राधाची डायरी


राधाची डायरी – पान २

केवढया झाल्या होत्या आमच्या बॅगा! बापरे, मी आख्खी मावले असते त्यात आणि शिवानी पण! (विमानात असं चालतं का?)
सगळं सामान भरल्यावर बॅगांना मोठ्ठी पोटं आली होती. शेजारच्या अस्मिता मावशी सारख्या दिसत होत्या. पोटात बाळ असल्यासारख्या-! आई चक्क त्या बॅगांवर बसली तेव्हा त्या बंद करता आल्या! सॉलिड धमाल आली. मी हसून हसून लोळलेच!

मग जरावेळ बागेत खेळून आले. माझी सायकल चालवली. बिच्चारी कोण खेळणार तिच्याशी आता? तिच्या हँडलवरून हात फिरवून तिला समजावून सांगितलं, की आई (म्हंजे मी) कामाला चाल्लीआहे – रडायचं नाही! घरी आहे तोपर्यंत माझी पुस्तक, चित्र रंगवायचं, सामान, बूट सगळं बॅगेत गेलं होतं. आणि कपडे? ते कुठे ठेवलेत आईनी? बघितलं तर एका छोटया कुकरमध्ये भरून ठेवले होते- मोजे, कानटोपी, पेटिकोट, च–, सगळे छोटे कपडे! मी हसायलाच लागले – आता वरणभातात माझे कपडे सापडणार!!

आणि माझे पार्टी फ्रॉक्स? ते तसेच आहेत कपाटात! ते का नाही भरलेत? ”राधू, थंडी असते तिथे पिल्ला! वरच्या कपडयांच्या आतही गरम कपडे घालावे लागतात. आता आवश्यक तेव्हढंच नेऊ, आणि बाबा आणेल तुझे फ्रॉक्स तो येईल तेव्हा! चालेल ना? शाणं माझं पिल्लू ते!! हं – असं बोलल्यावर मी कशी शाणं पिल्लू राहू? किती छान फ्रॉक्स आहेत माझे! लाल, पांढरा – वाढदिवसाला घेतलेला, आणि गुलाबी – झालरींचा आणि सॅटिनचा पट्टा असलेला. माझा सगळयात आवडता-! ते सगळे इथेच ठेऊन जायचे? मला किती आठवण येईल त्यांची? आणि तिथे पार्टी असेल तेव्हा मी काय घालू? हं- शाणं पिल्लू आहे ना मी? हट्ट केला तर आईला वाईट वाटेल, त्यापेक्षा बाबाकडून गॉड प्रॉमिस घेते की येतांना नक्की आण म्हणून!!

संध्याकाळी माझ्या मैत्रिणी येणारेत मला अच्छा करायला! सगळयांचे फोन नंबर आणि त्यांच्या आई-बाबांचे ई-मेल लिहून घ्यायला सांगितले आहेत आईनी!
छान पावभाजी केलीए. मला आवडते ना!!
आणि पार्टीची तयारी मी करणारे! छान प्लेटस् काढल्या, चमचे, पाणी! (तिकडे गेल्यावरही मी आईला खूप मदत करणारे!)

आई मला जवळ घेत म्हणाली ‘शाणं माझ पिल्लू ते! राधू, सगळी खेळणी नाही हं नेता येणारेत! सामान फार झालंय गं, मावत ही नाहिए. माझी अभ्यासाची पुस्तकं, गरम कपडे, स्वयंपाकाची भांडी-तुझं जवळपास सगळं घेतलं आहे. आपण जमेल तेव्हढं नक्की नेऊ!!
‘माझी बोलणारी बाहुली न्यायची हं आयू!
‘राधू, ती कुठे बोलते आता! तू तिला अंघोळ घातल्यापासून बोलती बन्द आहे तिची! आणि जागा जाते उगीच. सॉफ्ट टॉईज घे, ती मावतात चांगली’.
आता माझा मूडच गेला. शाणं पिल्लू रडायला लागलं. माझी सगळयात आवडती बाहूली आहे ती. ‘बबडी’ नाव आहे तिचं.
बोलत नसली म्हणून काय झालं?
संध्याकाळच्या पार्टीत मी पूर्णवेळ बबडीला घेऊन बसले होते. सगळया मित्र-मैत्रिणींनी मला गमती-जमती दिल्या. शिवानीनी तर ‘बार्बी’ दिली. पण मला बबडीच हवी होती.
किती एकटं वाटेल तिला? माझी बबडी ती, शाणं पिल्लू, आई कामाला जाणार आहे हं (म्हणजे मी) रडायचं नाही!
रात्रीपण तिला कुशीत घेऊनच झोपले.
उशीरापर्यंत सगळे सामान भरत होते.
सकाळी आईनी उठवलं, भराभर आवरून दिलं, सगळे आले होते. आजी, आजोबा, आई-बाबांचे मित्र-मैत्रिणी – अच्छा करायला!
आईला सारखं रडू येत होतं. बाबालाही आणि माझ्या बबडीलाही! सगळे सांगत होते. ‘नीट जा, सांभाळून रहा आणि फोन करा पोहचल्याचा.’
आई म्हणाली, ‘राधू सगळयांना नमस्कार कर, आणि तुझ्या बबडीला कडेवर घे.’
‘तिला घेऊन चलू?’
‘हो’
‘विमानात? इग्लंडला पण?’
‘हो गं पिल्लू!’
‘हुर्रेरे!! मी खूष! बबडीही!’
सगळयांना नमस्कार केला. आणि बाबांच्या मिठीत असताना दिसलं की, माझ्या आवडत्या, सुदंर, गुलाबी, झालरींच्या फ्रॉकचा सॅटिनचा पट्टा एका बॅगेतून बाहेर आला आहे- आणि मला हसतो आहे !!
सॉलिड हुर्रे…..!!

– मधुरा डहाणूकर

मधुरा डहाणूकर ह्या मराठी रंगभूमी, दूरदर्शन मालिकां मधील प्रसिध्द अभिनेत्री आहेत. साहित्य आणि कलेचा वारसा लाभलेल्या मधुरा डहाणूकर पुण्याच्या ‘चिल्ड्रन फिल्म सर्कल’ च्या संस्थापक कार्यकर्त्या आहेत.