राधाची डायरी


राधाची डायरी – पान ८

आयू मस्त गरम गरम पोळया करत होती..!! छान तुपाचा वास येत होता…!
पुण्याच्या घरी गॅस होता…. इथे हॉट प्लेट आहे…!! आत्ता कुठे आयूला छान पोळया यायला लागल्या आहेत… कडक होत नाहीत…!!

हात पाय धुवून पट्कन जेवायला बसले….गरम तूप पोळी आणि आयुच्या हात चा जॅम….!!
मला खुदुखुदू हसू येत होतं…आयूनी विचारलं…’काय राधू?? आज जेवताना कुरकुर नाही? हसू येतंय चक्कं? काय झालं गं?’
मी तोंडावर हात दाबून हसतच होते…
मला एक नवा शब्द सापडला होता…. ‘वॉबली’….!!
सॉलिड मजा आली शाळेत…. माझा एक दात हलत होता आणि त्यातून रक्त आलं शाळेत! एलननी बघितलं आणि म्हणाली,’ तुझ्या दातातून रक्त येतं आहे..’ तर मी म्हणाले, ‘हो, तो हलतो आहे…पडणार आहे… सैल झाला आहे…. मी हे सगळं तिला इंग्लिश मधे सांगितलं हं….!!!
तर तोंडाचा चंबू करुन ती म्हणाली.. ओह… इट्स वॉबली…..!!!
मला इतका आवडला तो शब्द….. !! वॉबली….. वॉबल….. बबल…. वॉवल…!! हलणारा दात तोंडात घेऊन ‘वॉबल’ शब्दाशी खेळायला सॉलिड मजा येत होती…!!
आयूला सगळं सांगितलं….
मग रात्री आयूनी टूथ फेअरी ची गोष्ट सांगितली…. !! इथे इंग्लंड मधे दातांची काळजी घेणारी परी असते म्हणे… दात हलायला लागला, की ती आपल्यावर नीट लक्ष ठेवते. आपण दात मुदद्दाम हलवत नाही ना? जिभेनी खेळत नाही ना? उपटून काढत नाही ना?
दात पडला की रात्री तो उशीखाली ठेवायचा… मग रात्री परी येते.. दात घेऊन जाते… आणि खर्च करायला एक पाउंड देऊन जाते…दात पडला की आपण मोठे होतो ना…. थोडेसे…!! मग आपल्याला खर्च करायला पैसे देऊन जाते…!!
सॉलिड की…. पुण्यात नसते दातांची परी…. तिथे दातांचे डॉक्टर असतात…!!
वॉबली दाताचा विचार करतच झोपले….
परी कडून पैसे मिळवायचेच असं ठरवलं होतं… झोपेत कधी कधी हळूच तोंडात जाणा-या अंगठयाला बजावलं होतं… की माझ्या वॉबली दाताला दुखेल… आणि परीला आवडणार नाही… त्यामुळे अंगठा तोंडात जाऊ द्यायचा नाही….!!!
दात जास्त जास्त हलायला लागला… आता परीकडून नक्की मिळणा-या पैश्यात काय घ्यायचं याशिवाय मला काही सुचत नव्हतं….आयूबरोबर सुपर स्टोअर मधे गेले की मी सारखी वस्तूंच्या किंमती बघत होते…. कधी एकदा तो वॉबलसिंग पडतो आहे असं झालं होतं मला…
सकाळी उठले…. दात घासायला गेले…. तर वॉबली दात गुल….!!! नव्हताच तोंडात….. म्हणजे?? पडला??
मी गादी शोधली…. पांघरूण उलटं केला…. पण माझा पडलेला दात कुठेच नव्हता….!!
बहुतेक झोपेत अंगठा तोंडात गेला…. आणि त्याबरोबर दात ही….!!!
आता उशीखाली काय ठेऊ मी? दातांची परी ही नाही… आणि पैसे ही नाहीत….!
मला खूप वाईट वाटलं…. सगळा मूड गेला….!! शाळेत एलन विचारेल… काय सांगू मी?
रात्री दात घासायला गेले… तर माझ्या ब्रश ला पेस्ट लाऊन ठेवली होती….. आणि एका वाटीत एक पाउंड….!! छोटया चिठ्ठीवर लिहिलं होतं…. विथ लव, फ्रॉम दाताची परी….!!!
हुर्रे…..!!

– मधुरा डहाणूकर

मधुरा डहाणूकर ह्या मराठी रंगभूमी, दूरदर्शन मालिकां मधील प्रसिध्द अभिनेत्री आहेत. साहित्य आणि कलेचा वारसा लाभलेल्या मधुरा डहाणूकर पुण्याच्या ‘चिल्ड्रन फिल्म सर्कल’ च्या संस्थापक कार्यकर्त्या आहेत.