संगीतकला

गायन - हिंदुस्तानी संगीत

भावगीत

‘वंदे मातरम’ – एक अजरामर भावगीत!

वंदे मातरम! वंदे मातरम!
सुजलाम सुफलाम, मलयज शीतलाम
शस्य शामलाम मातरम, वंदे मातरम!
शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीं, फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीं
सुहासिनीं, सुमधुर भाषिणीं, सुखदां वरदां मातरम,
वंदे मातरम, वंदे मातरम……………..१

कवि – स्व. बंकिमचंद्र चटर्जी (१८३८-१८९४)

१८७५ मध्ये मनाच्या एका उन्मनी अवस्थेत त्यांनी हे गीत लिहिलं. त्यात एकूण पाच कडवी आहेत त्यातलं पहिलं-वर दिलेलं कडवं स्वतंत्र, प्रजासत्ताक भारताचं ‘राष्ट्रीय गीत’ (National Song) म्हणून १९५० साली संसदेत घोषित करण्यात आलं. त्याला ‘जन गण मन’ ह्या राष्ट्रगीताचा (National Anthem) समान दर्जा देण्यात आला. ह्या दोन्ही गीतांना आंतरराष्ट्रीय संकेतानुरुप चाली लावून त्याच्या ध्वनिमुद्रिका बनवून घेऊन सरकारने १९५२/५३ साली वितरित केल्या. रोज सकाळी ते रेडियोवरून ऐकवायचा निर्णयही घेण्यात आला. तेव्हांपासून आजपर्यंत ‘वंदे मातरम’ गीत रोज सकाळी आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून कार्यक्रम सुरू होण्याआधी ऐकवलं जातं. असं भाग्य आणखी कोणत्याही गीताला लाभलेलं नाही. ह्या चालीत एकही वाद्य वाजविलेलं नाही. एक पुरुष स्वर (पं. दिनकर कायकिणींचा) व एक स्त्री स्वर (सुमती मुटाटकर ह्यांचा) अश्या समूहगान स्वरूपात ते ५२ सेकंदात राष्ट्रगीताप्रमाणेच ऐकविलं जातं. सर्वसामान्य भारतीय नागरिक गेली साठेक वर्षे ते तसंच गातात. शाळेत, सरकारी व खाजगी समारंभांची सुरूवात ‘वंदे मातरम’ नं तर समारोप ‘जन गण मन’ नं ही पद्धत रूढ होऊन सर्वमान्य झाली.

भारताच्या स्वातंत्र्याला पन्नास वर्षे झाली तेव्हां संगीतकार ए.आर.रहमाननी ‘वंदे मातरम’ ला वाद्यांच्या साथीसह गाऊन त्याचे ध्वनिमुद्रण बाजारात आणले. ‘वंदे मातरम’ ह्या अल्बमनं १९९७ साली खूप लोकप्रियता मिळवली. त्याच सुमारास बी.बी.सी. (ब्रिटिश ब्रोडकास्टिंग कार्पोरेशन) ला ७० वर्षे पूर्ण झाली. त्यांनी जगातली सर्वोत्तम दहा गीते निवडण्याची आनलाईन स्पर्धा घेतली. त्यात रहमानचं ‘वंदे मातरम’ दुसरं निवडलं गेलं. ह्याच आल्बममध्ये ‘मा तुझे सलाम’ हे गीत होतं. ते ज्याच्या त्याच्या तोंडी बसलं. अगदी सोप्या शब्दांत ‘वंदे मातरम’ चा अर्थ त्यात सांगितला होता. १९९७ मध्ये स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या सोहोळ्यात, संसदेत पं. भीमसेन जोशी तबला पेटी घेऊन ‘वंदे मातरम’ पाच मिनिटे गायले तर सांगता समारंभात १९९८ साली पं.जसराज हुंकारांच्या तालावर अगदी ताना मारत तेवढाच वेळ गायले. सर्व खासदार सावधान स्थितीत ‘राष्ट्रीय गीत’ होईतो उभे होते. ‘राष्ट्रीय गीत’ झाल्यावर सर्वांनी टाळ्या वाजविल्या. सामान्य नागरिक राष्ट्र/राष्ट्रीय गीत गायनाला अशी दाद देतात काय? विशेष म्हणजे ह्या सगळ्याचं दूरदर्शन वरुन प्रसारण होत होतं. त्याचंही भान कुणालाच नव्ह्तं. पुढे १९९८ साली ‘वंदे मातरम-२’ अल्बम आला. त्यात लताबाईंनी ‘आनंदमठ’ मधल्या जुन्या गाण्याचं पुन्हा मुद्रण केलं. त्याच बरोबर “मा, तुझे सलाम! मा तुझे प्रणाम!” असं रिमिक्सही गायलं. शुभा मुदगल ह्यांनी पॉप पद्धतीनं तर कौशिकी चटर्जीनी अंगाई गीताच्या स्वरूपात ‘वंदे मातरम’ गायलं. अश्या प्रकारे पवित्र राष्ट्रीय गीताला आधुनिक गायक/गायिका व संगीतकारांनी नाचाचं रूप देऊन एक ‘प्रॉडक्ट’ म्हणून बाजारात विकायला मांडलं. ते अर्थातच नवीन बाजारप्रणालीला धरूनच होतं. २००६ साली अर्जुन सिंहांनी नसलेल्या शताब्दीचं ओढूनताणून आवाहन केलं, देशभर वादळ उठवलं व बहुतेक भारतवासीयांनी त्याचं गांभीर्यानं, आदर व सन्मानपूर्वक समूहगायनच केलं व गीताचा मान राखला. कलाकारांनी मात्र ताळतंत्र सोडून आपण सामान्य नागरिकांपेक्षा कुणी निराळेच आहोत हे अधोरेखित केलं.

स्वातंत्र्यापूर्वी पन्नास वर्षे ह्या गीतानं व ‘वंदे मातरम’ ह्या शब्दांनी भारतीयांच्या मनावर राज्य केलं. स्वातंत्र्य लढयात ‘वंदे मातरम’ ह्या दोन शब्दांनी व गीतानं महत्त्वाची भूमिका बजावली. हे शब्द वेद मंत्रांहूनही पवित्र मानून अनेक क्रांतीकारक हसत हसत फासावर गेले. स्वातंत्र्य मिळाल्यावर हेच गीत राष्ट्रगीत होणार ह्याची खात्री असल्याने अनेकांनी त्याला वेगवेगळ्या रागात चाली बांधल्या. त्यात अर्थातच मराठी व बंगाली मंडळी आघाडीवर होती. आपल्याकडे १९२५-५० ह्या काळात मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर, विष्णुपंत पागनीस, केशवराव भोळे, ओंकारनाथ ठाकूर, वि.दे.अंभईकर, मोगूबाई कुर्डूकर, सावळारामबुवा शेजवळ, संगीतकार वसंत देसाई ह्यांनी ‘वंदे मातरम’ गाऊन त्याच्या ध्वनिमुद्रिकाही बनविल्या. आपलीच चाल निवडावी ह्या करिता नेहरू, पटेलांपाशी प्रयत्नही केले. वाद्यव्रुंद वादनाच्याही ध्वनिमुद्रिका बनवून घेतल्या. बंगाल मध्ये दिलीपकुमार राय व एम.एस.सुब्बलक्ष्मी ह्यांनी ‘वंदे मातरम’ युगलस्वरात गायिलं. त्याअगोदर भवानीचरण दास, सत्यभूषण गुप्ता, मुखर्जी ह्यांनी हे गीत ध्वनिमुद्रित केलं. १८९६ मध्ये खुद्द रविंद्रनाथ टागोरांनी कलकत्ता येथील कॉंग्रेसच्या अधिवेशनात ‘वंदे मातरम’ गायलं. त्याची चाल आपल्याकडच्या मंगलाष्टकासारखी आहे. आर.एन.(रविंद्रनाथ) टागोर ते ए.आर.रहमान असा ह्या गीताच्या चालींचा १०० वर्षांचा इतिहास आहे. http://www.mustrad.org.uk/articles/mataram.htm येथे माहिती येथे वाचावयास मिळेल

बंकिमचंद्रांच्या हयातीत मात्र हे गीत तसं प्रसिध्दीला आलं नव्हतं. त्यांच्या साहित्यिक मित्रमंडळीत “विषय चांगला पण विविध भाषांतली क्लिष्ट रचना” अशी टीकाच झाली. त्यांच्या मुलीनं पण नाराजी व्यक्त केली. पण ते म्हणत, “मी या जगात असेन/नसेन, पण एक दिवस हे गीत व शब्द प्रत्येक भारतीयाच्या ओठांवर असतील”. १८८२ मध्ये ‘आनंदमठ’ कादंबरीत हे गीत समाविष्ट झालं व वाचकांचं त्याच्याकडं लक्ष गेलं. राजकीय नाटकं, प्रहसनं ह्यात हे गीत देस-मल्हार रागात गात असत. त्यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी रविंन्द्रनाथांनी कॉंग्रेसच्या अधिवेशनात गायिलं. पुढे दहा वर्षांनी, १९०५ सालच्या ‘वंग-भंग’ विरोधी आंदोलनात कलकत्ता येथील टाऊन हाल मध्ये भरलेल्या निषेध सभेत कुणीतरी ‘वंदे मातरम’ ही घोषणा दिली. लगोलग हे शब्द व गीत देशभर पोहोचले व त्यानं भारताच्या सांगितीक इतिहासात मोलाची भर घातली. आजही ते प्रेरणादायी, स्फूर्तीप्रद आहे.

भारताच्या एकसष्ठाव्या स्वातंत्र्यदिनी ह्या अजरामर भावगीताचं हे पुण्यस्मरण!

– सुरेश चांदवणकर
मानद सचिव, ‘Society of Indian Record Collectors’
मुंबई