नटसम्राट या नाटकाचा पहिला प्रयोग झाला त्यावेळी ही भविष्याची नांदी आहे असे कोणाला वाटले होते? परंतु आज हे एक कडवट वास्तव आहे. पाच हजार वर्षांची आर्याची समृध्द परंपरा लाभलेल्या या समाजात स्वत:च्या “जन्मदात्या आई- वडिलांची काळजी घ्या नाहीतर तुरूगांत जा” अशा प्रकारचा कायदा करावा लागतो याहून जास्त दुर्देव ते कोणते?!
सात शतके पारतंत्र्यात काढलेल्या या समाजास सामूहिक न्यूनगंड निर्माण होणे साहजिकच होते. त्या न्यूनगंडामुळे वाणीतून जरी भारताबद्दलचा अभिमान प्रकट होत असला तरीही मनातून या समाजास पाश्चात्यांबद्दल नेहमीच आदरयुक्त आर्कषण वाटतच राहिलेले व परिणामी गेल्या दशकात झालेल्या जागतीकरणा बरोबर “टिकावू नव्हे टाकावु” या अमेरिकन अर्थशास्त्रीय सिध्दांताला (रीप्लेनिशेबल इकॉनॉमी) आलिंगन देता देता हा समाज त्यांच्या मगरमिठीत केव्हा गुदमरू लागला हे त्याचे त्यालाच कळले नाही. नव्याने जन्मलेल्या प्रसिध्दी माध्यमांनी यालाच उन्नती म्हणून समाजाची संपूर्ण भुलावण केली. केवळ नवे कायदे बनवून घसरलेली गाडी पुन्हा रूळावर येणे अशक्य आहे. प्रखर सामाजिक प्रबोधनाची गरज आहे.
असेच चालू राहिले तर या समाजाचे भविष्य वर्तवण्यास महर्षी पराशरांची गरज नाही. अमेरीकन समाजाकडे नजर टाका. आज ऐन चाळीशीत नोकरीवरून कमी केलेले अती-शिक्षित व उच्चपद्स्थ बेकार याप्रकारचा एक अमेरीकन समाज घटक समस्या बनून त्यांच्या समाजासमोर उभा आहे. या घटकाला “फिफ्टी ऍण्ड फार्यंड” अशारितीने संबोधले जाते.
जो “जॉब” न्यूर्याकमधून बंगलोर व पुण्याला येतो तोच “जॉब” येथून पुढे “शांघायला” जायला वेळ लागणार नाही. हात पाय पसरण्यासाठी कर्ज काढून पांघरून मोठे करणे हा उपाय नाही. या भ्रमात राहिलात तर साक्षात भिक्षेची झोळी हाती कधी आली हे कळणार सुध्दा नाही. आधी वैचारीक पांघरून मोठे करा तरच ओघाओघाने आर्थिक पांघरूण मोठे होईल. भारत समृध्द करण्याचा हा एकच मार्ग आहे.
सिंहीण आपल्या छाव्यांना अन्न पुरविते त्यांना शिकार करावयास शिकविते. कालांतराने छावे निघून जातात व ज्यावेळी सिंहीणीच्या अंगची शिकार करण्याची क्षमता संपते त्यावेळी तिचा भुकेने मृत्यु होतो. या ब्रम्हाव्युहातून सुटण्यासाठी आर्यांनी मानवाच्या समाजात रूपांतर केले. त्या समाजाच्या मुलभूत मूल्यांशीच जर प्रतारणा केलीत तर व्याभिचाराचे पाप फेडण्यासाठी पुन:जन्माची वाट पहावी लागणार नाही, हिशेब येथेच पूर्ण होईल.
आपणच भरलेल्या कराच्या रक्कमेतून कोटयावधी रूपये खर्चुन आपलीच दिशाभूल करण्यासाठी प्रचार यंत्रणा बनवणारे राज्यकर्ते निव्वळ ५०० रूपयात “अजामिनपात्र वाँरट” विकणारे न्यायाधीश, वाण्याप्रमाणे दुकान उघडून बसलेले पोलिस अधिकारी, धातांत खोटया ताळेबंदावर निर्धास्तपणे सही करणारे ‘सी.ए’. वृध्द विधवांच्या ठेवी चोरून निर्लेजपणे स्वत:ची घरे सजविणारे सहकारी बँकांचे अध्यक्ष, कर्जाच्या रक्कमेचा मासिक हप्ता भरण्यासाठी केविलवाणी धडपड करणारा “डॉक्टर”, थंडगार पडलेल्या यज्ञंकुडांतील राखेचा “विभुती” म्हणून विक्रय करणारे भट-भिक्षुक व या सर्वांमध्ये ज्याची नितांत गरज आहे तो झिजलेली वहाण सांभाळत ‘एस.टी’च्या लाल डब्यात लोंबकळणारा शिक्षक.
हा आजचा आपला समाज! किती सुरक्षित आहे तुमचे व तुमच्या मुला बाळांचे भवितव्य? हा भारत म्हणे चालला आहे समृध्दीच्या व प्रगतीच्या मार्गावर? तुम्हीच विचार करा, लोकहो व निश्चय करा, झाले तेवढे पुरे झाले आता या पाखंडयांना निरोप द्यायची वेळ आली आहे. सरळ गळी उतरत नसेल तर नाक दाबून ते घश्याखाली उतरवावेच लागेल. पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी हा त्याग अत्यावश्यक आहे. हेच या युगातील कुरूक्षेत्र आहे. या लोकहो धर्म आपल्या कौशल्याची आहुती मागतोय त्यास निराश करू नका.
– सुरिन उसगांवकर, मुबंई