गणेशोत्सव 06, लंडन

Ganesh लंडनच्या महाराष्ट्र मंडळात साज-या होणा-या गणेशोत्सवात अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन हा एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम समजला जातो. गणेशचतुर्थी नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी हा कार्यक्रम दरवर्षी आयोजीत केला जातो. 1996 साली सौ. भानप अध्यक्ष असतांना श्री. वसंतराव जोशी यांची सुचना आणि सौ. कोठारे यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम सुरू झाला.

पहिल्या वर्षी आवर्तन करण्यासाठी 31 व्यक्ती आणि ऐकण्यासाठी 50 हून कमी लोक हजर होते. ह्यावर्षी सहस्त्रावर्तनासाठी आवर्तन करणारे 150 हून अधिक तर ऐकणाऱ्यांची संख्या सुरुवातीला 250 हून अधिक होती. नंतर उशीरा येणा-यांमुळे ऐकणा-यांची संख्या 350 च्या घरांत जाऊन पोहोचली.

ह्यावर्षी आवर्तनाबद्दल खास नमूद करायची गोष्ट अशी की आवर्तनाची सुरूवात, इथले ख्यातनाम चित्रकार आणितबला व पेटी वादक श्री. बाळासाहेब आठल्ये यांचा 10 वर्षाचा नातू चि. अनिकेत याने केली. अत्यंत कठीण संस्कृत उच्चार अस्खलितपणे करीत, कुठेही पुस्तकाचा आधार न घेता, हा मुलगा सुरूवातीला जो मांडी घालून बसला ता आवर्तन संपल्यानंतरच उठला. दहा वर्षाच्या मुलाला अथर्वशीर्ष शिकवणारे बाळासाहेब आणि आजोबांच्या मांडीला मांडी लावून, सुरूवातीपासून शेवटपर्यंत सहस्त्रावर्तनाला बसणारा त्यांचा नातू, अनिकेत, दोघांचही कौतूक करावं तितकं थोडच आहे.

कार्यक्रम संपल्यानंतर महाप्रसाद झाला. 600 भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त पणे सारी जबाबदारी चोखपणे बजावली

– मनोहर राखे, लंडन