राधाची डायरी


राधाची डायरी – पान ११

रात्री स्वप्नात ही तेच आले होते…. सावरकर….!! आयूने काल गोष्ट सांगितली ना काल….! समुद्रकिना-यावर गेलो होतो दोघी… मी वाळूत खेळत होते.. तर एकदम म्हणाली, “राधू, ये गोष्ट सांगते..!” मग आयूबरोबर वाळूत लोळून गोष्टीचा सॉलिड कार्यक्रम…! हातातल्या काडीने वाळूत रेघा मारत मी गोष्ट ऐकत होते..! आयूने सावरकरांची सगळी गोष्ट सांगितली…. त्यांच्या लहानपणापासून त्यांना तुरुंगात टाकलं तिथपर्यंत सगळं… आणि समुद्रात मारलेली उडी पण…!! त्यांना तुरुंगात असताना खूप छळलं, कसं वागवलं वगैरे सगळं…मला तर ऐकूनच रडू येत होतं…बैलासारखं जुंपलं होतं म्हणे…

रात्री झोपताना वाटलं किती दुष्ट होती ही इंग्रज लोकं…आयू म्हणत होती की भारतावर त्यांनी राज्य केलं…आपल्या लोकांना छळलं.. तुरुंगात टाकलं.. गोळ्या घातल्या… मारलं…! आयू हे ही सांगत होती की या सगळ्या वाईट गोष्टींबरोबर त्यांनी चांगलं ही केलं आहे..रेल वे… पोस्ट ऑफिस, पूल, युनिव्हर्सिटी, धरणं….माझ्या डोक्यात एकच…. इंग्रज दुष्ट लोक आहेत… !!
शाळेत ही मी तोच विचार करत होते…
एलन ला विचारलं,”तू इंग्रज आहेस का? म्हणजे इंग्लिश आहेस का?”
तर म्हणाली, ” नाही, मी वेल्श आहे.. (म्हंजे??? आयू ला विचारायला हवं…!) पण माझी घट्ट मैत्रिण इंग्लिश नाहीए हेच सॉलिड वाटलं…!! बरं झालं….!! नाहीतर मला तिच्याशी चांगलं वागता नसतं आलं….!! बिचारे सावरकर…!!
मला बोलावलं होतं म्हणून एलन च्या आजी आजोबांकडे गेले होते… तेव्हाही वाटलं… हे आजोबा ‘इंग्लिश’ असतील??
तिथे जातानाच गाडीत समजलं की ते भारतात होते खूप वर्ष”….. सॉलिड… म्हणजे.. जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं तेंव्हा..!!!!
आता मला बघायला मिळेल की दुष्ट इंग्लिश माणसं कशी असतात ….!!!
त्यांच्या घरी पोचलो… छान बाग होती दारात… आणि गुलाबाची छान झाडं…! एलन चे आजोबा आम्हाला घ्यायला दारात आले… मोठा मिश्या होत्या त्यांना… गाल भरून..!! मला पाहून म्हणाले,” इंडियन गर्ल…!! नमस्ते, खेसी हो..?” सॉलिड … ‘लगान’ मधल्या त्या दुष्ट इंग्लिश माणसासारखं हिंदी बोलत होते…!!
मला जवळ बसवून घेतलं… एका कपाटातून काय काय काढून दाखवत होते… भारतात काढलेले फोटो, हत्तीच्या दातांच्या वस्तू, काश्मिर मधली पर्स, डब्या….!!
आणि काय काय सांगत होते… ‘सिमल्याला होतो तेंव्हा कसं होतं, त्यांच्याकडे काम करणारी माणसं.. वाळ्याचे पडदे… मसाले.. देवळं … आणि हिमालय…!!!
त्यांचं असं म्हणणं होतं की भारत सॉलिड देश आहे…!!तिथली माणसं, डोंगर, समुद्र, जेवण, खूप छान आहे…. आणि ते खूप नशिबवान आहेत की त्यांना भारतात रहायला मिळालं…!! ऑ….!! इंग्लिश…!!! आमच्या देशावर राज्य केलं…. !!!
घरी येताना मी गप्प…!!
आयूनी खूप विचारलं…. की ‘काय झालं…?’
मग रात्री जेवण झाल्यावर तिला सगळं सांगितलं… की काय काय म्हणाले ते आजोबा….. आणि सांगून टाकलं.. की ते इंग्लिश आहेत.. पण दुष्ट नव्हते…
“पण आयू..? इंग्लिश वाईट असतात ना? त्यांनी राज्य केलं आपल्या देशावर… छळलं आपल्या लोकांना…!! सावरकरांना….!!एलनचे आजोबा इंग्लिश आहेत…. मग ते कसे चांगले?? आणि भारताबद्दल चांगलं बोलत होते… कसं काय गं?”
आयू हसली,आणि माझ्या कपाळाची पापी घेउन म्हणाली, ” उद्या सकाळी सांगेन हं? झोपा आता….!!! गुड नाईट”
दिवा बंद करताना म्हणाली, ‘ वेडू आहे पोर माझी….विचार करायला लागली आहे…..!!’
मी झोपेत ऐकलं… पण असं का म्हणाली ते नाही कळलं…!!

– मधुरा डहाणूकर

मधुरा डहाणूकर ह्या मराठी रंगभूमी, दूरदर्शन मालिकां मधील प्रसिध्द अभिनेत्री आहेत. साहित्य आणि कलेचा वारसा लाभलेल्या मधुरा डहाणूकर पुण्याच्या ‘चिल्ड्रन फिल्म सर्कल’ च्या संस्थापक कार्यकर्त्या आहेत.