कृष्णमूर्ती ज्योतिष


॥कालाय तस्मै नम:॥

बरेच वेळेला आपण एखादया गोष्टीसाठी प्रचंड मेहनत करतो, अगदी जीव तोडून मेहनत करतो, अहोरात्र् मेहनत करतो. पण तरीही ती गोष्ट आपल्याला मिळत नाही आणि आपण जेव्हा कंटाळून प्रयत्न सोडून देतो तेव्हा अचानक ती गोष्ट आपल्याला मिळते. या सगळयातून काय प्रतीत होत की ”नसिब’ से ज्यादा और वक्त से पहले कुछ नही मिलता’ ज्यांनी जुना वक्त चित्रपट पाहिला असेल त्यांना हे कळेल की ‘होत्याचं’ ‘नव्हतं’ व्हायला आणि ‘नव्हत्याचं’ ‘होतं’ व्हायला वेळ लागत नाही. थोडक्यात काय तर ‘काळ’ हा माणसाच्या आयुष्यातला महत्वाचा घटक आहे. एखादया गरीब कुंटुंबात जन्मलेला मुलगा हा पुढे जाउन मुख्यमंत्री होतो आणि एखादया गर्भजात श्रीमंतांच्या मुलांना पुढे आर्थिक चणचण भासते. एखादा दहावीपर्यंत अभ्यासात सर्वसाधारण असलेला मुलगा पुढे उच्च-शिक्षण घेतो आणि एखादा दहावीपर्यंत अभ्यासात अत्यंत हुशार असलेला मुलगा पुढे शिक्षणात गटांगळया खाताना दिसतो. काळानुसार लोकांची कामाची क्षेत्रं बदलतात. नातेवाईकांशी, मित्रांशी अगदी चांगले असलेले संबंध तुटतात. नवीन लोकांशी घनिष्ट मैत्री होते, वगैरे वगैरे…

तर एखाद्या व्यक्तिच्या जन्मपत्रिकेत ‘काळ’ हा घटक मुख्यत्वेकरून ‘महादशा अंतर्दशा’ या गोष्टीनुसार बघितला जातो. ‘महादशा’ म्हणजे मोठा काळ आणि ‘अंतर्दशा’ म्हणजे छोटा काळ. इथे कृपया ‘दशा’ या शब्दाचा अर्थ वाईट अवस्था असा न घेता फक्त ‘काळ’ एवढाच घ्यावा. सहाजिकच तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हा काळ कशावरून ठरतो? त्यातला वाईट काळ कुठला आणि चांगला काळ कुठला? हे सांगायचं झाल्यास असं सांगता येईल, की प्रत्येक ग्रहानुसार फक्त हर्षल, नेपच्यून आणि प्ल्यूटो सोडून त्या त्या ग्रहाचा विशिष्ट असा कालावधी ठरलेला आहे. इथे आधी एक मुद्दा सांगितला पाहिजे तो असा की, महादशांचे अनेक प्रकार ज्योतिषशास्त्रात आहेत. पण सांप्रत विशोत्तरी महादशा साधारण सगळे ज्योतिषी वापरतात. तर मघाशी म्हटल्याप्रमाणे, प्रत्येक ग्रहाला काही ठराविक कालावधी हा वाटून देण्यात आला आहे. म्हणजे शुक्र 20 वर्षे, रवि 6 वर्षे, चंद्र 10 वर्षे वगैरे वगैरे. अशा या सर्व महादशा मिळून 120 वर्षांच्या असतात. पण कुठली महादशा आधी येईल, आणि कुठली नंतर येईल हे ठरविण्यासाठी एक नियम आहे. तो असा की, व्यक्तीच्या जन्माच्या वेळेस चंद्र ज्या नक्षत्रात असेल, त्या नक्षत्राचा स्वामी आणि चंद्राचा उपनक्षत्र स्वामी हे जे दोन ग्रह असतील तिथपासून महादशा अंतर्दशेला सुरवात होते. तुम्ही म्हणाल की हे जरा अवघड वाटतंय. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास असं म्हणू की, समजा, तुम्ही भारत भ्रमंतीला निघाला आहात, आणि समजा तुम्ही तुमच्या प्रवासाची ‘सुरवात’ ही उत्तर भारतातून केलीत तर सहाजिकच ‘तामिळनाडू’ या दक्षिण भारतातील राज्यात तुम्ही उशीरा याल पण समजा, तुम्ही तुमच्या प्रवासाची सुरवातच दक्षिण भारतातून केलीत तर ‘तामिळनाडू’त तुम्ही लवकर पोहोचाल. महादशा अंतर्दशेच्या बाबतीतही अगदी असंच आहे. तुमची सुरवात कुठून होते, यावर पुढील महादशा, अंतर्दशा अवलंबून असतात.

काही व्यक्तींना काही ग्रहांच्या महादशा लवकर येतील तर दुस-या एखाद्या व्यक्तिला त्याच ग्रहांच्या महादशा उशीरा येतील, किंवा कदाचित येणारच नाहीत. विशोत्तरी महादशा या सगळया मिळून 120 वर्षांच्या असतात. सर्वसाधारण माणसाचं आयुष्यं हे 120 वर्षांचं नसतं. त्यामुळे काही महादशा ह्या एखाद्या व्यक्तीला संपूर्ण आयुष्यात येतच नाहीत. काही वेळेला आपण असं बघतो की एखाद्या व्यक्तीचा एखादा ग्रह हा खूप चांगला आहे, पण नेमकी त्या व्यक्तीला त्या ग्रहाची महादशा ही येतच नाही, किंवा खूप उशीरा येते… ह्यालाच म्हणायचं, त्या त्या व्यक्तीचं नशीब. वेळच्या वेळी सर्व महादशा येणं हे ही अत्यंत महत्त्वाचं ठरतं. एक गमतीशीर उदाहरण द्यायचं झाल्यास असं म्हणता येईल की, समजा एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक सुखास उत्तम असणा-या एखाद्या ग्रहाची महादशा ही वयाच्या 80 व्या वर्षानंतर किंवा वयाच्या पहिल्या वर्षी येऊन उपयोग नाही, तर ती योग्य वयातच आली पाहिजे. तसंच व्यक्तिच्या करियरसाठी उत्तम असणा-या ग्रहांची महादशा ही वयाच्या 20 ते 60 या वर्षांपर्यंतच आली पाहिजे. वयाच्या, 80 नंतर येऊन उपयोगाची नाही. किंवा वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत असून उपयोगाची नाही. ज्या व्यक्तीची पत्रिका उत्तम असते आणि सगळया महादशा ह्या योग्य वेळी येतात, तेच खरे ‘नशीबवान’ असतात.

काही काही वेळेला आपल्याला काही गंमतशीर उदाहरणं बघायला मिळतात, म्हणजे एखादी पन्नाशीला किंवा साठीला आलेली व्यक्ती एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन एम्.ए. करत असते. तर काही वयस्कर जोडपी ही आयुष्यभर एकत्र राहून वयाच्या उत्तरार्धात घटस्फोट घ्यायच्या विचारात असतात. मी ऐकलेलं एक उदाहरण फार गंमतशीर आहे. एका व्यक्तीचं लग्न झालं. पुढे त्यांनी घटस्फोट घेतला आणि पुढे काही काळानंतर त्या व्यक्तीचं घटस्फोट घेतलेल्या त्याच्या पत्नीशीच पुन्हा लग्नं झालं. या सगळयाचा अर्थ काय तर, योग्य वेळी न आलेल्या महादशा-अंतर्दशा.

एखादी गोष्ट कधी होईल? हे सांगण्यासाठी अंतर्दशेचा आधार घ्यावा लागतो. पण जन्मपत्रिका ही मुळात चांगली हवीच. जन्मपत्रिकेनुसार घडणा-या वाईट किंवा चांगल्या घटनांचा काळ सांगण्यासाठी आधी मूळात जन्मपत्रिका ती घटना दर्शवीत असायला हवी. ज्या गोष्टी जन्मपत्रिकेत दिसत नाहीत त्या ‘कधी होतील’, हे बघण्याला अर्थच नाही. मुळात आडात नाही, तर पोह-यात कुठून येणार? या म्हणीसारखं आहे. काही वेळेला एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत एखाद्या क्षेत्रात नाव मिळण्याचं दिसतं पण, प्रत्यक्षात मात्र बघितलं तर ती व्यक्ती त्या वेळेस वेगळया क्षेत्रात काम करत असते. हे का होतं? तर त्या व्यक्तीची त्या क्षेत्रासाठी असलेली महादशा आलेलीच नसते. ती महादशा पुढे जेव्हा येते तेंव्हा ती व्यक्ती त्या क्षेत्रात पुढे येते. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला असे किती नट माहीत असतील की जे पूर्वी कोणीतरी पोस्टात कारकून किंवा बस कंडक्टर होते, त्यावेळेस ते ‘नट’ नव्हते पण, आत्ता आहेत. तसंच कितीतरी उद्योगपती असे आहेत जे पूर्वायुष्यात अक्षरश: कोणीही नव्हते आणि नंतर ते एक यशस्वी उद्योजक झाले आणि त्याचं नाव सगळीकडे झालं.

एखादी घटना कधी घडेल हे सांगणं आणि त्या बाबतीत किती कालावधी चांगला अथवा वाईट आहे, हे सांगणं, हे दोन्हीही महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती नट होईल पण, किती काळ गाजवेल हे ही महत्त्वाचं ठरतं. आणि हे सगळं जन्मपत्रिकेतील यश आणि पुढे येणा-या महादशा अंतर्दशा यावर अवलंबून असतं. उदाहरण द्यायचं झालं तर, अमिताभ बच्चन हाही नट झाला. आणि कुमार गौरव हाही नट झाला. पण अमिताभ बच्चन हे आत्ताही काळ गाजवत आहेत, आणि कुमार गौरवचा पत्ताच नाही. एक चित्रपट गाजवणा-या भाग्यश्री पटवर्धनचं नाव सध्या कुठेच नाही. ‘किती वर्ष सातत्य राहील’ हे देखील महत्त्वाचं ठरतं. आणि हे अवलंबून असतं, पुढे अनुक्रमे येणा-या महादशा अंतर्दशांच्यावर!

तर अशा या महादशा अंतर्दशा व्यक्तीच्या आयुष्यात किती महत्त्वाच्या असतात हे आपण पाहिलंच. शेवटी काळ हा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा घटक ठरतोच, म्हणूनच ‘कालाय तस्मै नम:।’

Astrologer अभय गोडसे,
http://www.abhaygodse.com