आला वसंत

पहाटवेळी जाग आली ती आमराईतल्या कोकिळांच्या पंचमसुरी मधुमधुर गाण्याने कुहू कुहू कुहू आणि मन एकदम प्रसन्न झाले, उल्हासित झाले, म्हणजे? भगवान श्रीकृष्णाने ‘ऋतुनाम कुसुमाकर:’ असे म्हणून गीतेमध्ये कौतुक केलेला वसंतऋतु आला की काय? हो आला, सर्वांचा प्रिय वसंत आला, सगळीकडे नवचैतन्य पसरवून टाकणारा ऋतुराज आला. मनावरची सारी उदासपणाची मळभं दूर करणारा आश्वासक ऋतु आला. चला त्याचे स्वागत करूया पण कसे?

शंभर वर्षांपूर्वीच्या ”कोकिलकूजित” या सुंदर कवितेत दत्तात्रय कोंडों घाटे सांगतात की एका प्रात:काळी एक कोकिळा वसंतऋतुची दूती होऊन वनात आली. तिने तरूशिखरावर बसून त्याची ‘राजाज्ञा’ वाचून दाखवायला सुरूवात केली. म्हणाली ऐका…….
‘वसंतराया येईल आता तुम्हां भेटाया।
राजदर्शना सज्ज रहावे आले सांगाया॥’

आता सर्व पक्ष्यांनी सुदंर अलंकार घालून तनुला सजवावे आणि सुहास्यवदनाने त्याला सामोरे जावे. बालतृणांनी वनात रम्य असे हिरवे गालीचे पसरावेत, वृक्षांनी त्याच्या वाटेवर विविध फुलांचे सडे घालावेत, मिलिंदजनांनी ललकाऱ्या द्याव्यात. पाखरांनी त्याची स्तुतीगीते गावीत, उगवत्या सूर्याने साऱ्या गगनभर गुलाल फेकावा, फुलांनी सुगंधाची उधळण करावी. दिशांनी दंवबिदूंचे स्नान घालावे. उपवनांनी वस्त्राभरणांनी सजवावे, मग वनदेवींनी सुग्रास फलभोजन घालावे. सरोवरांनी कमलसुगंधी जल प्यायला द्यावे. नंतर मदनोद्यानांत उंच आसनावर बसवून सर्व वृक्षवल्लरींनी त्याचे मंगलपूजन करावे. हे ऐकताच मग काय? पळस फुलले, पांगारे शेदंरी झाले. सारे वन स्वागतोत्सुक झाले.

आपणही पाडव्याच्या दिवशी त्यांचे स्वागत करतो. परंपरे प्रमाणे बांबूची, पळसाची, बकुळ किंवाकदंबाची दंडकाठी घेऊन त्याला आंब्याच्या टाळा बांधतो. जरीच्या खणाने, चांदीच्या पेल्याने सजवतो. साखरेच्या पदकांची माळ आणि ताज्या फुलांचा हार घालतो. अशा त्या सुशोभित गुढीची उंच जागी स्थापना करतो. रांगोळी काढून तिची पूजा करतो. म्हणतो……नव्या वर्षाला, ब्रम्हध्वजाला, चैत्राला आणि सकल जनांचे भाग्य फुलवणाऱ्या वसंतऋतुला नमस्कार असो. नंतर मग आरोग्यदायी कडुलिंब चटणीचे सेवन करतो.
हे तर झाले त्याचे औपचारिक आगमन आणि स्वागत. पण तसा हा वसंत होळीच्या आगेमागेच जाणवायला लागलेला असतो. सगळीकडे सूर्यप्रखर आग ओतीत असतांना

कडक उन्हाळा। रानांत नाही पाणी
देव आश्चर्य करितो। झाडा पल्लव फोडुनि ॥
कडक उन्हाळा। पाण्याचा नाही पत्ता
देव आश्चर्य करितो। झाडां फुटे नवा पत्ता॥

खरोखरच नवल घडते. सगळीकडे पाणी आटत असतांना, तीव्र सूर्यकिरणांना न जुमानता लाखो झाडांना कोवळे तांबुस कोंब फुटून बघता बघता त्या गुलाबी गुंडाळयातून हिरवी पोपटी पाने वाऱ्यावर लवलव करायला लागतात.झाडे सुखावतात. त्या पानांच्या रूपाने देवाने दिलेल्या बाळाकडे कौतुकाने पहात रहातात, म्हणतात –
‘या रे या पाखरांनो! सावली झाली बघा तुमच्यासाठी. पाखरे किलकिलू लागतात. आणि इकडे आई काय करत्येय ? हं…..हरभरे भिजत टाकतेय. व्वा! म्हणजे उद्या हळदी-कुंकू दिसतंय, चला….दारांना तोरणे बांधायची. अंगणात चैत्रागणांची रांगोळी काढायची. गौरीची आरास मांडायची, नवे नवे कपडे घालायचे, आब्यांची डाळ, खिरापत, कलिंगडाची फोड, पन्हे…..भिजलेल्या हरभऱ्यांची ओटी, हळद-कुंकू लावल्यावर अत्तर लावायचं, चांदीच्या गुलाबदाणीतून गुलाबपाणी शिंपडायचं…..मज्जाच मज्जा! घरोघरी माहेरवाशिंणी येतात.

मुलांना शाळेला सुट्टया लागलेल्या असतात. जेवणे झाली की मुलांचा खेळायचा धांगडधिंगा, धुडगुस सुरू होतो. ”तिकडे खेळा बघू, ओरडू नका, झोपून घ्या जरा, मुळळी ऐकत नाहीत” आजी सांगतात. लगोऱ्या, अबाधोबी, लपालपी सुरू होते आंबराईत…..मग पत्ते- शेवटी झब्बूत हरल्यावर गाढवासारखं ओरडण्यावरून चिडचिडी होऊन सारी वानरसेना घरात येते. बघतात तो काय! बदाम,वेलची, बडीशोप, मिरी, भोपळयाच्या बिया, गुलाबकळी वाटून वाटून केलेली, मलमलीवर गाळलेली गार-गार थंडाई तयार असते. मग झब्बूतल्या गाढवपणाचं, पाच-तीन दोन मधले हात ओढण्याचे, नाटेढोममधले पत्याच्या साऱ्या जोडया देऊन टाकायला लागल्याचे दु:ख कुठल्याकुठे पळून जाते. शिवाय मोठया परातींत कलिगंडाच्या लाल-लाल फोडी चिरून ठेवलेल्या असतात त्या वेगळयाच! हवं तेवढं कलिगंड खा……
दूर तिकडे आता मारवा संपवून कोकिळेनं वसंत गायला सुरूवात केलेली असते. उन्हं उतरत आलेली असतात. झाडं गाणं ऐकण्याच्या नादात हलाडोलायचीच विसरलेली असतात. संध्याकाळ होते तशी कोकीळा गाणं संपवून उडून जाते तेव्हांच सारे जग भानावर येते.

पूर्वीच्याकाळी या ऋतुत नगरवासी लोक पिवळी वस्त्रे परिधान करून वनोद्यानात जात.दिवसभर निर्सगात आनंदाने रहात. खेळ, नृत्य, गायन करीत. होरी, ठुमरी, चैत्रगीत झोपाळयावर बसून म्हणत. अनेक व्रते करीत. मस्त्यव्रत, गौरीव्रत, विद्याव्रत, बालेन्दुव्रत, अशी कितीतरी प्रपादान म्हणजे जागोजागी पाणपोया घालून समाजोपयोगी सत्कार्यें करीत. वसंताच्या स्वागतासाठी सुवसंतक फाल्गुनोत्सव अशोकोत्सव, दोलोत्सव, मदनोत्सव, दमनोत्सव असे उत्सवही साजरे करीत.
वसंतऋतुचे वर्णन प्राचीन काळापासून आजपर्यंतचे कवी आपल्या काव्यातून करीत आले आहेत. संत मीराबाई म्हणतात-

होली खेलत है गिरीधारी।
मुरलीसंग बजत डफ न्यारी संग जुवती व्रजनारी।
चंदन के सर छिरकत मोहन। अपने हाथ बिहारी।
भरि भरि मूठ गुलाल चहु लाल देत सबनपै डारी॥
होरी खेलत है गिरीधारी॥

तर संत कबीर भगवत भक्तीचा वसंत नावाचा मंगल महोत्सव भक्तांच्या मनी सदाच बहरलेला असतो असे म्हणतात.
साने गुरूजी वसंतवारा कवितेत म्हणतात –

‘नवजीवन प्रदाता चैतन्य ओतणारा।
सुकल्यांस हासवीता आला वसंतवारा॥’

कवी वसंत बापटांपर्यंत जेव्हा वसंतवारा नवसृजनाच्या वार्ता आणतो तेव्हा ते म्हणतात-

‘मनात माझ्या आम्रफळे रसरसती। मनात माझ्या कुहूकुहूची गीते
मनात माझ्या वसंत वसंत करितो जंतर मंतर। घालुनि फुंकर…….
जाईजुईंना देत दिलासा येतो । सृष्टीसह तो रंगविलासा येतो…..

माधव ज्युलियन ‘एंकव तव मधुबोल कोकिळे ऐकव तव मधु बोल’ म्हणतात तर तुझ्या अवेळी गाण्याने माझे दु:ख हलके होते….
तेव्हा कोकिळे अवेळ असली तरी गा..

‘अवेळ तरिही बोल कोकिळे अवेळ तरिही बोल.
रित्या मनी या ओत सूर त्या जाऊ दे अति खोल कोकिळे अवेळ तरिही बोल’

असे कवी गोविंदाग्रज तिला विनवतात.
संत ज्ञानेश्वरांनीही ‘
‘जैसे ऋतुपतीचे द्वार। वनश्री निरंतर। वोळगे फळभार। लावण्येंसी’
असे म्हटले आहे तर समर्थ रामदास हिंदी रचनेत
‘खेलत है नंदलाल बसंत खेलत है नंदलाल’ असे लिहितात. तर,

‘कुंजात मधुप गुंजारव यमुनातटी
होरि खेळतो हरि। करूनि नट राधा, आपण नटी॥

असे शाहीर राम जोशी लिहितात.

वसंतात होळी, गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया असे सण आणि रामनवमी, हनुमान जंयती, देवीचे नवरात्र असे उत्सव आणि त्यात आणखी आंब्या फणसाचे दिवसही असल्याने खाण्यापिण्याचीही चंगळ असते. आयुर्वेदाने या दिवसात मधु, लघु, शीत, व द्रव्य आहार घ्यावा असे सांगितले आहे. पण आपले सारे लक्ष बर्फ उसाच्या रसाकडे आणि बर्फ गोळयाच्या गाडीकडे असते. पाहुणे आल्यावर तर साग्रसंगीत भेळेचा बेत हवाच. कुल्फी, आईस्क्रीम, कैरी, कोकम सरबत, थंडाई, वाळा सरबत, लिंबू सरबत, सातूपीठ…..अहाहा! चौफेर राज्य सगळं या थडं सुशीतल पेयांचे आणि बर्फाचेच असते.

वसंतऋतु नवनिर्मितीचे प्रतीक आहे. लक्ष्मीबाई टिळक लहानग्या बालकाला त्याचे महत्व सांगतांना म्हणतात-

या पृथ्वीवर ये। नवेपणा उदयाला
तुज कळेल पुढती। वसंत म्हणती याला॥

पृथ्वीवर नवेपणा, ताजेपणा आणून सर्वांना हर्षभरित, उल्हासित करणार हा ऋतु शुध्द आनंदाचे प्रतिक आहे. करतां करतां आता वसंत पूर्ण बहरलाय. जागोजागी गुलमोहोराच्या फुलदाण्या भरभरून ओसंडतायत्. पिवळया धम्मक फुलांच्या घोसांनी अमलताश डोलतायत. रस्त्याच्या कडेला खरबूज टरबूजांचे डोंगर ढिगारे उभे राहिलेत. बागेतून अंजीर पिकलेत, डोगंराच्या जाळयामधून करवंदे काळी झालीयत. जांभळं खाली पडायला लागलीत. सगळीकडे आंब्याचे साम्राज्य पसरलंय. घरातल्या मुलांची जुन्या पुस्तक वह्याची अडगळ रिझल्टच्या दिवशीच बाजूला काढली आहे. लग्नसराईमुळे पाहुण्यांची धावपळ#सरबराई#धमाल चालते नुसती या वासंतिक दिवसात….

उगीच नाही वसंतऋतूला ऋतूराज म्हणत! तो तर आता फुलपाकळयांच्या शय्येवर पहुडलाय. अंहं….तसं नाही. अहो चक्क
”पुष्पधुळीमाजी। लोळे वसंत” असं कवी मुक्तेश्वरच म्हणताहेत.

तर असा हा वसंत! नव्या नाजुक पालवीने पोपटी-हिरवा झालेला पळसपांगाऱ्यांच्या गुलमोहरी फुलोऱ्याने लालकेशरी दिसणारा, सोनचाफ्यांच्या फुलांनी सोनेरी झालेला, मोगरा,मदनबाण,सुरंगी, बकुळीने गंधित झालेला पिकल्या करवंद-जांभळांनी निळाच वाटणारा हा वसंत! चला-त्याच्याबरोबर बोलू या, डोलू या, आंनदाने गाऊ-नाचू, खेळू या. म्हणू या……. ये शिशिरांतका, मधु माधवा, रंगराज वसंता ये…..ऋतुराजा ये. तुझे स्वागत असो.
कवयित्री इंदिरासंत म्हणतात….

‘आला वसंत, वसंत आला। तनामनाचा झाला हिंदोळा
हिरवे सारे रंग दुलारे। कोकिळ गाणे, निळयांत भरे
रंगा नहाळी, गंधा जिव्हाळी। कोऱ्या फांदीला धुंद कोवळी
आला वसंत, वसंत आला। तनामनाचा झाला हिंदोळा॥’

सौ. अरुंधती जोगळेकर, नाशिक