कृष्णमूर्ती ज्योतिष


ग्रहमालेतील लढवय्या सेनापती – मंगळ

सोलापूर जिल्ह्यातल्या एका छोटया खेडयातल्या एका शेतात २ वर्षाचा विशाल आणि त्याचा ७ वर्षाचा भाऊ तुषार खेळत होते. त्यांचे आई-वडील दुरवर शेतात काम करण्यात मग्न होते. खेळता खेळता २ वर्षाचा विशाल अचानक विहिरीत पडला. तुषारच्या हे लक्षात आल्यावर त्याने क्षणाचाही विलंब न करता विहिरीत उडी मारली आणि विशालला मृत्युच्या दाढेतून परत आणलं. ७ वर्षाचा तुषार नुकताच पोहायला शिकत होता तरी देखील त्याने जीवाची पर्वा न करता धडाडी दाखवली. त्यावर्षी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी तुषारचं नाव घोषित करण्यात आलं. तुषारच्या धडाडीचं सगळीकडे कौतुक करण्यात आलं. ही धडाडी आणि हिंमत देणारा ग्रहमालेतील ग्रह म्हणजे, अर्थातच ‘मंगळ’.

मंगळाच्या अखत्यारीत धडाडी, हिंमत, बंड, अन्यायाला प्रत्युत्तर, शत्रुचा पाडाव, कडवेपणा, कट्टरपणा अशा अनेक गोष्टी येतात. मंगळप्रधान व्यक्तींमध्ये या गोष्टी अगदी ठासून भरलेल्या असतात. उदाहरणच द्यायची झाल्यास महाराष्ट्रात मराठी माणसाला मान मिळवून देणारे बाळासाहेब ठाकरे, मराठेशाहीची स्थापना करणारे महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराज, स्वातंत्र्यासाठी झटलेले जहाल स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, राजगुरू, चाफेकर बंधु, इथपासून ते गांधीजींचा वध करणारे नथुराम गोडसे, अगदी आत्ताच्या काळातले ‘आक्रमक’ अभिनयासाठी प्रसिध्द असलेले नाना पाटेकर वगैरे ह्या सर्व मंगळप्रधान व्यक्ती होत. जागतिक पातळीवरचे सगळे हुकूमशहा जसे हिटलर, मुसोलिनी, सद्दाम हुसेन, परवेज मुर्शरफ, इथंपासून ते आतंकवादी ओसामा बिन लादेनपर्यंत सर्व व्यक्ती ह्या देखील मंगळाच्याच अधिपत्याखाली येतात.

ज्योतिषशास्त्रा मध्ये ज्या दोन राशी मंगळाच्या अधिपत्याखाली येतात, त्या म्हणजे, मेष व वृश्चिक. ह्या दोन्हीही राशी जरी मंगळयाच्याच अधिपत्याखाली येत असल्या तरी ह्या दोन्ही राशीत मंगळाच्या गुणधर्मांची वेगवेगळी छटा पहायला मिळते. प्रत्येक ग्रहाला एक धनं आणि एक ऋण अशा दोन बाजु असतात. यापैकी मेष राशीमधे मंगळाची धनं बाजु पहायला मिळते आणि वृश्चिक राशीत मंगळाची ऋणं बाजु पहायला मिळते. ‘मेष’ राशीमधे मंगळाच्या महत्वाकांक्षी वृत्ती, अन्यायाविरूध्द लढा, रोख-ठोक वृत्ती, नियमांचे पालन इत्यादी गोष्टी पहायला मिळतात तर वृश्चिक राशीत मंगळाच्याच हट्टी, दुरग्राही, टोचून बोलणे, मार्मिक बोलणे, मान-अपमान, सुड घेणे इत्यादी गोष्टी पहायला मिळतात. मात्र ह्याचा अर्थ सरधोपट ‘मेष’ राशीची माणसं चांगली आणि वृश्चिक राशीची वाईट, असा मात्र मुळीच घेऊ नये कारण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव हा पुर्णत: राशीवरून ठरत नाही तर त्यासाठी त्या व्यक्तीच्या पत्रिकेतील लग्न रास, लग्नस्थानाचा उपनक्षत्र स्वामी इत्यादी अनेक गोष्टी अभ्यासाव्या लागतात.

मंगळप्रधान व्यक्ती मुळातच स्वतंत्र बाण्याच्या, प्रचंड महत्वाकांक्षी आकाशाला गवसणी घालण्याची इच्छा बाळगणा-या अशा असतात त्यामुळे बरेचवेळेला अशा व्यक्ती नोकरी पेक्षा स्वतंत्र व्यवसाय करण्यास जास्त इच्छुक असतात किंवा अशा व्यक्तींना नोकरीत स्वतंत्र्या हवं असतं कुणाच्या हाताखाली काम करणं त्यांना नको वाटतं, स्वत:च्या योजना राबविण्यास रस असतो, स्वत:च वेगळेपण सिध्द करायचं असतं. वगैरे वगैरे. समुहात मिळून मिसळून काम करण्यापेक्षा समुहावर अधिकार गाजविण्याची इच्छा असते. आपण पेक्षा मी ला प्राधान्य असतं तु तुझ बघ, माझं मी बघेन अशी वृत्ती असते. ह्या सगळयामुळेच लग्नाच्या वेळेला पत्रिका बघताना, शक्यतो नवरा-बायको दोघांचीही रास मेष किंवा दोघांचीही रास वृश्चिक असं असु नये किंवा एकाची रास मेष व दुस-याची वृश्चिक असं देखील शक्यतो असु नये. मंगळ ह्या ग्रहाचा सगळयात जास्त राग मंगळ असणा-या मुलांच्या आई वडीलांना येत असावा कारण मंगळ असणा-या मुलीच्या पालकांना सगळीकडून नकारघंटाच येत असते. त्यात पुन्हा मंगळ सौम्य आहे की तीव्र आहे हा मुद्दा असतोच. अनेक मुलींचे पालक यामुळे हैराण झाले असतील. वास्तविक पाहता, एखाद्या मुलीला किंवा मुलाला मंगळ आहे किंवा नाही ह्यापेक्षा त्यांच वैवाहिक आयुष्य कसं आहे, दोघांचे स्वभाव जुळतील का? अशा अनेक गोष्टी पाहणं महत्वाच ठरतं (पत्रिका मेलन हफाभ्ळ हफष्व्क्रल्) यासाठी माझे ऋणानुबंधाच्या गाठी आणि शुभमंगल पण सावधान हे मागील लेख वाचावेत) असं असुन देखील अजुनही अनेक ज्योतिषी आणि पालक देखील मंगळ आहे किंवा नाही या गोष्टीवर अडुन बसलेले बघायला मिळतात.

मंगळप्रधान व्यक्तींच्या बाबतीत आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या व्यक्तींच्या अंगात भरपूर ताकद असते. शारिरीक क्षमतेची कामं हे लोक सहजपणे करू शकतात. अशा व्यक्ती काटक प्रकृतीच्या देखील असतात. मंगळप्रधान व्यक्तीची हाडं व स्नायुदेखील बळकट असतात. मंगळाच्या अधिपत्याखाली येणारी क्षेत्रं म्हणजे इंजिनियरींग क्षेत्र, कंप्युटर हार्डवेअर क्षेत्र, सिक्युरीटी सव्र्हिसेस, पोलीस, मिल्ट्री खातं, अशी अनेक आहेत. मंगळाच्या अधिपत्याखाली ज्या शारिरीक व्याधी येतात त्या म्हणजे ऍसिडीटी, ताप, उष्णतेचे विकार, अति तिखट खाण्यामुळे होणा-या व्याधी जसं अल्सर, मुळव्याध इ. जिभेवर जेथे तिखट पदार्थांची चव कळते, तो भाग देखील मंगळाच्याच अधिपत्याखाली येतो. तसंच ब-याचशा मंगळप्रधान व्यक्तींच नाक हे तरतरीत व सरळ आढळतं. मंगळाबद्दल सांगण्यासारख्या इतरही अनेक गोष्टी आहेत जसं खून, मारामा-या, घातपात ह्या गोष्टी मंगळाच्या अधिपत्याखाली येतात. आणि मंगळाचा रंग ‘लाल’ मानतात. तुम्ही जर जगात नीट बघितलतं तर तुमच्या लक्षात येईल की जगात सर्वत्र लाल रंगाचा अर्थ ‘सावधान’ किंवा ‘धोका’ या अर्थानेच रूढ आहे. ‘लाल’ सिग्नल म्हणजे थांबा, विजेच्या ट्रान्सफॉर्मर जवळ असलेली ‘धोका’ ही पाटी देखील लाल रंगातच असते. रक्तपात देखील मंगळाच्याच अधिपत्याखाली आणि रक्ताचा रंग देखील ‘लाल’च असतो. एखाद्या वाहनाच्या मागील बाजुस असलेल्या ‘टेल लॅम्पला’ देखील ‘लाल’ रंगाचीच काच असते तसच अवजड वाहनांच्या मागील बाजुस असलेल्या सामानाला देखील ‘लाल’ रंगाचच फडकं गुंडाळलेलं असतं. ‘काम चालु, वाहने सावकाश हाका’ ह्या रस्त्यावरच्या पाटी शेजारी देखील ‘लाल’ झेंडे लावलेले असतात. पोलिस, रूग्नवाहिका, अग्निशमन दलाच्या गाडयांचा रंग देखील ‘लाल’च असतो. अशी एक भली मोठ्ठी यादीच तयार होईल.

ग्रहमालातील प्रत्येक ग्रहाचे विशिष्ट असे काही गुणधर्म आहेत. त्यांपैकी, मंगळाचे वर उल्लेखिलेले सर्व गुणधर्म हे एखाद्या लढवय्या सेनापतीसारखेच भासतात. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे जरी खरं असलं तरी काही कामं करायला युक्तीबरोबरच शक्ती देखील लागतेच आणि म्हणूनच सर्व शक्तीनिशी लढा देणा-या या ग्रहमालेतील लढवय्या सेनापतीला माझा कडक सलाम!.

Astrologer अभय गोडसे,
http://www.abhaygodse.com