कलाकार – लेख

चाहत्यांचे चाहते – छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष

Gautam Rajadhyaksha चित्रता-यांना आपल्या कॅमे-यात बंदिस्त करुन चाहत्यांसमोर वेगळ्याच रुपात पेश करणारे कॅमे-यामागचे जादूगार म्हणे गौतम राजाध्यक्ष. कठोर विद्यार्थी, उत्तम अध्यापक, सामाजिक बांधिलकीची जाण असणारे उत्तम लेखक व जगतविख्यात छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजाध्यक्षानी आपल्या आयुष्याची सुरुवात मुंबईच्या लिंटास इंडिया कंपनीतून केली. १९७४ सालापासून त्यांनी आपला फोटोग्राफीचा छंद व्यवसाय रुपात आकारास नेला. १९८० मध्ये शबाना आझमी, टीना मुनीम, जॅकी श्रॉफ या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्यांची त्यांनी काढलेली व्यक्तिचित्रे प्रकाशझोतात आल्यापासून त्यांच्या व्यक्तिचित्रात्मक छायाचित्रणास प्रसिद्धी लाभली.

मुंबईची खरी ओळख म्हणून परिचित असलेल्या गिरगाव, ग्रॅण्डरोड येथील ‘झवेरी हाऊस’ या इमारतीतील एका प्रशस्त घरात गौतम राजाध्यक्ष राहत होते. घरात भला मोठा दिवाणखाना, कोरीव कलाकुसर केलेले लाकडी फर्निचर, शोभेच्या पितळी वस्तू, कलेची साक्ष देणारी विविध पेंटिंग्ज, याशिवाय ओळीने मांडलेली विविध विषयांवरची पुस्तके आणि दुर्गाबाई खोटेंपासून सचिन तेंडुलकरपर्यंत वैविध्यपूर्ण व्यक्तींच्या छायाचित्रांनी समृद्ध असे त्यांचे घर होते.

ऐंशीच्या दशकात चित्रता-यांना राजाध्यक्ष स्टाइलच्या फोटोची भुरळ पडली. धूसर, स्वप्नाळू जगाचा आभास निर्माण करणारे, कमालीचे जिवंत भासणारे आणि आपल्याशी संवाद साधणारे हे ‘चेहरे’ गौतम राजाध्यक्ष स्टाइल फोटोग्राफीचा ट्रेडमार्क ठरले.

कसबी छायाचित्रकार, प्रभावी व्यक्तिमत्त्व, तल्लख बुद्धी, अभिजात रसिकमन, उत्तम वक्ता या गुणवैशिष्टयांमुळे गौतम राजाध्यक्ष केवळ ‘स्टार फोटोग्राफर’ न राहता स्वत:च ‘स्टार सेलिब्रेटी’ बनले. फोटोग्राफी हा केवळ व्यवसाय न मानता त्यांनी कला-संस्कृतीच्या विविध क्षेत्रांत मुशाफिरी करीत आपल्या या व्यवसायाला लेखनाची भरभक्कम जोड दिली.त्यामुळे माधुरीपासून ऐश्वर्या रायपर्यंत, दुर्गाबाई खोटेंपासून शांताबाई शेळकेंपर्यंत, जे.आर.डी टाटांपासून अंबानीपर्यंत ते जनरल माणिकशॉपासून सचिन, सुनीलपर्यंत, लताबाई-आशाबाईंपासून भीमसेन, रवीशंकर यांच्यापर्यंत, आणि गुलजारपासून अगदी सुभाष अवचटांपर्यंतची व्यक्तिमत्त्व ही केवळ सेलिब्रेटी व्यक्तिमत्व न राहता तुमच्या-आमच्या घरातील सभासदांपैकी एक झाली.
सेंट झेविअर हायस्कूलमधील इंग्रजी माध्यमातील शिक्षण आणि बी.एस्सी पर्यंतच महाविद्यालयीन शिक्षण, उत्तम बुद्धिमत्ता, जिज्ञासा यांचं पाठबळ असतांनाही गौतम यांच्या करिअरचा प्रवास मात्र लिटाससारख्या मान्यताप्राप्त ख्यातनाम जाहिरात कंपनी मधून नोकरी आणि पुढे मुलाखतकार व छायाचित्रकार म्हणून झाला. गौतम यांचा स्वभाव मृदू होता. त्यामुळेच की काय विभिन्न क्षेत्रातील, विविध वयोगटातील, विविध विचारांची माणसं त्यांच्याशी सहजतेने, मोकळेपणाने संवाद साधू शकतात. गौतम नेहमीच त्यांच्या संपर्कात येणा-या सेलिब्रेटीजच्या अंतरंगात डोकावून पाहण्याआधी ती व्यक्ती कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे, त्याची आवडनिवड काय आहे याचा वेध घेत. त्यामुळे समोर कर्नल सॅम माणिकशॉ असो किंवा संगीतकार नौशाद, एमएफ हुसेन असो किंवा जर्सन डिकुन्हा, इस्मत चुगताई असो किंवा भानू अथय्या, त्यांच्याशी त्यांच्या क्षेत्राविषयी जाणून घेत, गप्पा मारत ते या व्यक्तींचा स्वभाव खुलवत, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत आणि नेमकं त्याचंच प्रतिबिंब जेव्हा त्यांच्या छायाचित्रातून उमटतं असे तेव्हा जाणकारांच्या मुखातून नकळत वा क्या बात है? ची दाद येत.

जोगळेकर काका त्यांना नेहमी सांगत की, “समोरच्यांच्या गुणांवर प्रेम कर. त्याच्या दुर्गुणांकडे पाहू नकोस. त्यांच्यातील उणिवा शोधू नकोस. उलट त्यांच्यातील माणुसकी, सहृदयता जागी कर. त्यांच्यातील सहजवृत्तीला चालना दे, मग पहा तुझं ‘मैत्रबन’ किती झपाटयाने वाढेल.” काकांचा उपदेश शिरोधार्य मानणा-या गौतम राजाध्यक्षांचं ‘मैत्रबन’ नुसतंच झपाटयाने वाढलं नाही तर वृध्दिगंतही झालं. यातूनच गौतम यांचे विविध क्षेत्रांतील निवडक ६८ ‘मैत्र’ त्यांच्या आगामी ‘चेहरे’ या पुस्तकातून आपल्याला भेटले.

गौतम यांनी शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षण घेतलं ते देखील असीम जिज्ञासेमधूनच. कंठसंगीतामध्ये त्यांना विशेष रुची होती. पं. रमेश जुळे यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. ‘ऑपेराज्’च्या सोबतीने त्यांच्या घरातल्या भिंतीमधून भारतीय शास्त्रीय संगीतही झिरपलं. या संगीत प्रेमामुळेच ते मंगेशकर कुटुंबीय, पं. भीमसेनजी, पं. रविशंकर, नौशाद, त्याचबरोबर जावेद अख्तर, कैफी आझमी, गुलझार, शांताबाई शेळके आदी सर्जनशील साहित्यिकांशी संवाद साधू शकले.

सात दशके व तीन पिढ्यांची सेवा करत तब्बल ३७५० लोकांची छायाचित्रे त्यांनी काढली. फॅशन फोटोग्राफी सन्मान, महाराष्ट्र भूषण, कुसुमाग्रज पुरस्कार अशी विविध पुरस्कारानी गौतमजीना गौरविलें आहे. त्यांचा हा चित्ररुपी ठेवा आज नव्या छायाचित्रकारांना मार्गदर्शक आहे.

साभार-लोकप्रभा,चेहरे पुस्तक,व गौतमजींच्या मुलाखती

संकलन – केशव मते