गर्भसंस्कारासाठी महाभारतातील अभिमन्यूचे उदाहरण दिले जाते. एकदा श्रीकृष्ण व सुभद्रा गप्पा मारीत बसले होते. त्यावेळेस श्रीकृष्णाने सुभद्रेस चक्रव्यूह भेदाविषयी सांगितले. रात्र फार झाली व गप्पा अर्धवटच राहिल्या. आईच्या पोटातील अभिमन्यूने चक्रव्यूह भेदाविषयी ऐकले व त्या ज्ञानाच्या बळावर पुढे कौरव पांडवाच्या महायुध्दात त्याने कौरवांच्या चक्रव्यूहाचा भेद केला पण अर्धवट ज्ञानामुळे कसे परतायचे याचे ज्ञान नसल्याने तो कौरवांकडून ठार मारला गेला. आईच्या पोटात असतांना अभिमन्यूला चक्रव्यूह भेदाचे ज्ञान झाले. तेव्हा उत्तम गर्भसंस्काराने गर्भाला उत्तम संस्कार मिळतील त्याला उत्तम ज्ञानप्राप्ती होईल असे म्हटले जाते.
यावरून आईया पोटातील गर्भाला ऐकू येते व त्याच्यात ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता असते असा विश्वास अनेक विद्वान पंडितांना व डॉक्टरांना ही असतो. खरे पाहता गर्भाला ज्ञानग्रहण क्षमता बिलकूल नसते. कारण ज्ञानप्राप्तीही ही निसर्गदत्त देणगी नाही ज्ञान प्राप्त करणे ही कष्टाची व परिश्रमाची बाब आहे. एखाद्या वस्तूचे ज्ञान कसे होते? तर अवलोकन, ग्रहण, आकलन, विश्लेषण व संश्लेषण करून एखाद्या वस्तूचे ज्ञान होत असते. या सर्वांच्या संबंध मेंदूशी (Brain) आहे. आईच्या पोटातील गर्भाला मेंदू हा विकसित झाला नसल्याने त्याला ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता नसते. बाळाच्या जन्मानंतरही तीन वर्षांपर्यत मेंदूचा विकास हा चालूच असतो. गर्भाला चौथ्या महिन्यात कान येतात पण जोपर्यंत मेंदूतील श्रवण केंद्र कार्यान्वित होत नाही तोपर्यंत गर्भाला ऐकू येण शक्य नाही. तेव्हा अभिमन्यूला गर्भावस्थेत असतांना चक्रव्यूहभेदाचे ज्ञान झाले ही एक कल्पना मात्र आहे.
अभिमन्यूच्या कथेवर विश्वास ठेवून गर्भसंस्कारांचे महत्त्व प्रतिपादन केले जाते. गर्भाला ऐकू येते सर्व समजते हे ही मानले जाते. तेव्हा त्याला अभिजात संगीत, मंत्रपाठ, वेदमंत्र ऐकवून संस्कार करता येतात असा प्रचार केला जातो. गर्भवती स्त्रीने संगीत ऐकल्यास गर्भ आनंदी राहतो असे म्हटले जाते. संगीत, आनंदप्रद कथा, कविता ऐकणे गर्भवती स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने ठीक आहे. पण त्यामुळे गर्भावर संस्कार होतो हे म्हणणे खरे नाही.
न्यूझीलंडमधील मॅसे विद्यापीठातील विज्ञान विभागातील एक डायरेक्टर डॉ. डेव्हिड मेलर (David Mellor) म्हणतात की मेंदू व गर्भवेष्टन (वार) हे जे नैसर्गिक उपशामक औषधे सोडतात (Secreted), त्यांच्या संयोगाने गर्भाला प्रगाढ निद्रावस्थेत ठेवण्याचे कार्य होते. डॉ. मेलर यांचे हे नवीनतम संशोधन आहे. हे संशोधन असे म्हणते की मानवी गर्भ हा जन्म घेईपर्यंत निद्रावस्थेत बंद असतो. प्रगाढ निद्रेत असल्याने गर्भाला काही ऐकू येत नाही किंवा त्याला जन्म घेईपर्यंत किंवा तत्पूर्वी कोणतीही संवेदना होत नसते. त्याला जन्मानंतरच जाणीवा येतात.
(Research suggests that human babies are locked in a deep sleep until they born. Foetus in the womb cannot here any thing before or during birth. Consciousness appears for the first time after birth)
आईच्या पोटात बाळ लाथा मारते, हुंकार देते, फिरते हे सर्व प्रगाढ निद्रेतच होत असते जसे मोठी माणसे झोपेत कुशीवर वळतात, बडबडतात, रडतात, ओरडतात इत्यादि. यावरून गर्भसंस्कारला अधिक महत्व न देता मातेच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिल्यास बाळ अधिक सुधृढ आणि बुध्दीमान होईल ह्यात शंका नाही.
– भाग्यश्री केंगे