मूल-मंत्र

भूतछाप

वर्तमानात जगणारे पण आपल्याच भूतकाळात पार खोलवर अडकलेले पालक तुम्ही नक्की पाहिले असतील. या भूतछाप पालकांची खासियत म्हणजे त्यांच्या सारख्या मोठया माणसांना ते अजिबात त्रास देत नाहीत पण घरातल्या लहान मुलांना पिडण्याची एकही संधी ते सोडत नाहीत!! घरात कुठलाही विषय निघाला की लगेचच हे ‘भूतछाप’ पालक त्याचं कनेक्शन आपल्या भूतकाळाशी जोडतातच.

पुढचा प्रसंग ओळखीचा वाटतो का पाहा.

”बाबा आपण खूप दिवसात बाहेर जेवायला गेलोच नाही. परवा शनिवारी माझी परीक्षा संपते आहे. संध्याकाळी आपण तिघं मिळून आहेर जेवायला जाऊ या ना? प्ली….ज बाबा” असं संजालीने बाबांना विनवताच, आईने पण संजालीच्या सुरात सूर मिसळला.
हे ऐकताच बाबा लगेच कामाला लागले.

त्यांनी या गोष्टीचं कनेक्शन आपल्या भूतकाळाशी जोडलं आणि प्ले बटण दाबलं. आत्तापर्यंत हज्जारवेळा ऐकवलेली गुळगुळीत कॅसेट पुन्हा नव्या दमाने वाजू लागली,”काय हॉटेल? आमच्यावेळी घरात हॉटेल मधला ‘ह’ बोलण्याची सुध्दा हिंमत नव्हती. मी जर असं वडिलांना विचारलं, तर पुढचे दहा दिवस जेवता येणार नाही इतकं माझं तोंड सुजलं असतं!! आणि आता तुम्ही परीक्षा संपली म्हणून हॉटेलात? मग रिझल्ट लागल्यावर काय इग्लंडला जायचं वाटतं? संपली की दुस-या परीक्षेची तयारी सुरू, त्यासाठी हॉटेलात कशाला जायला पाहिजे?….”

संजाली चुळबुळ करू लागली.
आई इकडे तिकडे पाहू लागली.

बाबा सावध झाले.

त्यांनी पटकन कॅसेट बदलली आणि कनेक्शन घट्ट केलं. “तुम्ही दोन पैशाचं नाणं तरी पाहिलंय का? आमच्यावेळी दोन पैशात मिसळ मिळायची आणि आत्ताच्या सारखी नाही. चांगली पोटभर मिळायची. खरपूस भाजलेले मोठे दणदणीत पाव आणि हवा तेवढा रस्सा. अजून ती चव माझ्या तोंडात आहे. आता हॉटेलात मिळते ती सपक मिसळ आणि त्याची अव्वाच्यासव्वा किंमत! कोण जाईल असल्या हॉटेलात?”

इतकं सर्व एका दमात बोलल्याने बाबांना धाप लागली. तरी ते विजयी मुद्रेने वर्तमानकाळातल्या मायलेकींकडे पाहू लागले.

संजाली आणि तिची आई या दोघींना ‘हे सर्व’ आता पाठ झालं होते. वर्षानुवर्ष हे ‘भूछा’ बाबा हीच कॅसेट लावत होते.
प्रत्येकवेळी त्यांचा उत्साह नवीन पण टेप जूनीच!

संजाली आईकडे पाहात बाबांना म्हणाली, ”पण….आपण जायचं की नाही हॉटेलात हे तुम्ही काही सांगितलंच नाही बाबा? काय करायचं आपण शनिवारी”

बाबा पुन्हा भूतकाळाकडे पळत महणाले, ” काय करायचं शनिवारी…..मारूतीला तेल घालायचं! कमाल झाली तुझी!! मी जर माझ्या वडिलांना असं……..”

पुढे बाबा काय बोलणार हे संजालीचे पाठच होतं.

तिने हात उंचावून बाबांच बोलणं थांबवलं. आणि भूतकाळातून वर्तमानकाळात बाबांना खेचून आणलं. आईचा हात धरत संजाली म्हणाली, “आम्ही दोघींनी हॉटेलात जायचं ठरवलं! तुम्ही येणार का?”

हे ऐकल्यावर वर्तमानकाळात आलेले बाबा क्षणभर सटपटले, आधारासाठी भूतकाळात चाचपडू लागले….आणि अविश्वासाने आपल्याच घरातल्यांकडे पाहू लागले.

अशावेळी दुस-या पालकाची भूमिका खूप महत्त्वाची असते. त्यांनी जर समजावून सांगितलं तर हे ‘भूछा’ पालक पुन्हा वर्तमानात येऊ शकतात. नाहीतर हे याच प्रसंगातला पुढचा भाग पाहू.

आई पुढे आली.

बाबांना समजावत म्हणाली “आता गेले ते दिवस. पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टी ऐकून संजालीच काय मी पण कंटाळते.
त्यापेक्षा आज काय करता येईल याबाबत मुलांशी गप्पा मारल्या आणि पुढे काय करता येईल याची स्वप्न जर मुलांसोबतच रंगविली तर त्यांची उमेद वाढेल ना!

संजाली क्लासला गेली किंवा अभ्यासाला बसली की आपण थोडावेळ गप्पा मारू…त्या आपल्या जुन्या दिवसांविषयी.”

तुम्हाला काय वाटतं, शनिवारी हॉटेलात जेवायला कोण कोण गेले असतील? का गेले नसतील? तुमच्या ओळखीचे आहेत का, असे भूतछाप पालक?

पालकांसाठी गृहपाठ : भूतछाप पालकांच्या मानेवर भूतकाळाचेच भूत बसलेले असते. त्यांना मांत्रिकाकडे नेऊ नका. त्यांना प्रेमाने समजून घ्या. विश्वासाने जिंकून घ्या. यातच तुमच्या मुलाचे भले आहे.

‘मुलांसोबतच चालता येते भविष्याची वाट’ ही चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल म्हणा.

– राजीव तांबे