संगीतकला

गायन - हिंदुस्तानी संगीत

भावगीत

थाट काफी

वाचक मित्र हो, नमस्कार आणि अभिनंदन! तुम्ही म्हणाल, नमस्कार ठीक आहे, पण अभिनंदन कशाबद्दल?, ते काही कळलं नाही बुवा. सांगतो; माथेरानच्या निसर्गरम्य परिसरात एक अभिनव संगीत शिबिर आयोजित करण्यात आले आहे, ज्यात संगीतातील दिग्गज समस्त संगीतप्रेमींना मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्याचे मला व आपल्या सगळयांना निमंत्रण आले आहे. मग आपल्याला ह्या शिबिराला जाऊन काफी थाट व त्यावर आधारित रागांविषयी माहिती करून घ्यायला ही सुवर्णसंधी आहे की नाही, तुम्हीच सांगा. म्हणूनच तर तुमचे अभिनंदन केले. चला तर मग, लवकर निघायला हवे आपल्याला !

वा शिबिराच्या ठिकाणी तर आपण येऊन पोहोचलो आहोत. कुठल्यातरी सुंदर उपवनात हे शिबिर लागलेले दिसते आहे. येथे निसर्गाने केलेली कलाकुसरच इतकी सुंदर आहे की वेगळया सजावटीची आवश्यकताच नाही. प्रवेशद्वारावरील पाने व फुलांनी केलेली पुष्परचना किती मनोहारी आहे नाही?

“चला तर मित्रांनो (आणि गात्रांनो) सज्ज व्हा, एका सुंदर सोहळयात सहभागी व्हायला आपण जात आहोत”.

या, हा पहिला शामियाना कुणाचा आहे ते बघू या. अरे हा तर पंडित जसराजजींचा आहे! वा. अगदी दुग्ध-शर्करा योगच जुळून आला आहे म्हणायचा! चला तर, पंडितजींना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेऊया.

“नमस्कार पंडितजी”

“नमस्कार, ह्या शिबिरात मी आपले हार्दिक स्वागत करतो! या बसा”.

“पंडितजी, आम्ही सर्व मंडळी मराठीवर्ल्डचे वाचक आहोत आणि विशेष करून काफी थाट व त्यावर आधारित रागांची अधिक माहिती घेण्यासाठी ह्या शिबिरात आलो आहोत.”

“वा, काफी थाटाचे नाव ऐकताच माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. खूप बहारदार राग दिले आहेत ह्या थाटाने हिंदुस्थानी संगीताला आणि त्यासाठी आम्ही गायक तर जन्मोजन्मी काफी थाटाच्या ऋणात राहू. जसे राग बागेश्री, भीमपलास, पिलू, बहार, पटदीप, मियाँ मल्हार, वृंदावनी सारंग, शुध्द सारंग ये सब राग काफी थाटकीही अनमोल देन है।’

‘पंडितजी, ह्या थाटाविषयी व त्यातील रागांविषयी आम्हा रसिकांना थोडीशी माहिती द्याल का?’

‘खुशी से, आधी काफी थाट कसा आहे ते बघू या. त्याचे स्वरूप असे आहे. सा, रे, को.ग, म, प, ध, को.नि,

आता ह्यापासून तयार झालेला एक राग ‘मियाँ मल्हार’ बघा कसा आहे! संगीत सम्राट मियाँ तानसेन ह्यांची ती निर्मिती असल्यामुळे त्याचे नाव ‘मियाँ मल्हार’ असे पडले आहे. गाके सुनाता हूं।

आरोह असा आहे- सामरेप, मप, को.नि, ध नि सा!
आणि अवरोह असा- सा! को.नि, प, मप, को.ग, म, रे, सा.

ह्याचा वादी स्वर मध्यम आणि संवादी स्वर षडज् आहे.’

‘वाहवा पंडितजी, एकदम मोराने पिसारा फुलविल्याचा भास झाला.’

‘एकदम सही फर्माया. कारण राग मियाँ मल्हार वर्षा ऋतुचा सगळयात लाडका राग आहे. आणि मल्हारचे सूर ऐकले की मेघ दाटून येणार, मोर थुई थुई नाचणार आणि हे बघून मनाचा मोर सुध्दा नाचू लागला तर त्यात नवल ते काय!’

‘पंडितजी, ह्या रागावर एखादे गीत आधारित आहे का?’

‘हाँ। है ना। वाणी जयराम यांनी गायिलेले ‘बोल रे पपीहरा’ हे सिनेगीत मियाँ मल्हारवरच आधारित आहे. मल्हाराचे आणखीही प्रकार आहेत. जसे मेघ मल्हार, गौड मल्हार, छाया मल्हार, मीरा मल्हार इ.’

“पंडितजी, आपण राग बागेश्रीचा आधी उल्लेख केलात, त्याबद्दल जरा सांगाल का?”
“मित्र हो, राग बागेश्रीचे नाव ऐकून एक शेर आठवला, जरा गौर फर्माईये.”
“गुनगुनाती हुईसी आती है फलक सें बूंदे (फलक- आकाश)
कोई बदली तेरे पाजेबसे टकराई है।” वा, पंडितजी, क्या बात है।’ आम्ही सगळयांनी मनापासून दाद दिली.

“राग बागेश्री हा असाच एक रोमॅन्टिक मूड असलेला एक राग आहे आणि मला विचाराल तर मी असं म्हणेन की शृंगार करावा तर राग बागेश्रीनेच! शृंगार रसातील नाजूक व कोमल भावनांना व्यक्त करायला राग बागेश्रीचे स्वर अतिशय समर्पक आहेत. संगीत सौभद्र मधील, ‘बहुत दिन नच भेटलो सुंदरीला’ आणि संगीत पंडितराज जगन्नाथमधील ‘मदनाची मंजिरी साजिरी’ ही नाटयगीते तसेच ‘जाग दर्द ए इश्क जाग’ ह्या ‘अनारकली’ चित्रपटातील हेमंतकुमारांनी गायिलेल्या सिनेगीतातील शृंगाररस, राग बागेश्रीनेच तर खुलवला आणि फुलवला आहे.”

“पंडितजी, राग पिलूसुध्दा काफी थाटापासूनच तयार झाला आहे ना?, त्याबद्दल…”

“अहाहा राग पिलू की बात ही कुछ और है। ह्या रागाच्या सूरामध्ये खूप गोडवा आणि दर्द भरलेला आहे आणि तो तेवढयाच हळुवारपणे व्यक्त करण्याची क्षमताही त्या सूरांमध्ये आहे. ब-याच नाटयगीतांच्या एकापेक्षा एक सरस अशा चाली राग पिलूमध्ये बांधण्यात आल्या आहेत. मिसाल के तौरपर ‘अरे वेडया मना तळमळसी’, ‘जगी हा खास वेडयांचा पसारा’, ‘दे हाता शरणागता’, ‘हृदयी धरा हा बोध खरा’, ‘नच सुंदरी करू कोपा’, ह्या सर्व नाटयगीतांच्या चाली राग पिलूच्याच सुंदर सुरावटीची रूपे आहेत. आणि लताजींनी गायिलेल्या ‘मुघल-ए-आजम्’ मधील ‘मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे’ ह्या गीतातील मिठास तर काय वर्णावी ? ह्या गीताच्या चालीला राग पिलूनेच तर अवीट गोडी बहाल केली आहे.”

“पंडितजी राग पिलूवरून मला लहानपणीची एक गंमत आठवली. एकदा आकाशवाणीवर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होता. कार्यक्रमाचे निवेदन संपविताना निवेदिका म्हणाली, ‘अब सुनिये, सितार पे पिलू’ ते ऐकून मला काही अर्थबोध होईना. सतारीवर एखाद्या प्राण्याचे पिलू येऊन बसले की काय, असे माझ्या बालमनाला क्षणभर वाटून गेले.”

“हा!हा!हा! लेकीन अब वो पिलू बडा आदमी बन गया होगा। अब मेरे खयाल से सितार पे पिलू नहीं आदमीही बैठता होगा।” पंडितजींचा हजरजबाबीपणा वाखाणण्यासारखा होता.

“पंडितजी काफी थाटापासून तयार झालेले अजून कोणते प्रचलित राग आहेत?”

“अरे हा. भीमपलासचा उल्लेख केल्याशिवाय काफी थाटाची माहिती आणि ‘महती’सुध्दा पूर्ण होऊ शकत नाही”.

राग भीमपलास मूळात भक्तीरसप्रधान राग आहे. अनेक भजनांच्या चाली, विशेषत: भजनी मंडळातून जी भजने गायली जातात, त्यांच्या चाली आपल्याला, हमखास राग भीमपलासमध्ये बांधलेल्या दिसतील. ‘ए री मै तो प्रेम दिवानी, मारो दर्द ना जानो कोई’ हे लताजींनी गायिलेले संत मीराबाईचे भजन राग भीमपलासमध्येच स्वरबध्द करण्यात आले आहे. ह्याशिवाय भीमपलासमध्ये ब-याच नाटयगीतांच्याही चाली गुंफण्यात आल्या आहेत. जसे ‘स्वकुल तारका सुता’, ‘मूर्तीमंत भीती उभी’, ह्या सर्व नाटयगीतांच्या चालीत भीमपलासचेच सूर पेरण्यात आले आहेत. और अभिषेकीजीका ‘काटा रूते कुणाला’ तो आपने सुनाही होगा। बुवा काय अप्रतिम गायले आहेत हे गीत! ‘आतल्या जीवाची ही कळ’ व्यक्त करायला, बुवांनी राग भीमपलासचीच निवड केली आहे, बरं का!

“पंडितजी, काफी थाटाविषयी आतापर्यंत बरेच काही ऐकले. पण अजूनही खूप ऐकण्याची इच्छा आहे. लगता है, अभी काफी नहीं हुआ।”

वा! छान कोटी केलीत. आणि एका अर्थाने तुम्ही म्हणता ते बरोबरही आहे, कारण काफी थाटापासून तयार झालेल्या आणखी एका रागाचा येथे उल्लेख करणे आवश्यक आहे, तो म्हणजे राग शुध्द सारंग व त्याची भावंडे असलेली वृंदावनी सारंग, गौड सारंग, मधमात सारंग, मियाँ की सारंग इ.

सारंग कुटुंबातील रागांचे वैशिष्टय असे की हे राग किंवा त्यावर आधारित रचना एकदा ऐकून तुमचे मन कधीही भरणार नाही. वारंवार ऐकाव्याशा वाटतील. उदाहरणच द्यायचे झाले तर राग शुध्द सारंगवर आधारित रामदास कामत ह्यांनी गायिलेले संत गोरा कुभार ह्यांचे प्रसिध्द भजन, ‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे’ व ‘मधुरा बिंबाधरा’ हे संगीत शारदातील नाटयगीत. इन गीतोंका मै जितना ज्यादा सुनता हूं, उतनीही उन्हे सुननेकी मेरी प्यास और भी बढ जाती है। आणि हो. ‘साद देती हिमशिखरे’च्या चालीचा आधार देखील सारंगचाच. फक्त थोडेसे बाकीच्या स्वरांचे मिश्रण आहे. अगदी ख-या अर्थाने अवीट गोडी असलेली गीते आहेत ही, नाही का? …. “अरे हो, तुझे नाव पण घेतो जरा, धीर धर.”

पंडितजी कोणाशी बोलले ह्याचा आम्हाला काहीच उलगडा झाला नाही. पंडितजींनीच त्याचा खुलासा केला. ‘मंडळी आत्ता राग पटदीप व राग बहारचे सूर येऊन माझ्या कानात कुजबुजून गेलेत, की आमचा उल्लेख तुम्ही कधी करणार ? म्हणून मी त्यांच्याशी बोललो. आणि त्यांच्या नावाचा उल्लेख करायलाच हवा नाहीतर ते नाराज होतील बरे का!

मंडळी, राग पटदीप हा काफी थाटातील आणखी एक नितांत सुंदर राग! विरह वेदना वाहणारा बराचसा करूण, आर्त असा हा राग आहे. आणि ह्याचे एक छान उदाहरण म्हणजे, ह्या रागात स्वरबध्द करण्यात आलेले, लताजींनी गायिलेले शर्मिली चित्रपटातील ‘मेघा छाये आधी रात, बैरन बन गयी निंदीया’ हे गीत ! ह्या गीतातील विरहवेदना संगीतकार सचिनदेव बर्मन ह्यांनी राग पटदीपच्या आधारे अक्षरश: जिवंत केली आहे. तसेच ‘मर्मबंधातली ठेव ही’ ह्या नाटयगीताची ‘मर्मबंधातील ठेव’ असलेली चालसुध्दा राग पटदीपमध्येच गुंफण्यात आली आहे.

आता ‘बहार’ रागाविषयी थोडक्यात सांगतो. गाताक्षणीच निष्पर्ण वृक्षावरही बहार फुलविण्याची किमया करू शकणारा राग म्हणजे राग बहार असे म्हणता येईल. ‘छमछम नाचत आई बहार’ ह्या लताजींनी गायिलेल्या प्रसिध्द सिनेगीताच्या चालीला ‘बहार’नेच बहर आणला आहे. तसेच ‘कुहुकुहू बोले कोयलिया’ ह्या सुपरिचित ह्या सिनेगीतातील ‘काहे घटा में बिजुरी चमके’ हे कडवे राग बहारमध्येच स्वरबध्द करण्यात आले आहे.

“पंडितजी आता काफी थाटातील एखाद्या रागावर आधारित एखादी चीज ऐकवा ना!”

पंडितजींनी आमच्या आग्रहाला मान देऊन राग भीमपलास मधील ‘जा जा रे अपने मंदिरवा’ ही चीज आम्हाला ऐकविली. पंडितजींनी केलेले काफी थाटाचे निरूपण आणि त्यांचे गायन ऐकून आमची श्रवणेंद्रिये अगदी तृप्त झाली होती.

तेवढयात कुणाला तरी नारळ पाण्याची आठवण झाली. मंडळी तहानलेली दिसत आहेत. त्यांना आता ब्रेक द्यायला हवा. पंडितजींनी संगीतविषयक जी अनमोल माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानून आम्ही त्यांचा निरोप घेतला.

“चला, रसिकजन हो, आता आपल्याला शिबिराच्या पुढच्या टप्प्यात जायचे आहे, पण त्या आधी मला पण एक छोटासा ‘ब्रेक’ द्या ना; नारळपाणी प्यायला?”.

अच्छा, बाय ऽऽऽ ! पुन्हा लवकरच भेटूया!

– जयंत खानझोडे