राधाची डायरी


राधाची डायरी – पान ३

विमानात आईच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपायच्या आधी पिटुकल्या टि.व्ही वर मस्त सिनेमा बघितला. खूप सॉलिड होता. धमाल विनोदी – कानाला हेडफोन लावला होता आणि बहुतेक एकटीच हसत होते! आईचं खूप वेळ काहीतरी चालू होतं. कसलेतरी फॉर्म भरत होती. कागद पर्स मध्ये ठेवत होती.
तेवढयात ट्रॉलीवरचं जेवण आलं.
आईनी विचारलं, ‘राधू, काय जेवणारेस?’
माझं सगळं लक्ष सिनेमात होतं!
‘मला काही नको’
‘राधू थोडं पुडिंग तरी खा’
– मी आ केला, आणि आईनी भरवलं. मस्त होतं खरंच पुडिंग!!
सिनेमावरचे डोळे न काढता मी मटामट पुडिंग संपवलं.
आई हसत होती, ‘आवडलं ना? मग आधी का नको म्हणतेस?’
मी जीभ काढून हसले.

खरंच, मला हे पुडिंग आवडेल, हे आईला कसं कळलं? आईला खूपच गोष्टी न सांगता कळतात!! आई मस्त असते!!
सिनेमा संपला आणि इतकी झोप आली!!
मला आठवतंच नाहीए की मी आईच्या मांडीवर डोकं कधी ठेवलं आणि बूट कधी काढले, पाय कधी दुमडून वर घेतले –
माझ्या अंगावर विमानातलं मस्त पांघरूण होतं.
जाग आली तेव्हा बघितलं की आई खिडकीतून एकटक बाहेर बघते आहे आणि तिचे डोळे मोठ्ठे झाले आहेत.
मी पटकन् उठून बघितलं तर भला मोठ्ठा चंद्र होता –
इतका मोठ्ठा की आईनी सांगितलं नसतं तर कळलंच नसतं!
इतका मोठ्ठा की बास्! आणि पांढराशुभ्र नव्हता – केशरी दिसत होता!
आणि त्यावरचा ससा गुल झाला होता!
इतका मोठ्ठा केशरी चंद्रूमामा? विमान अगदी त्याच्या जवळून चाल्लं होतं! की चंद्रूमामा विमानाजवळ आला होता मला भेटायला??
मला किती दिवस त्याला हात लावायचा होता!
माझं सिक्रेट होतं ते! कुणाला सांगितलं नव्हतं मी!
मी हळूच आईकडे बघितलं, ती अजून चंद्राकडेच बघत होती.
आणि एकदम गप्पगप्प झाली होती. मला वाटलं आता रडू येणार तिला. पण तिनी तेवढयात माझ्याकडे पाहिलं आणि गोडगोड हसली. मला सॉलिड मस्त वाटलं.
‘हुश्श! माझं चंद्रूमामाच सिक्रेट आईला कळलं नाहिए!’
मी परत डोळे मिटून गुडूप झोपले
थोडं थोडं उजाडायला लागलं होतं, आईनी उठवलं आणि म्हणाली,
‘राधू, आता अर्ध्या तासातच पोचणार हं आपण!’
मी उठून खिडकीतून खाली बघितलं.
कापसासारख्या ढगांमधून चाल्लं होतं विमान आता –
आणि हळूहळू बिल्डींग्स् दिसायला लागल्या होत्या, पुस्तकातल्या चित्रांसारख्या. आणि हिरवळींच्या चौकटी! खूप सॉलिड दिसत होतं –
मला बूट घालता घालता आई म्हणाली, ‘राधू, मजा आली का गं तुला विमानात?’
‘हो ss.. खूप मज्जा आली. सिनेमा, पुडिंग, आणि आयूच्या मांडीवरची झोप…!’ –
‘हं, पण चंद्रूमामाला हात लावायचा राहून गेला, हो ना?’
अशी कशी जादू झाली?
आईला कसं कळलं माझं सिक्रेट? कुणी सांगितलं?
आपोआप?
सॉलिड –
या नव्या देशात आल्यावर अजून काय काय जादू होणार आहे ते चंद्रूमामालाच माहित!!

– मधुरा डहाणूकर

मधुरा डहाणूकर ह्या मराठी रंगभूमी, दूरदर्शन मालिकां मधील प्रसिध्द अभिनेत्री आहेत. साहित्य आणि कलेचा वारसा लाभलेल्या मधुरा डहाणूकर पुण्याच्या ‘चिल्ड्रन फिल्म सर्कल’ च्या संस्थापक कार्यकर्त्या आहेत.