कलाकार – लेख

कै. वामनराव सडोलीकर प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने

शास्त्रीय संगीत व नाटय संगीत या दोन्ही क्षेत्रात स्वत:च असं वेगळेपण जपत कार्यरत असलेल्या गानसम्राज्ञी श्रृती सडोलीकर आपले वडिल कै. वामनराव सडोलीकर यांच्या स्मरणार्थ दर वर्षी काही कार्यक्रम करुन त्यांना श्रध्दांजली वाहतात. ह्या वर्षीच्या कार्यक्रमाचे वेगळेपण श्रृतीताईंच्याच शब्दात-

कै. वामनराव सडोलीकर प्रतिष्ठानाच्या ह्या वर्षीच्या कार्यक्रमाचे वैशिष्टय असं आहे की माझ्या वडीलांचे गुरु उस्ताद संगीतसम्राट अल्लादियाखाँसाहेब यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम होणार आहे. २००५ हे साल उस्ताद अल्लादिया खाँसाहेबांच्या १५० व्या जयंतीच वर्ष. १० ऑगस्ट १८५५ ला खाँसाहेबांचा जन्म राजस्थानमधे झाला. तर हे जयंतीचं वर्ष चांगल्या रितीने साजरं व्हाव ही त्याचे नातू अजिरउद्दीन खाँसाहेब उर्फ बाबा यांची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मी आमच्या संस्थेतर्फे कोलकत्याच्या आयटीसी या संगीत रिसर्च ऍकॅडमीला निमंत्रण दिलं आणि आयटीसीच हे संमेलन अल्लादीयाखाँसाहेबांच्या स्मरणार्थ डिबीर क्लबमधे १२ व १३ मार्च रोजी कोल्हापूर येथे होणार आहे. त्यात सतारवादन आणि कंठसंगीताचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर १६ मार्च २००५, बुधवार रोजी, मुंबईत दादर माटुंगा कल्चरल सेंटर इथे संध्याकाळी सहा वाजता एक संम्मेलन होत आहे. अध्यक्षस्थान आमचे बाबा अजिरउद्दिनखाँसाहेब भूषवतील. गान तपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांच्या जेष्ठ शिष्या कौशल्या मंगेश्वर ह्या कार्यक्रमाचं उद्धाटन करणार आहेत. आमच्या आयटीसी संगीत रिसर्च ऍकॅडमीचे एक्झीकेटीव्ह डायरेक्टर श्री. अमीत मुखर्जी गाणार आहेत. कुशलदा हे अत्यंत तडफदार व निश्णांत सतारवादक सतार वाजवणार आहेत. आमच्या संस्थेच्या वतीनं खाँसाहेबांना श्रध्दांजली म्हणून मी थोडं गाणार आहे.

कै. वामनराव सडोलीकर प्रतिष्ठानाची स्थापना सप्टेंबर १९९५ केली. माझे वडील प. अल्लादियाखाँ पुण्यतिथी समारोहाचे स्फूर्तीदाते होते. पहिल्या वर्षीचा कार्यक्रम त्याच्या एका शिष्यानी स्वखर्चाने केला. मला ते बरोबर वाटलं नाही. मी भाऊंना म्हटलं तुमच्या गुरूस्मरणार्थ होणारा कार्यक्रम तुमच्या शिष्यानी करावा हे मला नाही पटत, त्यापेक्षां आपण देणग्या जाहीर करु. तसे देणग्या यायला सुरुवात झाली. त्यावेळी मग मी सांगितलं की आपण ट्रस्ट स्थापन करु. पण ते कांही त्यावेळी जमलं नाही. कार्यक्रमाद्वारे सडोलीकर पैसे कमवतात अशा आशयांची भाऊंना पत्रं यायला लागली. मला याचा खूप संताप आला, मनस्वी दु:ख झालं. एक प्रकारची असूया असते ती अशी बाहेर पडते म्हणजे बघा भाऊंनी नुसता फोन करायचा अवकाश अल्लारखाँ, मनसूरजी, कुमारकाका, निवृत्तीबुवा सरनाईक असे दिग्गज कलाकार आपली कला सादर करीत तेही कोणतेही मानधन न घेता. एवढा मोठा कार्यक्रम गुरुच्या स्मरणार्थ माझे वडिल करत ह्याच असूयेपोटी सूड बुध्दीने काहीजण वागत. त्याला सडेतोड उत्तर म्हणून भाऊ गेल्यावर, ज्यांनी आपलं सारं आयुष्य संगीताच्या सेवेसाठी वेचलं त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मी हा ट्रस्ट नेमला. अशा वृत्तीच्या लोकांकडून त्रास होऊ नये, आपल्या कामात यामुळे खीळ बसू नये, कोणी काही वावगं बोलू नये म्हणून मी हा ट्रस्ट स्थापन केला.

त्यासाठी लोकांनी आपणहून जाहिरात दिली, पैसे दिले तर मी घेते. त्या सर्वांची नोंदणी, पावती तर असतेच पण या ट्रस्टला देणगी देणा-यांना आयकरातील करसवलत पण मिळते. मला सांगयला अतिशय आनंद होतो की लार्सन अन्ड टुर्ब्लो, बॅंक ऑफ बरोडा, पंजाब नॅशनल बॅंक या सारख्या प्रसिध्द कंपन्यांनी माझ्या ट्रस्टला बहुमोल सहाय्य केले आहे. जे संगीतप्रेमी आहेत, ज्यांना माझं कार्य जवळून माहित आहे अशा लोकांनीपण खूप मदत केली आहे. जे प्रेमाने देतात तेच मी स्विकारते. या ट्रस्टची काही उद्दिष्ट आहेत.

भाऊंनी चित्रसृष्टीतपण काम केलं पण तिथे ते रमले नाहीत. त्यांच खरं क्षेत्र शास्त्रीय संगीत व नाटय संगीत. या दोन्ही क्षेत्रात ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले. भाऊंकडे पदांचा, चालींचा जो अमोल ठेवा होता मला नाही वाटत आज ते कोणाकडे असेल. उदा. संगीत तुलसीदास, संगीत पटवर्धन, जयदेव व महाश्वेता या गोविंदरावांच्या संगितीका यांच्यातील गाण्यांच्या चाली इतक्या अप्रतिम आहेत आणि माझे वडील सोडल्यास फार थोडया लोकांना त्या माहित असतील. भाऊंच्या स्मृतीपित्यर्थ हे प्रतिष्ठान स्थापलं. त्यांच्या मृत्यूनंतर दहा वर्षांनी त्यांना श्रध्दांजली अर्पिण्यासाठी १९६८ नंतर २०००-२००१ साली संगीत तुलसीदास ह्या नाटकचं मी पुन:र्जिवन केलं व संगीत तुलसीदासचा प्रयोग उभा केला. १५ प्रयोग मी केले. काही लोकांनी, काही बॅंकांनी मला मदत केली. पण जवळजवळ नव्वद टक्के खर्चाचा भार मी स्वत: उचलला होता. फाउंडेशन १९९५ ला स्थापलं त्यापूर्वी १९९३ मधे दादरमाटुंगा कल्चरल सेंटरमधे मी ‘गोविंदगुणी रंगले ‘ हा कार्यक्रम सादर केला होता. मी आणि नाशिकचे अभिनव कला मंदीर, दादरमाटुंगा कल्चरलच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या ह्या कार्यक्रमात गोविंदराव टेंबे यांच्या संगीत कार्याचा आढावा घेतला होता.

ती संहिता उचलून दुस-या लोकांनी पण असे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला होता. पण वामनराव सडोलीकर फाउंडेशनच्या अंर्तगत ज्यांना थिमॅटिक म्हणता येइल असे अनेक कार्यक्रम सादर केले. जसे वर्षाऋतुवरती, योगेश्वर कृष्णावरती म्हणजे कृष्णाच्या व्यक्तिमत्वाचा विचार करून त्यावर एक संगीत संहिता स्वत: तयार करुन हिंदीतून सादर केली. माझ्या मावशी प्रभात फिल्म कंपनीच्या एकेकाळच्या स्टार बालनटी वासंती यांच्या कारकिर्दीचा व त्या अनुशंगाने प्रभात कंपनीच्या कार्यपध्दतीचा आढावा मुलाखत रुपात, रेकॉर्ड सोसायटी ऑफ इंडियाच्या विद्यमाने मी सादर केला होता. त्यावेळी त्यांनी गायलेल्या रेकॉर्डस लावून त्यांच्या आठवणी त्यांना सांगायला सांगितल्या होत्या. हे करतांना माझा फायदा असा झाला, एकतर असे कार्यक्रम बसवून ते मला सार्वजनिक स्वरुपात लोकांपुढे मांडण्याची संधी मला मिळाली. फाऊंडेशनमधून मी शास्त्रीय संगीताचं, नाटय संगीताच शिक्षण देत असते. अनेक विद्यार्थी बाहेरून येतात त्यांना कोणताही मोबदला न घेता शिकवते. पुष्कळ लोकांची ऐपत नसते त्यांना तर मी विनामूल्य शिकवते. काही उपक्रम असे आहेत की अनेक सामाजिक संस्था, अनाथाश्रम, मागास वर्गीयांसाठी काम करणा-या संस्था यांनासुध्दा या फाऊंडेशनतर्फे मदत असते.

माझ्या वडीलांच्या पुण्यतिथाला दरवर्षी मी त्यांना श्रध्दांजली म्हणून कार्यक्रम करत असते. गेली दहा वर्षे तो करत आले आहे. पहिल्या वर्षी नाशिकला दोन दिवसाचा कार्यक्रम केला. ह्या वर्षीच्या कार्यक्रमाचे वैशिष्टय असं आहे की माझ्या वडीलांचे गुरु उस्ताद संगीतसम्राट अल्लादियाखाँसाहेब यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम होणार आहे.

– श्रुती सडोलीकर