एक शून्य शून्य

जैन मंदिरातील चोरी

जैन मंदिरातील चोरी (भाग १)
दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात असलेल्या पोलिस ठाण्यात मी नेमणूकीस होतो. त्या दिवशी फोर्ट परिसरात असलेल्या जैन मंदिराचे विश्वस्त पोलिस ठाण्यात आले आणि मंदिरात चोरी झाल्याची माहिती दिली. जैन व्यक्तींना दीक्षा देण्यापूर्वी त्यांची एका चांदीच्या रथातून मिरवणूक काढली जाते. तो रथ म्हणजे एक प्रकारे बैलगाडीच असते. मात्र त्यावर चांदीचा नक्षीकाम केलेला पत्रा चढविलेला असतो. गाडीला रथासारखा आकार दिलेला असतो आणि वरती कळससुध्दा असतो. अत्यंत उमद्या बैल जोडीच्या मदतीने त्या रथाची मिरवणूक काढली जाते. मिरवणूकीनंतर तो रथ जैन मंदिरातच एका गोडाऊनमध्ये सुरक्षित ठेवलेला असतो.

दुस-या दिवशी रथाचा वापर करायचा असल्याने पॉलिश करण्यासाठी तो गोडाऊनमधून बाहेर काढला असता त्यावर जागोजोगी चांदीचा पत्रा फाडून काढलेला होता. फाडलेला पत्रा सुमारे १० ते १२ किलो वजनाचा होता. तक्रार समजताच ठाणे अंमलदार अधिकारी माझ्या कक्षात आला आणि त्याने मला त्याबाबत माहिती दिली. धार्मिक स्थळामध्ये चोरी झालेली असल्याने प्रकरण निश्चितच गंभीर होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मी स्वत: माझ्या विशेष पथकातील दोन पोलिसांना घेऊन ठाणे अंमलदार अधिका-यासोबत जैन मंदिरात पोहोचेलो. मंदिराच्या आत ब-याच खोल्या होत्या. त्यापैकी एका कोप-यातल्या खोलीला रोलिंग शटर लावलेले आढळले ते शटर उघडतांना जमीन व शटर ह्यामध्ये सुमारे आठ इंच जागा मोकळी रहात असल्याचे मी पाहिले. शटर गंजलेले असल्याने पूर्ण बंदही होत नव्हते. गोडाऊन मंदिराच्या परिसरात, अंर्तभागात असल्याने शटर दुरुस्त करून घेण्याची काळजी घेतली नव्हती असे विश्वस्तांचे स्पष्टीकरण होते.

शटर उघडून आम्ही गोडऊनमध्ये प्रवेश केला. झगझगीत चांदीमुळे डौलदार वाटणारा रथ, फाडलेल्या चांदीच्या डागांमुळे अतिशय केविलवाणा दिसत होता. ह्यापूर्वी हा रथ कधी वापरला होता याबद्दल चौकशी केली असता विश्वस्तांनी दोन महिन्यापूर्वी, मिरवणूकीनंतर रथ गोडाऊनमध्ये ठेवल्याचे व त्यानंतर सकाळीच गोडाऊन उघडल्याचे सांगितले. म्हणजेच चोरी दोन महिन्यातच कधीतरी झाली होती. ह्या दोन महिन्यात शेकडो नव्हे तर हजारो भाविक मंदिरात येऊन गेले असतील. ह्या चोरीचा तपास लागणे अशक्य वाटते ही ठाणे अंमलदार अधिका-यांची पहिली प्रतिक्रिया दुर्लक्षित करून मी रथाचे निरीक्षण करण्यास सुरूवात केली. रथाचा डवीकडील भाग, जवळपास पूर्ण जोखड (बैलाच्या मानेवर ठेवला जाणारा आडवा जाड दांडा) तसेच रथाच्या कळसाचा डावीकडील भाग येथील पूर्ण पत्रा फाडून काढलेला होता.

चांदीचा पत्रा फाडून काढल्यानंतर त्याच्या फाटलेल्या कडा चमकदार असतात पंरतु मुंबईच्या दमट हवामानामुळे त्या काही काळाने काळया पडतात. रथाचा पत्रा काढलेल्या कडा चांगल्याच काळवंडलेल्या दिसत होत्या त्याअर्थी चोरी होऊन बराच काळ लोटलेला असावा असा माझा प्राथमिक निष्कर्ष होता. दुसरी बाब म्हणजे सदरचा पत्रा मेटल एम्बॉसिंग तंत्राप्रमाणे लाकडावर अतिशय घट्ट ठोकलेला असतो व त्यामुळेच लाकडावर कोरलेली नक्षी चांदीच्या पत्र्यावरून स्पष्ट दिसत असते. अशाप्रकारे काळजीपूर्वक ठोकलेला पत्रा काढणे सहज शक्य नसते. त्यातही फाडलेल्या त्या पातळ पत्र्याच्या तुकडयाचे वजन १०/१२ किलो भरत होते म्हणजेच सहज उचलेगिरी करणा-या संधी साधू चोरटयाचे हे काम नक्कीच नव्हते.

त्यानंतर मी विश्वस्तांकडे जास्त विचारपूस करण्यास सुरूवात केली. मंदिरात रात्री मुक्कामाला कोण असते ह्याबाबत माहिती देतांना विश्वस्तांनी मंदिराचे पुजारी रहातात व त्यांच्या व्यतिरिक्त जैन देरासरमध्ये ज्या जेवणावळ होतात त्यासाठी केटरिंग एजन्सीची माणसेही रात्री तेथे असतात असे सांगितले.

जैन पध्दतीची जेवण करणारे काही ठराविकच केटरर्स जैन मंदिरातील जेवणाची कंत्राटे घेत असतात, त्यामुळे मी गेल्या दोन महिन्यात ज्या केटरिंगवाल्यांनी जेवणाची कंत्राटे घेतली होती त्यांची नावे व पत्ते मागितली. मला पाच कंपनीची नांवे मिळाली. सदर पाच केटरिंग कंपनीजमध्ये जाऊन चौकशी केली असता दोन कंपनीमधील जेवण तयार करणारे सर्व कर्मचारी नियमितपणे कामावर हजर असल्याचे सांगितले. बाकी तीन कंपनीमध्ये नेहमी काम करणारे कर्मचारी काही ना काही कारणामुळे कामावर येत नाहीत असे समजले. त्यापैकी एक कर्मचारी स्वभावताच अनियमित असल्याचे दिसले बाकी दोन कंपन्यांपैकी एका कंपनीतील एक कर्मचारी सुमारे सव्वा महिन्यापासून येत नाही असे समजले. त्याचे नांव विचारले असता त्याचे टोपण नाव ‘बटलर’ असे समजले. बटलर नावाचे स्पष्टीकरण विचारताच तो बुटका व लहानखुरा असल्याने त्साला बटलर म्हणतात असे सांगितले. त्या बटलर नावाने माझी जिज्ञासा चाळवली व मी त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. तो बुटका व लहानखुरा असल्याने बिघडलेल्या रोलिंग शटर व जमीन ह्यातील ८ इंचाच्या मोकळया जागेतून सरपटत आत शिरकाव करून घेईल असा अंदाज होता.

दक्षिण मुंबईत भुलेश्वर भागात जेवणावळीत वाढीची कामे करणारे लोक रोजगारासाठी ठराविक गल्लीत जमतात व त्यांचे काही एजंटही असतात ह्याची मला सर्वसामान्य माहिती होती.

भुलेश्वरमधील त्या गल्लीत जाऊन मी तेथील एका जुन्या जाणत्या एंजटला गाठले व बटलर बद्दल चौकशी केली असता त्याने गेल्या काही दिवसांपासून कामाच्या शोधात गल्लीत येतो असे सांगितले, पंरतु त्याच्या येण्याबद्दल निश्चित काहीही सांगता येणार नाही असे सांगितले. विनाकारण एका माणसासाठी दिवसेंदिवस पोलीस शिपायांना बसवून ठेवणेही अयोग्य होते. कारण पोलिस ठाण्यातही इतरही महत्त्वाच्या गुन्ह्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते म्हणून मी एक धाडसी निर्णय घेतला.

जैन मंदिरातील चोरी (भाग २)
मी माझे नांव व पोलिस ठाण्याचा पत्ता लिहून त्या एजंटाकडे दिला. त्याला समजाऊन सांगितले की जेव्हा कधी २/४ दिवसांत बटलर येईल त्यावेळी सदर एंजटाने माझ्या नावाची चिठ्ठी बटलरकडे देऊन त्याला ”हे साहेब माझे जुने परिचयाचे आहेत. त्यांचयाकडे काही धार्मिक बाबीसाठी बरेच लोक जेवायला येणार आहेत म्हणून त्यांनी २/३ विश्वासाची माणसे पाठवावी असे मला सांगितले आहे. तू ही चिठ्ठी घेऊन १/२ जोडीदारांसोबत साहेबांना पोलिस ठाण्यात जाऊन भेट, म्हणजे साहेब कार्य कधी आहे व काय आहे त्याची माहिती देतील व पैशांचेही ठरवतील ” असे सांगण्याबद्दल सांगितले व मी पोलिस ठाण्यात परतलो.

तिस-या दिवशी मी पोलिस ठाण्यात काही कागदपत्रे तयार करत असतांना, शिपायाने ‘बटलर’ नावाचा इसम एका जोडीदारासह मला भेटायला आल्याचे सांगितले. बटलरला माझ्या कक्षात घेऊन मी त्याच्याकडे खरोखरच काहीतरी कार्य असावे अशा अविर्भावात विचारपूस केली व हळूहळू प्रश्नांचा रोख जैन मंदिराकडे वळवला. सुमारे दीड तासाच्या अथक उलटसुलट चौकशीनंतर अखेर बटलरने चांदीचा पत्रा चोरण्याची कबूली दिली. त्यानंतर चोरलेला मुद्देमाल परत मिळविण्याचे महत्त्वाचे काम बाकी राहिले.

बटलरला मी विशेष पथकाच्या ताब्यात देऊन त्याने चोरी केल्याचे कबूल केले आहे. रथाच्या कोणत्या भागातील पत्रा फाडलेला आहे हे ही अचूक सांगितले आहे. तरी आता तुम्ही तुमच्या पध्दतीने मुद्देमाल कोठे ठेवलेला आहे किंवा विकलेला आहे ह्याची माहिती काढा असे आदेश दिले.

सदर पथकाला तुमच्या पध्दतीने माहिती काढा असे सांगण्याचे कारण म्हणजे ह्या पथकातील बहुतेक कर्मचा-यांचा कल, कथा कादंब-यात पोलिसी हिसका, ”पोलिसी खाक्या” या शब्दात वर्णन केले जाते त्या पध्दतीवर प्रचंड विश्वास होता. त्यापैकी काहींनी तर आमच्या वरिष्ठांकडे, ”साहेब नुसतेच बसवून विचारपूस करण्यात वेळ घालवतात. हातापायांचा वापर करीत नाहीत” अशा स्वरूपाच्या तक्रारीही केल्या होत्या. तपासाच्या ह्या तंत्रावर माझा विश्वास नसल्याने आमचे काहीसे वाद होत असत.

पुढील १० दिवस सदर पथकातील कर्मचा-यांनी त्यांच्या तंत्रात बसणा-या सर्व क्लूप्त्या वापरून, विचारपूस करून पाहिली. बटलर दर दोन दिवसांनी वेगवेगळी हकीगत सांगत असे व वेगवेगळी दुकाने दाखवीत असे व तेथे माल विकल्याचे सांगत असे. प्रत्येक वेळी त्याने दिलेली माहिती खोटी असल्याचे निष्पन्न होत असे.

मी चौकशीचे प्रकार पहात होतो व पोलिसी भाषा, पोलिसी खाक्या ह्याचा अतिरेक होत नाही ना ह्याकडेही लक्ष ठेवत होतो. बटलरच्या हालचाली व वर्तणूक ह्याकडे लक्ष देत असतांना माझ्या ध्यानात आलेली एक बाब म्हणजे शरीराने अत्यंत काटक व कणखर असलेला बटलर झुरळांना घाबरत होता किंवा त्याला त्याची किळस वाटत असे.

आठवडाभराच्या चौकशीनंतर बटलरने आणखीनच नवीन हकीगत सांगितली. ती हकीगतही शहानिशा केल्यावर खोटी असल्याचे उघडकीला आले पंरतु तो किस्सा खरोखरच पोलिस खात्याच्या कामात अतिशय कायदेशीर आणि नावलैकिकात भर घालणारा ठरला. विषयात्तर होऊ नये म्हणून सध्या कथन करीत असलेल्या बटलरची हकीगत पूर्ण करतो. त्यानंतर पुढील भागात बटलरमुळे मिळालेल्या जावेदची हकीगत कथन करेन.

१० दिवसांनंतर बटलरला पुन्हा न्यायालयात हजर करण्याची मुदत २ दिवसांवर आल्याने मी पथकातील सर्व अंमलदारांना बटलरसह बोलावले आणि मुद्देमालाची माहिती मिळाली किंवा नाही ह्याबद्दल विचारणा केली. ह्यावर सर्वच अंमलदार उसळून बटलर किती निर्ढावलेला गुन्हेगार आहे व त्याच्याकडून माहिती मिळणे कसे अवघड आहे हे सांगू लागला.

पोलिसी भाषा, पोलिसी हिस्का प्रत्येकवेळीच उपयोगी पडतो ही आमची समजूत चुकीची होती व ह्यानंतर अशा तंत्राचा वापर करण्याचे शक्यतो टाळू हे त्यांनी कबूल केले आणि नंतर मी त्यांच्या देखत माझ्या चौकशीला सुरूवात केली.

बटलर सुमारे १० दिवस एकाच अर्ध्या पँटमधे रहात होता. मी एका हवालदाराला एक जुना पण न फाटलेला पायजमा आणण्यास सांगितले. एक पंचा देऊन बटलरला मळलेली हाफ पँट काढून टाकून पायजमा घालण्यापूर्वी पाहिजे असल्यास हातपाय स्वच्छ धुवून केवळ पायजमा घालावा असे सांगितले. त्यानंतर चहा, नाष्टा दिला. ह्या कनवाळू साहेबाला आपण आरामात गुंडाळू अशी त्याची मनोभूमिका तयार होत आहे ह्याची खात्री पटली. त्यानंतर दोन शिपयांना एक रिकामा खोका देऊन काय करायचे हे सांगून जवळच असलेल्या मंडईत पाठवले. शिपाई येईपर्यत बटलर चांगलाच बेफिकीर झाला होता. त्यानंतर इलॅस्टीकचे दोन बँड देऊन बटलरने घातलेल्या पायजम्याचे दोन्ही पाय बटलरच्या पायाच्या घोटयाजवळ बांधण्यास सांगितले. मंडईतून शिपाई परतल्यावर त्यांच्या हातातील खोका उघडून त्यात पकडून आणलेली १५/२० पंख असलेली तपकिरी झुरळे बटलरला दाखवून ती सर्व झुरळे आता पायजम्यात सोडण्यात येणार असल्याचेही सांगितले. आधीच ठरल्याप्रमाणे आमच्या एका वयस्क हवालदारांनी कळवळून, ”नको साहेब ही मोठी झुरळे नाजूक कातडी कुरतडतात हो त्यामुळे विषही उभरते” अशी विनंती केली. मी तेवढयाच बेफिकीरपणे असे काही कुरतडले तर दवाखान्यात नेऊन टिटॅनसचे इंजेक्शन टोचून आणा” असे सांगितले.

झुरळे पाहूनच बटलरला दरदरून घाम फुटला होता. तो दूर होण्याची धडपड करीत होता. मी इशारा करताच दोन शिपाई एक झुरळ पकडून बटलरकडे वळले. त्यांच्यापैकी एका अतिउत्साही शिपायाने झुरळ पायजम्याच्या आवळलेल्या नाडीजवळून आत ढकलले आणि काय आश्चर्य….

१० दिवस सर्व पोलिसी चमत्कारांना बिनधास्त तोंड देऊनही न बधणारा बटलर पोपटासारखा बोलू लागला. त्यानंतर सुमारे दोन तासात आम्ही विकलेल्या मुद्देमालासह पोलिस ठाण्यात परतलो होतो. सदर बटलर विरुध्द अखेर न्यायालयात गुन्हा सिध्द झाला व बटलर सक्त मजूरीसाठी कारागृहात रवाना झाला. संवेदनशील स्वरूपाच्या धार्मिक स्थळांतील चोरीच्या प्रकरणाची यशस्वी अखेर झाल्याने आम्ही सुटकेचा निश्वास सोडला.

– सुहास गोखले