काम करणा-या स्त्रीचा संघर्ष

distinguished-women प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषामागे स्त्री असते मात्र कर्तृत्ववान स्त्रीमागे तिचे संपूर्ण कुटूंब असते.

मी पाचवीत असतांना माझी शाळा घरापासून ८ कि.मी. वर होती. मी शाळेतल्या विविध स्पर्धांमध्ये कायमच भाग घ्यायचे. बरेचदा शाळेत व्यवस्थित तालमी करता यायच्या नाही म्हणून मग जवळच राहणा-या मैत्रिणीच्या घरी तालिमी करायचे ठरले. त्यासाठी आईची परवानगी विचारली तर आई म्हणाली, “शाळा झाल्यावर तू मैत्रिणीकडे जाण्यात हरकत काहीच नाही पण घरी परतणार कशी? मला ऑफिसमधून येईपर्यन्त संध्याकाळचे सहा वाजतात आणि त्यानंतर स्वयंपाकाची घाई असते. त्यामुळे मला तुला घ्यायला येणे शक्य नाही, बाबाही नऊशिवाय घरी येत नाहीत, संध्याकाळच्या रिक्षाही नसतात. त्यामुळे तू मैत्रिणीकडे जाऊच नकोस, घरीच तालिम कर.” हे ऐकून मला आईचा खूप राग आला. घरचे प्रोत्साहनच देत नाही असे मला वाटले. मी उद्धटपणे सांगितले की कोणीच घ्यायला यायची गरज नाही मी एकटी बसने (PMT) येईन. आईने तत्परतेने मला बसचा थांबा आणि क्रमांक समजावून सांगितला. बसने यायची पहिलीच वेळ असली तरी आई-बाबा घाबरले नाहीत आणि मला अडवलेही नाही.

ठरल्याप्रमाणे दुस-या दिवशी शाळा सुटल्यावर मी परस्पर माझ्या मैत्रिणीकडे गेले. काकू आम्हाला साग्रसंगीत जेवण वाढत होत्या आणि शाळेतल्या गमतीजमतीपण विचारत होत्या. आमच्या नाटकाच्या तालमीच्या वेळीही त्यांनी खूप मदत केली, संवाद म्हणून घेतले, काही ठिकाणी सूचना केल्या, बदल केले… एकंदर खूप मज्जा येत होती. मात्र मला आतून खूप वाईट वाटत होते, कशाचं ते कळत नव्हतं. ठरल्याप्रमाणे बसने मी घरी आले. पण खरंतर मला आईचा खूपच राग आला होता. आईने प्रेमाने जवळ घेतल्यावर रडत तिला म्हणाले की मैत्रिणी आई रोजच घरी असते. शाळेतून घरी आल्यावर तिच्यासाठी गरम गरम जेवण करून देते, गप्पा मारते. मला मात्र शाळेतून घरी आल्यावर स्वतः जेवण गरम करुन ऐकटयाने जेवावे लागते. मला पण वाटत की तू माझ्यासोबत राहवं… त्यामुळे उद्यापासून तू ऑफीसला जाऊ नकोस, घरी आमच्या बरोबर रहा. आईने मात्र शांतपणे मला समजवण्याचा प्रयत्न केला पण मी काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि न जेवताच झोपले.

नंतर असे अनेक प्रसंग आले… शाळेतले प्रकल्प, क्रीडामहोसत्व, स्पर्धा ह्या सगळ्यांमध्ये भाग घ्यायला मी स्वतः शिकले. वादविवाद स्पर्धेचे मुद्दे मी स्वतः लिहायचे, पाठांतर करायचे आणि आरशासमोर सराव करायचे. मैत्रिणी मात्र आई-बाबांकडून लिहून घ्यायच्या. त्यामुळे माझी स्पर्धा माझ्या वयाच्या मुलींबरोबर न होता मोठ्यांबरोबर असायची. नृत्याचा सरावही असाच केला. इतकेच काय दहावीचा क्लासही वरच्या वर्गातील मुलांना विचारून लावला, आईने फक्त फीचे पैसे दिले. पुढे कॉलेजमध्येही बहुतेक निर्णय मी स्वतःच घ्यायला शिकले. काही निर्णय चुकले पण मी त्यातूनही शिकतच गेले. आईबाबा वेळोवेळी मार्गदर्शन करायचे मात्र सगळं काम मीच करायचे. खरंतर आईच्या ह्या ऑफिसमुळे मी खूपच स्वावलंबी झाले होते, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत होते. स्वतःच्या चुका आईबाबांकडे न जाता स्वतःच सोडवत होते. आजकाल जेव्हा मी पालकांना आपल्या मुलांना विविध गोष्टींमध्ये भाग घेण्यासाठी आग्रह करतात तेव्हा त्यांना सांगावसे वाटते की मुलांना स्वतःहून निर्णय घेऊन त्यात भाग घेऊ द्यात. त्यात लुडबुड न करता फक्त मार्गदर्शन करा.

आज, इतक्या वर्षानंतर मी जेव्हा आईला विचारले,” माझी चिडचिड बघून तुला ऑफिस सोडावेसे नाही कां ग वाटले?” आई म्हणली “नोकरी सोडण्याचा विचार अनेकवेळेला माझ्या मनात आला. त्याबाबत सासूबाईंना आणि तुझ्या बाबांना विचारलेही तेव्हा दोघेही एका सुरात मला म्हणले, “तू मुलींसाठी स्वतःचे करीयर का पणाला लावते आहेस? मुली स्वतः शिकतील आणि इतक्यात मोठया होतील.त्यांच्यासाठी तू नोकरी सोडायची अजिबात गरज नाही”.
हे ऐकून मला माझ्या आजी आणि बाबांबद्दल खूप अभिमान वाटला.. घरच्यांची साथ असल्यामुळेच तर आईला ही कसरत शक्य झाली.

ह्या लेखाची सुरूवातीची ओळ लिहितांनाच मला माझ्या आयुष्यातले ते सगळे प्रसंग आठवत राहिले.. त्या वेळेस आई खंबीर नसती किंवा तिच्या पाठीशी आजी-आजोबा, बाबा नसते तरे? किंवा मुलांना वेळ देता येत नाही ह्या अपराधी भावनेमुळे तिने नोकरी सोडली असती तर माझा मार्ग मीच शोधायचा, स्वावलंबी व्हायचे धाडस व बुद्धि मला झालीच नसती. हे सारे प्रसंग फक्त माझे नसून समाजासाठी प्रातिनिधिक आहेत.

हा लेख प्रत्येक नोकरी/व्यवसाय करणा-या स्त्रीला समर्पित आहे जिच्या मनात कायम खंत असते मुलांना सोडून नोकरी करण्याची मात्र ही खंत नसून तुमचं सौभाग्य आहे कि तुम्ही तुमचं अस्तित्व टिकवून आहात, आणि कळत नकळत मुलांना स्वावलंबी करत आहात. हा लेख प्रत्येक सासू सास-यांना, नव-याला आणि स्वावलंबी मुलांना समर्पित आहे ज्यांनी खंबीरपणे आपल्या सुनेला, बायकोला आणि आईला साथ दिली.

म्हणूनच म्हणतात कर्तृत्ववान स्त्रीमागे तिच्या कुटूंबाचा पाठिंबा महत्त्वाचा असतो.

शुचिता केळकर-दांडेकर, बेल्जियम