लेखाच्या मागील भागात आपण संगीतातील ‘स्वर’ ह्या मूलभूत संकल्पनेविषयी माहिती घेतली. ह्याशिवाय ‘थाट’ व ‘राग’ म्हणजे काय आणि थाटापासून विविध रागांची निर्मिती कशी होऊ शकते, ह्याविषयी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. लेखाच्या ह्या भागापासून आपल्याला निरनिराळे ‘थाट’ व त्यापासून निर्माण होणारे विविध ‘राग’ ह्यांची जरा अधिक विस्ताराने माहिती घ्यायची आहे. आणि ह्याची सुरुवात आपल्याला ‘भैरव’ आणि ‘तोडी’ ह्या थाटापासून करायची आहे. चला तर, थाटाच्या ह्या प्रवासाला अगदी ‘थाटामाटाने’ निघू या!
भैरव थाट
स्व. कुसुमाग्रजांचे भगवान शंकराची आळवणी करणारे एक भक्तिगीत आहे. कदाचित ते आपल्या वाचण्यातही आले असेल. त्याचे बोल असे आहेत-
‘महन्मंगला परमसुंदरा, हे शिव गंगाधरा,
सदय होऊनी या भूमीचे आज शिवालय करा!’
“समजा, कोणी जर मला विचारले की ‘ह्या गीताला चाल लावाल का ?” तर मी क्षणाचाही विलंब न लावता ‘भैरव थाटा’तील ‘शुध्द भैरव’ ह्या रागात ह्या गीताची चाल बांधायला घेईन, कारण भैरव राग अगदी वरील गीतात व्यक्त झालेल्या भक्तीभावासारखाच आहे, धीरगंभीर व परमेश्वराची आर्ततेने आळवणी करणारा! अगदी झुंजु-मुंजूची वेळ आहे. पक्ष्यांचा किलबिलाट नुकताच सुरू झाला आहे, मंदिरातून घंटानाद ऐकायला येतो आहे, उदयाचली अरूणागमनाचा दिव्य प्रकाशमय संदेश येऊन पोहोचला आहे, कोणी भाविक नदीच्या पात्रात उभे राहून उगवत्या भास्कराला अर्घ्य अर्पण करतो आहे- बस हीच वेळ आहे, ‘भैरव राग’ आळवून जगन्नियंत्याला साद घालण्याची!
आता भैरव थाटाची व त्यातून निर्माण झालेल्या काही रागांची सुरावट कशी आहे, ते बघू या!
भैरव थाटातील सगळयात प्रसिध्द राग म्हणजे, ‘शुध्द भैरव’! भैरव रागाचा ‘पिता’ असलेल्या भैरव थाटाचे स्वरूप- सा, को.रे, ग, म, प, को.धै, नि- असे आहे. आणि त्यापासून निर्माण झालेल्या ‘भैरव’ रागाचे आरोह व अवरोह पुढीलप्रमाणे आहेत-
आरोह- सा, को.रे, ग, म, प, को.धै, नि, सा!
(!- हे चिन्ह वरच्या सप्तकातील सुरांसाठी आहे.)
अवरोह- सा!, नि, को.धै, प, म, ग, को.रे,
सवादी स्वर- को.धै, संवादी स्वर- को.रे
गानसमय- दिवसाच्या प्रथम प्रहराचा पूर्वार्ध
भैरव रागाचे सगळयात प्रसिध्द भावंडं म्हणजे, राग ‘अहिर भैरव’. ह्या रागातून व्यक्त होणा-या भावनांचे वर्णन करायचे झाल्यास विरही जीवांची आर्त हाक किंवा प्रियतमेच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या प्रियकराला युगासमान भासणारा प्रत्येक क्षण म्हणजे, राग ‘अहिर भैरव’, असे करता येईल! बैजू-बावरा या चित्रपटातील ‘मोहे भूल गये सांवरिया’ हे दर्दभरे सिनेगीत राग ‘अहिर भैरव’वरच आधारित आहे. शिवाय मन्ना डे ह्यांनी गायिलेले, ‘पूछों ना कैसे मैने रैन बितायी’ हे डोळयांच्या (आणि मनाच्याही) पापण्या ओलावणारे विरहगीतसुध्दा ‘अहिर भैरव’ या रागावरच बेतलेले आहे.
‘बैरागी भैरव’ हा ‘भैरव’ थाटातूनच तयार झालेला आणखी एक वैशिष्टयपूर्ण राग! नावाप्रमाणेच वैराग्याची भावना ओतप्रोत भरलेला असा हा राग आहे. ‘ओंकार स्वरूपा’ हे सुरेश वाडकर ह्यांनी गायिलेले भक्तिगीत, श्रीधर फडके ह्यांनी राग ‘बैरागी भैरव’च्या सूरांच्या आधारेच संगीतबध्द केले आहे. शिवाय लताजींनी गायिलेल्या संत ज्ञानेश्वर रचित ‘पैलतोगे काऊ कोकताहे’ ह्या विरहिणीची चालसुध्दा राग ‘बैरागी भैरव’ चे सूर घेऊनच बांधण्यात आली आहे. ‘शिवमत भैरव’, ‘नटभैरव’ हे भैरव थाटातून निर्माण झालेले आणखी काही राग. आपल्यापैकी काही जणांनी हे राग रागदारीच्या मैफिलीतून ऐकले असतील.
तोडी थाट
‘करूण रसाने ओथंबलेला थाट म्हणजे, तोडी थाट’- असे तोडी थाटाचे अगदी यथार्थ वर्णन करता येईल. शुध्द तोडी, गुजरी तोडी, बिलासखानी तोडी, मियाँ की तोडी हे या थाटापासून निर्माण झालेले काही राग! (आमचे एक संगीतप्रेमी मित्र, ‘मियाँ की तोडी’ ह्या रागाला गमतीने ‘मियाँ की हातोडी’ असे म्हणत असत!) आता तोडी थाटाचे मूळ स्वरूप बघू या! ते असे-
सा, को.रे, को.ग, ती.म, प, को.धै, नि
आणि ह्याच थाटापासून निर्माण झालेल्या ‘शुध्द तोडी’ ह्या रागाचे आरोह, अवरोह असे
आरोह- सा, को.रे, को.ग, ती.म, प, को.धै, नि, सा!
अवरोह- सा!, नि, को.धै, प, ती.म, को.ग, को.रे, सा
वादी- को.धै, संवादी- को.ग
गानसमय- दिवसाचा पहिला प्रहर (सकाळी ६ ते ९)
राग तोडी कसा, तर, राम वनवासात जाताना पुत्र-वियोगाच्या कल्पनेनेच व्याकुळ झालेल्या राजा दशरथाने फोडलेल्या टाहोसारखा असेच म्हणावे लागेल! म्हणूनच कदाचित बाबूजींनी गीत-रामायणातील ‘थांब सुमंता, थांबवी रे रथ’ हे राम वनवासाला जायला निघालेले असताना, सर्व अयोध्यावासीयांच्या व्यथित झालेल्या मनाचे वर्णन करणारे गीत ‘तोडी’ रागात स्वरबध्द केले असावे, असा माझा भाबडा समज आहे. ‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तरांची करूण कहाणी सांगणारे, ‘कशी नशीबानं थट्टा आज मांडली’, हे गीत तोडी रागाचे सूर घेऊनच स्वरबध्द करण्यात आले आहे. तसेच लताबाईंनी गायिलेले मीराबाईचे प्रसिध्द भजन ‘साँवरो’च्या चालीचा आधार राग तोडीच आहे. ह्या भजनातील मीरेने कृष्णाला घातलेली व चराचराला व्यापून उरणारी आर्त साद स्वरबध्द करायला राग ‘शुध्द तोडी’हून अधिक योग्य राग असूच शकत नाही, असे मला नेहमी वाटत आले आहे. तसेच लताजींनी गायिलेल्या ‘इक था बचपन, इक था बचपन’ह्या फक्त स्मृतीतच शिल्लक राहीलेल्या बालपणाची दर्दभरी आठवण काढणा-या जुन्या चित्रपटगीताची चाल, तोडी रागाचे सूर घेऊनच सजली आहे.
ज्यांच्याजवळ पेटी किंवा कॅसिओ आहे, त्यांनी वरील राग आरोह-अवरोहासहीत जरूर वाजवून बघावेत. तुम्ही जर ही गाणी गुणगुणलात किंवा गाण्याची धून पेटीवर वाजवून पाहिलीत तर त्या सर्व गाण्यांच्या चालीत तुम्हांला साम्य आढळेल. कारण की, ती गाणी एकाच रागावर आधारित आहेत.
मला वाटते, लेखाच्या ह्या भागासाठी एवढी चर्चा आता पुरे झाली, अन्यथा, ‘मियाँ की हातोडी’ चा एक वेगळाच अनुभव मला येण्याची शक्यता नाकारता येत नाही! लेखाच्या पुढील भागात आपण आणखी काही थाटांविषयी चर्चा करू या!
– जयंत खानझोडे