संगीतकला

गायन - हिंदुस्तानी संगीत

भावगीत

थाट बिलावल

नमस्कार! ब-याच कालावधीनंतर आपण भेटत आहोत. सूरांच्या जगातील आपला आतापर्यंतचा प्रवास निश्चितच आल्हाददायक झाला असेल अशी मी आशा करतो. लेखाच्या ह्या म्हणजे चौथ्या भागात आपल्याला थाट ‘बिलावल’ व त्यापासून निर्माण झालेल्या काही प्रचलित आणि रंजक रागांची तोंडओळख करून घ्यावयाची आहे. चला तर मग, व्हा तय्यार!

बिलावल थाट

बिलावल थाट व त्यापासून निर्माण झालेले राग म्हणजे मनाला निखळ आनंद व प्रसन्नता देणा-या स्वरांचे एक लोभसवाणे कुटुंबच आहे! कुठल्याही जडभर झालेल्या मनाला ऐकताक्षणीच हलकं-फुलकं करणारा राग ‘बिहाग’, प्रणय रसाची उधळण करणारा राग ‘भिन्न षडज्’, सूर कानी पडताक्षणीच, आपल्याला थेट काश्मिरच्या रम्य पहाडांवर नेऊन सोडणारा राग ‘दुर्गा’, वीररसाने ओतप्रोत भरलेला राग ‘शंकरा’ ही सर्व बिलावल थाटाचीच अपत्ये होत!

इतके नितांत सुंदर राग देणा-या थाटाचे नावसुध्दा गोडच आहे, नाही का ?- बिलावल!

आता जरा बिलावल थाटाचे स्वरूप बघूया! ते असे आहे –

सा, रे, ग, म, प, ध, नि
आणि अलैय्या बिलावल हा ह्या थाटापासून तयार झालेला एक राग! त्याचे आरोह-अवरोह असे आहेत –
आरोह- सा, रे, ग, म, प, ध, नि, ध, नि, सा!
अवरोह- सा!, नि, ध, को.नि, ध, प, म, ग, म, रे, सा
वादी- धैवत, संवादी- गंधार, गानसमय- दिवसाचा प्रथम प्रहर

ह्या रागाचे आरोह-अवरोह बारकाईने बघितल्यास, आरोह-अवरोहाचे चलन जरा आडवळणाने जाते आहे, असे लक्षात येईल. म्हणजे आरोहात निषादानंतर परत धैवत व त्यानंतर परत निषाद आला आहे. तसेच अवरोहात धैवतानंतर कोमल निषाद व त्यानंतर परत धैवत आणि मध्यमानंतर गंधार व त्यानंतर परत मध्यम आला आहे. ह्या वैशिष्टयपूर्ण चलनामुळेच ह्या रागाचे स्वरूप स्पष्ट होते (आणि घरी पेटी असणा-यांनी तो जरूर वाजवून पाहावा!)

बिलावल थाटाने, भारतीय शास्त्रीय संगीताला, चित्तवृत्ती मोहून टाकणारे खूप राग बहाल केले आहेत. त्यातील काही निवडक रागांकडे आपण जरा जवळून बघूया! चित्रपट ‘गूंज उठी शहनाई’ मधील लताजींनी गायिलेले ‘तेरे सूर और मेरे गीत’ हे निरागस प्रीतीभावना व्यक्त करणारे गीत ऐकलेले नाही, असा माणूस (आणि स्त्री पण) विरळाच! संगीतकार वसंत देसाई ह्यांनी बिहाग रागातील स्वरांचे मोती घेऊनच ह्या गीताला चालीचे अलंकार चढविले आहेत. तसेच ‘मम आत्मा गमला’ ह्या प्रसिध्द नाटयगीताची चाल देखील बिहाग रागाच्या कोंदणातच सजवण्यात आली आहे.

राग ‘भिन्न षडज्’ हा बिलावल थाटातील आणखी एक मधुर राग! ‘तुम बिन जीवन कैसा जीवन’ ह्या मन्ना डे ह्यांनी गायिलेल्या ‘बावर्ची’ चित्रपटातील प्रणय गीताची चाल, मदनमोहन यांनी राग ‘भिन्न षडज्’ मध्येच गुंफली आहे. शिव कल्याण राजा ह्या कॅसेटमधील ‘जयदेव जयदेव जयजय शिवराया’ ह्या शिवशक्तीला आवाहन करणा-या भक्तीगीताचे सूर कानी पडल्यावर शरीरातील रोम न् रोम पुलकित होण्याचा अनुभव मी प्रत्येक वेळी घेतला आहे. ही किमया राग ‘भिन्न षडज्’च्या सुरांचीच बरं !

बिलावल थाटाने भारतीय शास्त्रीय संगीताला, वीररस प्रधान रागसुध्दा दिलेले आहेत. ‘शंकरा’ हा त्यापैकीच एक राग. ऐकल्यावर कुणाचेही बाहू स्फूरण पावावेत, एवढे सामर्थ्य ह्या रागाच्या सूरांमध्ये आहे. गीत रामायणातील ऋषी विश्वामित्राच्या तोंडी असलेले ‘मार ही त्राटीका रामचंद्रा’ हे वीरश्रीयुक्त गीत आपण ऐकले असेलच! ह्या गीताच्या धनुष्याला बाबूजींनी ‘शंकरा’ रागाचे सूर घेऊनच चालीची प्रत्यंचा चढविली आहे.

राग ‘दुर्गा’ ही बिलावल थाटातून निर्माण झालेली जादुई स्वरांची आणखी एक लडी! ह्या रागाने तर मला प्रत्येक वेळेस आल्हाददायक निसर्ग-सहलीचाच अनुभव व आनंद दिला आहे. खूप लोकप्रिय असलेल्या ह्या रागातील पंडित भीमसेन जोशी ह्यांची ‘तू रस कान रे’ ही प्रसिध्द चीज आपल्यातील जे शास्त्रीय संगीताचे दर्दी रसिक आहेत, त्यांनी नक्कीच ऐकली असेल. (मी लहान असताना ह्या चीजेतील शब्द मला ‘तू रस खान रे’ असे ऐकू यायचे. त्यामुळे एखादा दर्दी खवय्या आपल्या मित्राला जणू आमरस खाण्याचाच आग्रह करतो आहे, अशी एक गमतीदार कल्पना माझ्या मनात चमकून जायची! हा विनोद भीमसेनजींनी वाचला तर ते मला ‘तू धर कान रे’ असेच बहुदा म्हणतील) राग ‘दुर्गा’वरच आधारीत अवीट गोडी असलेले आणखी एक गीत म्हणजे, ‘गीत गाया पत्थरोंने’ ह्या चित्रपटाचे शीर्षक-गीत! आजच्या रिमिक्सच्या जमान्यात सुध्दा ह्या गीताचे माधुर्य टिकून आहे, आणि त्याचे श्रेय संगीतकारासोबतच राग ‘दुर्गा’च्या सुरांना सुध्दा आहे.

चला तर मग. आता मला निघायला हवे! लेखाच्या पुढच्या भागासाठी थाट ‘काफी’ आणि त्यावर आधारीत राग व गीते तुमच्याकरिता शोधून जी आणायची आहेत. अच्छा! बाय! पुन्हा लवकरच भेटुया!!

– जयंत खानझोडे