सध्याच्या घडीला इंटरनेट हे माहितीप्रसाराचं आणि दळणवळणाचं सर्वात प्रभावी माध्यम आहे. जगाच्या अनेक देशांच्या तारा एकमेकांशी जोडल्या गेल्या त्या इंटरनेटमुळेच. पण अशातच बासूंदीत मीठाचा खडा पडावा तसा अनेक साईटसचा उपयोग माहितीसाठी न केला जाता वेगळ्याच कारणांसाठी केला जातोय. चतूर वाचकांनी ओळखलेच असेल मी कोणत्या साईट्सकडे बोट दाखवतो आहे. सध्याच्या पिढीला ऑरकुट नावाच्या राक्षसानं अक्षरश: जादू केली आहे. झोरापिया डॉट कॉम, झुस डॉट कॉम, ऑनलाईन फ्रेंडस डॉट कॉम, अशी एकाहून अनेक असणारी ऑरकुटची राक्षरूपी भावंडं आपल्यावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाली आहेत. अगदी कालचीच गोष्ट आहे प्रशांत दामले, आदिती शारंगधर आणि अशा अनेक मराठी कलाकारांच्या बनावट प्रोफाईल या ऑरकुट डॉट कॉम वर आल्याची माहिती एका वृत्तपत्राने प्रसिध्द केली आहे. याआधीच काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेली कौशंबी या तरूणीची तिच्या नौदलात असलेल्या प्रियकर मनिष ठाकूरने केलेली क्रुर हत्या आपल्याला ठाऊक आहेच. या दोघांचा संपर्क व्हायला कारणीभूत होतं ऑरकुट! पुण्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी झालेली रेव्ह पार्टी, त्यासाठी रितसर पाठविण्यात आलेली आमंत्रणं यातही इतर संकेत स्थळांसोबत ऑरकुटचाही प्रामुख्याने वापर झाला होता. रेव्ह पार्टीमध्ये मद्यधुंद अवस्थेत असणारे तरूण-तरूणी आणि अंमली पदार्थाचं सेवन….बीभत्स नाच या सा-याचाच समावेश होता. या पार्टीत सहभागी झालेले बहुतांश तरूण-तरूणी बीपोओत काम करणारे होते एकमेकांना ओळखतही नव्हते. दिल्लीतील एका तरूणीने तिच्या प्रियकराला नकार दिल्याने, त्याने तिचे अश्लील फोटो तयार करून ऑरकुटवर प्रसिध्द केले होते. ऑरकुटच्या कम्युनिटीवर शिवाजी महाराजांबाबत अश्लील मजकूर प्रसिध्द करण्यात आला होता त्यावरूनही बरेच वाद निर्माण झाले होते.
तरी सुध्दा ऑरकुटवर प्रोफाईल असणं ही अभिमानाची बाब समजली जाते. या वेबसाईटचे अनेक फायदेही आहेत. जुन्या शाळा, अनेक लेखक, गायक, कवी, पत्रकार, उद्योजक अश्या अनेक कम्युनिटीज् आहेत. शाळेत असणारे आणि साथ सुटलेले जुने मित्र इथं भेटतात. कोण कसा आहे, कुठे आहे, काय करतो आहे याबाबत माहिती मिळते. नवे मित्रही भेटतात. पण अशा काही जमा बाजू सोडल्या तर बाकी सारी बाजू उणीच! मुळ प्रश्न आहे तो विश्वसार्हतेचा! कुठली प्रोफाईल नेमकी त्याच व्यक्तीची आहे हे कसं समजायचं? मुळात एखादा मेसेज वा स्क्रॅप कोणत्या संगणकाद्वारे आला हे शोधणं अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. तसंच हे समजणंही अत्यंत अवघड आहे. त्यामुळे समोरचा माणूस आपल्याला स्क्रॅप वा मेसेजद्वारे जे सांगेल त्याला पर्याय नाही. ते प्रत्येकवेळी खरंच असेल असं कसं मानायचं? जर असतं तर इतके गैरप्रकार घडले असते का?
ऑरकुटवर जेव्हा प्रोफाईल ओपन केलं जातं तेव्हा प्रायव्हसी नावाचा प्रकार नाही. सर्चबारच्या आधारे कोणीही तुमच्या प्रोफाईलला अगदी सहज भेट देऊ शकतं, अल्बममधले फोटो पाहू शकतं, कॉपी करू शकतं त्यामुळे या संकेतस्थळावर ज्यांनी खरी माहिती देऊन अत्यंत प्रामाणिक हेतूने सदस्यत्व स्वाकारले आहे, ती चुकीच्या हाती गेली की नुकसान होतंच. खासकरून महिलांना या संकेतस्थळाचा जरा जास्तच धोका निर्माण झाला आहे.
ऑरकुट बुयूककोकटेन नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरनं २००४ मध्ये ही साईट सुरू केली. सध्याच्या घडीला जगभर या संकेतस्थळाचे ५० दशलक्षाहून अधिक सदस्य आहेत. किती लोक खरोखरच या संकेतस्थळाचा चांगला आणि योग्य वापर करत असतील? २००४ ते २००७ या अवघ्या तीन वर्षाच्या कालावधीत या एवढे सदस्य असणारं हे बहुदा पहिलं संकेतस्थळ असावं. मान्य आहे याचा चांगला उपयोग आजही होत असेल. पण म्हणून गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? गैरप्रकार एक वा दोन झाले असते किंवा अगदीच नगण्य असते तरीही ठिक होतं पण इथं तसंही नाही आणि त्याहीपेक्षा गैरप्रकारांमध्ये सातत्य आहे. आज जर आपण गैरप्रकारांना आळा घातला नाही तर उद्या अनेक प्रश्न निर्माण होतील. अनेक तास ऑरकुटबाजी करणारे सध्याचे तरूण – तरूणी पाहीले की वाटतं यांना कोणीतरी या व्यसनातून हात धरून बाहेर आणणं खूप आवश्यक आहे. ऑरकुटचे स्क्रॅप, ब्लॉग, प्रायव्हेट चॅट, चॅट हे असले प्रकारही बोकाळले आहेत. या सगळयापासून वाचायचं असेल तर ऑरकुटवरचं सदस्यत्व रद्द करणं हाच एक उपाय आहे. अगदीच शक्य होत नसलं तर हळूहळू स्क्रॅप आणि मेसेजेस पाठवणं कमी कमी करत जाऊन शेवटी अकाऊंट डिलीट करावं. या वेबसाईटचा इतका प्रचंड विळखा आपल्या समाजाभोवती आणि खास करून माझ्या वयाच्या तरूणपिढीभोवती पडला आहे. त्यात अडकायचं की नाही हे प्रत्येकाने आपआपलं ठरवायचं.
– समीर जावळे