वासंतिक हृदय

spring heart दृष्टींला भ्रांत करणारा, प्राणिमात्रांतल्या निर्मितिच्या शक्तीच्या उन्मादक वृत्तींना चेतवणारा म्हणजे वसंत ऋतु. ’पुष्पधुळीमाजी लोळे वसंत’ हे अगदी मनाला पटतं. नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन, फुलाफळांमधून वाहणारा मधुरस, ऐकू येणारे कोकीळेचे स्वर आणि आंबा – फणसांशिवाय वसंत ऋतूला पूर्तताच येणार नाही. अशाच एका वसंतऋतूत १९४४ साली कोकणातील बोरघर येथे रत्नागिरीतील मामलेदार कै. आत्माराम खांडेकर यांच्या ज्येष्ठ कन्येचा जन्म झाला. वसंत ऋतू असल्यामुळे नाव ‘वासंती’ ठेवले. चेहर्‍यावरचा टवटवीत भाव, कायम प्रसन्न चेहरा, जिभेवर असणारा ”मधूरस” कोकिळेसारखा गोड गळा आणि सगळया कुटुंबातील माणसांना जोडून ठेवणारा तो दिलखुलास स्वभाव.

कुटुंबातील कर्तव्य पूर्तीसाठी वासंती मुंबईला नोकरीच्या निमित्ताने आली. राहण्याची सोय नसल्यामुळे गिरगाव, बांद्रा, दादर येथे नातेवाईकांकडे राहाणे झाले. लाघवी स्वभावामुळे सगळयांशी सूर चांगलेच जुळले. पाठीमागच्या तीन बहिणी आणि भावावर प्रेम केलंच पण चुलत, मावस, आते भावडांना सुध्दा तितकंच आपलं मानलं. वडिल श्री. खांडेकर वासंतीला म्हणून अभिमानाने ”माझा वसंता” असं म्हणायचे. इथे अभिप्रेत एवढंच की वासंतीने मुलासारखी जबाबदारी घेतली होती. १९६५ साली वासंती, सदाशिव पारखी यांच्याशी विवाहबध्द झाली. एका छोटयाशा खोलीत वासंतीने संसार सुरू केला. सासरच्या मंडळींना सुध्दा आपलंस करून घेतलं. पुढे पूर्णिमा आणि मंदार (संगीत संयोजक, पियानीस्ट) यांची आई झाली.

अधिकच गोड स्वभाव असलेल्या वासंतीचं-आईचं तिच्या वयाच्या बत्तीसाव्या वर्षी ‘मधुमेहाशी’ दुसरं लग्न झालं आणि तिच पुढचं आयुष्य, मधुमेहालाच मित्र करून हसत जगण खूप काही शिकवून जातं. १९७६ नंतरचा प्रत्येक दिवस वेगवेगळया प्रकारच्या ‘पॅथी’ करण्यामध्ये गेला. मधुमेहींसाठी देवदूत डॉ. विजय आजगावकर आम्हाला उपचारांसाठी भेटले. सकारात्मक, विनयशील डॉक्टरच भेटल्यामुळे पुढचं आयुष्य सकारात्मकच झालं. खाण्यापिण्यावर बंधन ठेवून ठराविक कालावधीनंतर डॉक्टरंकडे जाणं, असं सगळ नियमांनुसार हसतमुखाने करणं सुरु झालं!

घरी कायमच माणसांची ये-जा. पाहुण्यांचं घर येणं तिला फार आवडायचं घराच्या बाहेर पाहुण्यांच्या किती चपला असतात ह्यावरून माणसांची खरी श्रीमंती कळते, असं कायम म्हणायची. सगळयांना घरी केलेलं खाऊन जायचा आग्रह असायचा. सगळया प्रकारच्या भाज्या, वेगवेगळया न्याहारींचे प्रकार, दिवाळीचे पदार्थ, कोकण स्पेशल फणसभाजी, फणसाची सांजणं, आंबा आमटी, सोलकढी सगळं काही चवदार करण्याचा आईचा अट्टाहास! चैत्र महिना सुरू झाला की उत्साहाने कैरीचे पन्हे आणि आंबा डाळ पहिल्या दिवशी झालीच पाहिजे. आम्हालाच नाही तर शेजार्‍यांनासुध्दा तिचा आधार वाटायचा.

ssparkhi १९७७ साली पायाला चप्पल लागल्यामुळे जखम झाली. मधुमेहामुळे रहेजा हॉस्पीटलमध्ये एक महिना ठेवावं लागलं. पुढे दहा वर्षांनी २००७ मध्ये ”बायपास सर्जरी” सुध्दा झाली. पण त्यावेळी न घाबरता हसत सर्जरीसाठी ऑपरेशन लागले कारण जखम पूर्ण भरली नसल्यामुळे कायम मलमपट्टीसाठी रोज जावं लागायचं. हा आईच्या आयुष्यातला मोठा बदलाव होता. कारण तिने खर्‍याअर्थाने दुसर्‍याबरोबर स्वत:साठी जगायला सुरूवात केली. आईला आयुष्याची किंमत कळली होती. आपला कल अधिकाधिक कलात्मक गोष्टींकडे, वाचनाकडे वळवला. बोनस मिळालेलं आयुष्य फुकट जाऊन द्यायचं नाही म्हणून हातात परत हार्मोनियम घेऊन गाणं नव्याने सुरू केलं. भजनी मंडळामध्ये कायम हार्मोनियम वाजवायला सुरूवात केली. दोन वर्षं तर स्पर्धांमध्ये सुध्दा भाग घेतला.

घडयाळ तिच्या दैनंदिन कार्यक्रमांवर लावून घ्यावं. सगळं वक्तशीर नीटनेटकं झालंच पाहिजे. सगळं काही शिस्तबध्द अपेक्षित असायचंच पण आई स्वत: सुध्दा तेवढीच व्यवस्थित होती. एखादं काम करून घेण्याची तिच्याकडे वेगळीच हातोटी होती. कोणी दुखवलं जाणार नाही याची काळजी घ्यायची.

२०१४ च्या मे महिन्यात रत्नागिरीला बहिणीकडे जाऊन आल्यावर केलेले ” ह्दयाचं रूटीन चेकअप” व्यस्थित झालं. रत्नागिरीला आंबे खाल्लेत म्हणून डॉ. अजगावकरांकडे एक महिना जाईन असं म्हणाली. युरीन इन्फेक्शनचं निमित्त झालं आणि अँटीबायोटीक्सचा साईड इफेक्ट्, शेवटी ध्यानीमनी नसतांना आईचे ते सात मजली हास्य ९ जून २०१४ ला कायमचं मावळलं. ” तुम्ही हवं तसं आनंदाने जगा मी आहे”. असं सांगणारी आई ”तुम्ही माझ्याशिवाय जगायला शिका” हे सांगून गेली.

हल्ली कार्पोरेट जगतात वेगवेगळया प्रकारची ट्रेनिंग दिली जातात, ‘व्यवस्थापन’, ‘वेळेचे व्यवस्थापन’, ‘माणसांचं व्यवस्थापन’, ‘मधुमेहाबरोबर जगायला शिका’ वगैरे पण सौ. वासंती खांडेकर-पारखी यांना असल्या ट्रेनिंगची गरजच नव्हती. वसंत ऋतूमध्ये जन्मलेली असल्यामुळे ‘वासंतिक ह्दयच’ घेऊन आली होती ना!

पूर्णिमा पारखी – मुंबई