‘संकल्प’ महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने…

गोष्टी तशी बरीच जुनी झाली आता.. मलिष्का एफ.एम. वर सांगत होती “आज आर्मी डे आहे, यानिमित्त आपण सर्व सैनिकांना श्रध्दाजंली वाहूया”. मग त्यानंतर तिने सैनिकांशी संबंधीत असणारी गाणी सुरू केली. मी मलिष्काचं ‘आर्मी डे’ असल्याचं वाक्य ऐकलं आणि मला नोव्हेंबर २००६ मध्ये शहीद झालेला मेजर मनिष पितांबरे आठवला…..

अनंतनाग येथे अतिरेक्यांशी लढताना ठाण्यात राहणा-या मेजर मनिष पितांबरेला वीरमरण आलं. हिजबुल मुजाहीद्दीनच्या म्होरक्याला यमसदनी धाडताना ह्या शुरवीराने आपल्या प्राणांचीही पर्वा केली नाही. आज शहीद होऊन फार थोडाकाळ लोटला आहे. पण सध्याच्या घडीला त्याच्या परिवाराचं काय झालं असेल? किती लोकांना आज त्याच्या आठवणीनं गहिवरून आलं असेल? बोटावर मोजण्याइतकेच काही असतील. या आणि अशा अनेक प्रश्नांची मालिकाच मनात सुरू झाली असेल. मग आणखी एका शुरवीराची आठवण झाली. मिग विमान अपघातात मरण पावलेला फ्लाईट लेफ्टनंट अभिजित गाडगीळ! अभिजित व त्याची आई कविता गाडगीळ यानांही आपण विसरत चाललो आहोत. नव्हे विसरून गेलो आहोत. कविता गाडगीळ आजही न्यायासाठी झगडत आहेत. ही झाली वानगीदाखल काही उदाहरणं.

या दोघांप्रमाणेच इतर अनेक सैनिक देशासाठी आपले प्राण पणाला लावतात मात्र आपल्यातल्या कितीजणांना त्यांची आठवण येते? त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत याची जाणीव आपल्याला आहे का? हल्ली आपलं असंच होतं ना… आपल्याला विसरत जाण्याची किंवा त्याहीपेक्षा सोयीस्करपणे मागच्या गोष्टी मागे टाकून देण्याची सवय झाली आहे. पण आपल्याला नको त्या गोष्टींमध्ये भरपूर रस असतो. अमक्या नटाचं तमक्या नटीसोबत काहीतरी सुरू आहे. साडया कुठे छान, कोणाचा मोबाईल किती हजाराचा, रविवारी कोण पार्टी देणार आणि अशी अनेक ऑफिसेसमध्ये ऐकू येणा-या वाक्याना आपण कंटाळत नाही, लोकल ट्रेनमध्ये, कॉलेजमध्ये, कट्टयावर चर्चासत्र चालतात. आपण सगळेच खूप आत्मकेंद्री होत चाललो आहोत आणि आपल्याला इतर गोष्टी जोवर त्या आपल्यापर्यंत येत नाहीत तोवर त्याच्यांशी काही देणं घेणं नसतं. बेदरकारपणा वाढत चालला आहे. बॉम्बस्फोटाच्या खटल्यात अडकलेला संजय दत्त जेव्हा कोर्टाकडे सुटकेची याचना तेव्हा त्याला सगळ्यांची सहानभुती मिळते. पण मनिष पितांबरे आणि अभिजित गाडगीळ यांच्यासारख्या सैनिकांच्या कुटूबांचं काय झालं असेल याचा साधा विचारही आपल्या मनात येत नाही. त्यांचे काही जवळचे नातलग, मित्र आणि काही जागरूक नागरीक सोडले तर समाजासाठी तो विषय संपल्यात जमा आहे.

आपल्याकडे ‘मुन्नाभाई’ मधली ‘गांधीगिरी’ सहज खपते. पण देशासाठी प्राण अर्पण करणारे सैनिक विस्मृतीत जातात. उद्या मेजर पितांबरेवर एखादा दिग्दर्शक चित्रपट काढेल आणि सर्वांसाठी शौर्याची गाथा सादर करेल. कदाचित त्यावेळी मनिष पिंताबरे नावाचा एक सैनिक देशासाठी शहीद झाला याचीही आपल्याला आठवण येईल. ‘सबसे तेज’ जाण्याच्या घाईत अनेकदा प्रत्येक गोष्ट ‘ प्रॉडक्ट’ म्हणून पेश केली जाते. एका वाहिनीने सैनिकांच्या आयुष्यावर कार्यक्रम सुरू केला पण त्यालाही गरज लागली ती सेलिब्रेटीजची! कार्यक्रम वाईट नव्हता पण सेलिब्रेटी आल्याशिवाय सीमेचं रक्षण करणा-या जवानांची त्याआधी दखलही घेतली जाऊ नये ? मेजर मनिष पितांबरे मात्र वृत्तवाहिन्यांना आठवावा लागेल. मेजर मनिष पिंताबरे काही जवळचे नातलग, त्याचे मित्र आणि काही जागरूक ठाणेकर सोडले तर तो विषय संपल्यात जमा आहे.

चित्रपटांच्या बाबतीत विस्ताराने विचार केला तर हे लक्षात येतं की हाताच्या बोटावर मोजण्याइतके दिग्दर्शक उत्कृष्ट चित्रपटनिर्मिती करून त्यातून एखाद्या समस्येला वाचा फोडण्याचं काम करतात. बाकी चित्रपटांमध्ये आनंदी आनंदच! त्यामुळे अर्थातच मोजक्या आणि दर्जेदार कलाकृतींचाही आपल्याला विसर पडतो.’स्वदेश’ मधला मोहन भार्गवे प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनात दडला आहे पण तो आपल्याला आठवतो? ‘रंग दे बसंती’ तर अभिजित गाडगीळ आणि कविता गाडगीळ यांच्यावर आधारलेलं कथानक होतं. हा चित्रपट आला तेव्हा प्रत्येक तरूणाच्या मनात कुठेतरी एक जाणीव निर्माण झाली होती की आपण काहीतरी करायला हवं! बदल घडवायचा असेल तर स्वत: जबाबदारी घ्यायला हवी. पण आपण चित्रपटही विसरलो आणि अर्थातच जाणीवही. गांधीवादाचं गांधीगिरीत झालेलं रूपांतर आपण सगळयांनी स्वीकारलं पण तत्व विसरून विनोद लक्षात ठेवला. विसरण्याचं आपल्याला व्यसन लागलेलं आहे.

आपली शांत राहाण्याची आणि सारं विसरून जाण्याची वृत्ती आपल्याला घातक ठरेल यात शंकाच नाही. घटना एखाद्या सैनिकाच्या वीरमरणाची असो किंवा अगदी सामान्य असो त्याकडे डोळेझाक करण्याचीवृत्ती बदलणं आवश्यक आहे. कुठलीही घटना घडली की आपण कोणाच्यातरी माथी त्या घटनेचं खापर फोडतो आणि मग नवीन घटनेची चर्चा करण्याच्या नादात जुनी घटना विसरतो. आपण अंतर्मुख होऊन विचार करणं ही आजची गरज निर्माण झाली आहे. सेलिब्रेटीज महत्वाचे आहेत पण त्याचबरोबर समाजातल्या कुठल्याही समस्येशी निगडीत असणारा घटक त्याहून अधिक महत्वाचा आहे हे लक्षात घ्यायला हवं. ‘धूम’ स्टाईलमध्ये बाईक चालवून जीव गमावण्यापेक्षा देशासाठी प्राणांची आहुती देणा-या सैनिकांचा आदर्श समोर ठेवणं केव्हाही चांगलंच! आपण जबाबदारी घेऊन पुढे आलो तर मेजर मनिष पिंताबरे, अभिजित गाडगीळ व त्यांच्यासारख्या अनेक सैनिकांचे बलिदान विस्मरणात जाणार नाही किंवा सामाजिक प्रश्न साठून राहणार नाहीत. उलट ते सुटायलाच मदत होईल. चला तर मग आजपासून विस्मरण मागे टाकण्याचा ‘संकल्प’ सोडूया समाजातील प्रत्येक घटना गांभिर्याने घेऊ या.

– समीर जावळे, मुंबई