राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, राजर्षी शाहू महाराज व घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आधुनिक भारताच्या जडणघडणीत कार्यमग्न असताना या महापुरुषांना आपल्या आवाजाने थोडातरी विरंगुळा देत विसावा देऊन मंत्रमुग्ध करणारे सुरांच्या दुनियेतील अनिभिषिक्त सम्राट म्हणजे बालगंधर्व तथा नारायण श्रीपाद राजहंस.
रंगभूमीवरील आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत नाट्यप्रेमींना आपल्या मोहात पडणा-या या नटसम्राटाचा जन्म २६ जून १८८८ ला पुण्यात झाला. त्याचे आजोबा कृष्णाजीपंत यांना पाच अपत्य होती. त्याचे मुळगाव नागोठाणे, सातारा हे होय. श्रीपादरावांचा विवाह अन्नपूर्णाबाई यांच्याशी झाल्यानंतर त्यांना पुढे सात अपत्य झाली पण ती अल्पायुषी ठरली असल्याने नारायण रावांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडील चिंताग्रस्त होते. श्रीपादराव हे स्वतः सतारवादक होते. शिवाय सरकारी खात्यात नोकरीला असल्यामुळे घरची परिस्थिती संपन्न होती. त्या काळात नाटकाचा बोलबाला असल्याने बालपणीच नारायणवर संगीत कलेचे संस्कार रुजले. आपली भावंडे शंकर, वेणू, व व्यंकटेश झोपी गेली असतानाही नारायण मात्र नाटक संपेपर्यंत विस्फारलेल्या नजरेने बघत असत.
नारायणाची संगीतातील रुची पाहून वडलांनी त्यास शिक्षणासाठी बहिणीच्या मुलीकडे पाठवले. तिथे मेहबूब खॉं यांच्याकडे गायनाचे सुरुवातीचे धडे गिरवले. याच काळात काका यशवंत यांच्याकडे सहज म्हणून पुण्याला फिरण्यासाठी गेले असता ‘केसरी’ या वर्तमानपत्राकडून गाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. काका वर्तमानपत्रात काम करत असल्याने नारायणास तिथे जाण्याची संधी मिळाली. त्या कार्यक्रमात गायलेल्या ‘हरवा मोरा देव बंधवा’, ‘ना तर मै गारी दुंगी, ना रहुंगी तुम्हीसो बलमा’ हे गीत गायल्यानंतर लोकमान्यांनी त्यास ‘बालगंधर्व’ ही पदवी बहाल केली. केसरीच्या पहिल्या पानावर झळकत नारायण संपूर्ण महाराष्ट्रभर ‘बालगंधर्व’ नावाने प्रसिद्ध झाले.
या काळातच ‘किर्लोस्कर नाटक कंपनीत’ नशीब अजमावण्यास गेलेल्या ‘बालगंधर्वास’ अपयश आले. त्यांनतर ताहराबादकर गुरुजी व कोल्हापूरचे अपय्यबुवाकडे संगीतकलेचे ज्ञान संपादन केले. पुढे १९०५ च्या दरम्यान ‘किर्लोस्कर कंपनीत’, ‘शकुंतला’ च्या स्त्री रूपातील भूमिकेतून नाट्यविश्वातील एका नाटकीय कारकीर्दीचा ‘श्री गणेशा’ केला..
याच दरम्यान अण्णासाहेब किर्लोस्कर, भाऊराव कोल्हटकर, व नानासाहेब जोगळेकर यांच्या निधनानंतर किर्लोस्कर कंपनी, तसेच रंगभूमीवरील नाट्य युगाच्या ढासळत्या लोककलेला गंधर्व युगाने तारलेच नाही तर अफाट लोकप्रियता मिळवून देत पन्नास वर्षाहूनही अधिक वर्ष अधिराज्य निर्माण केले. शकुंतला, शारदा, नंदिनी, सुभद्रा, द्रोपदी, सिंधू, भामिनी, रुक्मिणी, रेवती, अशा स्त्रियांच्या एकाहून एक अधिक सरस भूमिका त्यांनी अशाकाळात साकारल्या ज्या काळात भारतीय स्त्रीची समाजात अत्यंत दयनीय अवस्था होती. ‘संगीत शकुंतला’ या नाटकातील शकुंतला व मानापमान मधील ‘भामिनी’ या भूमिकेने तर ते प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईतच बनले होते.
कारकीर्दीच्या सुरूवातीस आई, दत्तुमामा व शंकरराव यांच्या आग्रहास्तव इच्छा नसतांनाही पारगावच्या लक्ष्मीबाई हिच्याशी १९०७ साली विवाह केला. त्यांनतर पुढील काळात लक्ष्मीबाईला ‘इंदू’ नावाची मुलगी झाली.परंतु ती आजाराने दगावली असतानाही या नटसम्राटाने नारायणाची झळ ‘मनापनातील’ भामिनीला का? म्हणून त्यांनी खेळ बंद न करता भामिनीची भूमिका करून नाटकाप्रती आपली निष्ठा जपली.
कारकिर्दीला बहर येत असतांना १९११ साली नानासाहेब जोगळेकरांच्या निधनानंतर कंपनीत शंकरराव व इतर मंडळीत झालेल्या मतभेदातून गणपतराव बोडस, गोविंदराव टेंबे व पंडित या मित्राच्या पुढाकाराने किर्लोस्कर नाटक कंपनीतून बाहेर पडत १९ जुने १९१३ साली ‘गंधर्व संगीत मंडळी’ ची स्थापना केली. त्यानंतर ३ सप्टेंबर १९१३ साली ‘मूकनायक’ हे नाटक करून गंधर्वयुगाची सुरुवात केली. त्यानंतर संगीत शकुंतला, संगीत मानापमान, संगीत सौभद्र, संगीत मृच्छकटीक, संगीत संशय कल्लोळ, संगीत शारदा, संगीत स्वयंवर, संगीत विद्याहरण, संगीत एकाच प्याला अशा विविध नाटकातील स्त्रीच्या भूमिकेतून रंगभूमीवर अजरामर भूमिका केल्या. आपल्या २१ वर्षाच्या स्त्रीपार्टीच्या भूमिकेतून बाहेर होत ‘वीरतनय’ या नाटकात शूरसेनाची भूमिका केली.
काळाच्या बदलानुसार लोकांनी रंगभूमिकेकडे पाठ फिरवली व सिनेमाकडे त्यांचा कल झुकल्याचे बघून व्ही शांताराम यांच्या आग्रहाने प्रभात कंपनीच्या ‘धर्मात्मा’ या चित्रपटातील संत एकनाथांच्या सात्विक भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पण रंगभूमीवरील स्त्रीच्या भूमिकेतील बालगंधर्वला प्रेक्षकांनी स्वीकारले नाही परिणामी चित्रपटाला अपयश आले. त्यामुळे ते पुन्हा रंगभूमीकडे वळले. याच कालावधीत पत्नी लक्ष्मीबाईचे आजाराने निधन झाले. त्यांनतर पुढे त्यांनी नाटकातील जोडीदार गोहर कर्नाटकी या स्त्रीशी कायदेशीर विवाह केला. कालांतराने पुन्हा ‘मानापमान’ व ‘मृच्छकटीक’ मध्ये भामिनी व वसंतसेनच्या भूमिका गोहरकडून करवून घेतल्या पण त्या प्रेक्षकांना पसंत न आल्याने त्यांना स्वतःलाच त्या भूमिका कराव्या लागल्या.
नाटकाला शंभर वर्ष झाल्याच्या निमित्ताने मुंबई येथे झालेल्या ‘नाट्य शताब्दी महोत्सवाचे’ अध्यक्षपद बालगंधर्वांनी भूषविले. त्यांनी आपल्या शेवटच्या कारकिर्दीत अत्यंत हलाखीचे दिवस काढावे लागले. भजन, कीर्तन व प्रसंगी तंबोरा धरूनही पैसे मिळवावे लागले. पण लोकांनी प्रेमापोटी फुकट दिलेले पैसे स्वीकारले नाही त्या उलट ते मिळालेले पैसे गरजूंना दान केले.
वयाच्या ६५व्या वर्षापर्यंत त्यांनी विविध भूमिका केल्या त्यांची शेवटची भूमिका सिंधू ही ‘एकच प्याला’ या नाटकातील होती. आपल्या अर्धशतकाहूनही अधिक कारकिर्दीत त्यांनी २५ हून अधिक नाटकांमध्ये भूमिका केल्या होत्या. रंगभूमीसाठी आयुष्य घालवणा-या या नट सम्राटाला भारत सरकारने १९५५ ला ‘संगीत नाटक अकादमीतर्फे’ राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले. तसेच १९६४ साली ‘पद्मभूषण’ व ‘विष्णुदास भावे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती हेमंती बनर्जीनी रंगभूमीवरील बालगधर्वांच्या कार्यांची माहिती देणा-या माहितीपटाला २००२ साली राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. २०११ साली नितीन देसाई यांनी ‘बालगंधर्व’ या उत्कॄष्ट चित्रपटाची निर्मिती केली.
नेहमी चेह-यावर शांत भाव व स्मित हास्य असणा-या बालगंधर्वाचा अर्धांगवायूच्या झटक्याने वयाच्या ७९ व्या वर्षी, १९६७ साली निधन झाले. त्यांच्या निधनाने नाट्यविश्वातील सुवर्णयुगाची अर्थातच गंधर्व युगाची समाप्ती झाली.
संकलन – नितीन जाधव