देवी त्रयंबोली मंदिर


Tryamboli Temple करवीरच्या पूर्वेकडे एका उंच टेकडीवर, रम्य मंदिरामधे वास करून देवीने अनुग्रह दिला आहे. जवळच ‘तर्क-तीर्थ’ नावाचे कुंड होते. आजही ते थोडे फार वापरात आहे. ‘टाकळ’ हे त्याचे अलिकडचे नाव. मूळचे मंदिर लहान असून, आतील मूर्ती स्वयंभू आहे. काळया पाषाणातील ही मूर्ती चतुर्भुज आहे. येथली मूर्ती, महालक्ष्मी मंदिर ाकडे पाठ करून आहे. ‘त्रयमाली’ हे या देवीचे दूसरे नाव आहे. अनेक करवीर वासीयांचे हे श्रध्दास्थान आहे. मंदिराच्या पायऱ्यांवर जलधारांचा अभिषेक करण्याचा धार्मिक विधी या ठिकाणी दर आषाढ महिन्यात मोठया उत्साहाने पार पडतो. जवळच यमाई मंदिर आहे. देवस्थान कमिटीने छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला आहे. या मंदिराची चोख व्यवस्था गुरव कमिटी ठेवते.

अंबरनाथ-शिवमंदिर

मुंबईनगरीचे एक उपनगर अंबरनाथ. अंबरनाथ हे नाव बहुतेक अमरनाथ म्हणजेच शिवशंकर यावरुन पडले असावे. हळेबीड-बेलूरची आठवण व्हावी असे एक महादेवाचं मंदिर इथे आहे. मंदिराचे प्रवेशदाराजवळ एक शिलालेख आढळते. रॉयल एशियाटीक सोसायटीच्या एका खंडात हा इ. स. १०६० चा शिलालेख छापला आहे. मंदिराच्या प्रवेशदारापाशी दोन नंदी आहेत. एका नंदीच्या गळयात शिवलिंग आहे. आत शिरल्यावर अठरा खांबांचा भव्य सभामंडप दिसतो त्यातले चारच खांब आता दिसतात ज्यावर सुरेख नक्षीकाम दिसते. बाकीचे खांब मात्र भिंतीत बुजले आहेत. मंडपाचे छत व कळस यामझे पोकळी आहे.कोनात जोडून असलेल्या गाभाऱ्यामुळे ऊनसावल्यांचा वेधक दृष्य पहायला मिळते. संपूर्ण मंदिर सव्वादोनशे कोरीव हत्तींच्या पाठीवर बांधलेले आहे. मंदिराच्या बाह्यांगाला चारी बाजूला विविध शिल्पे आहेत. त्यात त्रिशूल घेतलेली शिवमूर्ती, लक्ष्मीची मूर्ती, शिवलिंग, पार्वती, नरमुंडधारी महाकाली, शिवपार्वती विवाह, हंसारुढ ब्रम्हदेव, वराहरुढ विष्णू, ऊजव्या सोंडेचा गणपती, नृत्यांचे आविष्कार, शृगांरिक कामशिल्पे आढळतात. काळाच्या ओघात त्यात बरीच पडझड झालेली आहे.

Ambarnath Temple सभामंडपातील कोरलेले खांब म्हणजे कोरीवकामाचा उत्कृष्ट नमुनाच होय. सभामंडपाच्या मध्यभागावरील झुंबर त्याच्या भोवतालची वर्तुळे, घुमट, त्यावरचे नक्षीकाम फारच सुरेख आहे. गाभारा दिवसाउजेडी पाहिला तर आतील भागात योगी शिव कोरलेला दिसतो. सभामंडपापासून दहाबारा पाय-या उतरल्यावर गाभारा दिसतो. त्यात एक स्वयंभू काळया पाषाणाचे शिवलिंग व दुसरे घडीव गारगोटीचे शिवलिंग आहे. आंबा, चिंच यांची दाट राई इथे एकेकाळी असावी असं वाटतं. वढवाण नदीच्या ऐन काठावर हे मंदिर सहज लक्षात येत नसलं तरी प्रेक्षणीय नक्कीच आहे.

कसे जाल?
अंबरनाथ हे सेंट्रल लाईनवर मुंबई दादर स्टेशन पासून ५२ किमी. वर आहे. रेल्वेने गेल्यास १ तासाचे अंतर आहे व हे मंदिर अंबरनाथ स्टेशपासून रिक्शाने काही मिनिटांच्या अंतरावर आहे.

– कुंदा कुलकर्णी

कात्यायनी देवी मंदिर

Kartani Temple एक आकर्षक ठिकाण: नानाविध प्राचीन मंदिरांमुळे कोल्हापूर हया श्री. क्षेत्राचा एक विवक्षित सांस्कृतिक प्रभाव आहे. देवी महालक्ष्मीच्या रक्षणार्थ महालक्ष्मी मंदिरासभोवती, इतर देवतांची मंदिरे सुरवातीला स्थापन केली गेली. पूर्वेकडे सिध्द बटुकेश्वर, पश्चिमेकडे त्रयंबोली, उत्तर दिशेला ज्योर्तिलिंग तर दक्षिण दिशेला कात्यायनी. ‘करवीर माहात्म्या’मधे हया देवतेचा उल्लेख आहे.

फार प्राचीन काळी कोल्हासूर राक्षसाने रक्तबीज नामक दैत्याला प्रस्तुत परिसराच्या रक्षणार्थ, इथेच ठेवले. या दरम्यान कोल्हासूराविरूध्द महालक्ष्मीने युध्द पुकारले आणि, रक्तबीजाचा नि:पात करण्यासाठी तिने भैरवाला पाठविले. पण त्याच्यावर वार करताक्षणी, त्याच्या रक्तातून अनेक दैत्य उत्पन्न होऊ लागले. त्यामुळे भैरव निष्प्रभ ठरू लागला. लगेच देवी महालक्ष्मीने कात्यायनीला पाठविले. तिने अमृत कुंड घडविला. रक्तामधून निर्माण झालेले भासमान दैत्य तिने त्या कुंडामधे ठेवले. भैरवाच्या सेनेचे पुनरूज्जीवन करून, कात्यायनीने रक्तबीजाचा नाश केल्याचा उल्लेख पुराण कथेमध्ये सापडतो. शिकारी, स्वाऱ्या इ. प्रसंगी, छत्रपती शाहू, राजाराम, व आक्कासाहेब या मंदिराला भेट देत असत, असे दफ्तरी बाडामधील ऐतिहासिक नोंदींवरून लक्षात येते. थकलेल्या, रोजच्या कटकटींनी ग्रासलेल्या कोल्हापूरवासियांसाठी, हे मंदिर म्हणजे, एक विसाव्याचे, विरंगुळयाचे रमणीय ठिकाण ठरते.