कृष्णमूर्ती ज्योतिष


ज्योतिष कशासाठी?

Why Jyotishपरवाच माझ्या एका मित्राशी ई-मेलवर काही गोष्टींवर चर्चा करत असतांना अचानक त्याने मला एक प्रश्न विचारला, लोक ज्योतिषांकडे कशाला जातात? हे मला कळत नाही. आयुष्यात जर नशिबाचा वाटा मान्य केला, तर घडणार आहे ते घडतच पण मग हे सगळं पत्रिका दाखवून जाणून घेण्याची गरज काय? हया त्यांच्या प्रश्नाने मी या मुद्यावर अधिक विचार केला आणि ब-याच गोष्टी समोर आल्या. या मित्राचा खरं तर लपलेला प्रश्न होता की, ज्योतिषाचा माणसाला उपयोग काय? याचा विचार करताना अनेक विविध फायदे समोर येतात. सगळयात पहिल्यांदा हे जाणून घेऊ की ज्योतिष म्हणजे नेमके काय?

अगदी थोडक्यात आणि सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ‘ज्योतिष म्हणजे नशीब ओळखण्याचं साधन’ प्रत्येक गोष्ट मोजण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी काहीतरी साधन आवश्यक असतं, जसं दिशा ओळखण्यासाठी होकायंत्र, तापमान मोजायला तापमापी वगैरे, तसं ‘ज्योतिष’ हे नशिबात काय आहे हे ओळखण्यासाठी किंवा मोजण्यासाठी वापरायचं साधन आहे, ओळखण्याचा मार्ग आहे. ज्योतिषशास्त्राच्या फायद्याचा विचार करताना सगळयात पहिल्यांदा जो मुद्दा समोर येतो तो म्हणजे ‘मार्गदर्शन’ बरेच वेळेला ज्योतिषाबाबतच्या लेखात किंवा जाहिरातीत ‘ज्योतिष मार्गदर्शन’ असा उल्लेख अढळतो. ह्या ‘मार्गदर्शन’ शब्दाला महत्व आहे. कल्पना करा, तुम्ही एका बोटीवर एखाद्या महासागरात खूप लांब प्रवास करत आहात, चारही बाजुला पाणी आणि वर आकाश याखेरीज आजुबाजुला काहीही नाही, अशा अवस्थेत जर तुमची बोट मार्ग चुकली आणि भरकटली तर तुम्ही काय कराल, त्यातच जर तुमच्याकडचा अन्नधान्याचा साठा संपत आला असेल तर नक्कीच लवकरात लवकर ‘मार्ग’ शोधण्याचा प्रयत्न कराल. आयुष्याच्या बाबतीत देखील अगदी अस्सच आहे. आयुष्याची बोट जर भरकटली तर ज्योतिषाच्या आधारे ‘मार्ग’ शोधावा लागतो. वरील बोटीच्या उदाहरणात समजा, रेडीओ यंत्रणेद्वारे किंवा अन्य कुठल्या मार्गाने जर तुम्हाला कळलं की उत्तर दिशेला अमुक अमुक अंतरावर अमुक अमुक नावाचं बेट आहे, तर तुमचा निम्मा त्रास कमी होईल. ह्याच्या अगदी उलट, समजा असं कळलं की मैलो न मैल कुठलचं बेट नाही, तरी हे ‘कळणं’ सुध्दा महत्वाच ठरेल.

‘ज्योतिष मार्गदर्शन’ म्हणजे आयुष्यात पुढे काय होणार आहे हे आधीच जाणून घेणं. इथे मी ‘जाणून घेणं’ म्हणतोय, बदलण नाही. कारण, तसं जर नशीब बदलता आलं असतं तर सगळयात पहिल्यांदा जगातल्या सगळया ज्योतिषांनी आपापली नशीब बदलून घेतली असती. ‘पुढे काय होणार ‘ हे आधीच माहिती झाल्यामुळे मानसिक स्तरावर फरक पडतो. त्याप्रमाणे प्रयत्नांची दिशा चुकत असल्यास त्यात सुधारणा करता येते. उत्तर दिशेला बोट आहे हे कळल्यानंतर दक्षिण दिशेला प्रवास सुरू ठेवण्यात काही अर्थ नाही. ‘मी जे काही आत्ता करतोय ते बरोबर आहे का ?’ माझी वाटचाल योग्य दिशेला सुरू आहे ना?’ यांसारख्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. ‘प्रवाहाच्या विरुध्द दिशेने पोहण्यात शहाणपणा नसतो, त्यातून फक्त अपयशच येतं.’ हे म्हणजे दगडावर डोकं आपटल्या सारखं आहे.

ब-याच लोकांच्या मनात एक प्रश्न उभा राहतो आणि बरेच लोकं तो विचारतात देखील, तो हा की, ‘ग्रहांचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर नेमका कसा होतो? ‘ या बाबतीत दोन विचारधारा (school of thoughts) आहेत पहिली विचारधारा असं म्हणते ग्रहांचा आपल्यावर थेट (direct) परिणाम होतो. म्हणजे जशी सुर्याची उष्णता मिळते, चंद्रामुळे भरती, ओहोटी येते, तसाच बाकीच्या ग्रहांचा देखील माणसावर परिणाम होतो, पण हे म्हणावं तसं शास्त्रीदृष्टया अजुन सिध्द झालेलं नाही. दुसरी जी विचारधारा आहे ती असं म्हणते, की ‘ग्रह परिणाम करत नाहीत, ते फक्त काही गोष्टी दर्शवतात’ म्हणजे कसं? तर, रस्त्यात सिग्नल असतो. तसं, लाल दिवा म्हणजे थांबा, हिरवा दिवा म्हणजे पुढे चला. आणि पिवळा दिवा म्हणजे वेग कमी करा. ग्रह काहीच करत नाहीत, ते फक्त काही गोष्टी दर्शवितात आणि त्या गोष्टी ओळखण्याचा प्रयत्न आपण ज्योतिषशास्त्राच्या आधारे करत असतो. ही विचारधारा जास्त संयुक्तिक वाटते आणि पटण्यासारखी आहे.

मार्गदर्शनाबरोबरच ज्योतिषाचे आणखी देखील काही फायदे आहेत.. काही लोकांनी आयुष्यात खूप त्रास भोगलेला असतो, खूप खस्ता खाल्लेल्या असतात, त्यात त्यांना भविष्यात काही सुधारणा घडेल अशी अपेक्षा असतेच असं नाही. पण आत्तापर्यंत त्यांच्या आयुष्यात जे काही झालं ते पत्रिकेत दिसयं का? किंवा पत्रिकेनुसार तसच घडणार होतं का? हे जाणूण घ्यायची मात्र तीव्र इच्छा असते. एक लहानसं उदाहरण देतो. माझ्याकडे एकदा एका मुलाची पत्रिका बघितल्यावर मी विचारलं की, ‘मुलगा यावर्षी अभ्यासात खूप मागे पडला आहे का?’ त्यावर त्या मुलाच्या आईने सांगीतले की, ‘हो ह्या वर्षी तो नापासच झाला.’ आणि वर कपाळाला हात लावून म्हणाली, ‘म्हणजे हे त्याच्या नशिबातच होतं’, नशीबातचं होती म्हणून एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात घडली आहे, हे कळल्यावर एक प्रकारचं ‘मानसिक समाधान’ त्या माणसाला मिळत असतं. आपण आपल्या बाजूने प्रामाणिक प्रयत्न केले, याच एक मानसिक समाधान मिळतं आणि तेही खूप महत्त्वाचं असतं. काही वेळेला ज्योतिषी वाईट गोष्टी सांगत नाही असं म्हटले जाते, किंवा केवळ प्रश्नकर्त्याचं समाधान होण्यासाठी वाईट गोष्टींचा उल्लेख ज्योतिषी नीट करत नाहीत, असं म्हटले जाते. तर याबाबतीत, ज्योतिषांनी देखील रोक ठोक रहावं, जे जसं असेल तसं सांगावं तरच ते श्रेयस्कर आणि तेच खरं मार्गदर्शन होऊ शकेल. त्याचप्रमाणे वधु वरांच्या पत्रिका जुळवितांना देखील समोरच्या स्थळाचा स्वभाव विवाहसौख्य इ. गोष्टी ह्या लग्न होण्याच्या आधीच कळतात. समोरच्या स्थळाचा खरा स्वभाव, खरं स्वरूप ओळखण्यासाठी ‘ज्योतिषा’ व्यतिरिक्त दुसरा विश्वसनीय मार्ग नाही. ब-याच वेळा वरवर स्थळ खूप चांगली दिसतात पण ते पत्रिकेच्या आधारे पडताळून बघणं महत्वाच असतं कारण दिसतं तसं असतचं असं नाही पण पत्रिका खोटं बोलत नाही.

ज्योतिषाकडे भविष्य विचारायला येणा-या माणसांनी हे वरील सर्व मुद्दे ध्यानात ठेवणं महत्त्वाचं ठरेल, ज्याद्वारे त्यांना त्यांचा ज्योतिषाकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्की करता येईल. तेव्हा आता यापुढे जर तुमच्या मनात विचार आला की, ज्योतिष कशासाठी? तर लक्षात ठेवा की, की, ‘या वरील सर्व मुद्दयांसाठी’!

Astrologer अभय गोडसे,
http://www.abhaygodse.com