तारांगण – (ग्रहगोलांविषयी माहिती देणारे सदर)

पिटुकला बुध

Budh सूर्यमालेचा जन्म व सूर्याचे महत्व आपण गेल्या लेखात वाचले आहे. सूर्यापासून पृथ्वीकडे येऊ लागलो की सर्वप्रथम आपला सामना होतो एका छोटया ग्रहाशी, बुधाशी.

सूर्याला सर्वात जवळ असणारा पिटुकला ग्रह ‘बुध’ पृथ्वीच्या एक तृतीयांश एवढा छोटा आहे. बुधाचा व्यास ४,८७९ किमी एवढा आहे तर पृथ्वीचा १२,७५६ किमी एवढा आहे. गंमत म्हणजे बुधाचे सूर्यापासूनचे अंतरही सूर्य-पृथ्वी अंतराच्या एक-तृतीयांश आहे.

बुधाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला ८८ दिवस लागतात. याचा अर्थ बुधाचे एक वर्ष ८८ पृथ्वी दिवसांएवढे आहे. म्हणजेच आपल्या एका वर्षात बुधाची चार वर्षे पूर्ण होतात. कल्पना करा की, सोनू आणि मोनू अशी दोन जुळी मुलं आहेत. जन्मतःच सोनू पृथ्वीवर राहते तर मोनू गेली बुधावर. सोनूचं वय जेव्हा ८ वर्ष असेल तेव्हा मोनूचं वय असेल ३२ वर्ष!

सूर्याभोवती पटपट फिरणारा बुध स्वतःभोवती मात्र आळशासारखा हळूहळू फिरतो. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला, एक दिवस संपवायला, बुध ५९ पृथ्वीदिवस घेतो. याचा अर्थ बुधाचा एक दिवस ५९ दिवसांएवढा आहे! म्हणजे असं की सूर्य उगवेल, मावळेल व दुसऱ्यांदा उगवून डोक्यावर येईपर्यंत बुधाचे वर्ष संपून जाईल. बुधाचा दीड दिवस बरोबर बुधाचे एक वर्ष. ३२ वर्षांच्या सोनूच्या आयुष्यात फक्त ४८ बुध दिवस पार पडलेत तर ८ वर्षाच्या सोनूने जवळजवळ ३००० दिवस पाहिलेत!

आपल्या मोनूला बुधावर राहताना किती कष्ट उपसावे लागतील ते बघूया. समजा रात्रीच्या अंधारात मोनू बुधावर पोहोचली, त्यावेळी तिथले तापमान असेल -१८० अंश सेल्सिअस. पृथ्वीवरील अंटार्क्टिका येथे कमीत कमी तापमान -९० अंश सेल्सिअस असू शकते. म्हणजे मोनू गारठून जाईल. म्हणून मोनू दिवसाच्या प्रदेशाकडे चालत जाईल व रात्रीतून दिवसाकडे पोहोचेल. या ठिकाणी तापमान असेल +४३० अंश सेल्सिअस. आपल्या देशात उन्हाळयात जास्तीत जास्त तापमान ४८ अंश सेल्सिअस एवढे असते. त्याच्या ९ पट तापमान बुधावर असेल, एवढया विषम तापमानात राहणे शक्यच नाही.

तापमान एवढे विषम असण्याचे कारण असे की बुधाचे वातावरण अत्यंत विरळ आहे. पृथ्वीच्या हजारपट विरळ. वातावरण एवढे विरळ असल्यामुळे बुधावर राहण्यासाठी ऑक्सिजनची व्यवस्था करावी लागणार त्याशिवाय आकाशातून येणारा प्रत्येक दगड वातावरणात जळून न जाता थेट बुधावर येऊन आपटणार त्यामुळे बुधावर खूप प्रमाणात खड्डे किंवा विवरं आहेत. अशाच प्रकारचे तापमान व अशीच विवरं चंद्रावर सुध्दा आहेत.

आकाशात बुध छोटा पिवळा दिसतो. सूर्योदयापूर्वी १ तास अगोदर किंवा सूर्यास्तानंतर एक तास असा फार थोडा वेळ बुध बघता येतो. दुर्बीणीतून बुधाच्या चंद्रासारख्या कला दिसतात. बुध दिसणे ही घटना दुर्मीळ असल्याने दुर्बीणीत बुध दिसला की आनंद वाटतो.

नॉर्स समूहाचे दैवत होते ‘वोडन’. त्या दैवताचा वार झाला woden’s day व नंतर wednesday. आपल्या बुधाचा बुधवार!
– अभय देशपांडे (खगोल मंडळ)
www.khagolmandal.com

सौंदर्य देवता – शुक्र

venus सध्या सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर लगेच जर पश्चिमेला नजर टाकली तर अत्यंत तेजस्वी असा ‘शुक्र’ दिसेल. शुक्र हा ‘तारा’ नसून ग्रह आहे. ‘शुक्रतारा, मंद वारा….’ किवा ‘शुक्राची चांदणी ….’ या सा-या कवी कल्पना आहेत. प्रत्यक्षात शुक्र सूर्यापासून दुसरा व जवळजवळ पृथ्वी एवढयाच आकाराचा ग्रह आहे. शुक्राला पृथ्वीचा जोड ग्रह म्हणावा एवढी साम्यस्थळं या दोन ग्रहात आहेत.

शुक्राकडे जर तुम्ही बघाल तर सर्वात प्रथम तुम्हाला जाणवेल ते त्याचे तेज. रात्रीच्या आकाशातील चंद्रानंतरची सर्वात तेजस्वी वस्तू असाच शुक्राचा उल्लेख होतो. सर्वसामान्यतः ग्रह गोल दिसणार या कल्पनेला दुर्बीणीतील शुक्र धक्का देतो. ब-याचदा दुर्बीणीतील शुक्राची कोर अत्यंत सुंदर दिसते.

बुध व शुक्र हे दोन अंतर्ग्रह असल्याने त्यांच्या चंद्राप्रमाणे कला बघता येतात. पृथ्वीवरून मंगळाची कला दिसणार नाही पण मंगळावरून पृथ्वीची दिसेल. फक्त आपल्यासापेक्ष सूर्याजवळच्या ग्रहांच्याकला दिसतात. शुक्राचा व्यास जवळपास पृथ्वी एवढाच आहे. एवढंच नव्हे तर शुक्राला पृथ्वीपेक्षाही दाट वातावरण आहे. पृथ्वीवर समुद्रात १ कि. मी. खोलीवर गेल्यावर जेवढा दाब जाणवेल तेवढे दाट वातावरण शुक्रावर आहे. पृथ्वीच्या ९० पट दाब शुक्रावर जाणवतो पण हे वातावरण बनले मात्र कार्बनडाय ऑक्साईड सारख्या वायुंपासुन. एवढंच नव्हे तर वातावरणात सल्फ्युरीक ऍसिड सारखे अत्यंत घातक आम्ल असतात. शुक्रावर त्या आम्लांचा पाऊस देखील पडतो. या दाट वातावरणांचा परिणाम हरित गृहा (green house eftect) सारखा होऊन शुक्राचे तापमान ५०० अंश सेल्सिअस एवढे जास्त जाते. म्हणजेच बुधापेक्षाही जास्त!

आता शुक्राच्या भ्रमणाच्या गमती बघा. शुक्राला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला २४३ पृथ्वी दिवस लागतात. याचा अर्थ शुक्राचा एक दिवस आपल्या २४३ दिवसांएवढा असतो. एवढया हळू स्वतःभोवती फिरणारा शुक्र सूर्याभोवती मात्र २२४ दिवसात फेरी पूर्ण करतो. म्हणजे शुक्राचे एक वर्ष बरोबर २२४ पृथ्वी दिवस. अर्थात ‘एक शुक्र दिवस’ हा ‘एक शुक्र वर्षा’पेक्षा मोठा असतो. शुक्राचे वर्ष सरते पण एक दिवस संपत नाही. हा अजब योग शुक्रावरच घडतो.

स्वअक्षाभोवती एवढा संथ जाणारा शुक्र अजून एक चमत्कार दाखवतो. तो म्हणजे स्वअक्षाभोवती उलटया दिशेने फिरण्याचा. त्यामुळे शुक्रावर सूर्य पश्चिमेला उगवतो व पूर्वेला मावळतो.

अशा या चमत्कृतीपूर्ण, सुंदर ग्रहाला धडक देण्याची, भेट देण्याची इच्छा मानवाला झाली नसती तर नवलच. १९६१ पासून आजपर्यंत शुक्रावर मानवीय अवकाशयानांनी ४२ वेळा स्वारी केली आहे. पैकी ३२ वेळा रशियनांनी तर १० वेळा अमेरिकनांनी. प्रत्यक्ष शुक्रावर देखील यानं उतरली आहेत. पण आम्लांनी त्या यानांचे नुकसान होत जाते. या पैकी मॅगेलान या नासाच्या यानाने शुक्राची सर्वाधिक माहिती पाठवली आहे.

गेल्या वर्षी शुक्र ग्रह अत्यंत प्रसिध्दी झोतात होता. त्याला कारण होते शुक्राने सूर्याला लावलेले ग्रहण. शुक्र सूर्य बिंबापुढून सरकताना दिसतो. या घटनेला अधिक्रमण म्हणतात. बुध व शुक्र दोन ग्रह अधिक्रमण करू शकतात. पैकी बुधाचे ब-यापैकी सातत्याने घडते. शुक्राचे मात्र खूप दुर्मीळ आहे. ८ जून २००४ रोजी झालेले शुक्र अधिक्रमण १२० वर्षांनी प्रथमच झाले आता परत होईल ते ६ जून २०१२ मध्ये. त्यानंतर परत मात्र शुक्र अधिक्रमण २११७ म्हणजे १०५ वर्षांनी बघता येईल. त्यामुळे ही दुर्मीळ घटना दुर्बीणीतून काळजी घेऊन जरून पहा.

तक्ता
शुक्र पृथ्वीसापेक्ष
व्यास ०.९४९ (पृथ्वी = १)
वजन ०.८१
सूर्यापासून अंतर ०.७२३
एक दिवस २४३ पृथ्वी दिवस
एक वर्ष २२४.७ पृथ्वी दिवस
वातावरणाचा दाब ९०(पृथ्वी = १)
सरासरी तापमान ४६४ अंश सेल्सिअस (पृथ्वी = ४० अंश)
वातावरणाचे घटक
CO2 ९६.५% (पृथ्वी = ०.००४)
N2 ३.५% (पृथ्वी = ७८%)
चंद्र (उपग्रह) नाही
खगोल मंडळ कार्यकर्त्यांनी टिपलेले शुक्र अधिक्रमण येथे बघता येईल.
सध्या रोज संध्याकाळी दिसणारा शुक्र काही महिन्यांनी सकाळी दिसेल. ते दोन तेजस्वी ग्रह वेगळे नसून एकच आहेत. तसेच शुक्र मध्यरात्री वगैरे कधीच दिसणार नाही. सूर्यास्तानंतर व सूर्योदयाआधी तीन ते साडे तीन तास एवढाच वेळ शुक्र दिसतो. त्यामुळे मध्यरात्री शुक्र बघितला वगैरे सगळया गप्पा, कविकल्पनेतील ताऱ्या प्रमाणेच चुकीच्या आहेत.

शुक्राला रोमन लोक सौंदर्याची देवता मानत. खरंच तो एवढा सुंदर दिसतो. शुक्राची कोर एकदा जरूर पहा. शुक्र ‘तारा’ नसून ‘ग्रह’ आहे हे समजल्याने त्याचे सौंदर्यही कमी होत नाही किंवा त्या गाण्याची श्रवणीयताही कमी होत नाही.

– अभय देशपांडे (खगोल मंडळ)
www.khagolmandal.com