत आढळतात. काही घराण्यात तर पिढयानंपिढया एखादी विशिष्ट घटना ही प्रत्येक पिढीत घडत असते. जसं प्रत्येक पिढित कोणातरी एकाचा घटस्फोट होणे, द्विभार्यायोग असणे, निपुत्रिक असणे, लग्न न होणे वगैरे वगैरे ही एक प्रकारची ‘अनुवंशिकताच’ म्हणावी लागेल. थोडक्यात काय, तर ज्या घराण्यात आपला जन्म होतो, जे आई – वडिल, भावंड, इतर लोक आपल्याना मिळतात ते आपले या जन्मातील भोग भोगण्यासाठी पुरक असेच असतात. अगदी त्या गरुडराजासारखे पण फक्त वाईट बाबतीतच नाही, तर चांगल्या बाबतीतसुध्दा जसं एखादं झाड उगवायला त्याला पुरकं असं हवामान लागतं, अगदी तसचं आपल्या आयुष्याचा वेलं बहरायचा असेल तर त्याला पुरक आणि पोषक हवामान हे लागतचं. काही वेळेला आपण बघतो की एखाद्या व्यक्तीला अगदी योग्य वेळेला योग्य माणसं भेटतात, त्या व्यक्तीला अगदी योग्य संधी मिळतात आणि ती व्यक्ती यशाच्या शिखरावर पोचते तर काही वेळेला अगदी योग्य वळणावर चुकीची माणसं भेटतात आणि एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याची धुळधाण होते. योग्य मार्गदर्शक, हितचितंक मिळण्यासाठी सुध्दा ‘नशिब’ लागतच. काही वेळेला काही व्यक्तींच्या नशिबात संसारसुख किंवा विवाहसौख्य नसतं, त्या व्यक्तीचं लग्न होत आणि नंतर संसारात रणांगण सुरु होतं. दोघांनाही असं वाटतं की ‘आपली निवड चुकली का?’ खरं तरं नवरा आणि बायको दोघांच्याही पत्रिकेत संसारसुख नसतं आणि म्हणूनच त्या दोघांचा ‘एकमेकांशी’ विवाह झालेला असतो. त्या दोघांच्याही नशिबात ते भोग भोगायचे असतात, कारण ‘घटस्फोट’ झाला तर तो दोघांचाही होतो, एकटयाचा नाही. ज्या मुलीच्या पत्रिकेत संसारसुख नसतं तिला नवरा हा देखील पत्रिकेत संसारसुख नसलेलाच मिळतो. मुलाच्याही बाबतीत तसच असतं. मुलीच्या पत्रिकेत संसारसुख नाही आणि मुलाच्या पत्रिकेत उत्तम संसारसुख असेल तर सहाजिकच त्यांचा एकमेकांशी विवाह होत नाही. असच दुसरं एक उदाहरण म्हणजे, काही वेळेला वडिल आणि मुलं याचं बिलकुल पटत नाही. तेथे सुध्दा ज्या वडिलांच्या नशिबात अपत्यांकडुन सुख नसतं अशाचं माणसाच्या घराण्यात अशी मुलं जन्माला येतात की ज्यांच्या नशिबात वडिलांकडून पाठिंबा नसतो. हाच नियम अगदी मालक – नोकर ह्या नात्यात देखील आहे. एक असाही विचार आहे की, पूर्वजन्मात आपला ज्या माणसांशी काही ना काही कारणांनी संबंध आलेला असतो त्याच व्यक्ती आपल्याला या जन्मात देखील वेगवेगळया रुपात भेटत असतात. पूर्वजन्मातील काही हिशेब पूर्ण करण्यासाठीच ही माणसं भेटत असावीत. कारण, जगातील सगळया लोकांना आपण कधीच भेटत नाही, काही मोजक्याच लोकांना आपण भेटतो, त्यापैकी काही जणांना आपण एखाद्या ठराविक काळातच भेटतो, नंतर पुढे आपल्याला त्या व्यक्तीचे तोंड देखील कधी दिसत नाही. तर काही व्यक्ती या आपल्याला अगदी थोडा वेळ भेटतात आणि त्यांची आपल्याशी चांगली मैत्री होते. काही लोक आपल्याला काही सबंध नसतांना, फारशी ओळख नसतांना, अगदी भरपूर मदत करतात. यांचा सबंध हा पूर्वजन्माशी असावा. काही लोकांना आपल्याला भेटण्याची खूप इच्छा असते पण भेटीचा ‘योग’ येत नाही, काही ना काही कारणाने त्या व्यक्तीला भेटणं होत नाही आजकालच्या email, chating आणि Telecommunication च्या युगात तर कित्येक व्यक्तीशी आपण फोनवर बोलतो, य्हफव्स् करतो, त्या व्यक्ती आपली कामं देखील करतात पण प्रत्यक्ष कधीच भेट होत नाही, या सगळयाचा संबंध हा पूर्वजन्मातील कर्माशी असावा.

हे सगळं वाचल्यावर काही व्यक्ती असंही म्हणण्याची शक्यता आहे की आम्ही आमच्या कर्तृत्वाने काहीही करु शकतो, आम्हाला कुठलीच गोष्ट अशक्य नाही, आम्ही आमच्या कर्तृत्वाने आमचं नशीब घडवू वगैरे वगैरे. कर्म जरुर करावं कष्ट जरुर करावेत पण प्रयत्नांनीच सगळया गोष्टी शक्य होत नाहीत कारण तसं जर असतं तर प्रत्येकजण सचिन तेंडूलकर, अमिताभ बच्चन, अंबानी किंवा बिल गेटस् झाला असता, पण तसं होत नाही, कारण माणसांच नशीब हे त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून नसून, माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या नशिबावर अवलंबून आहे.

ज्योतिषाला पत्रिका दाखवून, भविष्य विचारुन झाल्यानंतर जर काही वाईट असेल तर हे माझ्याच नशीबी का? या लोकांच्या प्रश्नाचं उत्तर दडलयं या पूर्वसंचितात त्याचबरोबर भविष्यात असण्या-या चांगल्या गोष्टीच आणि यशाचही मुळ दडलयं ते ही या पूर्वसंचितातच. तर, असा हा सगळा पूर्वसंचिताचा खेळ. आपल्या सारख्या सामान्य माणसाच्या हाती फक्त चांगली कर्म करण्याचा प्रयत्न करणं, एवढच उरतं आणि पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा………………..या गीताचा पुरेपुर अर्थ उमगतो.

Astrologer अभय गोडसे,
http://www.abhaygodse.com