हा गणेशोत्सव आगळा म्हणण्याचं कारण असं की इतर सर्व गणेशोत्सव जरी चतुर्थीला सुरू होत असले तरी ह्या उत्सवाची सुरूवात आणि समाप्ती सप्तमीलाच झाली. कारण मात्र अगदी सबळ आहे. १९८६-८७ मध्ये श्री. आबा पणशीकर (नटवर्य श्री. प्रभाकर पणशीकरांचे बंधू) यांनी लेस्टरमध्ये चालू केलेले मराठी मित्र मंडळ, मिडलॅंडस (Marathi Mitra Mandal, Midlands) पुरेशा कार्यकर्त्यांच्या अभावी गणेशोत्सवबंद पडलं. १९८८ साली काव्हेंट्रीच्या श्रीमती ऋता कुलकर्णी यांनी भरपूर मेहनत घेऊन ते पुन्हा चालू केलं. आता तर हे मंडळ खूपच मोठं झालं आहे. पण झालंय काय की आता सभासद सगळया मिडलंडस या इंग्लडच्या मध्यवर्ती परगण्यात विखूरलेले आहेत. काही लोक तर १००-१२५ मैलांचा प्रवास करून कार्यक्रमासाठी येतात. बहुतेक सभासद आणि उत्साही मंडळी नोकरदार असल्यामुळे त्यांना गणेशचतुर्थीला म्हणजे बुधवारी संध्याकाळी पुजेला आणि गुरूवारी विर्सजनाला येणं शक्य झालं नसतं. म्हणूनच मग स्थापना आणि विसर्जन शनिवारीच करण्याचं ठरविण्यातं आले.
सकाळी लंडनहून निघालो तेव्हा हवा अगदी कोरडी होती. पण कॉव्हेंट्रीला पोहोचताच मुसळधार पाऊस सुरू झाला तो संध्याकाळी लंडनला पोहोचेपर्यंत सोबतीला होता. आता बाकीच्या देवाचं मला काही सांगता येणार नाही. पण हा वरूणदेव मात्र खराखुरा गणेशभक्त असावा. कारण गेल्या ५०-५५ वर्षांतला एकही गणेशोत्सव मला असा आठवत नाही की उत्सवाच्या १० दिवसांत हे वरूणदेव आपली वर्दी मोठया धडाक्यात लावून गेले नाहीत.
ठरल्याप्रमाणे १० च्या सुमारास पुजेला सुरूवात झाली. ज्यांना अगदी ख-या अर्थाने वेदशास्त्र संपन्न म्हणता येईल असे लंडनचे श्री. हेमंत कानेटकर पुजा सांगायला बसले होते. पुजा यथासांगपणे पार पडली आणि त्यानंतरचा भोजनाचा कार्यक्रमही तितक्याच यथासांगपणे पार पडला.
जेवण झाल्यानंतर आणि उत्तरपुजेच्या अगोदर, कार्यक्रम होता. श्री. राहूल देशपांडे यांच्या गाण्याचा. मी त्यांच्याविषयी बरंच ऐकलं होतं पण प्रत्यक्ष गाणं ऐकण्याचा योग आज प्रथमच येत होता. किंबहुना त्यासाठीच मी लंडनहून येवढया लांब धडपडत आलो होतो. राहूलरावांनी एकदा सुरूवात केली आणि पुढचे दोन अडीच तास कसे गेले ते कळलेच नाही. स्वत: राहूल देशपांडे, त्यांना तबल्यावर साथ देणारे निखिल फाटक आणि पेटीवर बसलेले आदित्य ओक हे तिघे, सगळया श्रोतृवृंदाला एका आगळयाच दुनियेत घेऊन गेले. आमच्यासारख्या पामरांचं सोडा. पण स्वत: बाप्पा जर तिथे हजर असते तर देशपांडयांनी पहिली सम गाठायच्या अगोदरच ते हातातलं मोदकाचं ताट बाजूला ठेवून हळूच मखरांतून बाहेर येऊन बसले असते आणि मोठया खुशीत मान डोलावीत मैफलीचा आस्वाद घेत बसले असते. इतकंच नाही तर कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी या तिघांची पाठ आपल्या एकेका हाताने थोपटली असती आणि मग चौथ्या हाताने तबक पुढे करून खास आग्रहाने त्या त्रिकुटाला मोदक खिलवले असते! आजपर्यंत बाप्पांचे किती वाढदिवस झाले हे सांगण मुश्कील आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, वाढदिवसाची अशी अविस्मरणीय भेट त्यांना फार थोडया वेळा मिळाली असेल. असो. कार्यक्रम संपल्यावर समस्त श्रोतृवर्गाने उभे राहून टाळयांच्या कडकडाटात या तिघांच्या कलानिपूणतेला मन:पूर्वक दाद दिली.
आरत्या आणि टाळ्मृदूंगाच्या गजरात बाप्पांना ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणून निरोप देण्यात आला.
– मनोहर राखे, लंडन