राधाची डायरी


राधाची डायरी – पान १२

कसला अभ्यास करत होती आयू…!!! तिच्या खोलीत सगळीकडे जाड जाड पुस्तकं आणि कागदच कागद होते…!(माझ्या खोलीपेक्षा तिची खोली पसरली होती…!!) तिचा लॅपटॉप मांडीत घेऊन सारखा तिचा अभ्यास चालू होता. रात्री मला झोपवून ती तिच्या खोलीत अभ्यासाला जायची. सकाळी मी उठायच्या वेळीही ती अभ्यासच करत असायची!! मला एक जाड काळं पुस्तक दाखवलं, म्हणाली, ‘चिन्या, हे असं पुस्तक लिहायचं आहे मला! डिजर्टेशन म्हणतात याला! हे असं लिहून झालं की मग माझा अभ्यास संपेल..!!
सॉलिड…!! कधी होणार हे एवढं लिहून….!!! पण होईल लवकर… खूप अभ्यास करते आहे ना ती…!!

परवा माझी शाळा सुटल्यावर आयू आणि मी तिच्या लायब्ररीमधे गेलो. मोठी पिशवी भरून पुस्तकं परत केली…. आणि तेव्हढीच परत घेतली…!!! (आता ही कधी वाचून होणार?? कधी संपणार आयूचा अभ्यास..??) ती जड पिशवी घेऊन आम्ही तिच्या टीचरला भेटायला गेलो. आयूचं काहीतरी काम होतं, अभ्यासाचं…!!
‘आयू, तुझ्या टीचरचं नाव काय आहे?’
आयू हसली, म्हणाली….. ‘बघ, तुला म्हणता येतं आहे का..!? तिचं नाव आहे, अंतोनेला इन्व्हरनिझ्झी!!’
सॉलीड !! अंतोनेला ठीक आहे… पण इन्व्हरनिझ्झी..??!! नावावरुन काही कळंतच नव्हतं.. कशी असेल आयूची टीचर??
हसरी असेल? की चिडक्या चेहे-याची?? मी गप्पंच होते.. आधीच बागेत न नेता आयूनं इथे आणलं होतं मला…..
इन्व्हरनिझ्झी…!!!
पण वाटलं तशी नव्हती … अंतोनेला…छान बोलली माझ्याशी …मला चॉकोलेट दिलं…आणि मग त्यांचा अभ्यास सुरु झाला. मी आयूच्या शेजारी बसून चित्र काढत बसले. खूप वेळ बोलत होत्या दोघी. इंग्रजीमधेच बोलत होत्या… पण अंतोनेलाचं बोलणं मला नीट समजत नव्हतं. माझ्या शाळेत नाही असं कधी झालं. माझ्या टीचरचं बोलणं मला नीट समजतं..! मग आयूच्या टीचरचं का नाही समजत??
घरी जाताना आयूला विचारलं, ‘काय बोलत होती गं तुझी टीचर..? मला काहीच नाही समजलं..!!’
‘तिचे उच्चार वेगळे आहेत ना, म्हणून तुला कळालं नसेल…!!’
‘कसं काय गं आयू??’
‘अगं ती इटालियन आहे…तिची भाषा खरं तर इंग्रजी नाहीए… तिचं इंग्रजी वेगळं वाटलं तुला. मलाही आधी वेळ लागला समजायला, पण आता सवयीनं समजतं!’
‘मग आपण ही इंडियन आहोत की……!’
‘हो गं! आपलं इंग्रजी बोलणं इथल्या लोकांना वेगळं वाटत असेलंच की…’
‘पण आयू, अंतोनेला चं बोलणं खू…..प सॉलीड गमतीचं होतं गं!! मला तर आधी वाटलं की वेगळ्याच भाषेत बोलते आहे…!’
‘राधू, तिची गंमत ऐक. तिचे आई बाबा इटालिअन आहेत, पण हिचा जन्म स्विटझरलँड मधे झाला आहे आणि शाळाही तिथलीच. तिथे फ्रेंच आणि जर्मन अशा दोन्ही भाषा बोलतात.. आणि शाळेत शिकवतात सुध्दा. माझ्या डिजर्टेशन पेक्षा ही जाड पुस्तक लिहिलं आहे तिने. पि.एच.डी केली आहे. कुठल्या देशात केला आहे माहितेय का हा अभ्यास? पोर्तुगाल मधे.. !
आणि आता ती इथे यूके मधे शिकवते आहे…. आता ऒळख बरं … तिला किती भाषा येत असतील??’
‘तुच म्हणालीस की… फ्रेंच आणि जर्मन..! आणि इंग्रजी…!!’
‘या भाषा तर येतातच… पण आई बाबांमुळे इटालिअन ही येतं .. आणि अभ्यासासाठी पोर्तुगाल मधे राहिल्यामुळे पोर्तुगीज सुध्दा येतं…!!’
मी बोटं मोजायला लागले…..’इटालियन, जर्मन, फ्रेंच, पोर्तुगीज आणि इंग्रजी….???’
‘हो… या पाच भाषांपैकी कोणत्याही भाषेत ती छान बोलू शकते, वाचू शकते आणि लिहू ही शकते..!!’
‘सॉ… ली… ड!! मला तर फक्त मराठी, इंग्रजी आणि थोडं हिंदी येतं…..!’
‘ह्या भाषा तर आल्याच पाहिजेत ना राधू! पण याबरोबर अजून ही भाषा शिकायला हव्यात…. काय मजा येईल बघ ना….
कोणत्याही भाषेतली गोष्टीची पुस्तकं वाचता येतील तुला….!! आणि अजून भाषा बोलता आल्या तर खूप फिरता
येईल…केव्हढं मोठं आहे जग… किती शिकता येईल…. कळतंय का??’
घरी येऊन आम्ही जगाचा नकाशा काढून बसलो….
पुणे, महाराष्ट्र, भारत, आशिया….
युरोप, ग्रेट ब्रिटन, वेल्स, स्वांझी..(आमचं गाव…) असं सगळं बघितलं ….
अंतोनेला चे पण सगळे देश बघितले….
किलिऑन चा फ्रान्स, अलेक्झांडर चा स्पेन…..
मग गुगल वर आयूनी शोधलं ….. ते सगळं पाठ केलं….. सगळ्या भाषांमधे….
शुभ रात्री, गुटं नाख्ट, बॉन नुई, बॉन नोते…… गुड नाईट…!!!!

– मधुरा डहाणूकर

मधुरा डहाणूकर ह्या मराठी रंगभूमी, दूरदर्शन मालिकां मधील प्रसिध्द अभिनेत्री आहेत. साहित्य आणि कलेचा वारसा लाभलेल्या मधुरा डहाणूकर पुण्याच्या ‘चिल्ड्रन फिल्म सर्कल’ च्या संस्थापक कार्यकर्त्या आहेत.