जैन मंदिरातील चांदी चोरीच्या प्रकरणाचे कथन करतांना मी वाचकांना पुढील प्रकरणात जावेदची हकीगत सांगण्याबाबत प्रास्ताविक केले होते. तुम्ही काम करतांना प्रकरणाच्या मुळाशी जाऊन, तपास करण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्या प्रयत्नांना चांगले फळ मिळते हा अनुभव माझ्या वाटयाला अनेकवेळा आला आहे.त्यापैकीच हा एक अनुभव!
मागील प्रकरणांतील बटलर, दर दोन दिवसांनी वेगवेगळी हकीगत सांगून तपास पथकाची दिशाभूल करीत होता. हे मी नमूद केले आहे. त्याच ओघात एक दिवस लॉकअप गार्डपैकी एका शिपायाने माझ्याकडे येऊन बटरला मला काही माहिती द्यायची आहे असे सांगितले. मी उलट निरोप पाठवून त्याला चांदी कोठे ठेवली आहे किंवा विकलेली आहे ह्याबद्दल काही सांगायचे आहे का?अशी चौकशी केली कारण आरोपी अशा स्वरूपाची माहिती देणार असेल तर आम्हाला दोन स्वतंत्र साक्षीदारांना बोलाऊन त्यांच्या समक्ष आरोपीचे निवेदन नोंदवायचे असते व त्यानंतर आरोपीने दाखविलेल्या जागेचा व काढून दिलेल्या वस्तूंचा पंचनामा करावा लागतो. तरच न्यायालयात सुनावणीच्या वेळी याचा पुरावा म्हणून वापर करता येतो. वाचकांच्या माहितीसाठी आणखी थोडी माहिती देतो त्यामुळे पोलिसांच्या कामातील अडचणी वाचकांना समजतील. एखाद्या खून प्रकरणात आरोपीने स्वतंत्र साक्षीदारांसमोर त्याचे मयताबरोबर वितूष्ट असल्याची कारणे सांगून त्यांने कधी, कोठे, कसा खून केला व त्यानंतर हत्यार कोठे लपवून ठेवले हे सांगितले व त्याजागी ठेवलेले त्या वर्णनाचे हत्यार पोलिसांना, साक्षीदारांच्या समक्ष मिळाले तरी ही आरोपीच्या निवेदनातील मी हत्यार काढून देतो, माझ्यासोबत चला एवढाच भाग न्यायालयात ग्राह्य मानतात. ते हत्यार त्या खूनात वापरले होते, ते आरोपीनेच वापरले व ते वापरण्यामागची कारणे पोलिसांना स्वतंत्रपणे सिध्द करून द्यावी लागतात. ह्यातील एकही मुद्दा बाकी राहिल्यास त्याचा आरोपींना फायदा मिळतो.
आता मुळ मुद्याकडे वळतो. बटरलने पाठविलेल्या निरोपावर त्याने त्याला त्याच्या साथीदारांची माहिती द्यायची आहे असे सांगितले. माझ्यासमोर आल्यावर बटरलने सांगितले, मला पंगतीची कामे न मिळाल्यास मी व्ही.टी.स्टेशनवर हमालीचे करतो. त्यावेळी माझी ओळख जावेद नावाच्या साखळी चोराशी झाली. मी चांदी चोरल्यावर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मी जावेदला भेटलो आणि त्याच्याबरोबर आग्रा येथे जाऊन चांदी विकली. आग्रा येथील दुकान मला सापडणार नाही. जावेद आमच्याच लॉकअपमध्ये असल्याचे सांगितले. लॉकअप रजिस्टर तपासले असता जावेदला संशयास्पद अवस्थेत फिरतांना पकडल्याचे व त्याच्या फिगंर प्रिंट्सचा अहवाल मिळण्याची प्रतिक्षा असल्याचे आढळले.
जावेद आणि बटलरला दोन वेगवेगळया खोल्यात बसवून चौकशी केली असता ते पूर्वी एकमेकांना ओळखत नव्हते आणि त्यांची ओळख लॉकअपमध्येच झालेली असल्याचे आढळले. जावेदला विश्वासात घेऊन विचारले असता त्याने सांगितले “साहेब चौकशीनंतर बटलर लॉकअपमध्ये आला तेव्हा त्याचा पाय सुजला होता. रात्री तो कण्हत होता, म्हणून मी त्याच्या पायाला आयोडेक्स लावले आणि विचारले की त्याला कोणत्या केसमध्ये आणले आहे. तेव्हा त्याने चांदीच्या केसमध्ये अटक केल्याचे आणि चांदी परत मिळविण्यासाठी पोलीस त्रास देत आहेत असे सांगितले. म्हणून मीच त्याला सांगितले की त्याने साथीदार म्हणून माझे नांव सांगावे. मी पोलीसांना २/३ किलो चांदी काढून देईन आणि त्या मालाच्या आधारावर पोलिसांना दोषारोप पत्र दाखल केले म्हणजे तपास पूर्ण झाला म्हणून आपल्याला जामिन मिळेल आणि आपण जामिनावर सुटल्यावर आपण मालाची वाटणी करून घेऊ”.
लॉकअपमध्ये आपआपसांत होणार्या अशा व्यवहारांचा हा मी पाहिलेला पहिलाच प्रत्यक्ष अनुभव असल्याने मी चक्रऊन गेलो होतो. जावेदच्या एकंदर बोलण्यावरून त्याने लॉकअपमध्ये झटपट केलेल्या योजनेवरून तो निर्ढावलेला गुन्हेगार असल्याचे जाणवत होते. असे गुन्हेगार पोलिसी खाक्या किंवा थर्ड डिग्रीलाही बघत नाहीत. त्यांच्याकडे चौकशीसाठी मी वेगळीच पध्दत वापरली. माझ्या खोलीत येतांना जावेद आता पोलिस मारणार, थर्ड डिग्रीचा वापर करणार ह्याची खूणगाठ बांधनूच आला होता. पण त्याला शिपायाने माझ्यापुढे उभे केल्यावर मी त्याला समोर अभ्यागतांच्या खुर्चीत असायला सांगितले. मी चहा पीत होतो. दुसरा ग्लास मी त्याच्यासमोर सरकवला आणि त्याला चहा घेण्यास सांगितले. आता चक्रऊन जाण्याची पाळी जावेदची होती. आलेल्या संधीचा फायदा घेण्याचे मी ठरविले आणि जावेदला सांगितले की “तुमच्या प्लॅनप्रमाणे बटलरने तुझे नाव साथीदार म्हणून सांगितले आहे. आता पूर्ण १२ किलो चांदी मला तुझ्याकडून मिळाली पाहिजे. तुमच्या प्लॅनप्रमाणे २/३ किलो चांदीच्या आधारावर दोषारोप पत्र मी दाखल करणार नाही”.
साहेब मी व्ही.टी स्टेशन आणि आजूबाजूच्या परिसरात सोनसाखळया चोरतो. तसेच ‘पडी’ची कामे करतो. चोरांच्या भाषेत ‘पडी’ची कामे म्हणजे बर्याच वेळा शिफ्ट डयूटी करणारे लोक. लोकलमधून प्रवास करतांना झोपी जातात. मग लोकल यार्डमध्ये गेली तरी त्यांना जाग येत नाही अशा झोपलेल्या व्यक्तींच्या अंगावरील चेन, पैशाची पाकीटे चोरण्याच्या कामाला ‘पडीची’ कामे असे चोर लोक म्हणतात. अशा कामातील निष्णात मंडळींपैकी जावेद होता. त्या व्यवसायातील ही ‘तज्ञ’ मंडळी झोपलेल्या माणसाला गाढ झोप लागल्याची खात्री करून त्याचे हाताचे बोट स्वत:च्या तोडांत घेऊन, ओले करून बोटातील अंगठी दातात धरून अलगद काढतात. एवढे वाकबगार असतात. जावेद सोनसाखळया चोरीचा धंदा व्ही.टी व कोर्ट परिसरात करतो हे समजल्यावर मी त्याला सांगितले “ती चांदीची केस बाजूला राहू दे तू मला चोरलेल्या साखळयांबद्दलच माहिती दे”.
त्याला अनपेक्षित असलेले माझे साधे बोलणे व त्याला दिली गेलेली त्याच्या भाषेत “जंटलमन” सारखी वागणूक ह्यामुळे जावेद खुलून माहिती सांगत गेला आणि त्याने सुमारे दोन आठवडयाच्या काळात एकूण २१ सोनसाखळया कोठे गहाण ठेवल्या आहेत किंवा लपविल्या आहेत. हे सांगून त्या काढून दिल्या. त्या पूर्वीच्या दोन वर्षातील बहुतेक सगळयाच सोनसाखळया चोरीच्या प्रकरणाचा छडा लागल्याने वरिष्ठांनी समाधान व्यक्त केले. भरपूर काम मिळाल्याने पथकातील हवालदार, शिपाई देखील खूष झाले आणि चोरीला गेलेली साखळी परत मिळण्याची आशाच सोडलेल्या महिला वर्गानेही आशीर्वाद दिले ही सगळयात मोठी जमेची बाजू! तपासकामात भेटलेला जावेद ही एक अविस्मरणीय व्यक्ती होती. माझ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केसेस संपत आल्याने मी त्याला त्याने इतरत्र कोठे चोर्या केल्या आहेत ह्याबाबत विचारण्यास सुरूवात केली तेव्हा त्याने अत्यंत अजिजीच्या सुरात मला “साब कुछ देना होगा नही तो फालतू मार खाना पडेगा” असे सांगण्याचा प्रयत्न केला होता.
एकदा आमचे चौकशीचे काम सुरू असतांना माझा एक सहकारी अधिकारी खोलीत आला तेव्हा जावेदने अचानक विचारले “साहेब एक महिन्यापूर्वी लक्झरी बसच्या स्टॉपवर सामान चोरीला गेले म्हणून समजल्यावर तुम्ही आला होतात ते मिळाले का?” माझ्या सहकार्याने “तुला काय माहिती” असे विचारल्यावर त्यावेळी मी ही तेथे चोरी करायला आलो होतो. तुम्ही आणि ते सामान चोरणार्या चोराची माहिती दिली.
जावेद विरुध्दच्या सोनसाखळी चोरीच्या सर्व प्रकरणांच्या दोषारोप पत्रात त्याला न्यायालयात हजर करण्याची तयारी केली. तेव्हा हसत हसत “साब आपको मान गया, बिना मारकी मिठी छुरी चलाके आपने तो मुझे अच्छा पहुचा दिया” अशी दादही दिली.
तपासाच्या कामात त्याच्या बोटांच्या ठशाचा अहवाल मिळाला. तेव्हा २५ वर्षाच्या जावेदच्या चोरीच्या प्रकरणात ४२ वेळा शिक्षा झाल्याचे आढळले. मी दाखल केलेल्या २१ प्रकरणात त्याला शिक्षा झाल्याने सर्व शिक्षा एकाचवेळी भोगण्याच्या तरतुदीमुळे २१ प्रकरणांत मिळून सुमारे दोन ते अडीच वर्षे संपल्यावर त्याच्या शिक्षांचा स्कोअर ६३ पर्यंत गेला!
– सुहास गोखले