ह्या लेखात मी मला स्वत:ला आलेल्या काही पत्रिकांच्या अनुभवाविषयी लिहीत आहे. ह्या अनुभवातून वाचकांना कृष्णमूर्ती पध्दतीने सांगितलेल्या भविष्याची थोडी अधिक माहिती व्हावी ही अपेक्षा. व्यक्तींची नावे जाणून बुजून टाळली आहेत.
४ वर्षे ते ४ महिने – सगळयात पहिल्यांदा मला लिहावसं वाटतंय ते एका प्रेम प्रकरणाविषयी. माझ्या एका चांगल्या परिचयाच्या व्यक्तीने मला एकदा बाहेरगावाहून फोन केला. त्यांचं प्रेम प्रकरण गेली चार वर्षे चालू होतं, हे मला माहिती होतं. फोनवर त्याने तो आता त्या मुलीशी लग्न करणार असून तिची पत्रिका मी बघावी म्हणून सांगितलं. पत्रिका बघितल्यावर मी सांगतलं की ही पत्रिका निकृष्ट दर्जाची असून बरेच प्रॉब्लेम्स आहेत. तुमचा घटस्फोट होण्याचा योग आहे. हे सांगितल्यावर सुध्दा त्याने त्याच मुलीशी लग्न करण्याची तयारी दर्शविली. व आपण त्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगितलं. पुढे नंतर त्या दोघांचं लग्न झालं. लग्नानंतर लगेचच चार महिन्यांनी ही व्यक्ती परत माझ्याकडे आली व आपले बायकोशी पटत नसून वारंवार भांडणे होतात तर पुढे काय होईल हे विचारलं. पत्रिका बघून मी सांगितलं की ऑक्टोबरनंतर जर बायको माहेरी गेली तर परत येणार नाही व पुढल्या काही काळात घटस्फोट होईल. नंतर पुढे बायको, माहेरी गेली व घटस्फोटाची नोटीस दिली गेली. ४ वर्षे असलेली रिलेशनशिप ४ महिन्यांत संपुष्टात आली.
सिरियस केस– काही वेळेला अतिशय सिरियस प्रॉब्लेम्स असतात. एक १६-१७ वर्षांचा मुलगा एका गंभीर हृदयाच्या समस्येंनी आजारी होता. त्याचे वडील स्वत: डॉक्टर होते. तरीसुध्दा खूपच दडपणाखाली होते. त्यांनी मला मुलाबद्दल विचारले की मुलगा ह्यातून वाचेल का नाही? ही अगदी गंभीर बाब असल्याने माझी जबाबदारी आणखी वाढली होती. मुलाची पत्रिका नीट बघितल्यानंतर मी त्यांना कळवलं की मुलगा बरा होईल आणि एका विशिष्ट काळानंतर त्याची हळुहळू प्रगती होईल. त्यानंतर मधे काही काळ गेला. अचानक एके दिवशी त्यांनी मला कळवलं की माझा मुलगा आता खूपच बरा झाला आहे व कॉलेजला जाऊ लागला आहे.
लोड शेडींग – काही महिन्यांपूर्वी लोड शेडींगने सगळीकडे धुमाकूळ घातला होता. वीज गेली की परत कधी येईल ह्याचा काही नेम नव्हता. अशाच एका दिवशी माझ्याकडे एक ग्राहक सॉफ्टवेअरच्या एका कामासाठी येणार होते. वेळ ही आधी ठरलेलीच होती. आणि नेमकी वीज गेली. व बराच वेळ वीज आली नाही. समजा वीज आलीच नसती तर त्या ग्राहकाची भेट फुकट जाणार होती. ते ग्राहक देखील बाहेरगावाहून येणार होते. अशा वेळेला एका पुस्तकात वाचलेल्या एका उदाहरणाची मला आठवण झाली. त्यात वीज कधी येईल ह्याच्यासाठी एक पध्दत दिलेली होती. मी ती पध्दत वापरून बघायचं ठरवलं.
त्यानुसार जेंव्हा मी प्रश्नकुंडली व रूलिंग प्लॅनेटस् बघितले, तेंव्हा असं लक्षात आलं की ग्राहकाला दिलेल्या वेळेच्या थोडं मागे-पुढेच वीज येण्याची वेळ होती. आणि झालंही तसंच. मी काढलेल्या वेळेच्या थोडं फार मागे-पुढे बरोबर वीज आली. व त्यानंतर ते ग्राहक देखील आले.
Astrologer अभय गोडसे,
http://www.abhaygodse.com