नववर्ष स्वागत गुढी पाडव्यालाही
३१ डिसेंबरची मदमस्त रात्र, युवामनाला उधाण आणणारा व्हॅलेंटाईन डे इत्यादि पाश्चात्य संस्कृतीशी जवळीक साधणाऱ्या आपल्या भावी पिढीला भारतीय संस्कृतीचा विसर पडू नये म्हणून तीन वर्षापासून डोंबीवलीने गुढी पाडवा सामूहिक रित्या साजरा करण्याचा पायंडा घालून दिला. गेल्यावर्षीपासून कल्याण मध्ये व या वर्षापासून ठाण्यात ही अशा पध्दतीने साजरा होऊ लागला आहे.
कल्याण मध्ये जातीय दंगलीमुळे शोभायात्रेस परवानगी दिली नाही, मात्र डोंबिवलीत सालाबादाप्रमाणे यंदाही गुढी पाडवा तसाच उत्साहाने साजरा झाला. परंतु ठाणेकरांनी पहिल्याच वर्षी उत्साहाचा जोरदार बार उडविला. कौपिनेश्वर मंदिर ट्रस्ट च्या पुढाकारांत महिनाभर हा सण साजरा करण्यासाठी जय्यत तयारी चालली होती. ठाण्यात ठिकठिकाणी या सार्वजनीक कार्यक्रमाचे बॅनर्स लावण्यात आले होते, त्याने चांगलीच हवा निर्माण झाली होती व लोकांनी अत्यंत उस्फूर्तपणे या संकल्पनेला सक्रिय पाठींबा दिला.
संस्कार भारती या संस्थेच्या भगिनींनी अनेक सोसायटयातून, रस्त्यारस्त्याला, चौकाचौकात मोठाल्या रांगोळया काढल्या. गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येस म्हणजे 12 एप्रिलला रात्री ९ वाजतां ठाण्यातील मध्यवर्ती मासुंदा तलावपाळी व कौपिनेश्वर मंदिर परिसर घराघरांतून आणलेल्या असंख्य पणत्यांनी उजळून निघाला. रात्री नयनरम्य आतषबाजीने आसमंत चमचमला. रात्रभर चित्ररथ सजविण्यात आले. १३ एप्रिलला गुढी पाडव्याच्या पहाटे अभ्यंग स्नान करून व पारंपारिक वेषांत ठाणेकर सकाळी साडेसहापासून कौपिनेश्वर देवळाजवळ तलावपाळीला जमू लागले. या नववर्षाचे स्वागत करणाऱ्या शोभायात्रेत प्रथम मंत्रगजरांत कौपिनेश्वरची पालखी निघाली त्याला ठाण्यातील अनेक सामाजिक व राजकिय मान्यवरांनी ही खांदा दिला व अगदी फुगडयांचे फेर सुध्दां धरले. पगडी, भिकबाळी, धोतर उपरण्यातील पेशवे, नाना फडणवीस इत्यादी पारंपारिक वेषातील मंडळींनी शोभा वाढविली. दहा-बारा बग्ग्यांत प्रसिध्द अभिनेत्री सुहास जोशी, गायक मुकुंद मराठे सारख्या प्रतिष्ठीत व्यक्ती विराजमान होत्या.
जवळपास ३० चित्ररथ (फ्लोट्स) सामील होते. त्यात सी के पी क्लबच्या ‘पोळयाचा सण’ हा देखावा उभारणा-या चित्ररथास प्रथम बक्षीस मिळाले. झोपडी, गोठा, गोठयात बैल, बैलाची पूजा करणारे शेतकरी जोडपे, नृत्य-गाण्यात फेर धरणारे गांवकरी स्त्री-पुरुष असा सुरेख देखावा होता. येऊरच्या खुद्द वनवासींनी केलेला तूर नाच; राम मारुती रोडवर दोरखंडाच्या साहाय्याने इमारतीची भिंत चढण्या-उतरण्याचे रॅपेलिंगचे प्रात्याक्षिक; दोरखंडावरील मलखांब करणारी छोटी मुले; नऊवारी लुगडी नेसलेल्या तरूण स्त्रियांचे लेझीम खेळणारे समूह; अनेक भजनी मंडळे; स्त्री पौरहित्य वर्गाचे रुद्रपठण; भिंतीवरून चांगदेवाला सामोरे जाणारे ज्ञानेश्वर; विवेकानंद, लोकमान्य टिळक, फुले, आंबेडकर, हेडगेवार यांचे आयुष्य क्षण; वृक्ष संवर्धन व घन कचरा संदर्भात मार्गदर्शन करणारे व प्लास्टिकच्या समस्येची जाणीव करून देणारे रथ …अशा चित्ररथांनी व त्याबरोबर चालणा-या जनसमुदायानी ही यात्रा प्रचंड मोठी लांबच लांब झाली होती. वाटेवर दुतर्फा लोक जमून स्वागत करीत होते व सामीलही होता होते. अत्यंत शिस्तीत व आनंदोत्साहाने यात्रा तब्बल चार तास चालली.
पारंपारिक मूल्ये जपतांना त्याला सामाजिक स्वरूप देणा-या या नववर्ष स्वागत यात्रेच्या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. गुजरात मध्ये उसळलेल्या भीषण जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी या द्वारे आपली हिंदुवादी एकजूट दर्शविण्याची संधी घेतली असावी कां असे सहाजीकच वाटून जाते. अपरोक्षपणे असाच प्रयत्न घडला. परंतु लोकांना हा सामूहिकतेचा सण आवडलेला दिसला.
यास धार्मिक व जातीय स्वरूप न यावे यासाठी सर्वधर्मसमभावाचे स्वरूप देण्याचा प्रयत्नही झाला व अल्पसा कां होईना पण प्रतिसाद मिळाला. या यात्रेत सामील होते शीखांचे बैसाखी साजरे करणारे पंथ; जैनांचे रथ व जनसमूह तसेच मुस्लीमांचा एक छोटा समूह.
गुढी पाडवा म्हणजे वर्षप्रतिपदा. या चैत्र शुध्द प्रतिपदेला रामाने वालीचा वध केला. तसेच रावणाचा वध करून याच दिवशी श्रीराम अयोध्येला परतले तेव्हां विजयाचे प्रतीक म्हणून गुढया उभारून त्यांचे स्वागत केले. वैरभावनांच्या दुष्ट प्रवृतींवरील विजय म्हणून गुढया उभारून नववर्षाला सर्व जाती/पंथासाठी सद्भावनेने सुरवात असा आशय या सामूहिकतेतून निघावा.
– सुरेखा सुळे