आहारशास्त्राकडे माझा ओढा ‘प्रेग्नसीत’ जास्त वाढला. त्याला कारणीभूत होते मालती कारवारकरांचे ‘वंशवेल’ पुस्तक कित्येक पिढयांमध्ये लोकप्रिय असणारं हे पुस्तक खरोखरीच आहारशास्त्रातील ‘बायबल’ आहे. असो…त्यामुळे अन्न आणि आहाराचे घटक आणि त्यांची सांगड मला घालता येऊ लागली. थोडेफार ज्ञान प्राप्त झाल्यावर स्त्रीरोगतज्ञ मैत्रिण डॉ. कल्पनाच्या क्लिनिकमध्ये अलिकडेच कॅलशियम तपासणी शिबिरात संधी मिळाली. त्यावेळेला आलेले अनुभव आणि निरीक्षण करण्यासाठी लेखनप्रपंच –
कॅलशियम हा आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वपूर्ण घटक तो ९९% हाडे आणि दातांमध्ये सापडतो तर उर्वरित रक्त आणि इतर पेशींमध्ये. कॅलशियम शरीरातल्या असंख्य कामासाठी उपयुक्त असते जसे की हाड आणि दातांची घडण आणि मजबूती, रक्त साकळणे, मज्जातंतूतील संदेशवाहन, आकुंचन आणि प्रसारण क्रिया इत्यादी. कॅलशियम आपल्याला दोन प्रकारे मिळवता येते. पहिले आहारातून जसे की दूध व दूग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, चवळीसारख्या उसळी, नागली, बाजरीसारखी तृणधान्ये. दुसरया प्रकारात कॅलशियम हाडातूनच शोषले जाते. अर्थातच ही परिस्थिती कॅलशियम रक्तातून खूपच कमी झाल्यास आढळते. हाडातून घेतलेले हे ‘उधार’ कॅलशियम खरं तर परत करता यायला हवे परंतु चुकीच्या आहार पध्दतीमुळे असे घडत नाही आणि कॅलशियमची ‘उधारी’ मात्र वाढतच राहाते.
शिबीरात आम्हाला तपासणीत जवळ जवळ ८०% बायकांचे कॅलशियम २.५ T Score किंवा त्यापेक्षा कमी असल्याचे आढळले हयामध्ये अगदी २५ वर्षांच्या तरूणीपासून ८० वर्षांच्या आजीचा समावेश होता. खेदाची गोष्ट अशी ही कमतरता बहुतांशी ‘खात्यापित्या’ घरातल्या बायकांची होती.ह्याला कारण अर्थातच चुकीची आहार पध्दती आणि शारिरीक हालचालींचा अभाव. त्याउलट काही कामगार, वॉचमन आणि कामवाल्या स्त्री-पुरूषांची कॅलशियम पातळी अतिशय उत्तम होती.
जिवंत पेशीत हाडांची सतत उलथा पालथ होत असते. संपूर्ण आयुष्यात अनेकवेळा हाडे भंगतात आणि परत जोडली जातात. पण जेव्हा ह्या मधला तोल बिघडतो तेव्हा ‘ऑसटोपेनिया’ (osteopenia) ची सुरूवात असते. ऑसटोपेनिया हा काही आजार नाही. पण हाडे ठिसूळ झाल्याचा ‘अर्लट’ आहे. हयामध्ये हाडांची घनता कमी झालेलीच असते. येथेच जर योग्य काळजी घेतली नाही तर ही घनता कमी होऊन हाडे अधिक ठिसूळ होतात आणि ‘ऑसटिपोरोसिस’ (Osteoporosis) ची अवस्था येते. हा आजार स्त्रियांमध्ये ‘मेनोपॉज’ नंतर जास्त आढळतो कारण स्त्री (इसट्रोजेन) हार्मोनचे प्रमाण ह्यावेळेला कमी होते. ५०-५५ वर्षानंतर पुरूषांमध्येही हीच अवस्था येते. कॅलशियम गर्भारपणानंतरही कमी होते. स्तनपान करत असतांना आहाराची काळजी न घेतल्यास कॅलशियमची पातळी अधिक खाली जाऊ शकते.
शिबीरा दरम्यान अनेक गैरसमज व प्रश्न बायकांमध्ये आढळले जसे की कॅलशियमच्या गोळया गरम पडतील का? गोळ्यांनी ऍ़सिडीटी होते किंवा किडनी स्टोन होतो का? मी तर चांगलेच? खाते, कॅलशियमची पातळी कमी का ? मी घरातली सगळी काम करते मग व्यायाम कशाला? आहारातले कॅलशियम ओळखायचे कसे? कॅलशियमची पातळी कमी येऊन सुध्दा मी हिंडू-फिरु शकते मग वेगळ्या गोळ्या कशाला? असे आणि अनेक प्रश्न.
इथे मला भारतीय स्त्रियांची कुटूंबासाठी सर्वस्व अर्पण करण्याची वृत्ती आड येते असे वाटते. भाज्या, फळे, दूधाच्या किंमती महाग म्हणून पाहिले प्राधान्य मुलं आणि नवरोबांना. उरलेच तर स्वत: खाणार ! त्यातही काम, नोकरी, ‘लक्षात राहत नाही’ ह्या सबबी आहेतच. काही कुटूंबामध्ये घटकांपेक्षा चवीला महत्व असल्यामुळे अधिक रस्सेदार किंवा काही मोजक्याच भाज्या केल्या जातात. काही कुटूंबात हे कसले ‘फॅड’ म्हणून हेटाळले जाते. मग हे चित्र बदलणार कसं?
स्त्रियांनी नागली, बाजरी, चवळी, सोयाबीन, दूध-दही, इत्यादी कॅलशियम युक्त पदार्थ वापरायला शिकले पाहिजे. हे प्रमाण कुटूंबानुसार प्रत्येकाला मिळेल असे बघा. कॅलशियम शरीरात शोषले जाईल असे व्हिटॅमीन ‘डी’ व ‘के’ ही शरीरात जातील ह्याची काळजी घ्या.’ड’ व्हिटॅमीनच्या शोषणासाठी सूर्यप्रकाश अंगावर पडू द्या. आहार आणि अन्नातल्या घटकांचा तक्ता तुम्हाला तुमचे डॉक्टर सांगू शकतात नाहीतर पुस्तके आणि इंटरनेट आहेच की! आहाराबरोबरच व्यायामही तितकाच महत्त्वाचा. शारिरीक हालचालींमुळे कॅलशियम चांगल्या रितीने शरीरात शोषले जाते. हाडांची मजबूती व कार्यक्षमता वाढते.त्यामुळे तुमचे वय कितीही असले तरी घरकामा व्यतिरिक्त व्यायाम करणे आवश्यक आहे.
कॅलशियम आणि एकूणच आरोग्याबद्दल सकारात्मक दृष्टीने पाहाणारी स्त्री संपूर्ण कुटूंबही आरोग्यपूर्ण ठेवते. दरवर्षी ‘वूमन्स डे’ म्हणूनच साजरा होणारा ८ मार्च हा दिवस, ‘कॅलशियम डे’ म्हणूनही साजरा व्हावा असे सुचवावेसे वाटते.
– भाग्यश्री केंगे