संगीत-प्रेमी रसिकहो, नमस्कार !
मंडळी, लेखमालेच्या ह्या भागात आपल्याला थाट खमाज व त्यावर आधारीत रागांची ओळख करुन घ्यावयाची आहे.
थाट खमाज आणि त्यावर आधारीत असलेले राग म्हणजे मधाळ स्वरांचे पोळेच जणू ! थाट खमाजवर आधारीत कुठलाही राग ऐका, त्याचे सूर आपल्या हृदयात एक अनोखा, हवाहवासा वाटणारा गोडवा जागवतील हे अगदी नक्की! ह्या थाटातील, राग खमाज, राग जय-जयवंती, राग कलावती, राग देस, राग तिलक-कामोद, राग झिंझोटी, राग तिलंग व त्यावर आधारलेली गीते ऐकल्यावर ह्या अवर्णनीय गोडव्याचा आपणास प्रत्यय आला नाही तरच नवल ! ( मधुमेह असणा-या रसिकांनी संभाळून ऐकावा, ‘शुगर’ वाढू शकते !)
चला तर मग, ह्या मधाळ स्वर-यात्रेचा प्रारंभ थाट खमाजचे स्वरुप कसे आहे, ते जाणून करु या !
थाट खमाजचे स्वरुप असे आहे-
सा, रे, ग, म, प, ध, कों.नि.
आणि ह्या थाटावर आधारीत एक प्रसिध्द राग, ‘देस’ असा आहे-
आरोह- सा, रे, म, प, नि, सां,
अवरोह- सां, को.नि, ध, प, म, ग, रे, सा
वादी स्वर- रे, संवादी स्वर- प
शृंगाररसप्रधान असलेला राग देस, हा थाट खमाजमधील सर्वात प्रचलीत, प्रसिध्द व लोकप्रिय राग आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.ह्या रागावर आधारीत गीतांची यादी करायची म्हटली तर एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल. उदाहरणादाखल राग देसमधील काही चाली बघा!
आपण सकाळी आकाशवाणीवर ऐकतो त्या ‘वंदे मातरम’ची चाल राग देसमधेच बांधण्यात आली आहे. ह्याशिवाय ‘देह देवाचे मंदीर’ (संगीत प्रीती-संगम), आणि ‘मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला’ ( संगीत विद्याहरण) ह्या लोकप्रिय नाटयगीतांच्या चाली राग देसच्याच रसमय सूरांत गुंफण्यात आलेल्या आहेत.
सिनेगीतात म्हणाल तर ‘तू चंदा, मै चांदनी’ (फिल्म- रेश्मा और शेरा), ‘गोरी तोरे नैन-नैनवा, कजर बिन कारे-कारे'( फिल्म-मै सुहागन हूँ ), ‘आपको प्यार छुपानेकी बुरी आदत है’ (फिल्म-नीला आकाश), ‘अजी रुठकर अब, कहा जाईयेगा'(फिल्म-आरजू), ‘बेकसी हदसे जब गुजर जाये’ (फिल्म-कल्पना), ‘सैंया जाओ, तोसे ना बोलु’ (फिल्म-झनक झनक पायल बाजे), तकदीर का फसाना, जाकर किसे सुनाऊँ'(फिल्म-सेहरा) ह्या अजरामर व रसील्या सिनेगीतांच्या चालीसुध्दा राग देसच्याच स्वर-रत्नांनी मढवलेल्या आहेत.
‘राग खमाज’ हा थाट खमाज वरच आधारीत असलेला आणखी एक मनमोहक राग!अतिशय लडिवाळ सूर असलेल्या ह्या रागाने नाटय-जगताला बहाल केलेली काही स्वर-मौक्तिके म्हणजे ‘या नव नवल नयनोत्सवा’ (संगीत मानापमान), ‘गुंतता हृदय हे’ (संगीत मत्स्यगंधा), ‘छेडियल्या तारा'(संगीत हे बंध रेशमाचे) ह्या नाटयगीतांच्या, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणा-या चाली !
चित्रपटसृष्टी तर राग खमाजच्या कायमच ऋणात राहील अश्या एकाहून एक सुंदर चाली ह्या रागाने फिल्मी-जगताला दिलेल्या आहेत. ‘ओ सजना, बरखा बहार आयी’ (फिल्म-परख), ‘श्याम ढले जमुना किनारे'(फिल्म-पुष्पांजली), ‘आयो कहासे घनश्याम'(फिल्म-बुढ्ढा मिल गया), ‘बडा नटखट है रे किसन कन्हैय्या’ व ‘कुछ तो लोग कहेंगे'(फिल्म-अमरप्रेम), ‘नजर लागी राजा तोरे बंगलेपर’ (फिल्म-काला पानी), ‘तेरे बिन साजन लागे ना जियरा हमार’ (फिल्म-आरती) ही सर्व राग खमाजच्याच सूरांची पखरण आहे, महाराजा!
थाट खमाजच्या स्वर-तरुवर फुललेले आणखी एक सर्वांगसुंदर स्वरपुष्प म्हणजे राग जयजयवंती ! ‘मनमोहना बडे झूठे'(फिल्म-सीमा),’ये दिलकी लगी क्या कम होगी'(फिल्म-मुगल-ए-आझम), ‘जिंदगी आज मेरे नामसे शरमाती है’ (फिल्म-?), ‘ठुमक चलत रामचंद्र’ हे भजन, आणि ‘ लहरी आता सुखाच्या'(संगीत अमृतसिध्दी) ह्या सर्व मनात कायमच रुंझी घालणा-या गीतांच्या, रेशमी चालींचे सूर राग जयजयवंतीचेच, बरे का मित्रहो?
‘झिंझोटी’! हे नाव कधी ऐकले आहे का, मंडळी ? काहीसे गमतीदार असलेले हे नाव कुठल्या प्राण्याचे किंवा पक्ष्याचे नसून, थाट खमाजवर आधारीत एका रागाचे नाव आहे.
गंमत म्हणजे आपण जवळ-जवळ रोज गुणगुणत असलेल्या काही गीतांच्या चाली, ह्या कमालीचा गोडवा असणा-या रागावर आधारीत आहेत, हे आपल्याला सांगूनसुध्दा खरे वाटणार नाही. ह्या चालीच बघा ना- ‘छुप गया कोई रे, दूरसे पुकारके’ (फिल्म-चंपाकली), ‘मेरे मेहबूब तुझें मेरे मुहब्बत की कसम'(फिल्म-मेरे मेहबुब), ‘जाऊ कहाँ बता ए दिल'(फिल्म-छोटी बहन), ‘हाँ तुम मुझे यूँ भुला ना पाओगे’ (फिल्म-पगला कही का), ‘तेरी ऑंखोके सिवा दुनियामे रखा क्या है’ (फिल्म-चिराग), ‘घुंगरु की तरह बजता ही रहा हू मै'(फिल्म-चोर मचाये शोर), ‘मोसे छल किये जाये, सैंय्या बेईमान'(फिल्म-गाईड),’ जा जा रे जा, बालमवा(फिल्म-बसंत बहार), ‘कोई हमदम ना रहा, कोई सहारा ना रहा'(फिल्म-झुमरु)- ह्या सर्व सिनेगीतांच्या चाली राग झिंझोटीचे स्वर घेऊनच रचण्यात आल्या आहेत! अनबीलीव्हेबल, हो ना ?
थाट खमाजच्याच कुटुंबातील आणखी एक लाघवी प्रकृतीचा सदस्य म्हणजे ‘राग कलावती’, जो माझा स्वत:चा अत्यंत आवडता राग आहे; (‘अत्यंत’ हा शब्द दहा वेळेला लिहिला तरी त्याला माझी हरकत नाही). ह्या रागातील स्वर-मिलाफ, ऐकणा-यावर अशी काही भुरळ घालतो की, हा राग कितीही वेळा ऐकला तरी मन तृप्त होत नाही; ह्या उक्तीचा मी स्वत: कितीतरी वेळा अनुभव घेतला आहे!
कलावती रागातील, मनाला नादावून सोडणा-या काही गीतांच्या चाली आपल्याला सांगतो, बघा- ‘प्रथम तुज पाहता, जीव वेडावला'(फिल्म- मुंबईचा जावई), दे मला गे चंद्रीके, प्रीती तुझी’ हे भावगीत,(माझा एक मित्र त्याच्या तापट स्वभावाच्या ‘खास’ मैत्रीणीला उद्देशून ‘दे मला गे चंडीके, प्रीती तुझी’ असे म्हणायचा!) ‘जय गंगे भागीरथी’ (संगीत पंडितराज जगन्नाथ) हे नाटयगीत, ‘कोई सागर दिलको बहलाता नही'( फिल्म-दिल दिया दर्द लिया),’ काहे तरसाये जियरा'(फिल्म-चित्रलेखा), ‘है अगर दुश्मन, जमाना गम नही'(फिल्म-हम किसीसे कम नही) ही कव्वाली, ‘सनम तू ,बेवफा के नामसे मशहूर हो जाये’ (फिल्म-खिलौना),’ हाय रे वो दिन क्यो ना आये'(फिल्म-अनुराधा) !
मला वाटते ,’प्रथम तुज ऐकता, जीव वेडावला’ असेच राग कलावतीच्या सूरांना उद्देशून म्हणायला हवे, खरे ना? थाट खमाजपासूनच उगम पावलेली आणखी एक स्वर-सरिता म्हणजे ‘राग तिलक कामोद’! काहीसा संथ प्रकृतीचा परंतु अवीट नाद-माधुर्य असलेला असा हा राग आहे. ‘रवि मी, चंद्र कसा मग'(संगीत मानापमान) व ‘यतिमन मम मानीत त्या’ (संगीत ययाती-देवयानी) ह्या प्रसिध्द नाटयगीतातील सूर राग तिलक-कामोदचेच!
राग तिलक कामोदच्या स्वरांनी भक्ती रसात चिंब न्हाऊन निघालेले आणखी एक गीत आहे – ‘गगन सदन तेजोमय'(फिल्म-उंबरठा)! तेजोमयाची आळवणी ह्यापेक्षा अधिक आर्जवाने, आर्ततेने करता येऊ शकेल ? नाही बहुदा.
रसिकहो, प्रसिध्द सिने-संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आपल्याला माहिती आहेतच. थाट खमाजचेच अपत्य असलेल्या एका रागाच्या सूरांचा, मोठया खुबीने वापर करुन त्यांनी सिने-गीतांच्या काही उडत्या व कर्णमधुर चाली बांधलेल्या आहेत. तो राग म्हणजे राग तिलंग. ‘इतना तो याद है मुझे’ (फिल्म-मेहबूब की मेहंदी) व ‘छुप गये सारे नजारे, ओय क्या बात हो गयी’ (फिल्म-दो रास्ते), ही गीते कितीतरी वेळा आपण रेडिओवरुन ऐकली असतील! ह्या चालींना राग तिलंगच्याच सूरांनी नजाकत बहाल केली आहे. तसेच ‘तारिणी नव-वसन धारीणी’ (संगीत पटवर्धन) ह्या बहुपरिचीत नाटयगीताची चाल देखील राग तिलंग मधीलच!
मंडळी, थाट खमाजच्या वंश-वृक्षाचे वर्णन, ह्या थाटातील राग रागेश्रीचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. राग रागेश्री हा त्याच्या जातकुळीतील इतर रागांप्रमाणेच एक हळुवार, शृंगार-रसप्रधान राग आहे. आपल्या मनपटलावरची ज्यांची स्मृती कधीही पुसल्या जाऊ शकत नाही, अश्या राग रागेश्रीच्या स्वरमालेत गुंफलेल्या काही अजरामर चाली बघा – ‘मोहब्बत ऐसी धडकन है'(फिल्म-अनारकली), ‘कौन आया मेरे मनके द्वारे'(फिल्म- देख कबीरा रोया), ‘कोइ गीत सुहाना मेरे, संग गा, गुनगुना’ (फिल्म-जानवर). ह्या रागातील सूरांप्रमाणेच रागाचे नावही सुंदर आहे, नाही?- रागेश्री !
चला तर मंडळी, आता ब्रेक घ्यावा म्हणतो. लेखमालेच्या पुढील भागात आपल्याला थाट कल्याण व त्यावर आधारीत रागांची ओळख करुन घ्यावयाची आहे. बाय-बाय!
– जयंत खानझोडे