दिनांक २९ ऑक्टोबर रोजी, दिवाळीच्या निमित्ताने मंडळाने दोन एकांकिका सादर केल्या. जवळ जवळ वर्षभर मराठी नाटक न बघायला मिळालेले रसिकजन मंडळात गर्दी करून आले. पहिली नाटीका होती, कै. वसंत कानेटकर लिखित ‘मद्राशीने केला मराठी भ्रतार’. सादर करणारी मंडळी होती लिव्हरपूल आणि आसपासच्या गावांतली. त्यातले अर्धे अधिक लोक होते डॉक्टर. मला वाटतं लिव्हरपूल, म चेस्टर, बर्मिगहॅम इ. लंडनच्या उत्तरेस असलेल्या गावांत मराठी माणूस जर तो डॉक्टर नसेल तर त्याला प्रवेश नाकारत असावेत.
रेल्वेंत नोकरी करणारे बापलेक, (श्री.शिंत्रे आणि श्री. कानिटकर) लेकाची आई, (सौ.शिंत्रे) त्यांचा मद्रासी भाडेकरू, (श्री. श्रोत्री) आणि त्याची मुलगी (सौ. श्रोत्री) अशी ही चार मुख्य पात्रे. सौ. शिंत्र्यांनी प्रथम, सतत त्रागा करणा-या बायकोची आणि नंतर (मुलाच्या चालबाजीपणामुळे) नकळत बनलेल्या सासूची भुमिका उत्तम उभी केली. नवरा हे एक दयनीय प्राणीमात्र आहे असं का म्हणतात हे त्यानी उभी केलेली बायको पाहिल्यावर उमजून आलं. त्यांची दक्षिण भारतीयांच्याबद्दलची मते ऐकून, शिवसेना उभी करण्यांत त्यांचाही हातभार लागला आहे की काय अशीच शंका यावी. त्यांच्या अगदी विरुध्द टोक म्हणजे त्यांची ही (त्यांच्या नकळत) बनलेली सूनबाई, रुक्मिणी. नांव काय असं विचारल्यावर “Yesterday Rukminee, Today Radha” असं अगदी दिल लगाके लाजून आणि मुरका मारून सांगणारी. सगळा गोंधळ होतो तो किशनमुळे पण शेवटी स्टेजवर थैमान घालतात त्या सासूबाई, किशनचे (त्यांच्या नकळत झालेले) सासरे, दोराईस्वामी, किशनचे वडील, किशन आणि रुक्मिणी.
लोकांना कडूजहर औषधे पाजणारी आणि वेळीप्रसंगी सुयाही टोचणारी ही डॉक्टर मंडळी त्या दिवशी मात्र मंडळात बरीच खसखस पिकवून गेली. पडदा खाली आल्यानंतर मात्र जर कोणी डोक्यांत घर करून गेलं असेल तर त्या सासूबाई आणि बड दिलचस्पीसे लाजणारी त्यांची ती सून.
दुसरी नाटिका होती, ‘घर माझे वळणामागे”. ही सादर केली लंडनच्या कलाकारांनी. या नाटिकेची काही वैशिष्टे सांगण्यासारखी आहेत. सर्वप्रथम ही नाटिका लंडनच्या डॉ. प्रकाश जगदंबे यांनी लिहीली. व्यवसायाने डॉक्टर असलेला हा माणूस फ़ावल्या वेळांत कविता करतो हें मला माहीत होतं. आता पुढे प्रगती झाली. दुसरी गोष्ट म्हणजे नाटिकेचे दिग्दर्शक श्री. किशोर वेंगुर्लेकर यांनी मंडळासमोर सादर केलेला हा ८४वा कार्यक्रम. यांत ३ अंकी नाटके, एकांकिका आणि करमणूकीचे इतर कार्यक्रम यांचा समावेश आहे. या बाबतीतली शंभरी श्री. वेंगुर्लेकर लौकरांत लौकर गाठोत अशी आम्हा सर्वांचीच इच्छा आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या नाटिकेतली मध्यवर्ती भुमिका करणारी लता गानू हिची रंगमंचावर काम करण्याची ही पहिलीच वेळ होती. (आणि तिचं काम बघितल्यानंतर, ती यापुढे अनेक वेळा स्टेजवर आल्याशिवाय रहाणार नाही, याची मला खात्री आहे.)
पहिली नाटिका अगदी हलकी फ़ुलकी होती, तर ही तितकीच गहन. आपण दत्तक घेतले गेलेलो आहोत हे स्वत:च्या (दत्तक घेणाऱ्या) आईवडिलांकडून न कळता जर एखाद्या तिऱ्हाईताकडून कळलं तर त्या दत्तक जिवाची मन:स्थिती काय होत असेल हा या नाटिकेचा विषय. मुळात विषय इतका गहन की त्यावर तीन अंकी नाटक सुध्दा एखादेवेळी कमी पडेल. (प्रकाशने नोंद घ्यावी). तीन अंकी विषय एका अंकांत संकुचित केल्यामुळे Drama चा Melodrama झाला. पण Drama असो वा Melodrama असो, आपआपली कामें सगळयांनी चोख बजावली. आपण दत्तक आहोत हे कॉलेजमधल्या दोन ढ़ालगज भवान्यांच्या तोंडून ऐकल्यावर झालेली मनाची उलघाल लताने कुठलाही नवखेपणा न दाखविता स्टेजवर उभी केली. तिच्या आईवडिलांची कामें केली होती इथले ख्यातनाम नट आणि दिग्दर्शक श्री. सुभाष कुळकर्णी आणि माझी रुइया कॉलेजमधली वर्गमैत्रिण सौ. आशा सारंगधर यांनी. हे दोघे मंडळाचे जुने आणि जाणिते कलाकार आहेत. मुलीने केलेल्या बंडाला अगदी शांतपण सामोरे जाणाऱ्या वयस्क आईवडिलांच्या भुमिका त्या दोघानीही आब राखून केल्या. आणि शेवटी बंडखोर मुलीला एक प्रकारची उपरती घडवणाऱ्या शेजाऱ्याचं काम केलं समीर शिरवाडकरने. हा मंडळाचा जुना नसला तरी नक्कीच जाणिता कलाकार आहे. प्रेक्षकांच्या मनावर पकड घेण्यासाठी स्टेजवर आरडाओरडा किंवा रडारड करावी लागत नाही हे त्याने सहजपणे दाखवून दिलं. Lata showed unbridled emotions, whereas Sameer’s was a display of one who is firmly in control of one’s sentiments, yet making the point he wanted to.
इथे एक गोष्ट मात्र नमूद कराविशी वाटते. मला स्वत:ला एकांकिकांपेक्षा ३ अंकी नाटके बघायला (आणि कामे करायलाही) जास्ती आवडतात. नाटकाच्या तुलनेत, एकंकिका म्हणजे लग्नाच्या जेवणाला जावं आणि पहिला वरणभात संपल्यावर, पुढचा मसालेभात यायच्या अगोदरच आपोष्णी घ्यायला लागावी, तसं होतं.
चला दिवाळीची सुरुवात तर झकास झाली. आता पुढच्या ४- ५ दिवसांत काय आतषबाजी होते ते बघायचं.
– मनोहर राखे