माझी शिवणबाजी

नवरात्राचे दिवस आहेत. पोरे-बाळे शाळेत गेली आहेत. घरचे सगळे काम उरकले आहे. नवरा कामाच्या गडबडीत म्हणून उशिरा घरी येणार आहे. जेवणानंतरची एक डुलकीही काढून झालेली आहे. एकूण काय मोकळा वेळ आहे आणि डोक्याला कोणतीही विवंचना नाही. अशा सुंदर वेळी घरात बसले की मनातली निर्मितीची ऊर्मी आतून धक्के मारू लागते. आणि पहाता पहाता डोळे कपाटातल्या नव्या कापडांकडे किंवा माळयावर ठेवलेल्या गाठोडयाकडे लागतात. या कापडांच्या सान्निद्यात मन हरवून जाते. शिवणाचे मशिन पुढे ओढून कधी एकदा शिवायला बसते अशी घाई होते.

ही मीच नाही तर अनेक बायकांनी अनुभवलेली सुंदरशी निर्मितीची ओढ. आपण हजारो गोष्टी लिहितो-वाचतो-अनुभवतो. पण शिवणकामाबाबत कुणी फारसं लिहिलेलं आढळत नाही. आणि ही शिवणकला किती आनंद देते हे लिहिल्याशिवाय कसे कळणार?

आमच्या घरी माझ्या भावाच्या मुंजीत प्रेझेंट म्हणून आलेले र. 360.00 ते केव्हां? 1956 साली. वडिलांचा आईला प्रश्न – ‘तुला सोने घ्यायचे आहे का इतर काही?’ आईही हुशार. सोने घेण्याऐवजी ‘शिवणाचे मशिन’ घेऊ या म्हणाली. तेव्हां वडिलांच्या एका विध्यार्थ्याच्या दुकानातून त्याच्या सल्ल्यानुसार ‘ज्युकी’ नावाचे जपानी बनावटीचे शिवण यंत्र आणले. आता 2012 साली ते 56 वर्षांचे होईल. आजतागायत त्याने इतकी बिनबोभाट सेवा केली आहे की त्याचा हा वाढदिवस खरोखरच धूमधडाक्याने साजरा करायला हवा.

आईचा शिवणाचा डिप्लोमा झालेला होता. शिवणमशिन घरी आल्यावर मग शेजारी-पाजारी लोक येऊ लागले. कुठे कुणाच्या उसवलेल्या परकराला टीप घाल, तर कुठे कुणाच्या नव्या साडीच्या पदराला टीप घाल. होताहोता आईने ब्लाउज, परकर, स्कर्ट वगैरे शिवून द्यायला सुरुवात केली. वडिलांच्या तुटपुंज्या मिळकतीला आईने नकळत हातभार लावला. त्यातून घडलेला संस्कार किती मोलाचा आहे हे कळायला मात्र कैक वर्षे जावी लागली. शाळेत शिवणाचा तास असे. पण शिवणाच्या बाईंनी सांगितलेले ‘आढे, मुंढा, पुढचे सुटे बंद पदर, काठाकडून उंची’ असले शब्द डोक्यात शिरतच नसत. मग उगीच दंगा कर, शेजारणीच्या खोडया काढ, कुणाला हास असले उद्योग मी करी. त्यामुळे ही पीडा वर्गात नको म्हणून तास सुरू झाला की नित्यकर्माचा परिपाठ म्हणून माझ्याबरोबर एक-दोघींना बाई वर्गाबाहेरच काढत. (तिथे खरे तर खूप मजा येई. पण इतर शिक्षकांनी पाहिले तर अपमानास्पद वाटे.) अशी ही माझ्या शिवणाची रडकथा.

पण मॅट्रिक पास झाले आणि एके दिवशी कशी कुणास ठाऊक, एकदम शिवणाची उपरती झाली. म्हणजे त्याचे असे झाले की दिवाळीच्या वेळी धाकटया बहिणीसाठी वडिलांनी स्कर्ट-ब्लाउजचे कापड आणले होते. पण फराळाचे करणे,बाहेरच्या शिवणाच्या ऑर्डरी या गडबडीत आईला तिचे कपडे शिवायला वेळच झाला नव्हता. ती बसली रुसून. मला तिचे दु:ख भारी लागले. म्हंटल आपण करूयात की प्रयत्न. झाले. वडिलांनीही ही कल्पना उचलून धरली. वडिलांच्या देखरेखीखाली मी तिचा स्कर्ट शिवला आणि तो असा काही झकास झाला की काही विचारू नका. ती खूष. मीही खूष. हळु हळु तिचा कल माझ्याकडेच झुकू लागला. म्हणजे तिला नवीन काही शिवायचे असले की ती आईला सांगू लागली ‘तू नको, ताईच शिवेल.’ तेव्हांपासून आईच्या शिवणाकडे मी नीट लक्षपूर्वक पाहू लागले. कापडाचा पोत, ते आटणार का नाही, त्याला खळ आहे का नाही, रंग उतरतो का नाही…. एक ना दोन हजार गोष्टी आपोआप उलगडू लागल्या. रंगसंगतीची मजा कळू लागली. कपडा नीट बसणे म्हणजे काय या गोष्टीकडे लक्ष जाऊ लागले. लक्ष्मी रोडवरून हिंडताना नव्यानव्या फॅशनचे कपडे पहाण्याकडे आपोआप मान वळू लागली. मापे कशी घ्यायची, कापड ‘उंची’त फाडायचे की ‘आडवे’ ते कळायला लागले. (म्हणजे कापडाच्या काठाकडून उंची घ्यायची , तरच कपडा नीट बसतो.’आडव्या’ कापलेल्या बाहीचे फिटिंग बरोबर बसत नाही.) हेम कुठे घालायची, ती बाहेरून कशी सुबक दिसली पाहिजे, गळपट्टीसाथी कापडाच्या तिरक्या पट्टया काढल्या की त्या पट्टया कोणत्याही वक्राकाराला कशा सुरेख जुळवून घेता येतात (कारण त्या चक्क ताणल्या जातात) हे नीट उमगले.

निगुतीने शिवण करताना प्रत्येक टाका कसा एकसारखा येईल, कपडा कसा सुरेख दिसेल हे पाहण्यात वेळ कसा छान जाई. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आईच्या शिवणकामातल्या चुका ढळढळीतपणे दिसायला लागल्या. घरचा सगळा व्याप सांभाळून ती शिवणकाम करी. आमच्यासारखा एकच कपडा आठआठ दिवस शिवायला तिला कुठे फुरसत होती. पण तिच्या ‘दडपादडपीचे’ हसू येई. तिची काजपट्टी आणि बटणपट्टी यांचे कधीही जमले नाही. एक दुसरीपेक्षा हमखास लहान किंवा मोठी! /फ्रॉकच्या घेराला चूण घालताना आम्ही म्हणजे मोठी टीप घालून हाताने धागा ओढून अगदी नाजुकसा चूण घालणार. तोही वरच्या बफ्रॉडीला सगळीकडून एकसारखा पसरून लावणार. आई मात्र दणादण मोठयामोठया चुण्या घालून ते काम संपविणार. गिऱ्हाइकांची तक्रार नव्हती. मग ती कशाला हे नकसकाम करीत बसेल?

शिवणावर हात बसल्यावर ‘सफाईदार शिवणाविषयी अभिमान वाटू लागला. मैत्रिणींची, त्यांच्या आयांची शाबासकी अगदी हवीहवीशी वाटू लागली. मग आपला नवा कपडा ‘मिरवणे’ आणि नव्या शिवणकामाच्या संधीची वाट पहाणे सुरू झाले. बहीण मोठी झाली. ‘टेलर’कडचाच कपडा घालू लागली. मग लक्ष गेले ते बाळंतविडयाकडे. बाळंतविडयाने शिवणकामातील सर्जनतेचा खराखरा आनंद मिळवून दिला. एकतर त्यासाठी कापडाचे तुकडेही चालत. मग घरातले उरले-सुरले कापड, मॅचिंग नसलेले ब्लाउजपीस, कापडाच्या ताग्यातून उरलेले लहानसहान तुकडे – जे ‘सेल’च्या सत्रात खूप स्वस्तात मिळतात – अशा मालातून नवनिर्मिती होऊ लागली. दुपटी शिवताना जुन्या साडयांचे अस्तर, जरीच्या तुकडयांनी टोपडयाच्या सजवलेल्या कडा, धारवाडी खणाची शिवलेली कुंची, विशिष्ट रंगसंगत मनात ठरवून आणलेले रंगीबेरंगी तुकडे जोडून केलेले दुपटे. मजा यायची शिवायला. शिवाय कपडा कसा बसतोय याची चिंता नाही. लहान बाळाला कसलं आलय् फिटिंग! शिवाय मैत्रिणींच्या पहिल्यावहिल्या बाळासाठी आपल्या हातचा बाळंतविडा म्हणून एक जास्तीचं कवतिक!

मग मलाच मुलगी झाली. सातव्या महिन्यापासून हे ढीगभर कपडे शिवले. अगदी मुलीच्या जन्माच्या आदल्या दिवशी सुध्दा. मग दवाखान्यातल्या सिस्टर्स म्हणाल्या ‘अशी शेवटपर्यंत काम करीत होतीस ना म्हणून तर चटकन् सुटलीस.’ चट्कन? चांगले 12 तास तळमळत काढले होते. पण त्यानंतर प्रत्येक सणासुदीची वाट पहात असायची मी. साध्या नाडीच्या झबल्याऐवजी सॅटिनचे झबले, त्याला टिकल्या, थंडीसाठी बंडी, उन्हाळयासाठी पांढरी सुती उडत्या बाह्यांची झबली, कधी क्रफ्रॉसस्टिचने काढलेला तुरेदार कोंबडा. त्यावेळीपर्यंत विविध तऱ्हेच्या लेसेस आणि रेशिम टाक्याने कडा शिवलेले सुरेख पॅचेस मिळू लागले होते. मग काय? कार्टून, कधी लाल भोपळयाचे गोड चेहऱ्याचे बाळ /फ्रॉकच्या खिशावर उठून दिसू लागले. वेगवेगळया लेसेस लावून घरी झोपताना घालायच्या ड्रेसपासून ते पार्टी /फ्रॉक, मॅक्सी असे विविधप्रकार हातून शिवले गेले.

सण जवळ आला की बाजारात एक चक्कर टाकून यायची. नवी फॅशन दिसली की तसले कापड खरेदी करायचे. घरी आले की कधी एकदा सुट्टीचा दिवस येतोय याची वाट पहायची. मग सुट्टीच्या दिवशी दुपारचा वेळ मोकळा मिळावा म्हणून सकाळच्या कामाला भलताच वेग यायचा. या मोक्याच्या वेळी कुणीही अनपेक्षितपणे घरी टपकू नये म्हणून मनातल्या मनात प्रार्थना चालायची. आदल्या दिवशी रात्रीच /फ्रॉक बेतून ठेवलेला असायचा. कन्या मधूनच येऊन विचारी ‘आई झाला कां ग /फ्रॉक?’ बाळीला दिसत असायचे की आईला अजून सवडच झालेली नाही शिवायला, तरी आपला हा प्रश्न मधूनच टाकायची. शेवटी एकदाची ती आतुरतेने वाट पहात असलेली दुपार यायची. मग /फ्रॉकची बफ्रॉडी शिवून झाली तर लगेच कन्येला ती घालून बरोबर बसतेय ना याची खात्री करून पुढच्या कामाला लागायचे. संपूर्ण /फ्रॉक तयार होईपर्यंतच्या या ट्रायल्स् निदान सात-आठ वेळा तरी व्हायच्या. मन अगदी सुखावून जायचे. सणाच्या दिवशी एकदा का हा /फ्रॉक तिने घातला की ती कशी ऐटदार दिसेल या स्वप्नामधे मन दिवसासुध्दा रममाण व्हायचे. आणि त्या दिवशीचा तो नखरा झाला की शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून त्या /फ्रॉकबद्दलचे कौतुक ऐकताना धन्यधन्य वाटायचे. मग कुणी शेजारणी-पाजारणी आपापल्या मुलाबाळांसाठीची कापडे घेऊन येत आणी कपडे बेतून नेत असत. त्यावेळी ‘गुरू’पणा मनाला चांगलाच सुखावे.

दिसामाजी मोठी होणारी मुलगी /फ्रॉकमधून स्कर्ट-ब्लाउजमधे व त्यातून पंजाबी ड्रेसमधे आली आणि कफ्रॉलेजातही जाऊ लागली. मग आईच्या हातचे शिवण तिला रुचेनासे झाले. तेव्हां जरा शिवणाला खंड पडला. पण शिवणाची ऊर्मी तर मधेच डोके वर काढी. मग ‘जुन्याचे नवे’ करण्याचा नाद लागला. काटकसरीचे वळण अंगी बाणलेले होतेच. त्यामुळे कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत वापरून मगच टाकायची हा बाणा.

लेकीला पहिल्यांदा पोहायच्या क्लासला घातले. ती चवळीची शेंग. माशासारखी सुळसुळ पोहायची. उन्हाळयाच्या सुट्टीच्या शेवटी झालेल्या स्पर्धेत ती पहिली आली. प्रेझेंट मिळाला सुरेखसा टफ्रॉवेल. स्वत:च्या कमाईचा टफ्रॉवेल बाईसाहेबांनी वर्षभर वापरला. नवा टर्कीश टफ्रॉवेल घरी आल्यावर तिचा जुना टफ्रॉवेल माझ्याकडे आला. वापरून वापरून मऊ झालेले कपडे मला भारी आवडतात. मी तो वर्षभर वापरला. मग अमेरिकेला जायची वेळ आली. बॅग भरतेवेळी मी तो टफ्रॉवेल बॅगेत टाकेन या धास्तीने लेकीने धावतपळत जाऊन तो टफ्रॉवेल हाती घेतला. मला काही कळायच्या आत कात्रीने त्याचे चार तुकडे केले. खरे तर तो मधे विरला होता. पण तरीही आला असता वापरता…… म्हंटल जाऊ देत. नवीन टफ्रॉवेल बॅगेत बसला. पण मधल्या रिकाम्या वेळात त्या चार तुकडयांच्या कडांना टिपा घालून त्याचे प्रत्येक खोलीत एकएक धूळपुसणे करायला मी विसरले नाही.

आधी कपडा म्हणून वापरायचा. मग त्याचे टेबलपुसणे, मग फरशीपुसणे………. अमेरिकेत स्थायिक झालेल्या भावाने एकदा चेष्टेने म्हंटले ‘त्या फरशीपुसण्याच्या चिंध्या करून त्या चूल किंवा बंब पेटवायला वापरा !’ वापरतच होते तसे. पण म्हंटल त्याला कशाला सांगा. त्याच्या ‘क्रिएटिव्हिटीचा’ आनंद कशाला हिरावून घ्या? या भावाकडे अमेरिकेला गेले होते. भाची होती दहा महिन्यांची. वहिनी जायची ऑफिसला. भाचीला झोप आली की हाताशी तिचे एक दुपटे लागायचे. ते होते मऊ साडीचे. पेंगुळल्याक्षणी ते मऊ दुपटे बहुदा आईच्या सहवासाची उणीव भरून काढत असावे. कुठेही जायचे तरी दुधाच्या बाटलीबरोबर हे दुपटेही लागायचेच. पुढे भाचीला बोलता येऊ लागल्यावर ती त्या दुपटयाला ‘फडका’ म्हणू लागली. एकदा वहिनीने विचारले ‘मी जातेय् मफ्रॉलला. कुणाला काही आणायचे आहे कां?’ भाची म्हणाली ‘मम्मी, ब्रिंग मी वन ‘फडका’ !’ आम्ही सगळे मनापासून हसलो. अमेरिका कितीही श्रीमंत असली तरी आईच्या साडीचे मऊ ‘फडके’ ती नक्कीच पुरवू शकत नव्हती !

चांगली सुती साडी. मऊ मऊ ऊबदार. तिच्या चारी कडा बंद करून त्यावरून एक काश्मिरी शाल वरून शिवून टाकली. थंडीच्या दिवसात हे पांघरूण घेण्यासाठी घरात भांडाभांडी होऊ लागली. जुन्या उशीच्या आटएयांमधे जुन्या साडीचे चार पदर घालून वरून शिवले की त्याची सुरेख पायपुसणी व्हायची. बाथरूमच्या दारासमोर, बागेतून घरात येणाऱ्या दारासमोर त्यांचे स्थान. सगळे पाणी टिपून घेतल्याने घर कसे स्वच्छ राहू लागले. लेकीच्या पंजाबी ड्रेसमधले भरतकामाचे ‘योक’ वापरून फॅशनेबल पिषव्या तयार होऊ लागल्या. हिरव्या रंगाच्या कापडावर गुलाबी रंगाच्या टाक्याने आरसे लावलेला सुंदर योक वापरून मायक्रोवेव्हला वेष्ट्न तयार झाले. पांढऱ्याशुटएा कापडावर राणी कलरचे बुंदके असलेल्या कापडाचे ओव्हनसाठी कव्हर झाले. जुन्या पडद्याच्या कापडातून टीव्हीचे कव्हर झाले. जुन्या बेडशीटने चुणीदार गवसणी होऊन माझ्या तंबोऱ्याला गळामिठी घातली. ऑस्ट्रेलियन पक्षांची चित्रे असलेल्या जुन्या टेबलक्लफ्रॉथने हार्मोनियमला बंद असतानाही बोलतं केलं.

एकदा मैत्रिणी रात्रीच्या मुक्कामालाच घरी आल्या. गप्पाटप्पा झाल्यावर अंथरुणे घालायची वेळ आली. गादीखाली घालण्यासाठी चटया काढल्या. चटयांची कव्हरे एका मैत्रिणीला फारच आवडली. ‘कुठे मिळतात ग ही?’ तिने चवकशी केली. ‘अग, विकत कुठली मिळायला. मी ही घरी बनविली.’ मी खुलासा केला. ‘दोन गाद्या फार पातळ झाल्या होत्या ना. म्हणून त्यात भरीला कापूस घालून एक जाड गादी केली. त्यातल्या एका गादीचे कापड तसेच पडले होते – जवळजवळ कोरे. मग त्याच्याच चड्डया शिवल्या या चटयांसाठी!’ तिचे डोळे लकाकले. त्या लकाकीत मला माझ्या श्रमांचे सारे श्रेय एकवटून मिळाले.

आमच्या एका जवळच्या नातेवाइकाला मी दिल्लीहून सुरेख स्वेटर आणला होता – चांगला महाग स्वेटर. चार दिवस अंगाला लावल्यावर त्या शहाण्याने कोपरापासूनच्या बाह्या सरळ कात्रीने कापूनच टाकल्या. कां तर बागेत काम करताना बाह्या खराब होतात म्हणून. असे धडाचे विधूस केलेले पाहून मस्तकच फिरले. त्या कापलेल्या बाह्या तशाच जपून ठेवल्या होत्या. पुढे मामेभावाला मुलगा झाला. थंडीचे दिवस होते. या ऊबदार बाह्यांची त्या लहानग्या बाळाला छान फुलप ट झाली. ती इतकी काही सुंदर झाली की अशाच प टींची मागणी एकदम वाढली. म्हंटल बायांनो या प टीची कथा ऐकलीत तर कळेल तुम्हांला याची किंमत……..

एकजण म्हणाली ‘तुम्हाला कसे सुचले की याची प ट शिवावी म्हणून?’ प्रश्न अवघड खराच. पण बराच विचार केल्यावर रात्री लक्षात आले की आता इतके दिवस ही कला मनापासून जोपासत आलोय ना? त्यामुळे आपल्याला एक सिध्दी प्राप्त झाली आहे. शिल्पकाराला खडक पाहिल्यावर म्हणे खडक न दिसता त्यातून नको तो भाग छिन्नीने उडवून टाकल्यानंतर दिसणारी सुबक मूर्तीच दिसते. तसेच माझे होऊ लागले. उरल्यासुरल्या कापडातून, जुन्यापान्या कपडयातून, वेगवेगळे आकार दिसू लागत. पहाता पहाता ते आकार कपडयाचा एखादा भाग बनून मनात ठसत.

माझ्यासाठी एकदा छान टफ्रॉप आणला. तो होता बिनबाहीचा. पण बाह्या वेगळया सुटया दिल्या होत्या. हव्यातर त्या टफ्रॉपला शिवता येत होत्या. उकाडयामुळे त्या बाह्या मी वापरल्याच नाहीत. त्या कोऱ्याच्या कोऱ्या तशाच पडून होत्या. काठाला सुरेख भरतकाम केलेले. मधे छान आरसे लावलेले. त्या बाह्यांकडे पहाताना एकदम लक्षात आले की याचा बेबी/फ्रॉक सुरेख होईल. मग जुळत्या रंगाचा घेर आणि बाह्या लावून /फ्रॉक तयार झाला. ‘अय्या अशा फॅशनचा /फ्रॉक कुठे मिळाला?’ बारशाला एकीने विचारले. तशी माझी भाचेसून हसली. ‘अहो मावशींनी स्वत: शिवलाय तो.’ मग काय? सासूबाईंचा भाव भलताच वधारला!

ग.दि. माडगूळकरांनी एका गीतात म्हंटलं आहे ‘कपडयांसाठी करिशी नाटक तीन प्रवेशांचे’. कपडे शिवण्यातले तीन प्रवेश मी अनुभवले – प्रथम नवशिक्याचे, नंतर नव्यातून नव्याच्या निर्मितीचे आणि नंतर जुन्यातून नव्याच्या निर्मितीचे. यातला आनंद नक्की कुठे असतो? तो अनेक पदरी असतो. एक तर स्वनिर्मितीचा आनंद. कापडांच्या ढिगाऱ्यात बसले की तुकडे खुणावू लागतात ‘मला घे, मला घे. माझी पिषवी छान होईल. माझा कुर्ता छान होईल.’ असे म्हणतात. पट्टीच्या गायकाला जसे स्वर खुणावतात अगदी तशीच ही अनुभूती असते. मनात एखादी कल्पना आकार घेते. ती प्रत्यक्षात उतरविताना बारीक खाचा खोचा कळत जातात. स्वप्न जसजसे साकारू लागते तसतशी त्याच्या पूर्ततेची ओढ मनाला स्वस्थ बसू देत नाही. आसपासच्या वास्तवाचे भान त्या काळापुरते तुटते. विविध रंगसंगती डोळयासमोर शोभादर्शकासारख्या वेगवेगळे आकार घेऊन मनाला मोहवून टाकतात. तयार वस्तू ज्याला जाणार त्याला अनपेक्षित असेल तर त्याच्या चेहऱ्यावर कसा आनंद व आश्चर्य झळकेल या कल्पनेने मनाला सुखाच्या गुदगुल्या होत रहातात. ती कलाकृती देण्याच्या दिवसाकडे डोळे लावून वाट पाहिली जाते. आणि प्रत्यक्षात दिल्यावर होणारे कौतुक मूठभर मांस चढविते.

या मानसिक आनंदाच्या सोहळयालाच व्यावहारिक आनंदाचीही किनार असते. बाजारात 300 रुपयांना मिळणारा कपडा घरी कापड आणून शिवला तर 100 रुपयात होतो. शिवाय उरलेले तुकडे काहीबाही करायला उरतात ते वेगळेच. वस्तूचा शेवटपर्यंत उपभोग घेतल्याचे मध्यमवर्गीय समाधान मिळते. ही काटकसर इतर थोडीशी चैन करायला वाव देते.

यापलीकडे असते ‘आपुलकीची’ माया. बाजारातून विकत आणून दिलेले भेटकार्ड आणी स्वत: खपून केलेले (जरा वेडेवाकडे झाले असले तरीही) भेटकार्ड यातील फरक सुजाण मनाला नक्कीच कळतो. तसेच आपल्या हाताने शिवलेले कपडे त्या व्यक्तीच्या शरीराला प्रेमाचा वेगळा स्पर्ष करतात. आपल्याला प्रत्यक्ष भेटता आले नाही तर दूरदेशी गेलेल्या आपल्या लेकरांवर मायेचे पांघरूण घालता येते. प्रत्येकवेळी तो कपडा हाताळताना त्या व्यक्तीने काढलेल्या आठवणींच्या लहरी अंतर्मनापर्यंत सहज पोचतात. आनंदाचे तरंग मनात अलगद उमटवितात.
हे असेच चालू रहाणार. या शरीराचे वस्त्र गळून मातीत मिळेपर्यंत ही नवनिर्मितीची ओढ अशीच चालू रहाणार.

– कल्याणी गाडगीळ, न्यूझीलंड