एकटेपणाची समस्या आणि त्यावर मात

“मुशाफिरा जा,
आल्या पावली,
कुणी नसे आपुला ,
एकटाची आलास,
जायचे एकटे रे तुला,
कुणी नसे आपुला”

असं एका जुन्या मराठी चित्रपटातील गाणं आहे. एका अर्थाने बघायला गेले तर माणूस जन्माला येतांना एकटा असतो. मृत्यूच्या समयीही एकटाच जातो. जर जन्म, मृत्यू या घटना मानवी जीवनातील अबाधित सत्य असेल तर त्या सत्याच्या साक्षीदार म्हणून एकटेपणा ही माणसाची स्वाभाविक अवस्था असली पाहिजे. ही समस्या म्हणावी की दुकटेपणा जी मिथ्या अवस्था आहे ही समस्या म्हणावी? यातील गंमतीदार गोंधळ सोडला तर माणूस (या जगात आल्यानंतर) हा ‘सोशल ऍनिमल’ आहे असं म्हणतात. मग समाजप्रिय म्हणा किंवा समाजावलंबी म्हणा, पण माणूस समुहाने रहातानाच जास्त दिसतो. उलट कुणी एकटं रहात असेल तर आपल्याला खटकत नि कमीपणाचं लक्षण वाटतं.

एकटेपणा हे शल्य मानावं की नाही हा अलग मुद्दा आहे. पण माझ्यामते समस्या एकटेपणात अंगभूत असण्यापेक्षा तो जेव्हा खायला येण्याइतपत जाणवतो, तेंव्हा असते. म्हणूनच समस्येचं समाधान एकटेपणा नाहीसा करण्यात नसून तो आपल्यावर भारी होऊ नये यात आहे. एकटेपणाची अवस्था अंधारासारखी आहे. तो स्वयंभू नाही. जसं प्रकाशाच्या अभावाला अंधार म्हणतात तसेच आयुष्यात उपक्रमाच्या अभावाने एकटेपणाची पोकळी निर्माण होते. यावरून आपल्याला लक्षात येईल की एकटेपणा ही शारिरीक अवस्था असण्याहून मनाची अवस्था जास्त आहे. समस्या मनाशी निगडीत असल्याने मनाला अशा कामाला लावले पाहिजे ज्याची उर्जा मनाच्या गाभा-याला व्यापून उत्साहाने अखंड उजळत ठेवील व उरलसुरला एकटेपणाचा अंधार वितळून जाईल.

एकटेपणा म्हणजे स्वत:ला सतत होणारी एकटेपणाची जाणिव. स्वत:ला कुठल्या ना कुठल्या कार्यात झोकून देण्याने ही एकटेपणाची छळणारी टोचणी कमी होते. कुठल्याही कार्यात, व्यक्तीत, वातावरणात, उपक्रमात मनापासून समरस झाले की आपल्याला आपलं स्वत:च अस्तित्वच जाणवत नाही. मग एकटेपणाची जाणीव कुठून होणार? मनाला व्यापून रहाणारे व्याप आपण घेतले तर एकटेपणाला मनात रहायला जागाच उरत नाही. हे समरस होणं आपल्या आवडीच काम/क्षेत्र असू शकतं, छंद असू शकतो, सामाजिक कार्य असू शकते किंवा अगदी नेहमीची साधी दु:ख, घरगुती काम (घर सजवणं, टापटीप, व्यवस्थित ठेवणं) आपल्याला गुंतवूनही ठेवतं नि कार्यकुशलही बनवतं. कुणा मित्राला, परिचिताला मदत करण्याने एकटेपणाबरोबर आळसही निघून जातो. अपरिमित समाधान मिळतं नि ज्यांना आपण मदत करतो त्यांच्या शुभेच्छाही मिळतात. मदत करण्यासाठी परिचित असण्याचीही गरज नाही. नवनवीन गोष्टी शिकणं, नवीन कलागुणं आत्मसात करणं असे बरेच पर्याय आहेत. सुदैवाने या जगामध्ये आपल्याला असलेल्या आयुष्यातील क्षणांपेक्षा कितीतरी जास्त नि विविध शिकण्यासारख्या गोष्टी आहेत.या जगात मनापासून, सर्वस्वाने प्रेम करण्यासारखी दुसरी कुठली, सुंदर, सर्वव्यापक गोष्ट नाही. प्रेम कुणावरही करा, देशावर करा वा तत्वांवर करा. ज्यावर प्रेम करायचं, निष्ठा ठेवावी, ज्यांची काळजी घ्यावी अशा व्यक्तीचा शोध घेणं हा आयुष्य व्यापून रहाणारा ध्यास आहे मग त्या स्त्रोतापुढे एकटेपणाची जळमटं कशी टिकावी?

अध्यात्मिक दृष्टीकोनातून एकटेपणाची व्याख्या वेगळी भासते. अध्यात्मिक दृष्टया आपण सारे एकाच जीवात्म्याचे अंश आहेत. आपण सारे एका अनंत अटळ अशा चिवट आत्मिक धाग्याने सतत जोडलेले असल्याने कुणी ‘एकट’ कसं बरं असेल?तात्विक व मानसिक दृष्टया आपण एकटे असू वा नसू आपण सारे कसली ना कसली चिंता, विचार सतत करत असतो. कुठल्याही जागृतावस्थेत आपलं मन
कधीच शांत व (अध्यात्मिक अर्थांने) रिकाम नसतं. आपली आपल्या अंतरात्म्याशी एकरूपता, एकात्मता साधणं, साधता येणं हे अध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे. पण अशी अध्यात्मिक ज्योत लागायला मनाच निरांजन स्वच्छ नि रिकामं लागतं. मनातल्या अनंत विचारांचा कल्पनेत अंतरात्म्याने मारलेली हाक आपल्याला ऐकू कशी येणार?हे जमायला आपल्याला आपल्याशी एकांत साधायला लागतो. विचारांच्या गर्दीत नि चिंतेच्या गोंधळात जर आपण कायम फसलेले असू तर हा स्वत:शी एकटेपणा आपण कसा नि कधी साधणार? इथे समस्या एकटेपणा असण्याची नाही तर एकटेपणा नसण्याची आहे.जगाच्या कोलहलापासून दूर मनाच्या कलकलाटाला पाठी सारून अंतरंगाच्या डोहात निर्णायक डुबकी मारून समाधानाची समाधी लावण्यातच या समस्येचं समाधान आहे.

– यतीन सामंत