राधाची डायरी


राधाची डायरी – पान ४

आयू जिथे अभ्यास करायला जाते, ती युनिव्हर्सिटी, म्हणजे तिची शाळा, खूप म्हणजे खूपच मोठी आहे. खूsssप मोठी!
मी पुण्यात संध्याकाळी ज्या ग्राऊंडवर खेळायला जाते तशी शंभर ग्राऊंडस् मावतील त्यात!
खूप झाडं आहेत, सगळीकडे हिरवळ आहे, हिरवीगार शाळा, कसली मजा!!!
आणि आयू सांगत होती, की समुद्रपण आहे जवळच!
किती छान आहे आयूची युनिव्हर्सिटी – सगळीकडे हिरवळ- मस्त लोळायला!
आणि जवळच समुद्र – मऊ वाळूत खेळायला!!
आयूच्या ऍडमिशनचं काम करायचं होतं. ती आणि मी आलो होतो. ती भराभर चालत होती, आणि मी तिच्या पाठीवरच्या सॅकचा एक पट्ट धरून तिच्या मागे पळत होते. माझ्या हातात माझी बबडी बाहुली होती.

कसल्या कसल्या सॉलिड गाडया दिसत होत्या! ओळीत पार्क केलेल्या, त्यांच्या त्यांच्या आखून दिलेल्या चौकोनात!
आणि कॅन्टिनच्या बाहेरही कचराच नव्हता, कुठेच नाही!! कचरा टाकायला मोठे मोठे डबे ठेवले होते सगळीकडे.
तिथून जाताना मी खिशातला चॉकलेटचा कागद त्यात टाकला. आणि बबडीला बजावलं, ‘बबडे इथे कचरा टाकायचा, डब्यात! इकडे तिकडे नाही, कळळं ना?’
आईचं हसू ऐकू आलं!
आईचं लक्ष नाहीए असं मला वाटतं तेव्हाच बरोबर तिचं लक्ष कसं काय असतं?
आम्ही दोघींनी एकमेकींना डोळे मिचकावून दाखवलं.
एका ऑफिसमध्ये शिरलो, आयू म्हणाली, ‘राधू, मी १० मिनिटांत येते हं. तू इथेच बस!’
‘मी का नको येऊ?’
‘आत खूप गर्दी आहे पिल्ला! आणि चालून चालून तुझे पाय दुखणारेत आता रांगेत उभं राहण्यापेक्षा इथे बस. मी आहेच. या समोरच्या काचेतून मी दिसेन तुला. आणि मलाही तू दिसशील’
मी नाराजीनं मान हलवली. बबडीला जवळ घेऊन बसले.
आयू पलिकडच्या हॉलमधे एका मोठया रांगेत जाऊन उभी होती.
मी शेजारच्या खिडकीतून पाहिलं.
आणि अगदी जवळ समुद्र दिसला. चमचम करत होता! इतका जवळ समुद्र?
इतका जवळ, की कधीही शंख शिंपले गोळा करायला जाता येईल!!
युनिव्हर्सिटी आणि समुद्र- यांच्यामधे फक्त एक मोठा रस्ता आहे-काय मज्जा!?
मी एकदम खूष होऊन गेले. छानच आहे हे नवं गाव!!
आयूकडे वळून पाहिलं. ती कोणाशीतरी बोलत होती. हातात कागद घेऊन!
तेव्हढयात माझ्याजवळ कोणीतरी थांबलं.
मी पाहिलं तर एक मुलगी होती- गोरीगोरीपान, सोनेरी केसांची, निळया डोळयांची- तिच्याही हातात एक बाहुली होती आणि गम्मत म्हणजे तिच्या बाहुलीचे केस काळे होते- माझ्यासारखे!
आणि त्या मुलीचे, माझ्या बबडीसारखे!!
‘हाय’ ती म्हणाली
‘हॅलो’ मी हळूच!
मला खूपच मस्त वाटत होतं.
मी परत आयूकडे वळून पाहिलं, तिनी मला हात केला. तिच्या शेजारी उभ्या असलेल्या बाईकडे बघून काहीतरी बोलली. आणि त्या दोघी आमच्याकडे बघून हसल्या!
‘तुझ्या बाहुलीचं नाव काय आहे?’ तिनं मला विचारलं, अर्थात इंग्रजीतून! मी मराठीतून लिहीते आहे!
‘बबडी! आणि तुझ्या बाहुलीचं?’
‘लोला’ ती म्हणाली
‘ती माझ्यासारखी दिसते!’
‘आणि तुझी बाहुली माझ्यासारखी’ – आम्ही दोघी एकदमच बोललो!
आणि तोंडावर हात धरून हसायला लागलो!
मला खूपच आनंद झाला होता.
माझ्या बाहुली सारखी दिसणारी, ‘लोला’ची ‘आई’ – माझी मैत्रिण झाली होती !!

– मधुरा डहाणूकर

मधुरा डहाणूकर ह्या मराठी रंगभूमी, दूरदर्शन मालिकां मधील प्रसिध्द अभिनेत्री आहेत. साहित्य आणि कलेचा वारसा लाभलेल्या मधुरा डहाणूकर पुण्याच्या ‘चिल्ड्रन फिल्म सर्कल’ च्या संस्थापक कार्यकर्त्या आहेत.