अंतराळ ही एक गूढ पोकळी. थंड, अंधारी. मनच नाही पण शरीराला तरंगत ठेवणारी पोकळी. आपण जरी पोकळी म्हणत असलो, तरी ती केवळ एक पोकळी नाही. प्रचंड मोठ्या अवकाशस्त वस्तूंनी भरलेली. कितीही शोध घेतला तरी रोज एक नवीन शोध देणारी ही प्रचंड पोकळी आहे. यात असंख्य आश्चर्ये आणि विस्मयकारक गोष्टी भरलेल्या आहेत. त्यातले विज्ञान आज आपल्याला जरी माहीत असले तरी त्या विज्ञानाचे देखील आश्चर्य वाटावे असे वास्तव. गणिताच्या आधारे, भौतिकशास्त्राच्या मूलभूत सिद्धांताच्या तत्त्वावर आधारलेले अंतराळ एक वास्तव आहे. हे आज आपल्याला स्पष्ट झालेले आहे. त्यामागे प्रचंड अभ्यास आहे. अगदी हजारो वर्षांपूर्वीपासून आणि विविध संस्कृतींनी केलेला अभ्यास आहे. अगदी आपली सूर्यमालाच पाहुया. यामधले सृष्टीचमत्कार तर अफाट आहेत.
अवकाश, ब्रह्मांड, विश्व, अशा अनेक नावांनी आपण आपल्या जगाला संबोधत असतो. त्यातील अज्ञाताचा शोध हा माणसाला कायम आकर्षित करीत आला आहे. त्यातून अनेक विस्मयकारक गोष्टी आपल्याला माहित झाल्या आहेत. अत्यंत मूलभूत अशा शोधांनी आज खगोलशास्त्र विपुल आहे. परंतु त्यातील अजून सखोल ज्ञान मिळवण्याची मानवाची तहान भागलेली नाही. प्राचीन खगोलशास्त्रामध्ये हिंदुस्तानी वैज्ञानिकांचे अनमोल योगदान आहे. आज पुन्हा हिंदुस्तानी खगोलशास्त्रज्ञांचे नाव जगामध्ये घेतले जाते आहे आणि कदाचित पुन्हा एकदा संशोधनाचा सुवर्णकाळ आपल्याला पाहायला मिळेल अशी काही चिन्हे दिसू लागली आहेत. खगोलशास्त्रीय दृष्ट्या २०१७ हे वर्ष खास महत्वाचे आहे ते दोन कारणांसाठी, एक तर इस्रोने केलेला उपग्रह प्रक्षेपणातील विक्रम आणि दुसरे म्हणजे “सरस्वती दीर्घिका समूहा”चा शोध!
पुणे येथील आयुका आणि आयसर या संस्थांच्या शास्त्रज्ञांच्या चमूने याचा शोध लावला आहे. यांच्या सोबत एनआयटी, जमशेदपूर आणि न्यूमॅन कॉलेज, थोडुपुझा येथील शास्त्रज्ञदेखील या शोधाचा भाग आहेत. दिर्घिकांचा हा समूह आपल्यापासून सुमारे ४ अब्ज (४०० करोड) प्रकाशवर्षे इतका दूर आहे. प्रकाशाच्या वेगाने जायचे ठरवले तर इथे पोहोचण्यासाठी ४०० करोड वर्षे लागतील. आपल्याला साधारण १४ अब्ज वर्षे दूरपर्यंतचे आपले विश्व माहित आहे यामुळे हा शोध महत्वाचा ठरणार आहे. सरस्वती हा दिर्घिकांचा केवळ एक समूह नाही तर महासमूह (सुपरक्लस्टर) आहे. याचे जे चित्र आपल्याला मिळालेले आहे त्यावरून हे स्पष्ट होते की हा समूह अत्यंत दाट आहे. इथल्या दिर्घिकांचा सर्वसामान्य आकार साधारण अडीच लक्ष प्रकाशवर्षे इतका आहे. आपल्या विश्वातील महाकाय अवकाशीय वस्तूंपैकी एक अशी सरस्वती दीर्घिका समुहाची ओळख झाली आहे.
दीर्घिका म्हणजे अनेक तारे, ग्रह, अवकाशस्त धूळ, वायू, असंख्य सौरमाला आणि डार्क मॅटर याने बनलेली असते. शिवाय यामध्ये प्रचंड मोठ्या पोकळ जागाही असतात. यात असंख्य सुर्यसमान तारे असतात जे आपल्या ग्रहमालांना घेऊन फिरत असतात. या सगळ्याला कॉस्मिक वेब किंवा वैश्विक जाळे असेही म्हणतात. विश्वामध्ये अशा दीर्घिकांचे असंख्य समूह आहेत. हे सगळे एकमेकांशी गुरुत्वीय शक्तीने बांधले गेलेले आहे. अनेकदा हे दीर्घिका समूह काही प्रकाशवर्षे खेचले जातात. सरस्वती दिर्घिकांचा समूह साधारण ६०० अब्ज प्रकाशवर्षे इतका खेचलेला असू शकतो. या समूहामध्ये साधारण २० अब्ज सूर्य असावेत असा अंदाज केला आहे. कदाचित यामध्ये अनेक विविध सजीवसृष्टी असू शकतील. सरस्वती दीर्घिका समूह हा मीन तारकासमुहाच्या दिशेकडे आहे. आपली दीर्घिका म्हणजेच आकाशगंगा ही अशाच एका दीर्घिकंच्या महाकाय समूहाचा भाग आहे आणि या समुहाचे नाव आहे ‘लॅनिआकेया’. हा शोध फारसा जुना नाही. २०१४ मधील आहे.
सरस्वती दीर्घिका समूह आपल्याला जरी आज सापडला असला तरी तो आपल्याला ४० अब्ज वर्षांपूर्वी कसा होता हे समजले आहे. याचे कारण म्हणजे तेथून निघालेला आणि आपल्याला सापडलेला प्रकाश सुमारे ४० अब्ज वर्षांपूर्वीचा आहे. त्या समूहाची सध्याची स्थिती काय असेल, ती आजही अस्तित्त्वात असेल का की तिचे विघटन झाले असेल, की दुसऱ्या दीर्घिकेमध्ये मिसळून गेली असेल हे आपण काहीच सांगू शकत नाही. परंतु विश्व १० अब्ज वर्षाचे असताना हा समूह कसा असेल हे मात्र आपण या शोधामुळे सांगू शकतो. हा शोध म्हणजे गेल्या पंधरा वर्षांच्या कष्टाचे फलित आहे. २००२ च्या सुमारास जॉयदीप बागची आणि सोमक रायचौधरी हे दीर्घिकांच्या या समुहाचा अभ्यास करत होते. त्यातून मिळणाऱ्या एक्स-रे, रेडिओ आणि ऑप्टिकल प्रतिमांवरून हा समूह दाट असावा असा अंदाज केलेला होताच. परंतु २००२ मध्ये फार काही माहिती मिळू शकली नाही. पुढे चार-पाच वर्षांमध्ये रेड शिफ्ट किंवा ताम्रच्युति मधून मिळालेल्या माहितीचा वापर करून शोध चालू ठेवला. यामुळे आज हा समूह एक दिर्घिकांचा महाकाय समूह आहे हे सिद्ध करण्यात मदत मिळाली. हा नाविन्यपूर्ण शोध अॅस्ट्रोफिजिकल जर्नल, अमेरिकन अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या आघाडीच्या संशोधन जर्नलमध्ये प्रकाशित केला जाईल.
या दीर्घिकेला “सरस्वती” नाव दिले गेले आहे हे विशेष. सरस्वती या नावाचे मूळ प्रोटो-इंडो-युरोपीय संस्कृतीमध्ये आहे. भारतातील महत्वाच्या नद्यांपैकी एका नदीचे हे नाव आहे. स्वर्गीय नद्यांचे रक्षण करणाऱ्या दिव्य देवीचे हे नाव आहे. आधुनिक भारतामध्ये, ज्ञानाची, संगीत, कला, बुद्धी आणि निसर्गाची – सर्व सृजनशीलतेचा विचार करणारी देवी म्हणून सरस्वतीची पूजा केली जाते. यामुळे हे नाव अगदी यथार्थ आहे.
विश्वाच्या उत्क्रांतीच्या “कोल्ड डार्क मॅटर” या प्रारुपानुसार सुरुवातीला आकाशगंगेसारख्या छोट्या रचना प्रथम तयार होतात. त्यामुळे दीर्घिकांचे प्रचंड मोठे समूह असण्याची शक्यता कमीच असते. परंतु सरस्वती दीर्घिकांच्या या महाकाय समूहाच्या शोधामुळे कोल्ड डार्क मॅटर सिद्धांताला आव्हान मिळाले आहे, आणि त्यावर पुनर्विचार नक्कीच केला जाईल. भविष्यामध्ये सरस्वती सुपरक्लस्टर आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशांतील स्पेक्ट्रोस्कोपिक निरीक्षणांनी त्याचा आकार, समुहाची उत्क्रांती आणि आंतरक्रिया यांचा शोध घेतला जाईल. याचसोबत अजूनही काही समूहांची निरीक्षणे केली जातील. यातून कदाचित विश्वनिर्मितीची काही रहस्ये उलगडतील. अशा महाकाय समुहांमध्ये एखादी दीर्घिका तिच्या आयुष्यामध्ये विविध वातावरणातून प्रचंड मोठा प्रवास करीत असते. त्यामुळे विश्वनिर्मितीच्या शोधामध्ये दीर्घिकांच्या महाकाय समूहांचा अभ्यास अतिशय महत्वाचा असतो. म्हणूनच सरस्वती दीर्घिका समुहाचा शोध हा अत्यंत महत्वपूर्ण शोध मनाला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने हिंदुस्तानी शास्त्रज्ञांचा वाटा आहे हे आपल्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे.
– सुजाता बाबर
(सदर लेख दैनिक सामना मध्ये प्रसिद्ध झाला आहे)