संगीतकला

गायन - हिंदुस्तानी संगीत

भावगीत

थाट व राग भाग १

“नुसता थाट बघ तिचा!” किंवा “अगदी नाकावर राग आहे हं त्याच्या!”- ह्या आपण नेहमी ऐकणा-या वाक्यातील (विशेषत: बायकांच्या तोंडून) ‘थाट’ किंवा ‘राग’ ह्या शब्दांच्या प्रचलित अर्थापेक्षा शास्त्रीय संगीतातील थाट व राग ह्या शब्दांचे अर्थ खूप वेगळे आहेत. पण संगीतातील ‘थाट’ व ‘राग’ यांची माहिती करून घेण्याआधी ‘स्वर’- ज्यापासून संगीत बनले आहे, त्याविषयी थोडेसे जाणून घेऊया!

स्वर- स्वराची शास्त्रीय व्याख्या काय, असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याला, ‘स्वर म्हणजे अभिव्यक्तिक्षम ध्वनी किंवा संगीत दृष्टया अर्थसूचक ध्वनि’ असे ऐकायला एकदम जड वाटणारे उत्तर त्याहीपेक्षा जड स्वरात देता येईल. (म्हणजे, प्रश्न विचारणा-याचाच स्वर बंद!!) पण अगदी सोप्या भाषेत जर सांगायचे झाले तर, ज्या ध्वनीत माधुर्य आहे, आणि जो ध्वनि भाव व्यक्त करू शकतो तो ध्वनि म्हणजे ‘स्वर’ असे म्हणता येईल! जसे कोकिळेचा स्वर; कोकिळेने ‘पंचम स्वर लाविला’ असे वर्णन आपण कथा-कवितांमधून वाचत असतो किंवा मंदिरातील घंटानाद! हे दोन्ही ध्वनि केवळ माधुर्यच असलेले ध्वनि नसून, त्यात भावसुध्दा व्यक्त करण्याची क्षमता आहे. म्हणून आपण त्यांना ‘स्वर’ म्हणू शकतो. कोलाहल किंवा गोंगाटाला स्वर म्हणता येणार नाही!

शास्त्राच्या अभ्यासाला सोयीचे व्हावे म्हणून संगीतात स्वरांचे तीन प्रकार केले आहेत. शुध्द स्वर, कोमल स्वर आणि तीव्र स्वर. ज्यांना ‘मूलभूत’ म्हणता येईल असे शुध्द स्वर सात आहेत. ते असे- षडज्, शुध्द ऋषभ, शुध्द गंधार, शुध्द मध्यम, पंचम, शुध्द धैवत, व शुध्द निषाद. ह्यांना अनुक्रमे, सा, रे, ग, म, प, ध, नि – अशी सांकेतिक नावे आहेत. लहानपणी आपल्यापैकी ब-याच जणांनी ही स्वरावली हार्मोनियम किंवा कॅसिओवर वाजविली असेल.

स्वरांचा आणखी एक प्रकार म्हणजे, कोमल स्वर. मूळ स्वरापेक्षा अर्ध्या स्वरांतराने कमी असलेल्या स्वरांना ‘कोमल स्वर’ म्हणतात. हा नियम फक्त ऋषभ, गंधार, धैवत, निषाद ह्याच स्वरांना लागू आहे, म्हणून फक्त ह्याच स्वरांचे कोमल रूप होऊ शकते. ते म्हणजे, कोमल ऋषभ, कोमल गंधार, कोमल धैवत, कोमल निषाद. ह्यांना रे, ग, ध, नि अशी सांकेतिक नावे आहेत. ठळक केलेले स्वर म्हणजे म्हणजे कोमल स्वर एवढे लक्षात ठेवले तरी पुरे! (खरे तर संगीतातील सर्वच स्वर इतके नाजुक व कोमल आहेत की त्यांना वेगळे असे ‘कोमल’ नाव देण्याची काय गरज हेच मला समजत नाही!)

स्वरांचा तिसरा प्रकार म्हणजे तीव्र स्वर. मूळ स्वरापेक्षा अर्ध्या स्वरांतराने जास्त असलेल्या स्वरांना ‘तीव्र स्वर’ म्हणतात. हा नियम फक्त मध्यम ह्या स्वरालाच लागू आहे. म्हणून फक्त ह्याच स्वराचे तीव्र स्वरूप होऊ शकते. ते म्हणजे तीव्र मध्यम ह्याला, (डोक्यावर उभी रेघ असलेला ‘म’) म असे सांकेतिक नाव आहे. स्वराच्या नावाच्या डोक्यावर एक छोटी रेघ आहे, हे कृपया नोट करणे. (हे महाशय एकाच वेळी ‘तीव्र’ व ‘मध्यम’ स्वरूपात कसे वावरतात हे एक कोडेच आहे.)

ज्या स्वरांचे, ‘कोमल’ किंवा ‘तीव्र’ असे कुठलेच रूप होऊ शकत नाही, असे स्वर म्हणजे षडज् व पंचम ! म्हणजे, हम नहीं बदलेंगे अशा स्वभावाचे ! ते नेहमी शुध्द स्वरूपातच राहतात.

थाट व रागांकडे वळण्याआधी, ‘सप्तक’ म्हणजे काय, याची थोडक्यात माहिती घेऊयात! वर ज्या बारा स्वरांचा उल्लेख केला आहे, (म्हणजे, सात शुध्द, चार कोमल आणि एक तीव्र, असे एकूण बारा) त्या सर्वांचे मिळून एक सप्तक तयार होते. गायन-वादनात सामान्यत: तीन सप्तकांचा वापर होतो. मंद्र सप्तक, मध्य सप्तक व तार सप्तक. आपल्याला राग आला, (संगीतातला नाही), तर आपण ‘तार सप्तकात’ ओरडतो, ह्याचा बहुतेकांना अनुभव असेलच! अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर, सप्तक म्हणजे एक प्रकारचे स्वरांचे मजलेच आहेत. मंद्र सप्तक म्हणजे तळ मजला, मध्य सप्तक म्हणजे पहिला मजला, व तार सप्तक म्हणजे, दुसरा मजला! वर सांगितलेले बाराही स्वर हे तीनही सप्तकात असतात, किंवा तीनही सप्तकात गाता, वाजवता येतात.

जास्त सोपे करून बघुया! असे समजा, की एक जोशी कुटुंब आहे, व त्यात १२ सदस्य आहेत, जे परस्परांच्या नात्यात आहेत. समजा हे कुटुंब तळ मजल्यावर राहते आहे. तर हे बारा मेंबर म्हणजे, जणू मंद्र सप्तकातील १२ सूर आहेत, असे समजा. आता हेच कुटुंब जर पहिल्या मजल्यावर राहायला गेले तर, हे बारा मेंबर मध्य सप्तकातील १२ सूर होतील, आणि दुस-या मजल्यावर राहायला गेले तर, तार सप्तकातील १२ सूर होतील! हे कुटुंब कुठल्याही मजल्यावर राहीले तरी त्यातील सदस्यांचा आपापसातील नातेसंबध तोच राहील. फक्त ये-जा करताना, त्यांना मजल्यानुसार जास्त वा कमी जिन्यांची चढ-उतर करावी लागेल. असेच काहीसे सूर व सप्तकांचे आहे.

‘हार्मोनियम’ वरील पहिल्या पांढ-या पट्टीला ‘सा’ मानल्यास इतर स्वरांसाठी कुठल्या कुठल्या पट्टया असतील किंवा लागू होतील ते दाखविले आहे.

भाग दोन मध्ये आपण ‘थाट व राग’ यांची माहिती घेऊ.

– जयंत खानझोडे

टिप – कोमल स्वर व तीव्र स्वर दाखविण्याच्या प्रचलित पध्दती अनुक्रमे स्वर अधोरेखित करणे व डोक्यावर एक रेघ काढणे अशा आहेत. परंतु फॉन्टस्च्या काही अडचणींमुळे लेखाच्या ह्या भागात तसे दाखविता आले नाही. त्या ऐवजी स्वर ठळक दाखविले आहेत. त्यामुळे लेख वाचताना विसंगती जाणवेल, म्हणून मुद्दाम ही टिप दिली आहे. ह्या पुढील लेखांमध्ये कोमल स्वर व तीव्र स्वर दर्शविताना स्वरांच्या नावाच्या आधी अनुक्रमे को.(कोमल) व ती.(तीव्र) असे संक्षिप्त नाव येईल. वाचकांनी कृपया नोंद घ्यावी ही विनंती.