कृष्णमूर्ती ज्योतिष


प्रश्नकुंडली- अचूक होकायंत्र

आपण जर ज्योतिषशास्त्राविषयी थोडं फार ऐकलं किंवा वाचलं असेल तर आपल्याला ‘प्रश्नकुंडली’ हा शब्द नक्कीच माहित असेल. ‘प्रश्नकुंडली’ म्हणजे एखाद्या विवक्षित प्रश्नाचे उत्तर बघण्यासाठीची कुंडली. मग तुम्ही विचाराल की ‘जन्मकुंडली’ आणि ही ‘प्रश्नकुंडली’ ह्यात फरक काय? तर जन्मकुंडली म्हणजे तुमच्या जन्मदिवशी, जन्मवेळेची व जन्मठिकाणाची कुंडली. प्रश्नकुंडली ही ज्या वेळेला प्रश्न विचारला जातो ती वेळ घेऊन केलेली असते. ह्यात परत पारंपरिक ज्योतिषपध्दतीनुसार, प्रश्न विचारला ती तारीख, वेळ, व ठिकाण घेऊन केलेली प्रश्नकुंडली असते तर ‘कृष्णमूर्ती ज्योतिष’ पध्दतीत तारीख, वेळ, ठिकाण व 1 ते 249 ह्यापैकी एक नंबर घेऊन केलेली असते. आणि ह्यात रूलिंग प्लॅनेटस् ला महत्त्व असते. ‘रूलिंग प्लॅनेटस्’बद्दल आपण पुढे चर्चा करूच.

तर आता प्रश्न उभा राहतो की प्रश्नकुंडलीच कशासाठी? जन्मकुंडलीची गरज का नाही? तर असं मुळीच नाही. जन्मकुंडलीचा उपयोग हा व्यक्तीच्या सर्वांगीण आयुष्याचे विवरण देण्यासाठी केला जातो. म्हणजे त्याचा नोकरी/धंदा, पैसा, संततीसुख, संसारसुख इत्यादि इत्यादि. पण काही वेळेला काही प्रश्न इतके तात्कालीन असतात की त्या प्रश्नाचे उत्तर जन्मकुंडलीत शोधणं हे खूपच अवघड व किचकट असतं. अशा वेळेला ‘प्रश्नकुंडली’चा अतिशय सुंदर उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ एखादी हरवलेली वस्तू मिळेल का? आता या प्रश्नाचं उत्तर जन्मकुंडलीत शोधायला गेलं तर खूपच अवघड व किचकट आहे कारण, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अशा कित्येक गोष्टी हरवतात, त्यातल्या काही मिळतात तर काही मिळत नाहीत. त्या वेळेला ‘प्रश्नकुंडली’ फार उपयोगाची ठरू शकते.

‘प्रश्नकुंडली’ची आवश्यकता ही काही विशिष्ट कारणासाठी भासू शकते. जर एखाद्या व्यक्तीला त्याची जन्मवेळच माहीत नसेल, अगदी अंदाजाने सुध्दा माहीत नसेल तर काय? काही व्यक्तींना तर त्यांची नक्की जन्मतारीख सुध्दा माहीत नसते. अशा वेळेला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास ‘प्रश्नकुंडली’शिवाय मार्ग नसतो.

आणखी एक मुद्दा हा की, प्रश्नकुंडलीसाठी प्रश्न विचारला तीच वेळ का घ्यायची? तर उत्तर असं की कुठलीही व्यक्ती जेंव्हा एखादा प्रश्न एखाद्या वेळी विचारते, तेंव्हा त्या वेळेचा धागा पकडूनच त्या व्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर देता येतं. एखादी व्यक्ती ज्या वेळेला एखादा प्रश्न विचारते, त्या वेळेला अर्थ असतो, कारण ‘त्या’ वेळेला ती व्यक्ती तो प्रश्न विचारण्यासाठी उद्युक्त झालेली असते, आणि त्या वेळेनुसारच त्याचं उतर देता येतं. त्यामुळे त्या वेळेला खूपच महत्त्वं असतं.

‘कृष्णमूर्ती पध्दती’त आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणेज, ‘रूलिंग प्लॅनेटस्’. प्रश्नकुंडलीच्या रूलिंग प्लॅनेटस् ना खूपच महत्त्व असतं. रूलिंग प्लॅनेटस् म्हणजे, लग्नराशी स्वामी, चंद्र नक्षत्र स्वामी, चंद्र राशी स्वामी व वाराचा स्वामी. रूलिंग प्लॅनेटस् हे घटनेसंबंधी खूप गोष्टी दर्शवितात. विचारलेल्या प्रश्नाविषयी आणि त्याच्या उत्तरासंबंधी अधिक माहिती मिळते. रूलिंग प्लॅनेटस् वरून विचारलेला प्रश्न हा नक्की कोणत्या स्वरूपाचा आहे, तसेच त्या प्रश्नाचे उत्तर देताना रूलिंग प्लॅनेटस् चा विचार करावाच लागतो. घडणारी घटना ही नेमक्या कोणत्या स्वरूपाची असणार आहे, याचा खुलासा देखील रूलिग प्लॅनेटस् वरून होतो. ‘प्रश्नकुंडली’ संबंधातली काही उदाहरणे मी माझ्या ‘पत्रिकांच्या अनुभवाविषयी’ ह्या लेखात दिलेली आहेतच.

‘प्रश्नकुंडली’ संदर्भात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘प्रश्नकुंडली’ प्रश्नकर्त्या व्यक्तीची स्वत:ची कुंडली आहे, असे मानणे. उदाहरणार्थ ‘अ’ आणि ‘ब’ ह्यांच्यात एखादी स्पर्धा असल्यास आणि त्यातील कोण जिंकेल असा प्रश्न असल्यास, पहिल्यांदा प्रश्नकर्ता हा कुठल्या बाजूचा आहे, ते विचारावे लागेल. समजा तो जर ‘अ’च्या बाजूचा असेल तर ती प्रश्नकुंडली ‘अ’ची आहे, असं धरून उत्तर द्यावं लागेल. जर त्या पत्रिकेत प्रतिस्पर्धी जिंकेल असं उत्तर असेल तर सहाजिकच ‘ब’ जिंकेल पण प्रश्नकर्ता हा ‘ब’च्या बाजूचा असेल तर ‘अ’ जिंकेल. म्हणून प्रश्नकर्ता कुठल्या बाजूचा आहे हे आधी निश्चित करणं महत्त्वाचं आहे.

प्रश्नकुंडलीसाठी प्रश्नाचे स्वरूप ही अतिशय मौलिक बाब ठरते. कुठलाही प्रश्न हा नेमका असावा. उदाहरणार्थ, ‘मी परिक्षेत पास होईन का?’, आणि ‘मी मेरीटमध्ये येईन का?’ हे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत. किंवा ‘एखादी विवक्षित ऑर्डर मला मिळेल का?’ आणि ‘मला ऑर्डर मिळेल का?’ हे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत. पहिल्या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असू शकेल पण दुस-याचे ‘हो’ असू शकेल. त्यामुळे ‘नेमका’ प्रश्न काय आहे, याला खूप महत्त्व आहे. ढोबळ प्रश्न असू नयेत. जसे, ‘माझ्या परिक्षेसंदर्भात काय होईल?’ ढोबळ प्रश्नांमुळे ठाम उत्तरे देणे शक्य होत नाही. ज्या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ किंवा ‘नाही’ असे ठामपणे देता येते असे प्रश्न असावेत. नंतर पुढे घटनेचे विवरण देता येते पण प्रश्न हा ‘नेमका’ हवा. ‘जन्मकुंडली’चं महत्त्वं हे अनन्यसाधारण आहे. पण ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तिथे ‘प्रश्नकुंडली’चा विचार हा करावाच लागतो. काही काही वेळेला जन्मकुंडलीवरून एखादं भाकित सांगितलं तरी त्याचा ताळा करण्यासाठी प्रश्नकुंडली सुध्दा बघावी लागते. ‘प्रश्नकुंडली’ आणि विशेषत: रूलिंग प्लॅनेटस् हे आपण सांगितलेले भाकित बरोबर आहे का?, हे उकलण्यास सुध्दा मदत करतात. तर अशी ही ‘प्रश्नकुंडली’. खूपच उपयोगी आणि योग्य मार्गदर्शनपर ठरते.

Astrologer अभय गोडसे,
http://www.abhaygodse.com