हाँगकाँग मधील मराठी माणूस

मराठी माणूस बिचारा, जिथे जाईल तिथे दुधात विरघळणा-या साखरेसारखा मिसळून जातो. मराठमोळया मनाचं त्रैराशिक साधं आहे भाषाप्रेम, नाटकवेड आणि सांस्कृतिक हौस. हाँगकाँग मध्येसुध्दा तुम्हाला एकवेळ मिशीधारी चिनी माणूस दिसेल पण नाटक न आवडणारा मराठी माणूस शोधूनही सापडणार नाही तरीही हाँगकाँग मध्ये काही मराठीपणा दिलाही पडलेला दिसतो. मराठी माणासांना एकमेकांचे पाय खेचणाऱ्या खेकडयांची उपमा दिली जाते. पण इथे एकमेकांना मदत करणारे हसरे चेहेरे हे गणित चूक ठरवतात. तशीच मराठी साच्याची मध्यमवर्गीय काटकसरही खरेदीत गुंगलेल्या मराठी माणसांच्यागर्दीत विरून गेलेली दिसते. हो…..पण घासाघीस करण्याची आपली हौस मात्र इथे फिटायची काही सोय दिसत नाही मराठी माणसाचं हाँगकाँगशी मेतकूट जमायचं एक कारण मला तरी दिसतं बऱ्याचदा चिनी माणसं बोलताना ‘ला’ शब्दाला पूर्णविरामासारखं वापरतात आणि मराठीत तर’ला’ ची रेलचेलच आहे ….. मला, तुला, आपाल्याला इ.

इथे मराठी माणूस दिसतो तो हौसेच्या मळयात चांदणं वेचताना – मग ती दिवाळी असो वा कोजागिरी, गणेशपूजन असो किंवा पुल-वंदना ! आणि निष्ठापूर्वक बसवलेली नाटकं पाहिली की देशोधेशीच्या सीमा विरघळून, पार मायदेशीच असल्यासारखं वाटतं. म्हणूनच इतक्या दूर परप्रांती, फणसाच्या गाऱ्यागत जपून ठेवलेलं आपलं मराठीपण पाहून कौतुक वाटतं कि हाँगकाँग मधल्या सिंधी महासागरात शिडं ताणून आपलं मराठी तारू डौलाने डोलताना पाहून आनंदाने मन भरून पावतं.

– यतीन सामंत