एका आश्रमशाळेचा प्रवास

कल्याण आश्रमाच्या कामात १५ वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती घडली. माझे नशीब खूपच चांगले म्हणून मला या दोन्ही उपक्रमांचा एक भाग होण्याचे भाग्य लाभले. १५ वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील उतेखोल-माणगाव इथे कातकरी मुलांसाठी आश्रम सुरु झाला. यावर्षी (८ जुन २०१५) रोजी पुणे जिल्ह्यातील “मुळशी” जवळ “माले” या गावात पुन्हा एकदा कातकरी मुलांसाठी आश्रम सुरु झाला. १५ वर्षांपूर्वी जसा घटनाक्रम झाला, त्यापेक्षा यंदाचा घटनाक्रम किती वेगळा होता !!!

कातकरी समाज बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे आणि वनवासी कल्याण आश्रमही अधिक व्यापक झाला आहे. त्यामुळे उपक्रम जरी तोच असला तरी तो राबवण्याच्या कामाचे स्वरूप मात्र पूर्णपणे बदलले आहे, अर्थातच कामाचा निखळ आनंद मात्र तोच आहे.

मी, त्यावेळी वनवासी कल्याण आश्रमाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता होतो आणि माझ्याकडे ठाणे-रायगड विभागाचा संघटन मंत्री अशी जबाबदारी होती. महाराष्ट्राचे प्रांत संघटन मंत्री होते श्री. प्रमोदजी करंदीकर आणि रायगडचा जिल्हा संघटन मंत्री होता प्रवीण हरपुडे.

मी आणि प्रवीण कोठिंब्याच्या आश्रमात बरेचदा निवासाला असायचो. कोठिंबे आश्रम गावाबाहेर जंगलात आहे. सायंकाळी ६ वाजता आश्रमासमोरच्या रस्त्यावरून शेवटची मोग्रजची गाडी जायची. त्यानंतर सकाळपर्यंत तो रस्ता संपूर्ण रिकामा असायचा. रात्री मुलांचे पसायदान म्हणून झाले की मुले झोपायची आणि मग आम्ही दोघे व कधी कधी बाबू हिरवे, असे त्या रस्त्यावर आडवे पडायचो. अंगावर येणारी गार वाऱ्याची झुळूक आणि आभाळात दूरवर पसरलेले चांदणे यामध्ये आम्ही इतके गुंतून जायचो की किती वेळ गेला ते समजायचे देखील नाही. एके दिवशी असेच पहुडलो असताना हातावर काही तरी आहे असे जाणवले, हात हलवला तरी पंचाईत, प्रवीणने पळत जाऊन विजेरी (टोर्च) आणली, बघतो तर काय माझ्या हातावर भली मोठी इंगळी पहुडलेली. माझे नशीब बलवत्तर म्हणून तिला डंख मारण्याची हुक्की आली नाही. क्रिकेट मधले क्षेत्ररक्षक जसे “सिंगल एक्शन थ्रो” करतात; तसे करून मी त्या इंगळीला फेकून दिले, माझी छाती अक्षरशः धडधडत होती.

एकदा प्रवीणने जिल्ह्यातील कामाचे वृत्त सांगता सांगता माणगावच्या गणूआण्णा देवधरांची इच्छा सांगितली. गणूआण्णा हे माणगावचे संघ स्वयंसेवक. आसपासचे कातकरी त्यांच्याकडे मदत मागण्यास येत असत. गणू आण्णा शक्य ती सर्व मदत करत असत. मुलांच्या शिक्षणाची चौकशी करत असत. त्यावेळी कातकरी मुलांच्या शिक्षणाची परिस्थिती फारच विदारक होती. शासकीय आश्रम शाळेत कातकरी मुले टिकतच नसत. अगदी फारच कमी मुले असायची. आई-वडील वीट भट्टीवर काम करणारे, एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणारे, व्यसन करणारे, त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची आबाळ होत असे. हे सगळे पाहून गणू आण्णांना फार वाईट वाटायचे.

mangaon shala
girls yoga mangaon school
boys yoga mangaon school

ते यावर उपायाकरिता सतत काहीतरी धडपड करायचे, पण त्यांचे वय पाहता त्यांना याकरिता कोणाच्या तरी सहकार्याची गरज होती. हे सर्व ऐकल्यावर आम्ही त्यांना भेटायला गेलो. खूप चर्चा झाली, गणू आण्णा यापूर्वी हा विषय अनेकांशी बोलले होते. प्रमोदजींशी देखील बोलले होते, सर्वांना वाटायचे कि काहीतरी करायला हवे. समस्येचे स्वरूप पाहता सर्वाना असे वाटले कि छोटा आश्रम सुरु न करता मोठ्या आश्रमाचा प्रस्ताव ठेवावा. आणि मग सुरु झाला पावणे दोन वर्षांचा प्रवास. प्रयत्न, प्रयत्न आणि फक्त प्रयत्न. प्रमोदजी करंदीकर, संघाचे कार्यवाह रोह्याचे श्री भावे, महाजन, कवितके, आदिवासी विकास खात्याचे आधीचे मंत्री श्री ए. टी. पवार साहेब, नंतरचे श्री विष्णूजी सावरा साहेब, पेणचे प्रकल्प अधिकारी श्री देवरे साहेब, ठाण्याचे आदिवासी अप्पर आयुक्त श्री कुलकर्णी साहेब, कातकरी समाजातील कार्यकर्ते सुदामजी पवार, संतोष जाधव, संतोष वाघमारे.

आता डोळ्यासमोर या कामात हातभार लावणाऱ्या इतक्या व्यक्ती येत आहेत की त्या सर्वांची नावे इथे नमूद करणे शक्य नाही. कधी कधी तर इतका प्रवास मी आणि प्रवीण करायचो की माणगावहून पेण प्रकल्प कार्यालय, मग ठाणे आयुक्त कार्यालय आणि तिथून मंत्रालय आणि परत. आमच्याकडे बजाज केबी-१०० ही दुचाकी होती. तिच्यावरून एका दिवसात हे सगळे आम्ही कसे फिरायचो; हे आज आठवले तरी आम्हालाच आश्चर्य वाटत राहते. पण त्यावेळी आश्रमशाळेच्या विचारांनी आणि कल्पनेने आम्ही बेभान झालो होतो, एवढे मात्र खरे. आम्ही तसे कनिष्ठ कार्यकर्ते होतो त्यामुळे आम्हाला निर्णय प्रक्रिया कशी झाली ते समजले नाही पण एक दिवस पेणच्या देवरे साहेबांकडून आम्हाला समजले कि आश्रमशाळेला मंजुरी मिळाली आहे. मंजुरीचे पत्र मिळाल्यावर मी माझे चंबूगबाळे डोंबिवली केंद्रातून थेट माणगावलाच हलवले, तेथून पुढच्या ६ महिन्यात मी आश्रमाचे दुसरे कसलेच काम केले नाही.

गणू आण्णा देवधर हे संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक, पण त्यांनी संस्थेचे अध्यक्ष नेमले ते काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री गायकवाड साहेब यांना, सचिव केले शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना. गावातील विविध मान्यवर वकील आणि डॉक्टर हे सदस्य आणि सर्वात शेवटी संघाचे काही स्वयंसेवक. गणू अण्णांचे नाव मात्र कुठेच नाही. आम्ब्याच्या झाडाखाली पहिला कार्यक्रम झालेला आठवतो. गणू अण्णांचे एक सुपुत्र दिवंगत झाले होते आणि त्यांच्या स्मरणार्थ एक हॉल बांधला होता. रस्त्याच्या पलीकडे भाड्याने देण्यासाठी कोणीतरी ४ खोल्या बांधल्या होत्या. त्या खोल्या म्हणजे वर्ग, अन हॉल म्हणजे निवास अशी आश्रमशाळा सुरु झाली. आमचा रोजचा उपक्रम म्हणजे वीट भट्ट्यांवर फिरायचे आणि मुलांना आश्रमशाळेत पाठवण्यासाठी पालकांना समजवायचे. हे लिहिताना मला इतक्या वर्षांनी देखील त्या वीटभट्ट्या डोळ्यांसमोर स्पष्ट उभ्या राहत आहेत.

मुख्य रस्त्यापासून नदीकडे गेलेला, ट्रक जाऊन ओबड-धोबड झालेला कच्चा रस्ता. नदीच्या काठाला माती, कोळशाचे ढीग, विटा आणि गवताने बनवलेल्या छोट्या झोपड्या. जिकडे तिकडे पसरणारा धूर, त्यात राबणारी माणसे, रात्री झोपड्यात पेटलेले रॉकेलचे दिवे- “नसे राउळी वा नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी”.

इथले हरी होते रुक्मिणी आणि लेकुरवाळ्यांसोबत, इकडे तिकडे खेळणारी मुले, पण अशा परिस्थितीत देखील सर्वांचे चेहरे मात्र आनंदी. त्यांचे जे काही जीवन चालू होते त्यात आम्हाला दु:ख दिसायचे पण ते मात्र आनंदी. महिला तर इतक्या उत्साही की अशा परिस्थितीतदेखील चुलीवर भांडे मांडून आमच्यासाठी चहा करायला तयार. वरणभात बनवणार, तिथेच जेवायला वाढणार. आजपर्यंत कितीक कातोड्यांवर, वीट भट्ट्यांवर मी गेलोय, पण कुठूनही कधी उपाशी परत आलो नाहीये. आदरातिथ्य चांगले असायचे पण मुल-मुली आश्रम शाळेत पाठवायचा विषय निघाला कि मुले आईच्या पाठीशी जाऊन लपणार. एका जरी मुलाला पाठवायला एखादे पालक तयार झाले तरी आम्हाला ते फार मोठे यश वाटायचे. संतोष जाधव आणि संतोष वाघमारे दोघेही आपल्याच आश्रम शाळेत शिकलेले. ते कातकरी भाषेत इतरांशी तासन तास चर्चा करायचे पण चिकाटी सोडत नव्हते. हळूहळू मुले जमायला लागली. शिक्षक येऊ लागले, स्वैपाकी आला. धान्य जमा होऊ लागले. महाड, गोरेगाव, रोहा, अलिबाग, पेण, नवी मुंबई, मुंबई सगळीकडून देणगीदार आणि कार्यकर्ते येऊ लागले. गणू आण्णांची पुण्याई फार मोठी होती आणि तीच कामी येती होती.

खरे आव्हान होते ते म्हणजे आलेली मुले टिकवण्याचे. कधीच एका जागी फार वेळ न बसलेली मुले, आईवडीलांसोबतच कायम राहिलेली, मनात आले की आपला रस्ता पकडून चालू लागायची. आम्हाला मुले हरवण्याची भीती, पण ही छोटी छोटी मुले आपल्या वस्तीपर्यंत अचूक चालत पोहोचायची. एकदा तर पहिलीतला एक मुलगा न सांगता निघून गेला, ६० किलोमीटर अंतर पार करून ८ दिवसांनी आपल्या जांभूळपाड्याच्या कातोडीवर पोचला. इकडे आम्ही त्याला शोधून शोधून थकलो होतो; कासावीस झालो होतो. तिकडे मात्र तो पोचल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला लगेच जांभूळपाड्याच्या बाबा अभ्यंकरांच्या घरी नेला आणि जीपमध्ये घालून माणगावला पोचवला. यावर उपाय काय करायचा ?. मग शरदजी महाजन यांच्या घरातून टीव्ही आणला, केबलचे कनेक्शन मोफत मिळाले, रोज दोन सिनेमे दाखवायला सुरुवात केली. हा उपाय मात्र इतका अचूक लागू पडला कि, त्यादिवसापासून विद्यार्थी पळून जाणे हे जवळजवळ बंदच झाले. मुलांची मानसिकता छोट्या छोट्या प्रसंगातून समजत गेली. त्यानुसार आम्ही देखील त्यांना पसंत पडेल असे बदल करत गेलो.

आश्रमाच्या मागे पाण्याचा कालवा होता आणि त्याला छोट्या घाटासारखे पायऱ्यांचे बांधकाम केले होते. पहिल्या दिवशी सर्वांना अंघोळीला नेले, सोबत बादल्या आणि तांबे होते. सर्वांना सांगितले कि पायरीवर बसून अंघोळ करायची, आम्ही बाजूला उभेच होतो. मुलांनी पायरीवर बादल्या ठेवल्या, कपडे काढले आणि आम्ही काही म्हणायच्या आत थेट पाण्यात उड्याच मारल्या. सगळे माशाप्रमाणे पोहण्यात एकदम तरबेज. दुसर्या दिवसापासून बादल्या नेण्याचे कामच राहिले नाही. आश्रम चालवणारे श्री देवधर आणि पेंडसे आणि सर्व मुले, हि रोज मासे खाणारी मंडळी. तुम्ही समजाल कि मुलांचा हिरमोड झाला असेल, या बाबतीत. मासे कसे मिळणार? पण बिलकुल नाही. आमचे स्वैपाकी आणि कार्यकर्ते पण वाघमारेच होते ना !, ते परस्पर सोडवायचे तो प्रश्न, मग सगळी मुले एकदम खुश.

अशा छोट्या छोट्या प्रसंगातून आम्हाला कातकरी मुलामुलींचे अंतरंग समजत गेले. आश्रम हळूहळू स्थिर झाला, मी देखील नंतर तिथून बाहेर पडून ठाणे जिल्ह्याचा संघटन मंत्री झालो. प्रवीण पुणे जिल्ह्याचा संघटन मंत्री झाला. गांधी परिवाराने दिलेल्या जागेत “स्व. विजयाताई गांधी शाळेची” भव्य वास्तू उभी झाली.रायगड, रोहे, पनवेल, मुंबईकरांनी आश्रमाचा वटवृक्ष भरपूर वाढवला. आज या विशाल वटवृक्षाखाली ४२५ मुलामुलींचे जीवन घडत आहे. आजपर्यंत साधारण १००० च्या वर विद्यार्थी १० वी उत्तीर्ण झाले आहेत. पुण्याहून जाताना ताम्हिणी घाटानंतर, मुंबई – गोवा रस्त्यावर माणगाव लागते. इथल्या उतेखोलच्या वाडीत हा आश्रम आहे. आपण सर्वांनी अवश्य एकदा याला कुटुंबासमवेत भेट द्या !!!. तिथल्या शिक्षक, मुख्याध्यापकांचे संपर्क क्रमांक : ९४२११६६७५०, ९९७५५७२०२९, ९४२३२२५०७१.

असाच नवीन आश्रम आता पुण्यात “मुळशी” जवळील “माले” गावात उभा राहतोय. ८ जून २०१५ रोजी याचे उद्घाटन झाले आहे. त्याच्या एकूण प्रवासाबद्दल पुढच्या भागात सांगेनच. पण त्याआधी हे स्वप्न साकार आणि समृद्ध करण्याकरिता, आम्हाला आपले सहकार्य हवे आहे. आमचे स्वप्न आहे कातकरी माणसाच्या विकासाचे, त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचे. हे स्वप्न आपल्या समोर विस्तृत मांडण्यासाठी आपल्या घरी, आपल्या मंदिरात, आपल्या मंडळात, आपल्या संस्थेत, आपल्या मित्र समुहात आम्हाला जरूर बोलवा. धन्यवाद,

ऋषभ मुथा – ९३२५०९३८४०, नरेंद्र विश्वनाथ पेंडसे – ७७०९०१३२३२, सचिन कुलकर्णी – ९९२१५७४१०८

www.vanvsai.org

आओ मिल जुटके, करे दूरिया समाप्त
वनवासी हम सारे, भारतभू के भक्त
एकसाथ होकर, करे दु:ख परास्त
एक देश; एक माटी, करे प्रगती प्राप्त
वनवासी और शहरवासी,
तू मै एक रक्त !!!

– सचिन कुलकर्णी