बंध

मी दहावीच्या वर्गात विज्ञान शिकवत होते. नुकतीच मी या छोटयाश्या शहरातील शाळेत विज्ञान शिक्षिका म्हणुन रूजू झाले होते आणि मला दहावीचा वर्ग मिळाला होता. हळूहळू विद्यार्थ्याशी ओळख व्हायला सुरुवात झाली होती.

‘….तर अशाप्रकारे हा धडा संपला. कुणाला काही प्रश्न विचारायचे असल्यास विचारू शकता. उद्या येतांना व्यवस्थित अभ्यास करून या. मी एक छोटीशी चाचणी घेणार आहे.’

वर्ग संपवुन मी बाहेर आले आणि दुस-या वर्गात निघाले तेवढयात मॅडम अशी हाक ऐकू आली. मी वळुन बघितले तर मृण्मयी मला बोलावत होती.

‘मॅडम, मला काहीतरी विचारायच आहे तुम्हाला’
‘काय गं मनु, काय प्रोब्लेम आहे. विचार ना!’
‘मॅडम मला जरा नेत्रदान कसे करतात त्याविषयी माहिती हवी होती’

मी कौतुक मिश्रीत आश्चर्याने तिच्याकडे बघितलं. ‘माहीती सांगते मी तुला पण मला एक सांग, तुझ्या मनात कसा काय आला हा विचार? आणि तुला जरा जास्तच विचार करावा लागेल कारण तु अजून खूप लहान आहेस’

‘नाही मॅडम तुम्ही मलाच सांगा. माझे बाबा लहानपणीच वारले आणि आईला मी स्वत:च सांगणार आहे.’

तिच्या या वागणुकीबद्दल मला काहीच समजेना पण नाईलाजाने मी तिला सर्व माहिती सांगितली धन्यवाद म्हणून ती पळाली. मी सुध्दा लगेचच पुढच्या वर्गावर जाण्यासाठी निघाले. आणि माझ्या व्यस्त कार्यक्रमात मी पुन्हा अडकले. तिचा हा प्रश्न मी विसरून गेले होते तर एक दिवस अचानक ती परत माझ्याकडे आली.
‘मॅडम मला जरा किडनी कशी दान करतात ते सांगाल काय…?

‘काय! किडनी दान, अगं वेडी बिडी झालीस काय तू, अजुन तू दहावीत आहेस आणि कशाला हवी गं तुला ही सर्व माहिती.”
‘मॅडम माझ्या आईची एक किडनी दान करावयाची आहे.”
‘तसं पहाता ती खुप चांगली गोष्ट आहे पण किडनी दान करण्याचा निर्णय तुझ्या आईने का व कशासाठी घेतला ते सांगू शकशील काय?’
‘मॅडम तुम्ही फक्त मला माहिती सांगा.’
ते काही नाही. तु अगोदर सांगितले पाहीजे कशासाठी माहिती विचारतेयस ते.

मॅडम तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला माहिती सांगा.
मी परत तिला सर्व माहिती सांगितली पण यावेळी माझं मन मला स्वस्थ बसू देईना. मी तिच्या आईची भेट घेण्याचं ठरवलं. पण विशेष गोष्ट म्हणजे हुशार आणि लोकप्रिय असलेल्या मृण्मयीचं घर मात्र कुणालाही ठाऊक नव्हतं. मुलींचं म्हणण होतं की तिने कधीही कुणाला तिच्या घराविषयी काही सांगितलं नव्हतं.

शेवटी मी शाळेच्या रजिस्टर मध्ये तिचा पत्ता शोधायला घेतला आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. मृण्मयीच्या नावापुढे स्थानिक पालक म्हणून दुस-याच कुणाचं नाव नोंदविण्यात आलं होतं. मला काहीच कळेना, मनु आपले वडिल वारले असं काय सांगतेय? विचित्र प्रश्न काय विचारतेय. नुसता गोंधळ उडाला होता.

त्या पत्यावर मी जाऊन पोहोचले. मोठं प्रशस्त घर होतं मी जाताच एक चाळीशीतले गृहस्थ माझ्यासमोर आले. त्याचं नाव ऐकल्यावर मला कळलं की मनुचे पालक ते हेच.

नमस्कार मी तुमच्या मुलीची विज्ञान शिक्षिका. मला जरा तुम्हाला काहिसे प्रश्न विचारायचे होते.

मॅडम मी प्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो की मनु माझी मुलगी आहे पण ती माझी मुलगी नाही. गोंधळलात ना. नीट सांगतो म्हणजे कळेल. मनु माझ्या मित्राची मुलगी. माझा जिवलग मित्र अजय आणि त्याची बायको यांची एकच आवड होती ती म्हणजे समाजसेवा आणि याच आवडीपायी बाळंतपण शहरात करायचे सोडून ती दोघे एका खेडयातील वृध्दाश्रमात गेले. अपु-या सोयीमुळे मनुच्या जन्माच्या वेळी तिची आई हे जग सोडून गेली, पुढे अजय तिला घेऊन परत आला. आणि एकाच वर्षात तो सुध्दा गेला. दैवाचे खेळ बघा मरेपर्यंत समाजासाठी काम करणा-या अजयच्या मुलीसाठी कुणीही नातेवाईक पुढे न आल्याने शेवटी मी तिला घेऊन आलो, मनुच्या नावापुढे मी अजयच नाव ठेवलं. मनुला मी घेऊन आलो तेव्हा ती एक वर्षाची होती आणि माझं लग्न सुध्दा झालं नव्हतं म्हणून मी ऑफिसला जातांना मनुला बाजुच्या एका आश्रमात सोडुन जात असे. मनु आई-बाबांप्रमाणे त्यांच्यात रमली. आजही ती घरात फक्त काही वेळच असते आणि इतर सर्व वेळ ती आश्रमात असते.

मनुचं मला कौतुक वाटलं. पण मी तुमच्याकडे आले ते एका वेगळया संदर्भाने. मनु मला काहीसे विचित्र प्रश्न विचारत असते. नेत्रदान, किडनीदान वैगरे…. तुम्ही जरा माझ्या बरोबर चला.. म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. मी त्यांच्यामागुन निघाले. बाजुलाच एक आश्रम होता. तिथेच एका खोलीच्या दरवाज्याजवळ आम्ही दोघे थांबलो. खिडकीतुन आत डोकावले तर दिसले की मनु एका वृध्देला काहीतरी समजावीत होती. आजी तु घाबरू नकोस अगं उलट तुला आनंद व्हायला हवा, आज तुझ्यामुळे कुणाला तरी जीवनदान मिळणार आहे. तुला आठवतं की डॉक्टरांनी तुझ्या किडनीचं ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं ते ऑपरेशन यशस्वी झालंय आणि तुझी एक किडनी काढून दान म्हणजे…..

मनु मी सांगितलेला एक शब्द बोलत होती, बघितलंत मॅडम, मागे असेच एकदा एका आजोबांचा एक डोळा निकामी झाला, तर मनुने त्यांना नेत्रदाना विषयी माहिती सांगितली आणि त्यांच्या दु:खावर एक फुकंर मारली, कारण गेलेला डोळा परत तर मिळणार नव्हताच उलट आपण कुणाच्या तरी कामी येऊ शकलो अशी त्यांची भावना झाली आणि त्यांना परत त्यांच्या जीवनातला आनंद मिळाला. कदाचित मनुचं खोटं बोलण तुम्हाला खटकत असेल पण त्या बोलण्यामागे दुस-यांना निखळ आनंद देणं एवढा एकच उद्देश असतो. आपण अगदिच निकामी आहोत ही भावना त्यांच्या मनात निर्माणच न होऊ देणं, मला वाटतं हेच खरं मनुच्या कामाचं फलित.

आतून दोघींच्या हसण्याचा आवाज आला आणि माझे डोळे नकळत पाणावले, Covalent Bond चा खरा अर्थ मला समजत होता. आपल्या जीवनातील हिस्सा मनुने अशा प्रकारे दुस-याबरोबर वाटून घेऊन जो बंध निर्माण केला होता तोच Covalent Bond.