श्रावण – कालचा आणि आजचा …

पावसाचे आगमन झालेच आहे आता श्रावण लागेल. भारतीयांसाठी श्रावण महिना हा धार्मिक, रोमॅटिक, निर्सागाचे लावण्य रुप दाखवणारा असा अनेक अंगांनी जोडला गेलेला आहे. “हसरा-नाचरा श्रावण आला”, “आल्या बरसत श्रावणधारा” अश्या सारख्या मराठी कविता असोत किंवा “पड गये झुले, सावन ऋत आयी” किंवा “आया सावन झुमके” ह्यासारखी हिंदी चित्रपटातली गाणी असोत. श्रावण म्हणजे आनंद, वातावरणातला ताजेपणा आणि निर्सगाचे हिरवेगार गालिचे हे समीकरण मात्र घट्ट आहे. पण खरेतर श्रावणातला हा आनंद घ्यायला आजचे जीवन मात्र गतिमान झाले आहे. उलट कित्येकदा कामाच्या घाईत अचानक पावसाची सर आली तर बहुतेकांना कटकटीचेच वाटते. असे जर वाटणार असेल तर थोडेसे थांबून विचार करण्याची वेळ आली आहे.

श्रावणात साजरी होणारी मंगळागौर हा महत्त्वाचा सण. मागच्या वर्षी माझ्या बहिणीची आणि वहिनीची पहिलीच मंगळागौर ! आम्ही मात्र आता कशी साजरी होणार ह्या चिंतेत होतो पण आमचा हा प्रश्न अमेरिकेतल्या कॅलिफोरनियाच्या मराठी मंड्ळाने मंगळागौरी पुजनाचे आयोजन करुन सोडवला. पुजेचे स्थळ होते एका चर्चचा कम्यूनिटी हॉल. श्रावणाच्या एका ‘वीकएण्डला’ सा-या वशेळ्या जमल्या. त्यातल्या काहीजणी एच१ व्हिसावर असल्यामुळे नोकरी करणा-या नव्हत्या, काहीजणी उच्च शिक्षण घेणा-या तर काही नोकरी करणा-या. एकूण काय तर प्रत्येकीला मंगळागौर फक्त ऐकून माहिती होती. आता तर प्रत्यक्ष पुजेचीच तयारीही त्यांना करायची होती. यादीनुसार प्रत्येकीने इंडियन स्टोअर्स मधून शक्य तितके सामान आणून तयारी केली. पुजा सांगायला ‘कॅली’ मधल्याच पुरोहिता होत्या. मुलींना पुजा गाईड करण्यासाठी काहीजणींच्या आया आणि एक सत्तर वर्षांच्या आजीही होत्या. पुजेसाठी पुठठ्याची शंकराची छानशी पिंड केली होती. साडया आणि ड्रेस मध्ये प्रत्येकीने यथासांग पुजा मांडली. काहीजणी पहिल्यांदाच पुजा करत होत्या त्यामुळे अगदी डावे-उजवेही चुकत होते. तर काहीजणींनी यथासांग, पध्दशीरपणे पुजा केली. थोरल्या बायकांच्या नजरांनी संस्कारांचा हा फरक चाणाक्षपणे टिपत पुजा सपन्न केली. नंतरचा कार्यक्रम होता मंगळागौरीचे पारंपारीक खेळ खेळणे. वशेळ्या त्यासाठी सुट्सुटीत पॅन्टसारख्या वेशात सज्ज झाल्या ! मराठी मंडळाच्या बायका मात्र पारंपारिक नऊवारी साडीत होत्या. मोठ्या स्क्रीनवर इंटरनेटद्वारे Youtube कनेक्ट करण्यात आले. त्यावर आधी खेळांचा व्हिडियो सर्वांना दाखवण्यात आला आणि मग मंडळाच्या बायकांनी मुलींकडून खेळ खेळून घेतले. पिंगा, गाठोडं, हतूश पान, फुगड्या, खुर्ची-मिरची असे अनेक खेळ बहुतेकजणी पहिल्यांदाच खेळत होत्या. आजी सर्वांना सुडौल बांध्यासाठी खेळाचे महत्त्व पटवून देत असल्यामुळे सर्वांना अधिकच उत्साह आला होता. चर्चमध्ये आलेल्या काही अमेरिकन तरुणींनी ह्या खेळांची चौकशी केली आणि चक्क त्या सामिलही झाल्या. सरते शेवटी नाव घेण्याचा कार्यक्रम होता. आजच्या अरे-तुरेच्या जमान्यात काहींना हे फारच बुरसटलेले वाटले परंतु आजींनी त्यातली गंमत सांगितल्यावर मात्र लाजत सगळ्यांनीच नावं घेतली. पुजेची सांगता छानपैकी गोडाच्या जेवणाने झाली. एकूण काय तर परक्या देशात, घरातले मोठे नसतांनाही आजच्या ह्या मुलींना मंगळागौर एकदातरी साजरी करावीशी वाटली हे महत्त्वाचे आणि कौतूकाचे.

श्रावणात शुक्रवारी सवाष्णीला आपल्या घरी जेवायला बोलावणे ही अनेक घरांमधून चालत आलेली परंपरा. दुस-याला जेवायला घालण्याचे समाधान हा ह्या मागचा हेतू खरोखरच वाखाण्याजोगा. काळानुरुप त्यात बदल होत अनेकांनी आपल्या आजूबाजूच्या कामवाल्यांनाही गोडाचे जेवायला घालायला सुरुवात केली हे चांगलेच आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आणि त्यातही बहुतेक जणी नोकरी करत असलेल्या जमान्यात शुक्रवारची सवाष्ण शनिवारी-रविवारी ‘शिफ्ट’ होते आहे. पारंपारिक स्वयंपाकाला फाटा देऊन सोयीच्या स्वयंपाकाला पसंती दिली जाते. काहीजणी तर लंचटाईममध्ये मैत्रिणीला थेट हॉटेलमध्येच बोलावून जेवायला (?) घालतात. असे करणे सोयीचे आहे हे जरी मान्य केले तरी रांगोळी घालून पारंपारिक पुरणपोळीच्या जेवणाचा आस्वाद घेण्यात काही औरच मजा आहे. मग अश्या काही खास दिवशी तो देण्यास आणि घेण्यास काय हरकत आहे ?

श्रावणात उपासतापास आणि पुजाअर्चा भक्ती भावनेने केल्या जातात. त्यामागे पर्यावरणाचे रक्षण आणि कृतज्ञता हाच मुख्य हेतू असतो. तरीही नागपंचमीला नाग-सापांची हत्या केली जाते. बेसुमार वृक्षतोड केली जाते. श्रावणाचे व्रत म्हणून हे सारे थांबवायला काय हरकत आहे ? नागपंचमीला किंवा पोळ्याला चित्रांची पुजा करण्याबरोबरच प्रत्यक्ष प्राण्यांवर भुतदया दाखवून, त्यांच्यासाठी हिरवीगार जंगले राखणे अधिक योग्य नाही का ? मोठयांचे अनुकरण करत लहान मुलांनांही ह्या सणांची पर्यावरणाशी योग्य सांगड घालता येईल. श्रावणातल्या कहाण्या गोष्टीवेल्हाळ आजी-आईकडून ऐकण्यात गंमत आहेत. आजच्या काळाशी फारश्या अनुरुप नसल्या तरी त्या गोष्टीमधले प्रेम, त्याग, कष्ट आणि सबुरी (पेशन्स) हे गुण मुलांपर्यंत आजही पोहोचायला हवेत.

आपल्याला सगळे सोडवतही नाही आणि पूर्णपणे करवत/पाळताही येत नाही. ह्याचे उदाहरण म्हणजे वेळोवेळी मराठीवर्ल्ड डॉट कॉम वेबसाईटवर प्रत्येक सणवाराचे महत्त्व त्यामागचे शास्त्रीय कारण आम्ही अपडेट करत असतो. तरुण वाचकवर्ग, अगदी NRI महिलाही आनंदाने वाचून आपली संस्कृती टिकवण्यासाठी आणि त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले सण आणि रितीरिवाज आनंदाने साजरे करत असतात. त्यामुळे हे खरोखरीच आशादायी चित्र आहे. एकूणच काय प्रत्येकजण आपल्या पध्दतीने श्रावण साजरा करतच असतो म्हणूनच आषाढ अमावस्येला घरातले लक्ष दिवे उजळून श्रावणाचे स्वागत करायचे असे तर आपल्या पूर्वजांच्या मनात नसेल ?

– भाग्यश्री केंगे