वाचनसंस्कृतीच्या समृध्दीसाठी

पुस्तकं माणसाला नक्की देतात तरी काय? या प्रश्नाचं एकच उत्तर ठोसपणे देता येईल असं नाही. व्यक्तिपरत्वे या उत्तरात भिन्नता असू शकते, पण पुस्तकं जे काही देतात ते मात्र चांगलंच असतं. यात कुणाचं दुमत होण्याच कारण नाही. या चांगल्याचाच एक सर्वस्पर्शी भाग म्हणजे पुस्तकं ‘आनंद’ देतात हा होऊ शकतो. असा सात्विक आनंद वाचकाला मिळावा, यासाठी आज ठिकठिकाणी ग्रंथालये उभी आहेत, पण ती वाचनालये दिवसागणिक प्रसिध्द होणार्‍या पुस्तकांनी समृध्द होताहेत का आणि वाचकांचा आनंद द्विगुणित होतो आहे का, हा खरा प्रश्न आहे. ‘वाचनसंस्कृती’ समृध्द व्हायला हवी अशी व्यासपीठावरची पॉप्युलर विधानं ग्रंथालय समृध्द करू शकत नाहीत. त्यासाठी आंतरिक उमाळयाने काम करणारा कुणीतरी असावा लागतो आणि त्यानं वाचकांचा आनंद द्विगुणित करण्याचा ध्यासही घ्यावा लागतो. नाशिकमध्ये अशा ध्यासानं पछाडलेला एक कृतिवीर आहे, त्याचं नाव विनायक रानडे. खरं तर ध्यासमग्न पुस्तकवेडा असंच त्याला म्हणावं लागेल.

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वाचनालयाला आजवर जवळपास एकवीस लाखांची मदत रानडे यांनी मिळवून दिली. त्यात अमेरिकास्थित रानडे यांचे मित्र अनिल देशपांडे याचं मोलाचं योगदान आहे. विनायकच्या या कामाचं राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही पत्र पाठवून खास कौतुक केलं आहे. ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ या ओळीचा वापर करून पुन्हा वाचाळताच करणारी मंडळी समाजात कमी नाहीत. त्यांना ती ओळ कळलीच नाही असा त्याचा अर्थ होतो, पण रानडे मात्र ती ओळ आज अक्षरश: जगताहेत.

याची सुरुवात झाली ती ‘कालनिर्णय’च्या दिनदिर्शिकेवर परिचितांचे वाढदिवस नोंदवून ठेवण्यापासून! भेटेल त्याला त्याचा जन्मदिनांक विचारून तो नोंदवून ठेवणं हा रानडे यांचा माणसांना भेटल्यानंतरचा निराळाच शिरस्ता. त्यातून त्या त्या दिवशी त्या व्यक्तीला भेटणं, शुभेच्छा देणं! आणि वाचनालयासाठी वाढदिवसाची भेट म्हणून त्याच्या इच्छेप्रमाणे पुस्तकं मागणे..याबद्दल कुठलीही सक्ती नाही…नाही म्हटलं तरी रानडे यांच्या शुभेच्छांमधला ओलावा मात्र कमी झालेला नाही.

कुसुमाग्रजांच्या नावानं स्मारक उभे राहिल्यावर शासन, नगरपालिका, मोठमोठे देणगीदार यांच्याशी चर्चा करण्यात मंडळी गुंतलेली असताना रानडे यांनी खारीच्या वाटयानं काम करायला सुरूवात केली. पहिल्यांदा माठ, ग्लास यांचा सेट एकाच्या वाढदिवसाला घेतला आणि स्मारकात आल्यानंतर भासणारी पाण्याची अडचण दूर केली. स्मारकातल्या लॉनची कटिंग करण्यासाठी एका व्यक्तीच्या वाढदिवसाला सहा – सहा कुदळ फावडे मिळविले. स्मारक जसे पूर्णत्वाकडे जाऊ लागले, तसा स्वच्छतेचा प्रश्न उभा राहिला. रानडे यांनी पुन्हा एकाच्या वाढदिवसाला स्वच्छता करण्यासाठी लागणारी सर्व सामग्री मिळविली. यात रानडे हे फक्त एक चांगले काम करण्यासाठी आणि ते करून घेण्‍यासाठी निमित्त ठरले. अमूक एक वस्तू दिल्‍यानंतर वाढदिवसाच्या आनंदाला अत्यानंदाची सत्कर्म झाल्याची जी किनार लाभते तिथे असतात विनायक रानडे आणि त्यांच्या चेहर्‍यावर आनंद असतो सात्विक कर्माचा!

स्मारक पूर्ण झाल्यावर तिथे ग्रंथालय उभे राहिले. शासनाच्या तुटपुंज्या अनुदानावर पुस्तकांच्या आजच्या किंमती पाहता समृध्द होईल की नाही अशी शंका वाटल्यावर रानडे यांनी पुस्तक भेट मिळवायला सुरूवात केली. त्यातून आज वाचनालय समृध्द रूप धारण करून उभे आहे. या सगळयांचा रानडे यांच्या चेहर्‍यावर कुठेही अहंकार नाही, दर्प नाही, आहे ते वाचनालय चांगले चालल्याचे समाधान! पुढे रानडे यांच्या लक्षात आले की सर्वच लोक वाचनालयात येऊन पुस्तक घेऊ शकतात असं नाही त्याकरिता वाचनालयानेच वाचकांच्या घरी जायला हवे. यातून साकार झाली ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही योजना! त्यातही ज्यांना आपल्या पुर्वजांच्या कर्तृत्वाचं स्मरण म्हणून काही करण्याची इच्छा आहे त्यांची भेट घेऊन त्यांच्या नावानं शंभर नव्याकोर्‍या पुस्तकांची पेटी तयार करण्यात आली. त्यात एका पेटीत जवळपास अठरा हजारांची पुस्तकं बसतात. ती पेटी नाशिकच्या नगर-उपनगरातल्या एकेका भागात पोहोचवली जाते. एका पेटीतील पुस्तक त्या उपनगरातील वाचकांनी लाभ घेतला की दुसरी पेटी. अशा जवळपास बावीस पेटया तयार करण्यात रानडे यांचे परिश्रम मोलाचे आहेत. याच साखळी वाचनालयातील एक वाचक आजींचा रानडे यांना एकदा फोन आला आणि त्यांनी स्वत:हून काही देणगी या साखळी वाचनालयाला देण्याचर इच्छा व्यक्त केली तेव्हा ते म्हणाले, “कुणीतरी दिलेल्या देणगीचा, कुठलीही तसदी न घेता फुकट लाभ घ्यावा हे माझ्या मनाला पटत नाही. मलाही तुमच्या या सत्कर्मात भाग घेऊ द्या”. त्यांनी दिलेल्या देणगीची पुन्हा पूस्तकेच घेतली गेली. सर्वपित्री अमावास्येला एका गृहिणीचा रानडे यांना फोन आला, आणि पितरांच्या नावानं सत्पात्री दानाकरिता म्हणून तिने यथाशक्ती पुस्तकं खरेदीसाठी देणगी दिली.

हे अनुभव रानडे यांच्यासाठी आता नित्याचेच झाले आहे. यातील एकही पैसा स्वतः न घेता, देणगी देणारा आणि स्मारक असा थेट व्यवहार ते घडवून आणतात. माणसांना असं चांगलं काम करायला लावून रानडे यांना मिळतो तो फक्त आनंद! आज त्यांच्याकडे जवळ जवळ चाळीस हजारांहून अधिक व्यक्तींच्या वाढदिवसाची नोंद आहे आणि त्या त्या व्यक्तीला शुभेच्छा देण्याकरिता ‘आज वाढदिवस आहे अमुक अमुक’ अशा आशयाचा एसएमएस ते सर्वांना पाठवतात. त्या सर्वांचे त्या वाढदिवसमूर्तीला अभिनंदनाचे फोन जातात. यात संत तुकाराम महाराजांच्या “आनंदाचे डोही। आनंद तरंग।।” या अभंगाचे सूत्र आहे आणि रानडे यांच्या जगण्यापेक्षा ते निराळे नाही हे मात्र नक्की!

यात महत्वाचा धागा आहे तो रानडे यांनी मिळविलेल्या विश्वासाचा! “गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी….” ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी नाही, पण आस्थेवाईकपणे केलेल्या कामामुळे ‘माणसं’ गोळा होतात आणि हाती घेतलेल्या कामाला एक सुंदर रूप प्राप्त होतं. याचा रानडे यांनी वस्तुपाठ घालून दिला आहे.