राधाची डायरी


राधाची डायरी – पान १४

राजपुत्र मी फक्त नाटकात पाहिला होता. रंगीत मणी लावलेले, सोनेरी कपडे घातलेला, खूप माळा, अंगठ्या घातलेला…. डोक्यावर मुकुट … त्याची कामं करायला नोकर… असाच राजपुत्र पाहिला होता मी!! सोनेरी खुर्चीत बसलेला.. त्याला पिसांनी वारा घालणारी त्याची माणसं.. आणि प्रधानजी….!! नाटकातला हा राजपुत्र भराभर ऑर्डर्स सोडत होता आणि सगळे त्याची कामं करत होते. त्याला चांदीच्या ताटातून मिठाई खायला देत होते…. सॉलिड लाड चालू होते…! काय मज्जा असते राजपुत्रांची….!!!

सिनेमामधे ही पाहिले होते राजपुत्र..! स्नो व्हाईट, ब्युटी ऍंड द बीस्ट….रॅपुंझेल, सिंड्रेला….दुःखी मुलींना मदत करणारे राजपुत्र… शुभ्र ढगांमधले मोठे मोठे राजवाडे, पांढरे घोडे लावलेले रथ, मस्त कपडे…पार्टी…. दुसरं काहिही काम नाही… काय सॉलिड मज्जा…!!

आयू सांगत होती, की तिच्या युनिव्हर्सिटी मधे येणार आहे… ‘प्रिंस ऑफ वेल्स’…..!!!

खरा राजपुत्र???? राजवाडयात रहाणारा??

मी बघायलाच लागले…. डोळे मोठठे झाले असणार माझे… कारण आयू लागली हसायला….!!!! राजपुत्राचं युनिव्हर्सिटी मधे काय काम? राजवाडा सोडून?? मी पाहिलेल्या कोणत्याच नाटकात किंवा सिनेमात राजपुत्र अभ्यास करताना दाखवला नव्हता..!! (पांडव राजपुत्र होते ना?? हां….. ते गेले होते शिकायला.. द्रोण ऋषींकडे..ते ठीक आहे…. पण युनिव्हर्सिटी??)

मग आयूनी सांगितलं.. की इथे यूके मधे अजून खरी खरी राणी आहे.. अगदी गोष्टीतल्या सारखी…राजवाडात रहाणारी…दागिने, रथ, गाडया… तिला खूप मान देतात…राणी आहे ना ती….तर त्या राणीचा मुलगा… (खरा राजपुत्र!! सॉलिड ना??) चार्ल्स नाव आहे त्याचं.

आणि म्हणे राजपुत्राला कामं असतात खूप… नुसतं सोनेरी खुर्चीत बसून मिठाई खात नाही बसायचं… त्यांच्या राज्यात सगळं छान चालू आहे ना… हे बघायचं असतं… आवश्यक वाटेल तिथे मदत करायची असते…खूप काम असतं म्हणे ….. सॉलिड बिझी असतो हा राजपुत्र..!!

तर प्रिंस ऑफ वेल्स (म्हणजे हाच खरा खरा राजपुत्र…) याचं एक महत्वाचं काम म्हणजे ‘वेल्स’ ह्या भागाकडे लक्ष देणं…. आणि आपली युनिव्हर्सिटी ‘वेल्स’ मधे आहे ना? म्हणून येणार आहे तो….त्याचं कामच आहे ते…

ऐकत होते मी सगळं ….

कसा असेल हा राजपुत्र? शूर? घोड्यावरून येणारा? सोन्याच्या मोहोरा उधळणारा?? दुःखी लोकांना मदत करणारा?

मला बघायचं आहे त्याला….. जवळून … आयूच्या युनिव्हर्सिटी मधे जाऊन….

– मधुरा डहाणूकर

मधुरा डहाणूकर ह्या मराठी रंगभूमी, दूरदर्शन मालिकां मधील प्रसिध्द अभिनेत्री आहेत. साहित्य आणि कलेचा वारसा लाभलेल्या मधुरा डहाणूकर पुण्याच्या ‘चिल्ड्रन फिल्म सर्कल’ च्या संस्थापक कार्यकर्त्या आहेत.