आठवणीतले वसई – मनोहर राखे

माझा जन्म, शिक्षण आणि इग्लंडला येण्यापूर्वीची नोकरी हे सर्व मुंबईला झालं. त्या अर्थाने मी अगदी १००% मुंबईकर आहे. आमचं राखे घराणं हे मुळचं वसईचं. राखे घराणं हे वसईत कैक पिढयांपासून स्थायिक झालं असावं. वसईहून किल्ल्याकडे जाण्याचा जो रस्ता आहे त्याच रस्त्यावर राखे आळी आहे. अशी आख्यायिका सांगितली जाते की चिमाजी अप्पांनी वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून काबीज केल्यानंतर किल्याचे जे रखवालदार नेमले होते, त्यांत आमच्या घराण्यांतल्या पूर्वजांचा समावेश होता. त्याचा परिणाम म्हणून आमचं मूळ आडनाव मागे पडून आम्हाला राखे हे आडनाव बहाल करण्यात आलं. माझ्या काकांनी जेव्हा राखे घराण्याचा वंशवृक्ष (फॅमिली ट्री) काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना माझ्या खापरपंजोबांपुढे आणखी कोणी राख्यांचा उल्लेख कागदोपत्री सापडला नाही असो.

माझ्या आजोबांनी राखे आळीतला गणपती उत्सव चालू केला. माझे आजोबा टिळक भक्त होते. इतके की ते फक्त टिळक पंचागच वापरत असत, नेमाने केसरी वाचत आणि पेपर वाचायला सुरूवात करण्याच्या अगोदर न चुकता टिळकांच्या फोटोला नमस्कार करून मग पुढे पाने उलटायला लागत. कालपरत्वे माझे वडील आणि दोन्ही काका आपापली शिक्षणें संपवून मुंबईला नोकरीला लागले. त्या काळी वसई ते मुंबई हा प्रवास आजच्या इतका सुलभ नसल्यामुळे मुबंईला भाडयाच्या जागेत राहू लागले. पण त्यांनी आणि त्यांच्या नंतर मी आणि माझ्या चुलत भावांनी, काही झालं तरी वसईला गणपतीला हजर रहायचंच हा नियम भारतात असे पर्यंत मोडला नाही. राखे आळीतलं आमच्याइतकं जुनं दुसरं कुटुंब म्हणजे केळकर. गणपतीची पुजा झाल्यावर आरतीची वेळ झाली की सगळे केळकर कुटुंबीय तसेच राहणारे ठिपसे, दामले, केसकर, पेडंसे व क्षीरसागर कुटुंबीय आमच्या माजघरात जमायचे आणि मोठया थाटात आरती पार पडायची. ह्या मंडळींपैकी कोणीही, राखे कुटूंबियांनी वसई सोडेपर्यंत स्वतंत्रपणे गणपती बसवायचा विचारसुध्दा केला नाही. मी स्वत: वसईला शेवटच्या गणपतीला गेलो ते १९६६ साली !

त्यानंतर परदेशवासी झालो. पण अजुनही काही आठवणी, अगदी काल घडल्यासारख्या ताज्या आहेत. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आम्ही सर्व मुंबईकर वसईला जायचो. गाडीला तुफान गर्दी असायची. दिवस अगदी ऐन पावसाळयाचे असले तरी वसई स्टेशनवर उतरेपर्यंत पावसाचा पत्ता नसायचा. स्टेशनवर उतरून एस.टी.च्या रांगेत उभे राहिलो की मग पावसाच्या अंगात यायचं. (त्यावेळी वसईला रिक्षा सुरू झालेल्या नव्हत्या). पापडीला काही पाशिंदर सोडून एस.टी. पारनाक्यावर खाली व्हायची. घरी जातांना नाक्यावरच्या देवळातल्या शंकराला हात जोडून मग राखे आळीचा रस्ता पकडायचा. घरी पोचायला पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागायचा नाही. पण घरी पोहचेपर्यंत अर्ध्या विजारीत असतांना आणि नंतर पॅंटवर चिखलाच नक्षी काम झालेलं असायचं. रात्री जेवण वगैरे उरकून झोपायची वेळ झाली की मग मात्र अगदी कसोटीची वेळ यायची. कारण मुंबईला आमच्या विभागात (दादरला) त्यावेळी तरी अजिबात डास नव्हते. आणि इथे तर माणसागणिक शेकडो डासांची फौज हजर असायची. त्यावेळी आमच्या घरी वीजही आलेली नव्हती. त्यामुळे सर्व व्यवहार कंदिलाच्या किंवा चिमणीच्या प्रकाशात चालायचे. तेव्हा घरातल्या सर्व उंबरठयांना आणि काना भोवती गोगांट करणा-या डासांना (मनातल्या मनात) शिव्या देत, केव्हा एकदा मच्छरदाण्या लागताहेत ह्याची वाट पहात बसायचो. पण मच्छरदाणी लावूनही फारसा काही उपयोग फायदा होईल याची खात्री नसायची. कुठूनतरी एखादा डास मच्छरदाणीत घुसयचाच आणि अगदी डोळयाला डोळा लागतोय न लागतोय तोच कानाशी येऊन मोठया आनंदाने गुणगुणत येऊन डसून जायचा. या डासांच्या जोडीला झोपमोड करणारे दुसरे प्राणी म्हणजे रस्त्यावरची कुत्री. काही एक कारण नसतांना एखाद कुत्रं ऐन मध्यरात्री भुंकायला सुरूवात करायचं आणि मग आळीतली सर्व कुत्री त्याला प्रतिसाद द्यायची. १९६६ साली वसईला गेलो होतो तेव्हा कासव छाप अगरबत्ती किंवा तिचं इलेक्ट्रीक भावंड यांच्यामुळे कदाचित डास कमी झाले होते पण कुत्र्यांचा मध्यरात्रीचा कोरस मात्र तसाच चालू होता.

पुरूष मंडळी ओटीवर झोपायचो. त्यामुळे सकाळी फटफटलं की लगेच उठणं भाग पडायचं. कारण आमच्या ओटीला रस्त्याच्या बाजूला भिंतच नव्हती. वरपासून खालपर्यंत नुसते लोखंडी गजच होते. तेव्हा रस्त्यावरून जाणायेणा-याला ओटीवर झोपलेल्याचं दर्शन होऊ नये म्हणून सक्तीने उठणं भाग पडायचं आणि गणेश चतुर्थीचा दिवस सुरू व्हायचा.

माझे आजोबा पेशाने भिक्षूक होते. त्यांना गणपतीपूजनासाठी अनेक घरी बोलावणी असायची. त्यामुळे ते सकाळी लवकर उठून स्नानसंध्या उरकून निघून जायचे. बोलावणी वाढली तशी माझे दोन्ही काकासुध्दा जाऊ लागले. पण बोलावणी वाढतच राहिली. तेव्हा आमच्या मुंजी झाल्यावर मी आणि माझे चुलतभाऊसुध्दा एखाद दुसरी पूजा सांगायला जाऊ लागलो. पण या सगळया गडबडीत आमच्या घरच्या गणपतीची पूजा मात्र सगळयात शेवटी व्हायची. पुजेची सुरूवात व्हायलाच दुपारचा एक वाजायचा, म्हणजे जेवायला दोन नक्कीच. आम्ही लहान असतांना एवढया उशीरापर्यंत काही न खाता रहायचं म्हणजे कठीण काम होतं. आजोबांना पुजेअगोदर कोणीही काहीही खाल्लेलं खपायच नाही. इथे मग, आजी, काकू किंवा आई थोडीशी युक्ती लढवायच्या. आमच्या घराच्या माळ्यावर जाण्यासाठी जो जिना होता त्याच्याखाली एक छोटीशी खोली होती. तिथे मागीलदाराच्या अंगणांतल्या झाडावरचे नारळ, केळीची लोंगरं, केळफुले, सुरण वगैरे ठेवलेले असायचे. अकराच्या सुमारास आजोबा पुजा सांगायला बाहेर गेले की आम्हा लहान मुलांना या खोलीत जमा करून सांजा, उपमा, खिचडी असल्या पदार्थांची मेजवानी मिळायची. माझी एक काकू महाडची होती. तिच्या हातात सूत्र असतील तर खास कोकणी पध्दतीची उकड मिळायची. ती काकू गेल्यापासून, उकड हा पदार्थ पहायलासुध्दा मिळाला नाही. त्यावेळी आमच्या घराच्या ओटींवर फरशी लावलेली होती. पण माजघर, स्वयंपाकघर इ. सर्व खोल्यात मातीची जमीन होती. त्यामुळे आदल्या दिवशी खूप पाऊस पडला (आणि तो पडायचाच) की या खोल्यात ओल यायची. मग घरातल्या सर्व बायकांना हातातली बाकीची कामं टाकून, या सर्व खोल्यातली जमीन सारवायला लागायची. अशावेळी त्या जिन्या खालच्या खोलीत सांजा, खिचडी वगैरे ऐवजी पारनाक्यावरच्या उमेश हिंदू विश्रांती गृहातून मागावलेले बटाटवडे, भजी इ. पदार्थाचा फडसा पडायचा.

दुपारी पुजा आणि आरती झाल्यानंतर पंगत बसायची. अंगणातच केळीची बाग असल्यामुळे केळीच्या पानांचा कधीच तुटवडा पडला नाही. उकडीच्या मोदकांवर ताव मारून उठलो की संध्याकाळपर्यंत आम्हा मुलांना रान मोकळ असायचं. अशावेळी पाऊस नसेल तर आमच्या घरासमोर एक शाळा होती, तिच्यासमोरच्या पटांगणांत धुडगूस घालायचा नाहीतर केळकरांच्या घरासमोरच्या मोकळया जागेत बॅट आणि रबरी चेडू घेऊन क्रिकेट खेळायचं. पण क्रिकेट खेळण्यापेक्षा, अंगणाच्या कोप-यात असलेल्या विहीरीत पडलेला चेंडू काढण्यातच जास्ती वेळ जायचा. आमच्या मुंजी झाल्यावर या कार्यक्रमात बदल झाला. वसईला लव्हाटे कुटुंब होतं. त्यांच्या घरी गणेश चतुर्थीला दुपारी ब्राम्हणभोजन असायचं. घरातील मोठे पुरूष हे सगळे वेगवेगळया घरी पुजा सांगण्यात गुंतले असल्यामुळे, लव्हाटयांकडच्या ब्राम्हणभोजनाला नेहमीच, आमच्या घरून मी आणि केळकरांच्या घरून दत्ताचा नंबर लागायचा. अशावेळी घरच्या गणपतीची पुजा झालेली नसली तरी, आम्ही दोघे हातात पळी पंचपात्र घेऊन लव्हाटयांकडे रवाना व्हायचो. आम्ही दोघेही जायला फारसे तयार नसायचो. कारण एकतर तिथे आम्ही दोघे सोडले तर बाकीचे सर्व लोक मोठे असायचे, आणि आमच्या ओळखीचे असे कोणीच नसायचे, आणि तिकडून परत यायला उशीर झाला (आणि तो व्हायचाच), की घरची दंगामस्ती अर्धीअधिक संपलेली असायची. मग संध्याकाळी आरती आणि रात्रीचीं जेवणं संपली की पुन्हा एकदा डासांच्या फौजेला तोंड देत झोपायचं. वसईला पाहिलेली एक आणि ऐकलेली एक अशा दोन गोष्टी या जन्मात विसरणार नाही. पाहिलेली गोष्ट म्हणजे एक दिवशी रात्री अंगणांत बसलो असताना समोरून उडत गेलेला काजव्यांचा थवा आणि ऐकलेली चीज म्हणजे रात्री घरी येताना कुंपणाच्या कडेला चाललेली रातकिडयांची किरकीर. त्यानंतर आजतागायत काजवा ही चीज पहाण्यात आलेली नाही किंवा रातकिडयांची किरकीरही ऐकलेली नाही.

आमच्या घरचा गणपती फक्त दीडच दिवसाचा असायचा. तेव्हा दुस-या दिवशी दुपारी जेवणं वगैरे उरकली की तीनच्या सुमारास सर्व राखे कुटुंबीय (पुरूष) आणि आळीतले बाकी सर्व पुरूष विसर्जनासाठी बाहेर पाडायचे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या ललका-या अगदी मुक्त कंठाने निघायच्या. विसर्जन गावातल्या एका तळयावर व्हायचं. तळयावर शेवाळं इतकं असायचं की विसर्जन करणारा माणूस तळ्यात उतरेपर्यंत त्या शेवाळयाखाली पाणी आहे असं वाटायचंच नाही. तळयावरून घरी परत आलो की मग वाकून नमस्कार केले जायचे. आजोबांना नमस्कार केला की आजोबा कनवटीमधून चांदीचा अख्खा रूपया काढून हातात ठेवायचे. आजी हातात खडीसाखर ठेवायची.

…हे आता सर्व मेमरी फाईल्समध्ये जमा झालं. वसईचे काका, काकू गेले. तिन्ही चुलत बहिणी दिल्या घरी सुखी रहात्या झाल्या. शेवटी घरात रहायला कोणीच नसल्याकारणाने, आम्ही आमची वडिलोपार्जित वास्तू काढून टाकली. आता उरलीय राखे आळी आणि आमच्या आठवणी.

– मनोहर राखे, लंडन