राधाची डायरी


राधाची डायरी – पान ६

४ खोल्यांचं घर आहे माझं आणि आयूचं. जेवायची खोली, स्वयंपाकघर, आयूची आणि माझी झोपायची खोली आणि चौथी खोली माझी पसारा करायची!!
आमच्या बिल्डिंगमधे खूप मुलं आहेत. त्यांचे आई किंवा बाबा इथे अभ्यास करायला आले आहेत.
एक मुलगा स्पेनहून आला आहे, त्याच्या आईबाबांबरोबर. त्याला एका छोटी बहिणपण आहे. अलेक्झांडर आणि जेसिया. त्यांचे बाबा डॉक्टर होणार आहेत.

दुबईहून आले आहेत त्यांना दोन बाळं आहेत. सेम टु सेम दिसणारी, जुळी. त्यांची बाबागाडी सुध्दा जुळी आहे. एकमेकींना चिटकलेली.
किलियान नावाचा मुलगा आहे माझ्याएवढा. कुरळया सोनेरी केसांचा. लांब वाढलेत केस त्याचे. मला आधी कळळंच नाही की मुलगा आहे की मुलगी!! तो फ्रांन्सहून आला आहे. त्याच्या आईबरोबर. मोठ्ठया, लांबलचक गाडीत सगळं सामान भरून ते दोघेच फ्रांन्सहून इथे गाडी चालवत चालवत आले!!
त्याची सायकल सुध्दा आणली आहे त्याच्या आईने! कसली मजा ना ? सगळं घरच भरून आणल्यासारखं!!
‘राधू, विमानातून आलो आपण. त्यात सगळं घर कसं आणणारं बाळा?’
‘हो, पण माझी खेळणी तरी आणता आली असती?’
‘असं काय गं पिल्लू? आता आपण इथे घेऊ ना तुला खेळणी? आणि बघ, किती मित्र मैत्रिणी मिळाल्या आहेत तुला लगेच?’
‘हं–! आयू फ्रांन्स लांब आहे का इथून?’
‘हो. तसा लांबच आहे. पण भारताइतका लांब नाही. गाडी घेऊन येता येतं.
चल बरं, राधू, तुझ्या कपाटात तुझे कपडे नीट लावून टाक! मग आपण पिझ्झा करू!’
‘आत्ता नको ना गं! मी थोडयावेळ चित्र काढू का तुझ्या लॅपटॉपवर?’
‘हं काढ. मी अंघोळीला जाते आहे. केस धुवायचेत मला. जरा वेळ लागेल. मी पिझ्झा ठेऊन जाऊ? ओव्हन वेळेवर बंद करशील का? बघ आत्ता घडयाळाचा मोठा काटा 6 वर आहे. तो 11 वर आला की हे लाल बटण बंद करायचं. जमेल ना?’
‘हो गं आयू करेन मी’
माझं सगळं लक्ष आता पेन्टब्रश शोधण्याकडे होतं. मस्त चित्र काढून रंगवायचं होतं मला. किलियानच्या लाल मोठया गाडीचं!
आई अंघोळीला जातांना माझ्या समोर घडयाळ ठेवून गेली होती. त्याचा मोठा काटा आत्ताशी ८ वर होता आणि पिझ्झाचा मस्त वास येत होता.
चित्र काढून मी रंगवायला सुरू केलं. स्प्रे घेतला होता आणि छान लालचुटूक रंगाने गाडी रंगवत होते. आयूच्या लॅपटॉपवर चित्र काढायला सॉलीड मजा येत होती.
एकदम कसातरीच वास आला. जळका! पिझ्झा!! बाप रे!! घडयाळाचा काटा वर कसा काय गेला? मी स्वयंपाक घरात पळाले. ओव्हनमधून धूर येत होता.
मी पळत बाथरूमकडे गेले. तेव्हढयात आईनी दार उघडलं. माझा चेहरा कसातरीच झाला होता. मी तिला काही सांगायच्या आतच मोठ्ठया आवाजात सायरन वाजायला लागला. मी रडायला लागले. आईला सगळया घरात धूर झालेला दिसत होता. तिने पटकन जाऊन ओव्हनचं बटण बंद केलं. घराची किल्ली घेतली आणि मला घेऊन घराच्या बाहेर आली.
आमची आख्खी बिल्डिंग जिना उतरून खाली येत होती. सगळयांच्या घरात सायरन वाजत होता. कानठळया बसवणारा.
अलेक्झांडर, जेसिसा, जुळी बाळं, सगळयांचे आईबाबा, मी आणि आयू सगळे बाहेर!
तेव्हढयात आगीचा बंब आला. त्याचा सायरन तर अजूनच जोरात वाजत होता. लालेलाल नाकाने मी आयूला चिटकून उभी होते. माणसं आत गेली आमच्या घरात. त्यांनी तो जळका पिझ्झा काढला. खिडक्या उघडल्या. कुठे आग लागली नाहिए ना हे पाहिलं. आणि सायरन बंद केला.
त्यातला एक युनिफॉर्म घातलेला लालबुंद माणूस माझ्याजवळ येऊन म्हणाला,
‘पिझ्झा कोण खाणार होतं?’
मी रडतच त्याला ‘सॉरी’ म्हणाले.
तर त्याने चॉकोलेटचा बार काढून माझ्या हातात ठेवला.
आणि म्हणाला, ‘इटस् ओके’
ओल्या केसांना टॉवेल बांधलेली आई त्याला ‘थँक्यू’ म्हणाली.
आणि माझ्या गालाचा तिने पापा घेतला.
मला दोन गोष्टी मिळाल्या!! चॉकोलेट आणि मस्त वास येणा-या आयूचा फ्रेश फ्रेश पापा!! सॉलिड!!

– मधुरा डहाणूकर

मधुरा डहाणूकर ह्या मराठी रंगभूमी, दूरदर्शन मालिकां मधील प्रसिध्द अभिनेत्री आहेत. साहित्य आणि कलेचा वारसा लाभलेल्या मधुरा डहाणूकर पुण्याच्या ‘चिल्ड्रन फिल्म सर्कल’ च्या संस्थापक कार्यकर्त्या आहेत.